भाषेच्या गमतीजमती-भाग-२

भाषेच्या गमतीजमती-भाग-२
आमच्याकडे बोलतांना-लिहितांना "मला जाग आला" असे म्हणतात.
मी पण तसेच म्हणतोय.
पहिल्यांदा मी सुरेश भटांचे "पहाटे पहाटे मला जाग आली" हे गीत ऐकले तेव्हा भटांचे भाषाविषयक ज्ञान कमजोर आहे असाच माझा समज झाला होता.
पण जेव्हा "जाग" हा स्त्रीलिंगी शब्द आहे हे कळले तेव्हा माझीच बंडी उलार झाली.
आमच्या नागपुरी गावरान भाषेत जाग या शब्दाला "चेव" हा पर्यायी शब्द आहे आणि तोच वापरात आहे.
त्यामुळे "मला चेव आला" हे गांवढळ वाटले तरी शुद्ध वाक्य आहे.
तसेच "तो जागा आहे काय?" या ऐवजी "तो चेता आहे का?" असे म्हणतात.
पण जसजसा अशिक्षित समाज शिक्षितांच्या सानिध्यात यायला लागला तसतसे त्यांनी नवनवे शब्द ऐकून जाणिवपुर्वक आत्मसात केलेत. शब्द शिकता आलेत पण व्याकरण बोंबलले. कारण त्यांनी
"मला चेव आला" हे वाक्य फक्त शब्दबदल करून "मला जाग आला" असे उच्चारले.
आणि शुद्ध बोलण्याच्या नादात मुळात शुद्ध असलेलं वाक्य अशुद्ध करून टाकलं.
.
करू जाता काय, उलटे झाले पाय. आहे ना गंमत?
मी पण तसेच म्हणतोय. काय करणार? माझ्या सभोवताल सगळेच "जाग आला" असे म्हणत असतांना मी एकट्यानेच "जाग आली"
असे म्हणायचे ठरवले तर ते मलाच "वाटोळे" बोलल्यासारखे वाटते.
.
गंगाधर मुटे