रिक्तता..‌शून्य

या इंटर्व्ह्यूला मला एक प्रश्न विचारला गेला होता जो मला खूप आवडला कारण तो  प्रश्न मला अतिशय "इनसाइटफुल" असा वाटला. प्रश्न हा होता की "तुम्ही तुमच्या रिकाम्या वेळेमध्ये काय करता? " जसे माणसाचे मित्र त्याच्याबद्दल बरच काही सांगतात त्याचप्रमाणे एखादा माणूस त्याच्या रिकाम्या वेळेमध्ये काय करतो हे त्याच्याबद्दल खूप काही सांगून जातं असं मला वाटतं.
 आपण सगळेच जणं आपापला रिकामा वेळ कोणत्या ना कोणत्या कामांनी, विचारांनी भरून काढत असतो. कोणी नाना व्याप मागे लावून घेतो तर कोणी व्यसने, कोणी चांगल्या सवयी अंगी बाणवतो तर कोणी चिंता करत बसतो. नीट पहाल तर आयुष्य हाच एक रिकामा वेळ आहे. आणि जो तो आपल्या परीने हा रिकामा वेळ भरून काढत आहे.
क्वचित एखादा अवलिया, संत पुरुष असा निघतो जो की या रिक्ततेला न घाबरता तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहू शकतो. विशेष काही न करता, तटस्थ अवलोकन करीत तो संपूर्ण जीवन व्यतीत करतो. पण असा महात्मा विरळाच. आपण सामान्य लोक जरा मोकळा वेळ मिळाला की बेचैन होतो आणि स्वतःमागे व्याप वाढवून घेतो.
जशी शांतता ही शब्दाच्या पातळीवरील रिक्तता तसेच मौन हे वाणीच्या पातळीवरील पोकळी. मौनी साधू हे साधना म्हणून मौन पाळतात. उपास ही आहार या पातळीवरील रिक्तता. ती देखील सहजसाध्य नाहीच. संपूर्ण कडकडीत उपास हा कष्टसाध्यच असतो. ध्यान (मेडीटेशन) ही विचारांच्या पातळीवरील शून्यता. ध्यान किती  प्रचंड अवघड आहे हे सर्वश्रुत आहेच.
अशा रीतीने रिक्तता, पोकळी, शून्यता या गोष्टी नगण्य नसून अतिशय कष्टसाध्य आहेत. किंबहुना आपण जर थोडे शांत झालो तर लक्षात येईल आपला मूळ स्वभाव हाच "शून्य" आहे. म्हणजे आपलं आयुष्य बघा रिकामा वेळ जो आपण भरून काढतोय, आपलं मन हा कोरा घडा आहे ज्यात आपण विचार ओततोय. आपण मूळात मौन आहोत नंतर आपण शब्द उच्चारत आहोत असं काहीसं.
अवर ट्रू नेचर इज स्पेस.... शून्य!
(संपादित : प्रशासक)