म्युयुअल फंड

आपण मराठी माणसे गुंतवणूकीबद्दल फारच थोडा विचार करतो.
साधारणपणे गुंतवणूक म्हटली की आपण पी पी एफ, पोस्ट ऑफीस, इन्सुरन्स (नेहमीचा) यांचा विचार करतो.
आपण काही चाकोरी बाहेर विचार केला तर आपल्या गुंतवणूकीवर जादा मोबदला मिळेल का? असा विचार बरेचजण करण्याचे टाळतात.
माझे असे मत आहे( ते इतरांच्या दृष्टीने चुकीचे ही असू शकेल पण बऱ्याच जणांच्या फायद्याचे असेल) की होय!
ते शक्य आहे.
त्या अगोदर आपण गुंतवणूकीवर मिळणारा मोबदल्याचा तुलनात्मक अभ्यास कसा करायचा याचा विचार करू.
अरे बापरे! म्हणजे आली का पंचाईत.
आता ती त्रास देणारी आकडेमोड!
नाही! मी मिळणारा मोबदला कसा विचारात घ्यावा याची सोपी पद्धत सांगतो.
ती म्हणजे '७२ चा नियम'!!!

साधे सोपे गणित. गुंतवणूकीचा जो दराचा मोबदला दिला असेल त्याने ७२ ला भागा.
तेवढ्या वर्षात तुमचे पैसे दुप्पट.
अर्थात या परिस्थीतीत असे गृहीत धरून चालले पाहिजे की तुमची गुंतवणूक पूर्ण मुदतीची असेल व उगाच काही सबब सांगून पैसे काढले जाणार नाहीत. (कठीणच आहे बाबा! नाही का)

उदा. जर तुम्हाला मोबदला १० टक्के वर्षाला मिळणार असेल. तर ७२/१०= ७. २ वर्षात तुमचे पैसे दुप्पट होतील.
दुसरे उदाहरण घेऊ म्हणजे हा नियम नक्की समजल्याची खात्री होईल.
समजा तुम्ही गुंतवलेले पैसे तुम्हाला २० टक्के नफा देत असतील तर ७२/२० = ३. ६ वर्षात तुमचे पैसे दुप्पट होतील.
तर आता हे बघून घेऊ की पैश्याच्या बाजारात सर्वसामान्यासाठी असलेल्या गुंतवणूकीच्या वेगवेगळ्या प्रकारात साधारण किती वर्षानी पैसे दुप्पट होतील.

बँकेतील मुदतीची ठेव साधारण वर्षाला व्याज : ६. ७५%, ७% किंवा अगदिच फार तर ७. २५% सोयीसाठी ७ % धरायला हरकत नाही. तेव्हा हे पैसे दुप्पट होतील : ७२/७= १०. २८ वर्षानी
( बापरे! तरूण असू तर आजोबा होउ. आजोबा असू तर नातवाला मिळतील. )
खाजगी कंपनीत पैसे मुदतीच्या ठेवीत गुंतवल्यास : १०% ते ११% व्याज
तेव्हा हे पैसे दुप्पट होतील : ७२/१० = ७. २ वर्षानी. बहुतेक खाजगी कंपन्या साधारण एका वर्षासाठी पैसे मुदतीसाठी घेत नाहीत.
पोस्ट ऑफीस मध्ये मुदतीच्या ठेवीत ठेवले तर व्याज दर = ६. २५%
तर पैसे दुप्पट व्हायला लागतील :७२/६. २५= ११. २५ वर्षे म्हणजे परत म्हातारे झालोच की!
मग यावर उपाय शेअर मार्केटच!
बापरे म्हणजे नुकसान हमखास! असे सर्व म्हणतील.

जर शेअर बाजाराचा नफा व बऱ्याच प्रमाणात पैसे न जाण्याची खात्री झाल्यास कोणास नको आहे?
तेव्हा यावर उपाय म्हणजे म्युच्युअल फंड. येथे मी ओपन एंडेड म्युच्युअल फंडबड्डलच सांगत आहे.
मी स्वत: बरीच वर्षे म्युच्युअल फंडमध्ये माझे स्वतःचे पैसे गुंतवित आहे व चांगला नफा कमावत आहे.
या वाटचालीत मी गुंतवणूकीची कुठली सुत्रे वापरली हे सांगण्याचा एक प्रयत्न.
क्रमशः