मैत्री एक्सप्रेस

मैत्री एक्सप्रेस
=============

एखाद्या दिवशी लोकलने जाता जाता.. शाळा कॉलेजमधली एखादी मैत्रीण भेटते आणि मग जुळलेल्या सुरांची मैफिल पुन्हा एकदा रंगते. आनंदाच्या चित्कार पाठोपाठ उत्सुकतेपोटी लांबलेली प्रश्नावली.. गहिवरून टाकते.. तुझी माझी ख्यालीखुशाली विचारत विचारत शब्दांची पाखरं चिवचिवत पुन्हा जुन्या दिवसांमध्ये हलकेच घेऊन जातात..   आणि मग तू, मी भोवती फिरणारे संवाद त्या त्या दिवसांच्या उजळणीत विरतात. तेव्हाच्या आठवतील तितक्या नावांच्या हजेरीने दोघी वा तिघीच समोर असताना रजिस्टर पूर्ण भरलं जात.

कोण कुठे आहे.. काय करतंय.. कोण किती कुठे शिकतंय.. कोण कोणाच्या संपर्कात आहे.. कोणाला कशी नोकरी मिळाली आहे.. कोणाच लग्न झालंय.. कोणाला किती मुलं आहेत.. मुलं नातवंड कशी आहेत.. काय करतात.. ओळख जितकी जुनी आणि भेट जितक्या दिवसांनी तितकी मोठी प्रश्नावली.

लोकलने प्रवास करणाऱ्या प्रत्येकानेच त्या क्षणामधली एक्साइटमेंट कधीतरी अनुभवलीच असेल नाही..!

अशाच कधीतरी पिकल्या केसांच्या दोन शाळकरी मैत्रिणी अकल्पितपणे एकमेकींसमोर येतात.. ओळखीच्या दिसणाऱ्या चेहऱ्याची ओळख पटता पटता बराच वेळ जातो.. संभ्रम, संकोच आडवा येतो.. आणि उतरता उतरता ओठाबाहेर पडलेल्या हाकेला समोरून प्रतिसाद मिळतो.. अग तू लता ना.. करत निवांत बसलेली आजीबाई टुणकन उठून पुढे येते.. हातात हात घेतले जातात.. मी कधीची म्हणत होते कालिंदीसारखी दिसतेय ही, किती वर्षांनी दिसते आहेस गं..! म्हणेपर्यंत लताचं स्टेशन येत सुद्धा. लोकल थांबून पुन्हा सुटेपर्यंत जमेल तेवढं एकमेकींना डोळ्यात साठवत.. न शमलेली उत्सुकता उराशी घेऊन पुन्हा भेटण्या न भेटण्यासाठी दोघी आपापल्या विश्वात ओढल्या जातात. शांत तळ्यात टप्पकन पडल्या पानाने झरझर तरंग उठावेत आणि विरून जावेत तसंच काहीसं.. खऱ्या खोट्याची शंका यावी इतकं स्वप्नवत..!

पण नेहमी असच होतं अस काही नाही.
कधी कधी अशाच कोणत्यातरी चौरस्त्यावर वेगळ्या झालेल्या मैत्रिणी पुन्हा एकदा भेटतात.. आणि मधल्या वर्षातला दुरावा होत्याचा नव्हता होऊन एक छानसा गृप पुन्हा एकत्र हसू खेळू लागतो.

अमृता..   पल्लवी..   आणि स्मिता या तिघीही अशाच एका दिवशी बारावीनंतर जवळ जवळ सहा-सात वर्षांनंतर भेटल्या,   आणि मग भेटतच राहिल्या.

आश्चर्य.. आनंदाचा उमाळा.. उत्सुकता, जिज्ञासा.. वगैरे सगळे टप्पे टप्प्याटप्प्याने पार पडले.
अमृताच एम. बी. ए पूर्ण होत आलं होतं त्याच जोडीने ती एका मोठ्या कंपनीत जॉबही करत होती.   पल्लवी एका नामांकित ऍडव्हर्टायझिंग कंपनीत मार्केटिंग विभागात काम करीत होती..   तर स्मिताने चांगल्याश्या बॅंकेत छानसा जॉब मिळवला होता.   थोडक्यात सगळ्याजणी आपापल्या जीवनात सेटल होण्याच्या मार्गावर होत्या.   नवी नवी यशस्वितेची शिखर तिघींनाही खुणावत, सुखावत  होती.   त्याचबरोबर शाळा कॉलेजचे फूलपंखी दिवस उडून गेल्याची जाणीव प्रत्येकीच्या बोलण्यात अधून मधून डोकावून जात होती..   कधी आठवणी तर कधी स्वप्नांकडे झुलत झुलत वर्तमानाचा काटा पुढे पुढे सरकत होता..   तसे त्यांच्या बोलण्यातले विषय ही एक एक स्टेशन ओलांडून पुढे पुढे सरकत होते.

