कमांडर दिलीप दोंदे - सागर परिक्रमा

भारतीय नेव्हीतील कमांडर दिलीप दोंदे (वय ४२ वर्षे) ह्यांना त्यांनी पूर्णं केलेल्या सागर परिक्रमाबद्दल एका परिसंवादात ऐकण्याची संधी मिळाली. त्यांनी सांगितलेल्या माहितीचा थोडक्यात सारांश खाली दिला आहे. अधिक माहिती त्यांच्या अनुदिनीवर आहे. ह्या अवघड कामगिरीला पार पाडण्यात त्यांच्या आईने त्यांना सतत प्रोत्साहन दिले व ते त्याबद्दल आईचे आभार मानतात.
५ वर्षांपूर्वी नेव्हीने सर्कमनेव्हिगेशन (सागर परिक्रमा) उपक्रम आखला असल्याची माहिती त्यांना मिळाली व तो उपक्रम ते करण्यास उत्सुक आहेत का, ह्याबद्दल त्यांना विचारणा करण्यात आली. त्यांनी तत्काळ होकार दिला व अशी सफर कशी करतात, त्यातले नियम काय आहेत ह्याबद्दल माहिती आंतरजालावरून मिळवायला सुरुवात केली. माउंट एव्हरेस्ट ५००० पेक्षा जास्त लोकांनी चढला आहे तर असे सोलो सर्कमनेव्हिगेशन फक्त १७५ लोकांनी केले आहे. ह्यातही दोन प्रकार आहेत- थांबत आणि न थांबता पूर्णं केलेली. ह्यात दुसऱ्या प्रकारात आणखीनच कमी लोक आहेत. त्यामुळे अशा असामान्य आणि कमी संख्या असलेल्या लोकांच्या समूहात आपलेही नाव असावे असे त्यांना मनापासून वाटायला लागले.
तांत्रिकदृष्ट्या सागर परिक्रमा म्हणजे नक्की काय हे सर्कमनेव्हिगेशन व्याख्येत वाचायला मिळते. सागर परिक्रमा करू शकेल व सागरपरिक्रमेचे नियम पाळू शकेल अशी नौका नेव्हीकडे नव्हती त्यामुळे उपक्रमाची सुरुवात अशी नौका तयार करण्यापासून सुरवात झाली. ही परिक्रमा एका वाऱ्याच्या शिडाने गती मिळणाऱ्या नौकेनेच करायची असते. इंजिनचा उपयोग फक्त बॅटरीसंच रीचार्ज करण्यासाठीच व बंदरातून समुद्रात जाण्यासाठीच वापरायचा असतो. त्यासाठी त्यांनी अडमिरल आवटी ह्यांच्या मदतीने एक डच डिझाइन निवडले व मांडवी नदीतीरी ह्या नौकेची उभारणी सुरू केली. मांडवी नदीच्या नावावरुनच ह्या नौकेचे नाव त्यांनी म्हादेइ ठेवले.
१५ महिन्यांच्या अथक श्रमांनंतर त्यांनी ही नौका बनवून घेतली व त्यावर अत्याधुनिक उपकरणे बसवली. ही नौका एका मराठी माणसानेच तयार केली आहे. चाचणी घेण्यासाठी सुरुवातीला कोलंबो, नंतर मॉरिशसला जाऊन तेथून येताना एकटे परत आले. ह्या बद्दलची माहिती त्यांच्या अनुदिनीवरच वाचावी.
सागर परिक्रमा एकूण ५ टप्प्यात आखली गेली. त्यासाठी पृथ्वीगोलाच्या दक्षिण गोलार्धाची निवड करणे सर्कमनेव्हिगेशन नियमांनुसार ठरले. पहिल्या टप्प्यात ऑस्ट्रेलियाला, मग न्यूझीलंड, फॉकलंड, साऊथ आफ्रिका आणि मग मुंबई असे ५ टप्पे ठरले व १८ ऑगस्ट २००९ ला मुंबईहून सुरुवात केली. ह्या प्रत्येक टप्प्यात त्यांना आलेल्या अडचणींची, वादळ, वारे, ९ मीटर उंचीच्या लाटांना, इ. तोंड देत त्यांनी एकट्याने जे कौशल्य, शारीरिक आणि मानसिक कणखरपणा दाखवला त्याबद्दल त्यांनी लिहिलेल्या अनुदिनीवर वाचायला मिळते. ही अनुदिनी त्यांनी प्रवासात असतानाच लिहिली. इंटरनेट सुविधा व उपग्रहीय फोनसेवेमुळे त्यांना रोज जगाशी संपर्क साधता येत असे.
सोबत नेलेल्या खाण्याच्या पदार्थात त्यांच्या आईने कामगिरी निघण्यापूर्वी अनेक प्रयोग करून ३ महिने टिकेल असे खाद्यपदार्थ घरी करण्याचा प्रयत्न केला. ह्याबरोबरच त्यांनी हवाबंद डब्यातील अन्नही नेले होते. प्रत्येक टप्प्याचा शेवट ज्या बंदरावर व्हायचा तेथे नेव्हीतील सहकारी त्यांना भेटून रसद पुरवीत.
प्रवासातील काही काही दिवस खूप तणावपूर्ण असायचे, त्यांना एकमेव भीती असायची की, जर ते चुकून पाण्यात पडले व नौका निघून गेली तर काय! त्यामुळे ते वादळवाऱ्यात, खवळलेल्या समुद्रातून नौकेवर वावरताना स्वतःला नौकेला बांधून ठेवून, रांगत जात. ऑटोपायलटमुळे त्यांना नौका चालवण्याशिवायची कामे करता यायची.
ते ज्या-ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणच्या नेव्हीने त्यांचे आदराने स्वागत केले व माणसाच्या चांगल्या स्वभावाचे जागोजागी दर्शन घडले. त्यांची नौका पाहण्यास अनेक लोक खूप उत्सुकता दाखवत.
मे १८, २०१० रोजी ते मुंबईला परतले. दुर्दैवाने ज्या दिवशी ते परतले त्या दिवशी मंगलोरचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले व ही बातमी झाकोळली गेली व अनेक सामान्य माणसांना ह्याबद्दल कळलेही नाही.
त्यांचे भाषण झाल्यानंतर त्यांना अनेकांनी प्रश्न विचारले. अगदी मुद्देसूद व नेमकी उत्तरे देत त्यांनी कार्यक्रम वेगळ्या उंचीवर नेला. शेवटी त्यांना विचारले गेले, "आम्हाला तुमच्याकडून प्रेरणा मिळतेच आहे, पण एखादे प्रेरणावाक्य सांगायचेच झाले तर तुम्ही काय सांगाल?", त्यांचे उत्तर- "कार्य सफल करण्यासाठी उठा आणि प्रथम कामाला लागा!" हे होते.
त्यांची अनुदिनी- दुवा क्र. १