अच्छा तो हम चलते है..! ( लोकल गोष्टी-२८)

माझा आतापर्यंतचा सगळाच लोकल प्रवास अगदी निर्विघ्नपणे झाला आहे.. कसली दगदग नाही, गाड्यांची बदला बदली नाही, किंवा थकवून टाकणारा.. कंटाळवाणा लांबलचक प्रवास नाही. मी जो काही प्रवास लोकल मधून केला तो आरामशीर हवंतर सुखाचा म्हणूया.

कॉलेजला जायला लागल्यापासून या प्रवासाची सुरुवात झाली.. तेव्हा मी बांद्रा ते व्ही. टी. ( आताच आपलं छत्रपती शिवाजी टरमिनल) अशी हार्बर लाइन ने येजा करायचे.. बांद्र्याला चढायचं ते सरळ व्हीटीला उतरायचं येतानाही तसंच.. जागेची पकडापकडी नाही की उभ्यानं लटकणं नाही. कधी कधी खिडकी मिळायची नाही एवढंच काय ते सुखात दु:ख. तेव्हाची ती पाच वर्ष केव्हा आणि कशी उडून गेली कळलंच नाही.

त्या पाच वर्षांनंतर तब्बल चार वर्ष माझी आणि लोकलची गाठभेट अशी झालीच नाही असंच म्हणायला हवं.. पण म्हणतात ना एकदा सायकल/ पोहायला शिकलेला माणूस ते पुन्हा जन्मात विसरत नाही. तसंच एकदा लोकल प्रवासाची ओळख झाली की तिही पुन्हा कधीच विसरली जात नाही.

चार वर्षांच्या दीर्घ काळानंतर कधी खंड पडलाच नाही इतक्या सहजतेनं मी चर्चगेटाला जाणारी लोकल पकडली.. फक्त या वेळेला सांताक्रुझ स्टेशनातून. या वेळी पूर्वी पेक्षा गर्दी जरा वाढलेली.. चढताना बसायला मिळेलच याची खात्री नसायची आणि इच्छाही नसायची जाता येता आधीच्या ऑफिसातली मैत्रीण सोबतीला असल्यावर उण्यापुऱ्या अर्ध्या तासासाठी बसलं पाहिजे असं वाटायचंच नाही. तसंही दिवसभर एका जागी चिकटवल्यासारखं बसून राहिल्यावर उभंच राहायला पाहिजे..! तर तशा आम्ही येता जाता उभ्यानं गप्पामारत प्रवास करायचो. या काळात मी लोकल प्रवासाची सगळ्यात जास्त मजा लुटली.
त्याचं पूर्ण श्रेय माझ्या त्या मैत्रिणीला. जरूर, अनिवार्यता, किंवा उशीर होतोय म्हणून नाही तर निव्वळ मजा म्हणून मी तिच्या सोबत बांद्र्याला स्लो लोकल सोडून फास्ट लोकल पकडायचे.. आमची नेहमीची लोकल आणि ती फास्ट लोकल याच्या वेळा आशा काही काटाकाट्टी होत्या ना..! की उतरल्या उतरल्या बेछूट पळत सुटलं तर आणि तरच ही लोकल गाठता यायची.. ती ही खचाखच भरलेली इतकी खचाखच की आम्हाला मग लगेजच्याच डब्यात चढणं शक्य असायचं. मी एकटीनं हा असा एवढा पराक्रम कधीच केला नसता. आता आठवलं की खूप मज्जा वाटते. लगेजच्या डब्यातल्या त्या कोळिणी त्यांच्या त्या माश्याच्या वासाने घमघमणाऱ्या टोपल्या त्यांमधून निथळणारं ते पाणी.. बाई.. बाई.. बाई..!!! त्यात मी, कशी काय चढायचे ते देवच जाणे. त्या वेगळ्याच अनुभवासाठी खरं तर मीनाचे आभारच मानायला पाहिजेत.

काही काळ का होईना मी माझ्या बघ्याच्या भूमिकेतून बाहेर येऊन काहीतरी वेगळं वागले.

त्या कायम साठी पुरून उरण्याऱ्या वर्षानंतर तीन वर्षांची सुट्टी झाली.

पूर्ण वेळ घरी. कधी बरं वाटायचं तर कधी खूप मरगळ यायची.. आणि तरी बाहेर पडायला नकोच वाटायचं.! या तीन वर्षांनंतर जेव्हा लोकल पकडली तेव्हा खूप फरक जाणवला.. माझ्यात, गर्दीत, आणि प्रवासात. एकदा तर लोकलचा ब्रिज उतरताना स्केटींग करावं तशी सरसर घसरत दहा बरा पायऱ्या खाली येऊन आदळले. (नशीब हात पाय काही मोडलं नाही. ) पण तरीही हा प्रवासही काही वाईट नव्हता. सांताक्रुझ ते लोअर-परेल आधीच्या प्रवासाच्या निम्मा. तेव्हाच्या त्या पहिल्या एक-दोन आठवड्यातच गाडीच्या तालात झुलता झुलता जीवन गाडी ही कविता स्फुरली. मोकळी हवा.. तो ताल.. आणि नव्यानंच कामाला केलेली सुरुवात. याच काळात मी आजूबाजूला बघायला शिकले, बघितलेलं लिहायला लागले. तिही चार वर्ष संपली आणि आता पुन्हा एकदा माझी आणि लोकलची ताटातूट झाली.

सगळ्या मिळून दहा वर्षांच्या माझ्या लोकल प्रवासाच्या दरम्यान बऱ्याच घटना घडल्या.. कधी स्फोट.. स्फोटांच्या अफवा, अतिवृष्टी, आणि काय नि काय.. ते अगदी काल परवा सांताक्रुझ स्टेशनावरचा ईस्ट-वेस्ट जाणारा ब्रिज पडला तिथंपर्यंत. मी कधीच कोणत्या संकटात अडकले नाही. त्यामुळे असेल पण हे लोकल प्रेम अजुनही उतू जातय.

आता लोकलची आणि माझी भेट केव्हा होईल.. ( होईल की नाही ) तेव्हा मी कशी असेन.. कसं काय करेन ते काळच ठरवेल. तशीही लोकलला आणि मला आम्हा दोघींना या भेटण्या दुरावण्याची सवय झालीच आहे.

===========================
स्वाती फडणीस...... २८-०७-२०१०