म्युच्युअल फंड भाग २

म्युच्युअल फंडचे मुख्यत: तीन प्रकार असतात.
१. लिक्वीड फंड
२. डेट फंड
३. इक्विटी फंड
तीनही प्रकारच्या म्युच्युअल फंडसची सरमिसळ असू शकते. म्हणजे उदा. डेट फंड व इव्किटी फंड यांचा मिळून एक बँलन्स फंड तयार होतो. ज्यात जमलेले पैसे इक्विटी फंड मॅनेजर ६५% शेअर्समध्ये व ३५% सरकारी पेपर्समध्ये किंवा कंपन्यांच्या दिर्घ मुदतीच्या डेट पेपर्समध्ये गुंतवतात. ( या बद्दल मी नंतर सविस्तर सांगेन )
यापैकी पहिल्या प्रकारच्या फंडमध्ये म्हणजे लिक्वीड फंड मध्ये गुंतवणूक केलेले पैसे (अर्थात या प्रकारच्या म्युच्युअल फंडमध्ये पैसे ठेवण्यास गुंतवणूक म्हणता येणार नाही. )
हे फक्त तात्पुरत्या मुदतीसाठी असतील. उदा. १ आठवडा, १५ दिवस, १ महिना किंवा जास्तीत जास्त दोन महिने.
तरीही या प्रकारचे म्युच्युअल फंडस खूपच उपयोगी आहेत. यामधून पैसे काढायचे असतील तर एक दिवसात पैसे परत मिळतात. तसेच यातून होणाऱ्या फायद्यावर टी डी एस कापला जात नाही . बँकेत जर मुदतीचे पैसे ठेवलेत तर मिळणाऱ्या व्याजावर टी डी एस कापला जातो. तसेच याला मुदतीची अट नाही
अगदी थोड्या दिवसातही पैसे काढता येतात. म्हणून या प्रकारच्या म्युच्युअल फंडसचा उपयोग अक्षरशः एखाद्या सेव्हींग बँक अकाउंटसारखा करता येईल. (आहे की नाही बरी सोय! )
शिवाय या म्युच्युअल फंडमध्ये ठेवलेले पैसे काढून घेण्याच्या ऐवजी त्याच म्युच्युअल फंड हाउसमधल्या दुसऱ्या म्युच्युअल फंडमध्ये त्याच दिवशी सरकवता येतात. उदा. जर पैसे एच डी एफ सी लिक्वीड फंडमध्ये असतील तर पाहिजे त्यावेळी एच डी एफ सी इक्वीटी फंडमध्ये सरकवा त्याच दिवशी.
या फंडसचा फायदा असाही आहे की बँकेत पैसे वर्षभर ठेवले तरच ६. ५०% दराने व्याज मिळते व मुदतीच्या अगोदर पैसे काढले तर २% साधारणपणे व्याजाचा दर कमी होतो. पण म्युच्युअल फंडमध्ये जर पैसे ठेवले तर सर्वसाधारणपणे तेवढ्याच दराने थोड्या काळाच्या मुदतीसाठी पैसे मिळतील. (अर्थात ठेवलेल्या दिवसांच्या प्रमाणाच्या दरात पण दर तोच)
या फंडची आणखी एक विचारात घेण्याची गोष्ट अशी की या फंडसची नेट असेट व्हल्यू कधीही कमी होत नाही. (म्हणजे यात पैसे टाकलेत आणि विसरून गेलात तर नुकसान तर नक्की होणार नाही! )

पण या म्युच्युअल फंडस मधील फायदा फक्त ४. ५% ते ५. ५% वर्षाला एवढाच असणार आहे. पैसे दुप्पटव्हायला ७२/५ = १४. ४ वर्षे साधारणपणे लागतील. (म्हणजे यात फार काळ फार पैसे ठेवता येणार नाहीत नाही का? ) या फंडचा उपयोग चक्क पार्किंग लॉट म्हणूनच करायला लागेल.

त्यानंतर आले डेट फंडस यातही दोन प्रकार आहेत.
एक, गव्हर्नमेंट सेक्युरिटीज फंड यात जमलेले पैसे फंड मॅनेजर सरकारी सेक्युरिटीज मध्ये गुंतवतो. या प्रकारच्या म्युच्युअल फंडचा उपयोग ज्यावेळी व्याज दर कमी होत असतील तेव्हा होतो. व्याज दर वाढत असतील त्यावेळी यात अगदीच कमी नफा होण्याची शक्यता असते.
मला आठवते आहे की ज्यावेळी व्याज दर कमी होत होते म्हणजे साधारण २००३ ते २००५ च्या काळात त्यावेळी या प्रकारच्या फंडने साधारण वार्षिक नफा अगदी २०% सुद्धा दिलेला आहे.
पण सध्या व्याज दर वाढण्याच्या मार्गावर असल्याने या प्रकारच्या म्युच्युअल फंडमध्ये अगदीच कमी नफा होत आहे म्हणजे वार्षिक १. ५% ते ४. ५%. शिवाय जरी काही जणांचे म्हणणे असले की याची किमत(व्ह्ल्यू) कधीही कमी होत नाही तरी माझा अनुभव तसे सांगत नाही.

क्रमशः