मला आवडलेले पुस्तक

माझ्या स्विस मित्रावर एका महिलेला झुरिक विमानतळावरून घेऊन ट्रेनने राजधानी बर्न येथे आणण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. तिच्याकडे ३-४ बॅगा होत्या. स्त्रीदाक्षिण्य म्हणून मित्राने दोन बॅगा उचलल्या. नंतर दोघेही ट्रेनच्या दुसऱ्या वर्गाच्या डब्यात चढले. तिने दाराजवळ असलेली रिकामी पण आरक्षित असलेली  जागा पकडली. माझा मित्र त्या गर्दीत कसाबसा उभा राहिला. थोड्या वेळाने तिकीट निरीक्षक आला व त्याने या महिलेला सांगितले की, "ही अपंग लोकांसाठी आरक्षित जागा आहे, येथे तुम्ही बसणे चूक आहे. तिने ताबडतोब माफी मागितली व ती गर्दीत उभी राहिली. ही महिला डब्यातील सर्वच प्रवाशांच्या परिचयाची होती. तिचे नाव मिशेलिन काल्मी रे. स्वित्झर्लंड्ची तत्कालीन राष्ट्राध्यक्ष व सध्याची परराष्ट्रमंत्री. भारतात जसे सध्या सोनिया गांधी, पाकिस्तानात पूर्वी बेनझीर भुत्तो व फार पूर्वी इंग्लंडमध्ये मार्गारेट थॅचर यांचे प्रस्थ होते तसेच मिशेलिन काल्मी रे यांचे स्वित्झर्लंडमध्ये स्थान आहे. या व अशा अनेक घटना ज्या पुस्तकातून आपल्यासमोर येतात व आपल्याला अंतर्मुख करतात ते पुस्तक म्हणजे ‘एका दिशेचा शोध’. 
                  या पुस्तकामध्ये आंतर्राष्ट्रीय घडामोडींचे भाष्यकार व विश्लेषक संदीप वासलेकर यांनी आपले विचार अतिशय उत्तमरीत्या मांडले आहेत. संदीप वासलेकर यांनी भेटी दिलेल्या देशांमध्ये त्यांना आलेले अनुभव व तिथल्या राजकीय नेत्यांनी त्यांच्या देशातील लोकांसाठी केलेल्या सुधारणा सांगितल्या आहेत. त्या पासून आपल्या राजकीय नेत्यांनी काही शिकायला पाहिजे. जग चौथ्या औद्योगिक क्रांतीला सुरुवात करत असताना आपल्या देशामध्ये, आपल्या नवीन पिढीसाठी, आपल्या शिक्षण पद्धतीत आपण काय बदल केले पाहिजे  आणि त्यामुळे येणाऱ्या संधीचा फायदा आपल्या युवकांनी कसा घेतला पाहिजे याची माहिती दिली आहे. त्यांच्या दहशतवाद्यांशी झालेल्या भेटी, अनोळखी ठिकाणी त्यांच्यासमवेत काढलेल्या मध्यरात्री, त्यांच्या गोळ्या कधी वेध घेतील याचा नेम नसतानाही त्यांना हिंसाचारापासून परावृत्त करण्यासाठी केलेली धडपड, काही प्रमाणात त्याला आलेले यश असे बरेच काही अनुभव व त्यातून मिळालेले निष्कर्ष आपल्यासमोर ठेवले आहेत. येत्या पाच- सहा दशकांत येणारे धोके व नवनिर्मितीची संधी या दोन्ही आव्हानांसाठी आपला समाज कसा तयार होईल या गंभीर विषयावर या पुस्तकात चर्चा केली आहे. प्रत्येक भारतीयाने विशेषतः मराठी तरुणाने हे पुस्तक संग्रही ठेवावे.
पुस्तकाचे नाव- एका दिशेचा शोध              लेखक- संदीप वासलेकर
प्रकाशक- राजहंस प्रकाशन, पुणे                 पृष्ठ संख्या- १७९            मूल्य- २५० रुपये