काही नमुने.. ( लोकल गोष्टी-१७)

कोणती ही सेवा म्हटली की ती यशस्वीपणे दीर्घ काळ चालत राहावी यासाठी त्या सेवेवर सेवा शुल्क आकारणे, हे सेवा शुल्क सर्वां कडून भरले जाते ना? याची त्या सेवेचा कोणी गैरवापर करत नाहीन याची खबरदारी घ्यावीच लागते. आपली लोकल ही त्याला आफवाद नाही. मग त्यातूनच वेळच्या वेळी तिकीट, पास, काढणे ( पास कधी संपतो हे लक्षात ठेवणे ) तो तिकीट चेकरला दाखवणे या सारख्या गोष्टी लोकल प्रवाशांच्या जीवनाचा भाग बनून जातात. ( तरी एकाच दिवशी एकाच प्रवासात तीन-तीन चार-चार वेळा पास दाखवायला लागणं म्हणजे जरा अतीच होतं नाही? ) इथे लोअर परेल स्टेशनवर तर बऱ्याचदा एक एका वेळी दहा बारा टीसी ओळीनं उभे असतात. टीसीनं थांबवलं की पर्स मधून पास काढा तो टीसीनं बघे पर्यंत थांबून राहा यात बराच वेळ मोडतो, त्यामुळे पास असलेले प्रवासी ही टीसीला चुकवून पुढे जायला बघतात.

लोकलने रोजच्या रोज कार्यालयात जाणारा नोकरदार वर्ग तसा मुद्दामहून हे शुल्क चुकवायला जात नाही. तरी कधीतरी पास संपल्याच लक्षात न आल्यानं, विसरल्यानं त्याला टीसीच्या कारवाईला सामोरं जावं लागतं. (मी ही आज पर्यंत दोनदा दंड भरला आहेच की. ) असे तिकीट चेकरने पकडलेले सहप्रवासी लोकल मध्ये नेहमीच बघायला मिळतात. कधीच पास-तिकीट काढायला विसरला नाही असा एकही लोकल प्रवासी नसेल. ( असेल ही बाबा ) तरी जेव्हा कोणाकडे पास नाही म्हणून टीसीकडून कोणाला बाजूला घेतलं जातं तेव्हा त्याला बऱ्याच जणांच्या नजरांची शिकार व्हावं लागतं.. त्यामुळे, किंवा आपण तिकिटाशिवाय प्रवास करतोय या अपराधी जाणीवेतून, वा आता खिसा कापला जाणार या विचारानं तऱ्हे तऱ्हेचे प्रवासी वेग-वेगळ्या प्रकारे वागताना दिसतात. असच एखाद्या दिवशी जर तीन-चार नमुने एकदम बघायला मिळाले..

मी नेहमी प्रमाणे ऑफिसला निघालेले. लोकलमध्ये जरा गर्दीच होती, मला माझी ( मला हवी असलेली ) नेहमीची जागा मिळाली नाही. ती जागा एका स्मार्ट मुलीने आधीच बळकावली होती. अंगात फिकट खाकी रंगाचा लाकडी बटण असलेला सिव्हलेस टॉप, काळ्या रंगाची स्लॅक्स, पायात ( चटईसाठी वापरतात तशा )गवती काड्यांच्या स्लीपर्स, गळ्यात डार्क ब्राऊन रंगाच्या मोठाल्या स्फटिकांची लांब लचक माळ, पिंगट कुरळ्या केसांचा खांद्यापर्यंत येणारा स्टेप कट, मांजरी सारखे घारोळे डोळे, तरतरीत चाफेकळीसारखं नाक, दोन्ही हातांनी पूर्ण उघडून धरलेला बिझनेस एक्सप्रेस, अधाश्यासारखी पेपरमधल्या आकड्यांवरून फिरणारी नजर, एका हातात कितीतरी वेळ नुसतंच पकडून ठेवलेलं बोंनबोंनच बिस्किट, जणू काही पोटात भुकेनं खड्डा पडला आहे आणि त्यामुळे पोटावर दाब देताना आलेला पाठीचा बाक. अगदीच नाईलाज म्हणून ती पेपर वरून नजर फिरवता फिरवता एखादा बिस्किटचा तुकडा चिमणीच्या दातांनी तोडायची आणि परत बकाबका अंक नजरेत साठवून घ्यायची. आधी मला हवी असलेली जागा तिने पटकावल्यामुळे माझं लक्ष तिच्याकडे गेलं आणि मग तिच्यातल्या एक एका वेगळेपणात गुंतून पडलं. तेवढ्यात नेहमी दिसणारी तिकीट चेकर पास-तिकीट बाहेर काढायची सूचना देत डब्यात प्रकट झाली.

