म्युच्युअल फंड भाग ३

मी येथे नमूद करू इच्छितो की मी ज्या म्युच्युअल फंडाबद्दल सांगतो आहे ते सर्व ओपन एंडेड आहेत.
कारण क्लोज एंडेड म्युच्युअल फंडस फारच थोडे आहेत व ते लोकप्रिय नाहीत याचे कारण त्यात पैसे गुंतवणे व काढून घेणे सोयीचे नाही. (मग त्या फंदात पडाच कशाला! )

तर मी काय सांगत होतो! हो!
तर डेट फंडचा आणखी एक प्रकार म्हणजे प्युअर डेट फंड. या फंडचा फंड मॅनेजर फंडात जमलेले पैसे हे नावाजलेल्या कंपन्यांची व तीन किंवा दोन 'ए' असलेल्या दिर्घ मुदतीच्या नॉन कन्व्हर्टीबल डिबेंचर्समध्ये किंवा कमर्शियअल पेपर्समध्ये गुंतवतो. या फंडमध्येही पैसे काढण्या घालण्याची सोय खुप चांगली आहे. पण इथेही गव्हर्नमेंट सेक्युरिटी डेट फंड सारखाच काहीसा प्रकार आहे.
ज्या वेळी व्याजाचे दर कमी होत असतात त्यावेळी या फंडचे रिर्टन्स चांगले मिळत असतात. परत त्याच काळाबद्दल मी सांगेन की २००३ ते २००५ च्या सुमारास ज्यावेळी व्याज दर कमी होत होते त्यावेळी काही डेट फंडसनी वार्षिक १४% ते १५% ही उत्पन्न दिले होते.
पण सध्याच्या काळात ज्यावेळी व्याजाचे दर स्थिर किंवा वाढण्याची शक्यता आहे. त्यावेळी यातून होणारा नफा साधारणपणे ३% पासून ते ६% पर्यंत होईल. म्हणून मला व्यक्तीशः काही हे फंडस आवडत नाहीत.

त्यानंतर आपण एका सरमिसळ म्युच्युअल फंडची ओळख करून घेऊ या!
तो आहे एम आय पी. म्हणजे मंथली इंकम प्लान. या फंडचा जो कॉरपस( बापरे किती अवघड शब्द! पण अर्थ इतकाच की या फंडमध्ये जमलेले पैसे) आहे, तो फंडमॅनेजर ८०% भाग डेट फंडप्रमाणे व २०% भाग इक्वीटीमध्ये गुंतवतो. आता प्रत्येक फंड हाउस हे प्रमाण वेगळे ठेवू शकेल. जसे ७५% डेट व २५% इक्वीटी वगैरे. याप्रकारचे फंडस ही काही प्रमाणात चांगले रिटर्न्स देउ शकतील त्यावेळी ज्यावेळी शेअर मार्केट तेजीत असेल त्याचवेळी.
कारण तुमच्या गुंतवणूकीच्या ८०% ते ८५% वर जरी ५% ते ७% नफा झाला तरी १५% ते २०% गुंतवणूकीवर खूपच चांगला नफा होउन या फंडावर १४% ते १८% नफा झालेला आहे विशेषतः शेअर बाजाराच्या चढत्या काळात. ( आणि आताही मार्केट तसे स्थिर व चढते असल्यामुळे या फंडमधील गुंतवणूकीवर चांगला नफा दिसत आहे. ) पण या फंड मधील गुंतवणूकीचा ८०% भाग डेटमध्ये असल्यामुळे या फंडमधील गुंतवणूकीवरचा नफा नेहमीच सीमीत राहील. याउलट जर मार्केट तेजीत नसेल तर या फंडपासून अजिबात नफा न होण्याची शक्यता आहे. ( अर्थात मार्केटच्या अगदीच पडत्या काळात या फंडपासून नुकसानही अगदी कमी होईल. )

क्रमशः