असेच बोलत बोलत त्यांची मैत्री एक्सप्रेस त्यांच्या आजच्या अगदी जटिल, आणि जिव्हाळ्याच्या विषयावर धावू लागली..
प्रत्येकीच्याच मनात, जीवनात उथलपुथल करणारा अनिवार्य विषय म्हणजे "कांदेपोहे"
सध्या स्मिताच्या घरी या पदार्थाचा रतीब चालू होता.. त्या निमित्तानं तिघी आपापल्या समाजातल्या चालीरीती, अपेक्षा, मागण्या, आणि भावी आयुष्याबद्दल बोलून घेत होत्या. आता जरी एकटी स्मिता कढईत असली तरी पल्लवी आणि अमृता चाळणीत होत्याच की.

स्मिताच्या घरात गेली वर्ष दोन वर्ष वरसंशोधन चालू होत. स्थळांची माहिती मिळवणं, पत्रिका / जन्मकुंडलीतील ग्रहांची जुळवाजुळव करणं, तोच तो दाखवून घेण्याचा कार्यक्रम, त्यात विचारले जाणारे तेच ते प्रश्न, कितीही नाकारलं तरी त्रासदायक वाटतातच. स्मितासाठी आता ते सगळं संपत आलं होतं. काही दिवसांपूर्वी त्यांच्या एका फॅमिली फ्रेंडकडून तिच्या घरी लग्नाचा प्रस्ताव आला होता.. पत्रिका जुळली होती, तिची तिच्या घरच्यांचीही या लग्नाला काहीच हरकत नव्हती.. आणि आज ती त्या मुलाला पहिल्यांदा बाहेर भेटायला जात होती. अशावेळी तिच्या या सख्यांनी तिला हास्यविनोदाच लक्ष्य केलं नसतं तरच नवलं. संपत आलेल्या ताणामुळं, आणि नव्या हुरहुरीने उल्हसित होवून स्मिताही तिच्या सख्यांना मनमोकळी उत्तर देत होती. अशा वेळी मला नवरात्रीतल्या भोंडल्याची.. भोंडल्याच्या गाण्यांची वारंवार आठवण येत होती. त्याच त्या काळज्या.. त्याच चौकश्या, ती आणि तशीच आंबटगोड उत्तर. फक्त आजच्या काळातली. हाच काय तो फरक.

सांग सांग सखे, तुझं सासर कसं
सासर कस गं सासर कसं..?

कोण्या दिशेस जाते वाट..
सांग महालाचा थाट
कसा गवसला मनमित..
त्याची तुजवर किती प्रीत..?

स्मिताही त्यांची उत्कंठा ओळखून, त्यांची मस्करी समजून घेत विचारल्या प्रश्नांची आनंदानं उत्तर देत होती.

नाही ओलांडायची वेस
सोडायचा नाही देश
घर दार उबदार
जणू दुसरं मायघर..!

माहितीतली माणसं.. आई वडिलांच्याच तोलामोलाच घर.. जवळपास एकसारखंच वातावरण आणि रीतिरिवाज. बदलणार होतं ते फक्त तिच वास्तव्य अन नातं.. आणि त्याचबरोबर या एवढ्या बदलानं तिच पूर्ण आयुष्यही बदलून जाणार होत. याची कल्पना तिला व तिच्या सख्यांना होतीच. सध्या साडेसात आठपर्यंत ताणून देणाऱ्या स्मिताला लग्नानंतर तसंच वागून चालणार नव्हतं. आणि कितीही साम्य असलं तरी घराघरात फरक हा असतोच नाही..!

तोच धागा पकडून त्या पुढे बोलू लागल्या..

माय घर ते माय घर
कशा नाही त्याची सर..
पंखांखाली जगताना
कधी लागत का गं ऊन..!