मी माझा पास काढून तयार ठेवला.. ती तिकीट चेकर मात्र तो न बघताच डबाभर तिकीट-पास तयार ठेवण्याची सूचना देत फिरत होती. ( मी दाराशीच उभी राहत असल्याने असं बऱ्याचदा होतं. ) तिने चेक करायला घेतलेला पहिलीच प्रवासी पकडली गेली.. या महिलेचा पास नुकताच संपला होता.. आणि तिला तो संपला असल्याचे माहीतच नव्हते. तिने न बघताच पास तिकीट चेकर समोर सादर केला.. तो संपलेला आहे असे तिकीट चेकरकडून समजल्यावर तिची अवस्था अगदी दैनिय झाली होती. ( डब्यानं फाटून तिला पोटात घ्यावं किंवा ती जागच्या जागी अदृश्य व्हावी असं काहीसं तिच्या मनात चाललेलं असावं असं तिच्या एकूण हावभावातून दिसत होतं ) पकडलं गेल्यानंतर दंड भरण्या इतके पैसे ही तिच्या पाशी नव्हते. त्यामुळे भीती, अपराधाची भावना, लाज यांच्या एकत्रित आविष्कारातून ती रडवेली दिसू लागली.. टी सी ने तिला तशीच खेचून स्वतः बरोबर घेतलं आणि ती डब्यातल्या बाकीच्या प्रवाशांचे पास बघू लागली.. तिची सराईत नजर पास स्कॅन केल्या प्रमाणे बरोबर पास संपण्याच्या तारखेवरून फिरून एक-एक पास हाता वेगळा करत होती.

तिला आता आणखीन एक फर्स्ट क्लासचे तिकिट नसलेली प्रवासी सापडली.. ही महीला बरीच प्रौढ होती.. तिच्या जवळ सेकंड क्लासच तिकीट होतं. या आजींना मी डब्यात चढताना पाहिलेलं.. तेव्हाच त्यांच्याकडे फर्स्ट क्लासचं तिकीट नसणार हे ही लक्षात आलं होतं. (हल्ली तसं ते बऱ्याचदा कळतंच. एखादी कोणी अगदीच नवखी किंवा अनभिज्ञ अडाणीच वाटली तर तिला मी सेकंड क्लासच्या डब्याकडे पाठवतेही. ) आजी बाई कमीत कमी साठीच्या असाव्यात, एक पोरगेलीशी बाई त्यांना स्टेशनवर सोडायला आली होती. तरी त्यांच्या सराईतपणे डब्यात चढण्यावरून काही त्या नवख्या वाटल्या नाहीत. त्यांना माहीत होतं की सेकंड क्लासच्या डब्यात जास्त गर्दी असणार, आणि मला त्यांचं वयही दिसत होतंच.. त्यामुळे असेल पण मी त्यांना टोकायच्या (काही सांगायच्या )  भानगडीत पडले नाही. ( तसं ही रोजच्या रोज काही टी सी डब्यात येतेच असं नाही ) जातील आरामात म्हणून शांत राहिले खरी मात्र आज काही तसं व्हायचं नव्हतं. टी सी ने आजींना पकडलं खरं.. तरी आजी काही ऐकेनात. त्यांचं आपलं एकच म्हणणं त्या पुढे रेटत होत्या.. माझ्याकडे तिकीट आहे, मला काही फर्स्ट क्लास नि सेकंड क्लास कळत नाही.. माझी सून मला या डब्यात बसवून गेली.. ( काही चूक असेलच तर ती माझ्या सुनेची.. तुम्ही आणि ती काय ते बघून घ्या ) मला काही माहीत नाही बुवा.

या अशा प्रवाशांना टी सी ही चांगलेच ओळखून असतील नाही. ( हे अशा प्रकारे कोणी काही सांगायला लागल्यावर त्यांच्या मनाची कधी द्विधा अवस्था होत असेल का? की आपलं काम विना तिकीट प्रवाशांना पकडून दंड करणं तेवढंच आपण करायचं म्हणून सरसकट सगळ्यांना एक सारखे मापत असतील? एखादी नातलग किंवा मित्र परिवारातील, कोणी ओळखीची व्यक्ती जर विनातिकीट समोर आलीच तर त्या काय करत असतील..? ) आजींना ना तर त्यांनी कोणता अपराध केलाच नाहीये असे वाटत होते त्यामुळे अपराधीपणाची भावना दिसणं शक्यच नव्हतं.. कोणती भीती ही त्याच्या गावी नसावीच.. आणि लाज त्यांनी कोळून प्यायली असावी अशा थाटात त्या पूर्णं वेळ निश्चिंतपणे बसून होत्या. त्यांच्या फार नादी न लागता टी सी बाईंनी आपले काम चालू ठेवलेच होते.. मध्येच आजींच्या वटवटीला प्रत्योत्तर म्हणून ती "आपको मेरे साथ आना होगा. " एवढंच बोलत होती.

