लोकल गोष्टी
- लोकल प्रवास
- १. फर्जाना यादव
- ३. नटवर
- २. हातातला खजिना
- ४. माझ्या समोर बसलेली ती;
- ५. आईचा मुलगा हरवला..
- ६. गर्दीतले चेहरे..
- ७. ओळख; पहीली आणि शेवटची.
- ८. मैत्री एक्सप्रेस
- ९. दहशत
- १०. मेलडी
- ११. भिकारी पोट्टा
- १२. लेडीज कंपार्टमेंट आणि पुरुष प्रवासी
- १३. मरणघाई
- १४. नव्या जगात प्रवेश
- १५. बोलपाखरं
- १६. हादरे)
- १७. काही नमुने..
- १८. नावड
- १९. शहाण्या आणि वेड्यांच्यातलं अंतर
- २०. हाता तोंडाची गाठ
- २१. अंधाऱ्या बोळाच्या टोकावर
- २२. पहिली खेप
- २३. संकेत पौर्णिमेचा
- २४. "गॉड ब्लेस यू..! "
- २५. तिखा चटणी मिठा चटणी
- २६. असाही दहशदवाद
- २७. वेगळा-वेगळा
- अच्छा तो हम चलते है..! ( लोकल गोष्टी-२८)
आपल्या डोक्यात कित्येक गोष्टी कित्येक घटना उजाळा न दिल्यामुळे विस्मृतींच्या पुटांखाली कचऱ्यासारख्या पडून असतात.. रोज येताजाता दिसणाऱ्या कित्येक त्याच त्या गोष्टीं बाबत तर दुर्लक्ष करता करता काहीसा आंधळेपणाच येऊन जातो.. तसं त्यात फार विशेष असं काही नसतंही.
रोज ऑफिसला जाताना स्टेशनजवळ रिक्शातून उतरलं की हमखास दिसणारा पोटाचा बेढब नगारा दाखवत बेंबीखाली वीतभर लुंगी गुंडाळावी तशी साडी गुंडाळून एक-दोन बटण तुटलेल्या पोलक्यावर धुण्याच्या पिळ्याप्रमाणे खांद्यावर टाकलेला पदर घेऊन येणाऱ्या चार पेडांची सुतळीसारखी वेणी घातलेल्या पिकल्या केसांच्या टक्कलावर रुपया एवढं कुंकू लावून बांगड्या भरल्या हातांनी टाळ्या वाजवत आलाबला देत भीक मागत येणाऱ्या त्रासदायक हातांकडे त्या हातांनी आपल्या हातपायांना स्पर्श करणाऱ्या निगरगट्ट छक्क्याकडे आणि त्याच्या साथीदारांकडे दुर्लक्ष करायची सवयच लागून जाते. त्याच्या त्या आलाबला ही नको आणि पैसे न देता गेल्यावरचे शिव्याशापही नको. त्यांना कशाला लक्षात ठेवावं. आणि त्यांवर कशाला काही लिहावं बोलावं. इतके आपण त्यांपासून वेगळं राहतो.. किंवा त्यांना आपल्यापासून दूर ठेवतो.
तसं नाही म्हणायला काही कथा कादंबऱ्यांमधून चित्रपटांमधून या मंडळींची थोडीफार माहिती आपल्याला असते.. तरी असे रस्त्यावर किंवा रिक्शा टॅक्सी थांबतात तसे.. रात्रीच्या वेळी प्लॅटफॉर्मवर दृष्टीस पडल्यास बघून न बघितलंस करण्यापलीकडे साधारण माणसांना छक्क्यांच्या बाकी जगाबद्दल त्यांच्या जगण्याबद्दल फारशी माहिती नसतेच.
समाजात येता-जाता छक्का, हिजडा, षंढ या शब्दांनी केली जाणारी या वर्गाची हेटाळणी ऐकून सोडून देणं या पलीकडे "भिन्न" मधून झालेलं त्यांच्या समस्यांच दर्शन.. खरं तर माझी या मंडळींबद्दलची माहिती आणि आस्था ही एवढीच.
