पहिली खेप ( लोकल गोष्टी-२२)

बाई म्हटलं की तिला बाईपणाच्या भोगांतून जावंच लागतं. मग ती शिकली सवरलेली, नोकरी करणारी, घर चालवणारी कोणीही असली तरी (शंभरात नव्यांणनौ वेळा) स्त्रीपण काही चुकत नाही.. आजच्या समानतेच्या युगात नोकरी धंदा करताना येणाऱ्या जबाबदाऱ्या, धावपळ, ताण यांच्या सोबत पोटातल्या बाळासकट पळापळ करणाऱ्या बऱ्याच जणी आता वरचे वर आपण पाहतो. लोकलच्या डब्यात एक हात पोटावर ठेवून उभ्यानं प्रवास करणाऱ्या या "वुड बी मदर्स" ही रोजच्याच दृश्याचा भाग आहेत. त्यातल्या एखादीच्या पोटाचा डोलारा बघून ( तिला काही लागणार तर नाही.. ) आपल्यालाच भीती वाटते.. तर एखादीला उभं राहिलेलं बघून कोणीतरी कणव येऊन आपली जागा देऊ करते.. त्यातलील्या बऱ्याच जणी पुढे बाळाबरोबर जास्त काळ राहता यावं म्हणून अगदी पूर्णं दिवस भरेपर्यंत कामावर जातात.. माझ्या मैत्रिणी सारखी एखादी तर ऑफिसवरून येताना लेबर पेन सुरू झाल्यावर स्वतःच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होऊन तिथून घरच्यांना फोन करते.. (आता मोबाईल फोनमुळे निदान घरी संपर्क साधणे सोपे झालेय. ) हे इथंपर्यंत ठीक आहे.. त्या पुढची गोष्ट म्हणजे पेपरमध्ये वाचलेली प्रवासा दरम्यान झालेल्या एखाद्या प्रसूतीची बातमी. तेव्हा सगळ्यात आधी येणारी प्रतिक्रिया हे "असं कसं होऊ शकतं. " हीच असते. या बायकांना हे एवढंही कळत नाही का?.. इतकी वेळ येईपर्यंत त्या स्वस्थ कशा राहू शकतात.. वगैरे.. वगैरे.. हे म्हणजे अगदी पिक्चर मधल्यासारखं आहे नाही.. पाच एक मिनिटं आ.. ऊ.. आरडा ओरडा.. बायकांनी घोळका करून केलेला आडोसा.. आणि हातात दिलं जाणारं नाहूमाखू घातलेलं बाळ. कधी कधीतर अशा बातम्या खोट्याच वाटतात.

दोन वर्षांपूर्वी तर म्हणे एका बाईने ट्रेनच्या टॉयलेटमध्ये मुलीला जन्म दिला आणि ती तिथून चक्क टॅकवर पडली. आणि अपुऱ्या दिवसांची ती मुलगी तिथेच तब्बल दोन तास घाणीत पडून राहिल्या नंतर जिवंत सापडली.. नाहीना खरं वाटत..? मला माझ्या प्रतापी मैत्रिणीची हकीकत माहीत नसती तर मी ही या असल्या बातम्या वाचण्या किंवा विश्वास ठेवण्याच्या फंदात पडले नसते.

या बद्दल बोलताना की नंतर कशावरून कोणजाणे आमच्या घरी वरकाम करणाऱ्या सुनंदाताई त्यांच्या पहिल्या खेपे बद्दल बोलू लागल्या.. सात- आठ भावंडांतल्या एक अशा सुनंदाताई लग्न करून सासरी नांदायला आल्या.. नवरा चांगला हट्टाकट्टा नाकीडोळी बरा.. घरची परिस्तिती तेवढी हलाखीची.. दहा बाय दहाच्या एका झोपड्यात एक मोठा आणि एक धाकटा असे दोन दीर मोठ्या दिराची बायका पोर.. एक नणंद आणि हे दोघे असं सात जणांना राहावं लागायचं.. दिवसभर राबल्यानंतर रात्रीला जेवता यायचं नाहीतर उपवास घडायचा.. त्यात मोठ्या जावेचा वचक.. कडक डोहाळे.. जीव नकोसा करून टाकायचे.. सातवा झाला, आठवा सरला, नववा संपत आला.. माहेरून दोन-दोनदा बोलावणी येऊन गेली एकदा म्हातारे वडील स्वतः मुलीला न्यायला म्हणून येऊन गेले तरी एक नाही नि दोन नाही कोणी माहेरी पाठवायचं नाव काढेना दिवस भरत चालले तसं मन हळवं होत गेलं कधी रडूस वाटायचं कधी काही हवं नको व्हायचं.. आईची आठवणं यायची मन झर्र.. कन माहेरी पोहचायचं.. पाय मात्र जागीच अवघडून पडायचे.. बाळंतपणाचे चार-आठ दिवस तरी निवांत जावे म्हणून जीव उसळी घ्यायचा.. झालं एक दिवस अगदी राहवेना तसं पिशवीत कपडे भरले आणि निघाल्या माहेराला..

वय वर्ष सतरा दोन बाळंतपणं झालेली जाऊ असेल पंचवीशीच.. ती आली सोबत, पण तिला तो तिचा अपमान वाटला. रागारागात दोघी घुम्यानं लोकलमध्ये चढल्या या इथं अंबरनाथला जायचं होतं. वेळ मात्र सरता सरेना.. जिवाची घालमेल वाढत गेली.. अंग ओल कच्चं झालं.. कच्च टाकत दोन्ही पायावरून खाली पिवळट लालसर पाण्याची धार लागली.. काय होतंय काय होणार आहे काही म्हणता काही कळेना.. सोबत जाऊ होती तिला कळलं असेल तरी पण ओठांची कडी काही खुलेना.. कसंबस्स घर गाठलं शेजारीच डॉक्टरीण होती तिथं पोहोचलो न पोहचलो आणि शेवटची कळ आली.. अंगावरून जायला लागल्यापासून दवाखान्यात जाईपर्यंत मंतरल्यासारखं होऊन गेलेलं काय होतंय कोणाला होतंय काही काही म्हणता कळलं नाही.. नंतर डॉक्टरिणीनं धोका सांगितला पोर जाता जाता रायलं.. मला मेलीला अक्कल नव्हती पण उलट्या काळजाच्या जावेला कळायला नको..! काही सांगणं समजावणं नाही की धीर देणं नाही. मी आणि माझं बाळ दोघेच एकमेकांच्या सोबतीला. पोराचं काही बरंवाईट झालं असत तर कोणच्या तोंडानं यांच्या समोर गेले असते. माझी मी तरी उभी राहिले असते की नसते कोणजाणे.

हे मात्र समजूतदार हो पुढे जिथे कुठे मला जरूर पडली तेव्हा तेव्हा पाठीशी उभे राहिले.. एकाच्या जागी दोन-दोन नोकऱ्या केल्या.. पै पै जोडला बघा.. पोरांना मोठं करताना खूप जणांनी देवासारखी मदत केली. मी ही कोणत्या कामाला कोणाच्या अडचणिला कधी म्हणून नाही म्हटलं नाही. सोन्यासारखी पोरं आहेत माझी.!

सुनंदाताई सांगत गेल्या आणि मी अंगावर काटा आणणारा तो भीतीदायक प्रसंग त्यांच्या शब्दांतून अनुभवत राहिले.

====================
स्वाती फडणीस............. २७-०२-२०१०