दरम्यान पास संपण्याचा शेवटचा दिवशी असलेल्या दोन स्टायलिश सुंदऱ्यांनी टीसीला पास संपल्या नंतर त्यावर किती दिवस प्रवास करता येतो म्हणून विचारलं.. तसंच तसा तो निदान एक दोन दिवस तरी करता आला पाहिजे असं ही सुनावलं..! त्यावर टीसीनी तिच्या कडचं छापील उत्तर त्यांना ऐकवलं. पास संपतो त्या दिवशी तो संपतो. हा नियम मी बनवलेला नाही. आणि खबरदारी म्हणून तुम्ही पास संपण्याच्या तीन दिवस आधी ऍडव्हान्समध्ये पास काढू शकता. ( हे मला ही नवीनच होतं. ) मग तो नसू शकण्याचे कारणच उरत नाही नाही का?

डब्यातल्या एका बाजूच्या प्रवासींचे पास तपासून ती बाहेर आली आणि पलीकडच्या दाराजवळ उभ्या असलेल्या प्रवासींचे पास बघू लागली.. त्या तिथेच ती माघाचची हातात बिस्किट घेऊन पेपर वाचणारी मुलगी उभी होती. आधी इतकीच एकाग्र. तिकीट चेकर मॅडम या मुली जवळ पोहल्या बरोबर जराही वेळ न दवडता तिने भरमसाठ क्रेडिट कार्ड नि खचाखच भरलेल्या पाकिटातून शंभर शंभर रुपय्याच्या चार करकरीत नोटा काढून तिच्या हातात ठेवल्या.. आणि पुन्हा पेपरमध्ये बुडून गेली. टी सी ही पास चेक करत पुढे सरकली. तेव्हा मात्र तिला या मुलीने हटकलं. आणि " माय रिसीट? " म्हणत टीसीला तिचे काम पूर्ण करण्याची आठवण करून दिली. टीसीनी तिला कुठून कुठे प्रवास करत असल्याच विचारून रिसीट तयार करून तिच्या सुपूर्त केली.. आणि पुढे चालती झाली तोच तो खर्जातला कडक आवाज पुन्हा एकदा गरजला.. " गिव्ह मी माय चेंज फर्स्ट, आय हॅव टू गेट डाउन" आता त्या टीसीची खजील व्हायची वेळ होती. तिच्याकडे या मुलीला परत देण्यासाठी पुरेशी चेंज नव्हती. मग पाच-सहा प्रवाशांकडे मागून मागून तिला सुट्या पैशांची तजवीज करावी लागली. या मुलीचा अभिरभावच असा काही होता की त्यापुढे टीसी तिचा खाक्या टिकवू शकली नाही. हे सगळं मी आवक होऊन बघत होते. काय नव्हतं त्या छोट्याश्या कृतीत. निर्भीडपणा, आपली चूक मान्य करणं, त्या चुकीचा दंड तत्काळ अदा करणं, आपला हक्क वसूल करणं. ती नुसतीच दिसायला स्मार्ट नव्हती. ( मग ही अशी मुलगी पास काढण कसं विसरली..? )

टीसीचा आणि त्या मुलीचा हिशोब पूर्णं झाला होता..   ती मुलगी आता तिच्या इच्छीत स्थानकावर उतरण्यास मोकळी होती टीसीला उरलेला डबा तपासायचा होता.. ( त्या आजी आणि टीसीनी पुढे काय केलं हे कुतूहल तस्सच ठेवून.. पास दाखवत मलाही उतरायचे होतेच. ) दृश्य तसं नेहमीचंच पण त्यातल्या विविधतेमुळे खूप रंजक वाटून गेलं.. वेगवेगळ्या प्रवाशांच्या इतक्या वेगवेगळ्या तऱ्हा लोकल ट्रेन इतक्या आणि कुठे बघायला मिळणार नाहीत..   आणि म्हणूनच ( मी उतरले किंवा चढलेच नाही तरी.. )  लोकल आहे तोवर लोकल गोष्टी संपणार नाही.

================================
स्वाती फडणीस..................................... ०९-११-२००९