लोकलच्या डब्यात येणाऱ्या भसाड्या आवाजात बोलणाऱ्या सहा-पावणेसहा फूट उंच दणकट शरीरावर साडी गुंडाळून वाढवल्या केसात गजरे माळलेल्या हातात भारंभार बांगड्या भरलेल्या कपाळावर मोठाल्या टिकल्या लावलेला ओठांवर भडक्क लिपस्टिकचा थर दिलेल्या कोणत्याही कोनातून स्त्री न वाटणाऱ्या या पंथीयांकडे बघून बऱ्याचदा हे असे का राहतात असा प्रश्न पडतो. त्यांना त्याच्या वेगळेपणाच न्युनत्वाचं प्रदर्शन मांडायलाच आवडत की काय? खरं तर आता शहरातल्या सगळ्या बायकाही या वेषात राहत नाहीत किंवा काही नटमुर्ड्या सोडल्या तर सगळ्या बायका काही सदानकदा देह सजवून हिंडत नाहीत. मग हेच लोक असे का हिंडतात त्यांच्यातलं वैगुण्य लक्षात येणार नाही असे ही ते राहू शकतीलच की. आणि मग पोटा-पाण्यासाठी त्यांना जमतील ती काम ही करू शकतील. (? ) की त्यांना या मार्गाने जाण समाजधारेत सामावून जाणं अशक्यच असतं..? (या अशा विचारांच्या पुढे मी जात नाही. )
त्या दिवशी डब्यात असाच एक तृतियपंथी आला होता.. मी नेहमी प्रमाणे दरवाज्याजवळ उभी होते. समोर एक फुलवाली टोपलीतल्या फुलांचे गजरे गुंफत बसली होती. आणि तिचा शेजारीच तो बसला होता.. त्या गजरे गुंफणाऱ्या फुलवालीला गजरे गुंफायला मदत करत होता. त्याची लांबसडक निमुळती बोटं हातातल्या धाग्याला हलकेसे हिसडे देत भरभर फिरून हळूवारपणे फुलं गुंफत होती. गाठींचा गजरा वेणी एकदम सुबक आणि दाट..! एक वेळ त्या बाईंनी विणलेल्या गजऱ्यातली फुल वेडीवाकडी वाटतील पण त्यानं विणलेल्या गजऱ्यातलं फुलं आणि फुलं अगदी नीटस दिसत होतं.
या दोघांच्याशिवाय डब्यात भरपूर गर्दी होती. त्यातच एक भुरकट पिंगट केसांची काळी जीन्स पांढरा फुलं शर्ट घातलेली एक गोरी-गोमटी बाई माझ्या शेजारीच उभी होती.. माझ्या प्रमाणेच ( माझ्याहून जास्त बारकाईने) ती ही या दोघांचे गजरे गुंफणे पाहत होती.. आणि बघता बघता ती या दोघांच्या पुढ्यात जाऊन एक पायावर खाली बसली. जीन्स, शर्ट, केसांचा आखूड स्टेपकट आणि गजरा..!? असं विचित्र रुपडं माझ्या नजरे समोर येऊन गेलं. तिने एक दोन गजरे उचलले उलटे पालटे करून पाहिले.. गजरे विणणाऱ्या त्या दोघांच कौतुक केलं.. गजरेवालीदेखील किती गजरे देऊ करून तिच्याकडे आशेने बघायला लागली होती.. आणि तितक्यात तिनं त्या छक्याला तिला गजरा गुंफायला शिकवण्याची विनंती केली.
ए भवाने, गजरा पाहिजे तर घे.. नाहीतर गप्प उभी राहा. असलं काहीतरी कानावर पडायच्याऐवजी हे बघ, असा दोरा घ्यायचा, पायाच्या अंगट्यात अडकवायचा ही अशी पहिली गाठ मारायची आणि मग दोन दोऱ्यांच्या मध्ये फुलं सरकवाची.. करून गजऱ्याची शिकवणी सुरू झाली. एक-दोन प्रात्यक्षिकं झाली.. दोन-तीन सराव करून झाला त्यात बऱ्याच फुलांची नासाडी झाल्यावर गजरे गुंफण्याचा क्लास आवरता घेतला गेला.. त्या नंतर शेवटची शिकवण म्हणून तो बोलला.. काय बाई तुझ्या शिक्षणाचा उपेग; एवढी मोठी वाढलीस तरी तुला साधी फुलं गुंफता येत नाहीत.!
खरं तर आपल्या प्रत्येकालाच काहींना काही येत नसतं.. आणि त्या छक्याला जसे गजरे विणता येत होते तसंच काही आपल्या प्रत्येकालाच येत असतं. आणि तरी आपण मी एकटा शहाणा बाकी सगळे मूर्ख करून दुसऱ्याला हिणवत राहतो हे सगळ्यात मोठ्ठं दुर्दैव.
=========================
स्वाती फडणीस....................... ०२-०६-२०१०