लग्नानंतर स्मिता आतासारखी हवा तेवढा वेळ तिच्या मैत्रिणीं सोबत भटकू शकेल का..? रात्र रात्र जागून टीव्हीवरचे कार्यक्रम किंवा पिक्चर बघू शकेल का..? आठ-आठपर्यंत झोपून मिळणारा आयता चहा तिच्या हातात कोणी देईल का..? आज पर्यंत घरात काही काम केली असतील तर ती केवळ हौस म्हणून ते तसंच मनमौजी बनून यापुढे तिला राहता येईल का..?
हे मुळी विचारण्याचे प्रश्नच नव्हते. या गोष्टी आता अशा राहणार नाहीत हे प्रत्येक मुलीला माहीत असत, त्यामुळेच ती होणाऱ्या बदलांमध्ये स्वतःला रुळवून घेण्यासाठी तयारही असतेच.

भल्या पहाटे उजाडेल
नव्या घरी दिवस..
पेंगुळल्या डोळ्यांनी
गिरवेन संसाराचा पाठ..!

सासू माझी अध्यापक
घरामध्ये तिचा धाक..
नारळीच्या झाडावाणी
कणा लवचिक ताठ..!

स्मिता तिच्या भावी आयुष्याच्या सुंदर भावविश्वात दंग होऊन नव्या घराच नव्या जीवनाचं चित्र रंगवू लागते..   तिच्या आताच्या उत्फुल्ल भावअवस्थेत भिजून चित्रातले  सगळे रंग गुलाबी होऊन जातात..   की गुलाबाच्या काट्यांच्या जागीही फुल उमलू लागतात.

इथवरच थांबली तर ती छेडछाड कसली..  

सांग सांग सखे, तुझं सासर कसं
सासर कस गं सासर कसं..?

आता याच प्रश्नाच उत्तर उरलेल्या दोघींनाही देणं भाग असत.

अमृता सिंधी..
तिला सगळ्यात आधी आठवत ते घराघरातलं पुरुषांच मद्यपान करणं.
ती सहजच विनोद करावा तसं बोलत राहते..

पैसा पैसा जोडत जीवाचा
मोडून जाईल पापड
खर्र्म खुर्र्म चखणा चाखत
बुडवून पेल्यात रात
दिवस उगवेल बारानंतर
मी उठेन ती असेल पहाट
सूर्योदयाशी भेट न गाठ

पल्लवी गुजराथी..
तिने त्यांच्याकडील चार-चार दिवस चालणारी लग्न, जेवणावळी.. दिखाव्याचा सोस वगौरे गोष्टी बोलून घेतल्या.

सांगायची गोष्ट म्हणजे तिघींच्या या बोलण्यात कोणत्याही प्रकारचा उपहास किंवा नाराजी नव्हती.

त्यानंतर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे घेतला जाणारा हुंडा.. त्यांच्याकडून त्यांच्या माहेरच्यांकडून असलेल्या अपेक्षा.. स्वतःसाठी, व घरातल्यांसाठी न मिळणारा पुरेसा वेळ, घर आणि नोकरीतली दुहेरी कसरत अशा बऱ्याच विषयांवर त्या बोलत राहिल्या.. बोलण्याचा सुर मात्र कायम विनोदी.

मी त्यांच्याजवळच उभी असल्याने त्यांचं जवळ जवळ सगळं बोलणं माझ्या कानावर पडत होतं. घर, रीतिरिवाज, हुंडा, स्त्रियांच स्थान या सगळ्याच बाबतीत त्यातल्या त्यात महाराष्ट्रीयन मुली सुखी आहेत. असच त्यांच्या संवादातून जाणवलं.

तरी इथे तक्रार अशी कोणाचीच नव्हती.. या गोष्टी अशाच असतात आणि त्या तशाच स्वीकाराव्या लागतात.. हे त्या तिघींनीही मनोमन मान्य करून टाकलं होत. आणि त्यातूनही जर कधी काही खटकलंच तर त्यावर विनोद करायचे.. आणि भरभरून हसायचं असंच सध्यातरी त्या करत होत्या.. आणि कदाचित कायम करत राहतील. कधी कधी काही गोष्टी फक्त बोलल्यानेही खूप मोकळेपणा येतो नाही..?

पूर्वीच्या भोंडला, मंगळागौर वगैरे बायकी कार्यक्रमांइतक्याच आजच्या लेडीज डब्यातल्या या अशा मैफिली आजच्या सांस्कृतिक स्वास्थाचा अविभाज्य भाग आहेत. अस म्हणावंस वाटत.

=======================
स्वाती फडणीस.................. ०३-०८-२००९