म्युच्युअल फंड - एस आय पी

आता इथपर्यंत म्युच्युअल फंड बद्दल माहिती दिल्यानंतर म्युच्युअल फंड मधे
गुंतवणूक कशी करावी?
अर्थात एकदम पैसे गुंतवण्याच्या धोक्यापासून वाचण्यासाठी एस आय पी करा. एस
आय पी म्हणजे नक्की काय? तर एस आय पी म्हणजे सिस्टेमॅटिक इन्वेस्ट्मेंट
प्लॅन.
म्हणजेच गुंतवणूकीचा अभिषेक किंवा सतत धार. आपल्याला जेवढे पैसे म्युच्युअल
फंडमधे गुंतवायचे असतील तेवढे एकदम न गुंतवता त्याचे छोटे भाग करून समजा
दहा भाग करून वेगवेगळ्या दिवशी पैसे गुंतवणे.
सर्व गुंतवणूकीचे मान्यवर सल्लागार, असाच सल्ला देतील की इवीटी म्युच्युअल
फंड पासून चांगला नफा मिळवायचा असेल तर सर्व वेळी खरा उतरलेला व हमखास उपाय
म्हणजे एस आय पी.
ज्यावेळी शेअर मार्केटचा चढ वरचा असेल त्यावेळी तर हे अक्षरशः खरे आहे कारण
नुकसानीच्या सौद्यात कोणीही पैसे घालणार नाही.
सध्या चालू असलेले युरोपियन आर्थिक संकटाने भिती वाटेल व तुमची चालू असलेली
एस आय पी बंद करावी असेही वाटेल!
पण माझे म्हणणे आहे तसे करू नका!
या वर्षीच्या सुरवातीपासून ५० शेअर्स असलेला निफ्टी ५०० अंकानी खाली
पहिल्या ५ आठवड्यात गेला. (म्हणजे ५२०० ते ४७००) पण परत पुढच्या दोन
महिन्यात ६५० अंकानी वाढला तर मागच्या ४ आठवड्यात परत ३५० अंकानी घसरला. या
सर्व चढ उतारावर मात करण्याचा एकच उपाय आहे तो म्हणजे एस आय पी.
एस आय पी चा वापर कुठल्याही गुंतवणूकीसाठी करता येइल. विशेषतः शेअर्स खरेदी
करण्यासाठी!
उदा. केर्न इंडिया ३०० रुपयाला २० शेअर्स घेतले व शेअर्सचा भाव खाली गेला
तर २० शेअर्स कमी भावात घ्या. वगैरे.
ज्या काळाचा आपण विचार केला त्या काळात चेक लिहून पैसे गुंतवायचे असते तर
एखादे वेळेस भिती वाटली असती व पैसे गुंतवलेच गेले नसते. पण एस आय पी मधे
आपोआप गुंतवणूक होते. कारण पहिल्या हप्त्याचा चेक देऊन पुढे बँकेतून आपोआप
वजा होत जातात किंवा पुढच्या तारखेचे चेक अगोदरच दिले गेलेले असतात.
म्हणून कधीही एस आय पी पध्दतीने पैसे गुंतवणे हा एक उत्तम मार्ग असून
त्यायोगे पैसे गुंतवल्यास आपण शेअर बाजारापासून (ज्यात चांगला नफा होउ
शकतो) दूर राहणार नाही.
जाणकार असे सांगतात की भारतीय शेअर बाजाराला खूप चांगले दिवस येणार आहेत व
त्या चढावात भाग घ्यायचा असेल तर एस आय पी एक उत्तम मार्ग आहे.
एक शेवटची सुचना: आपण केलेल्या गुंतवणूकीवर सतत लक्ष ठेवा व वेळोवेळी नफा
पदरात घ्या.
एक लक्षात घ्या गुंतवणूक म्हणजे मुद्दलावरील मिळकत! व मिळकतीवर मिळकत!
तेव्हा आपल्या मिळकतीवर सतत लक्ष ठेवायला हवे नाही का!