भाषेच्या गमतीजमती-भाग-१
दोन महिण्यापुर्वीपर्यंत मी व्याकरणामध्ये फारच ढ्यॅ होतो हे तुम्ही जाणताच. माझ्या कवितांमधील व्याकरणाच्या चुका शोधून "त्यांनी" मला कसं धुतलं,पिळलं आणि वाळायला घातलं याचे तुम्ही जीते-जागते, चालते-बोलते साक्षीदार आहात. मात्र माझ्या व्याकरण अज्ञानामागे "हा विषय रटाळ" आहे एवढेच कारण नाही तर या विषयीची पराकोटीची चिड हे एक प्रमुख कारण आहे.
त्याचं काय झालं...
पाचव्या-सहाव्या इयतेत असतानाची गोष्ट. प्रशांतने इंग्रजीच्या मास्तरांना एक शंका विचारली. की Cut म्हणजे कट असे होते तर Put म्हणजे पट असे का होत नाही किंवा Put म्हणजे पुट होत असेल तर Cut कुट का होत नाही? यावर मास्तरांनी उत्तर देण्याऐवजी रागाने लाल होऊन असा काही जरब असलेला जबरी नेत्रकटाक्ष टाकला की प्रशांत हादरलाच. एवढा हादरला की त्याच्या हृदयाचे पाणी-पाणी झाले. त्याच्या हृदयाचे एवढे पाणी झाले की ते त्याच्या सदर्याखालून ओघळत ओघळत डाव्या पायाच्या आधाराने चक्क जमिनिवर उतरले.
व्याकरण एवढे जहाल आणि निर्दयी असते असे मला त्या दिवशी प्रथमच समजले. आणि "ह्रुदयाचे पाणी होणे" याचा अर्थही समजला.
त्यामुळे व्याकरणविषयक कुठल्याही प्रश्नाचे उत्तर मी कधिच कुणाला विचारले नाही आणि म्हणुन माझे व्याकरण कच्चे राहीले.
खालील शब्दांचा मला अजुनही निटसा उलगडा झालेला नाही.
१) पायात चप्पल घालायची की चपलेत पाय घालायचे?
२) अंगात सदरा घालायचा की सदर्यात अंग घालायचे?
३) मामाची पत्नी मामी तर मेव्हण्याची पत्नी मेव्हणी का नाही?
४) हातात बांगड्या भरायच्या म्हणजे पोत्यात धान्य भरतो तशा भरायच्या?
असे अनेक प्रश्न अजुनही अनुत्तरित आहे.
जाणकारांनी उत्तरे द्यावीत.
वाचकानींही "भाषेच्या गमती-जमती" येथे लिहाव्यात.
.
गंगाधर मुटे