नावड ( लोकल गोष्टी -१८)

काही गोष्टी इतक्यांदा सांगितल्या ऐकल्या जातात की मग त्या आपल्या नसल्या तरी आपल्याशा होऊन जातात. त्या सांगणारी व्यक्ती जर नेहमी दिसणारी किंवा जवळच्या परिचयातली असली तर ती व्यक्ती समोर येताच त्या व्यक्तीने सांगितलेली त्या व्यक्ती संदर्भात घडलेली ती घटना जरा जास्तच लक्षात राहते.. हि ही तशीच एक मी न पाहिलेली घटना..

डब्यामध्ये निलगिरी तेलाचा वास भरून राहिला होता.. मी केव्हाची अस्वस्थ होते, तशी आता या वासाची सवय झाली आहे.. निलगिरी तेल सर्दी झाली असता वापरले जाते हे ही माहिती झालंय.. इतकंच कशाला माझ्या ही घरात निलगिरी तेलाची लहानशी बाटली आहे तरी ही हा वास आला की मला नाक चोंदल्यासारखं वाटायला लागतं. त्यामुळे कुठून वास येतो आहे याचा मी शोध घेतच होते. तशीच माझ्या प्रमाणे माझ्याहून जास्त ती अस्वस्थ झाली होती.

निलगिरी तेलाला त्याच्या उग्र वासाला नाव ठेवता ठेवता तिने ती घटना सांगितली..
तिचे वडील रेल्वेत (लोकलचे) मोटरमन होते..

बदलत्या शिफ्टस प्रमाणे लोकल चालवायची वेळ झाली रिलिव्हर आला की उतरायचं आणि घरी जायचं.

त्या दिवशी ही ते तसेच घरी निघाले होते.. आणि काहीतरी राहिलं म्हणून पुन्हा ट्रेनकडे वळले.. ट्रेन नुकतीच सुटत होती.. अजून वेग घेतला नव्हता.. एवढ्या वेगात ट्रेनमध्ये चढणं काही अवघड नव्हतं. एवढ्यात कुणाचा तरी धक्का लागला आणि ते आडवे पडले गेले.. दोन्ही पाय प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या मधल्या मोकळ्या जागेत अडकले.. प्लॅटफॉर्म वरच्या सहकाऱ्यांनी जवळ-पासच्या सहप्रवाशांनी त्यांना सावरण्याचा, धरण्याचा ओढून काढण्याचे बरेच प्रयत्न केले.. पण ट्रेनच्या जोरापुढे कोणाच काही चाललं नाही.
तिचे वडील ट्रेनच्या खाली ओढले गेले.. ते गेले...

तेव्हा ती अवघी तीन वर्षांची होती.. म्हणजे ही घटना तिच्यासाठीही पूर्णपणे ऐकीवच होती.. त्यात अनुभवलं होतं ते दुःख, आईच्या डोळ्यातल्या न थांबणाऱ्या धारा.. पोरकेपणाची भावना आणि निलगिरी तेलाचा वास. ( डेड बॉडी जर काही कारणांनी जास्त वेळ ठेवावी लागणार असेल तर त्यावर निलगिरी तेल शिंपडतात. )

आता आता मला मुलगा झाल्यावर त्याच्या डॉक्टरांनी त्याला सर्दीवर औषध म्हणून निलगिरी तेल वापरायला सांगेपर्यंत मलाही निलगिरी तेलाचा तो एकच उपयोग ठाऊक होता. त्यामुळे तो वास अजिबात आवडत नसे. तिला तर नाहीच नाही.

अगदी लहान असताना एखादी बरी-वाईट गोष्ट मनावर ठसली की ती आवड-नावड पुढे कधीच पूर्णपणे बदलली जात नाही, नाही..?
.
.
=============================
स्वाती फडणीस................................... १७-०२-२०१०