भारतीय एकस्व कायद्याची ओळख: भाग १

सध्या आपल्या आसपास एकस्व (पेटंट) ह्या विषयाबाबत अनेक चुकीच्या समजुती प्रचलित झाल्याचे दिसते. ह्या लेखमालिकेद्वारे मी माझ्या वकुबानुसार भारतीय एकस्व कायद्याची ओळख करून देण्याचा, तसेच ह्या चुकीच्या समजुती दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. ह्याविषयातले मनोगतावरील तज्ज्ञ व इतर सुजाण सदस्य ह्या प्रयत्नात सहभागी होतील ह्याची मला आशा आहे. ह्यानिमित्ताने सगळ्यांच्या सोबतीने माझ्यासारख्या मामुली अभ्यासकाचे ह्या विषयाचे आकलन समृद्ध होईल ह्याचीही मला खात्री आहे.

बौद्धिक संपदा आणि बौद्धिक संपदेचे प्रकार

बौद्धिक संपदा म्हणजे बुद्धीने घडवलेली किंवा बुद्धीद्वारा घडलेली निर्मिती. नाटककार नाटके लिहितो, शिल्पकार शिल्पे घडवतो, फोटोग्राफर फोटो काढतो, कवी कविता लिहितो आणि संगीतकार त्याला संगीत देतो तेव्हा हे सगळे जण बौद्धिक संपदेची निर्मिती करत असतात. अशा साहित्यिक-वाङ्मयीन, नाट्यात्मक, सांगितिक आणि कलात्मक (लिटररी, ड्रमॅटिक, म्यूझिकल व आर्टिस्टिक) निर्मितीला प्रतलिपी अधिकार (कॉपिराइट) कायद्याचे संरक्षण प्राप्त होऊ शकते.

एखादा संशोधक औषधाचा शोध लावतो  (प्रॉडक्ट) किंवा
औषधनिर्मितीच्या नव्या प्रक्रियेचा (प्रोसेस)शोध लावतो तेव्हा तोही बौद्धिक
संपदेची निर्मिती करत असतो. अशा निर्मितीसाठी भारतीय पेटंट कायद्याद्वारे संरक्षण प्राप्त होऊ शकते.

एखादा सुर्वणकार सोन्याच्या दागिन्यांची आणि सुतार खुर्चीची नवी डिझाइने बनवतो तेव्हा त्यांच्या ह्या सृजनाला डिझाइन ऍक्टद्वारे संरक्षण प्राप्त करून घेऊ शकता येते. तर एखादा व्यापारी व्यापारासाठी नव्या व्यापारचिन्ह बनवतो तेव्हा त्याला ट्रेडमार्क कायद्यानुसार संरक्षण मिळू शकते.

एखादा प्रदेश विशिष्ट उत्पादनांसाठी प्रसिद्ध असतो. उदाहरणार्थ, कोल्हापूर कोल्हापुरी चपलांसाठी, गोवा फेणीसाठी, स्कॉटलंट स्कॉचसाठी आणि बेळगाव कुंद्यासाठी प्रसिद्ध आहे. ज्या उत्पादनांची खासियत विशिष्ट भौगोलिक प्रदेशांसाठी निगडित आहे अशा उत्पादनांची भारताच्या भौगोलिक उपदर्शनाच्या (जिओग्राफिकल इंडिकेशन) रजिस्ट्रीत नोंद करता येते अशा प्रकारे नोंद झालेल्या उत्पादनांची इतरत्र निर्मिती करून विकण्यावर निर्बंध येतात. उदाहणार्थ, स्कॉच ही स्कॉटलंडमध्ये गाळलेली असली पाहिजे. इतरत्र कुठेही गाळलेल्या स्कॉचसदृश मद्याला स्कॉच म्हणून विकता येत/येणार नाही.

एकंदर भारतात बौद्धिक संपदेची व्यवस्था राखण्यासाठी खालील कायदे अस्तित्वात आहेत:

१. एकस्व कायदा १९७०;
२. प्रतिलिपी अधिकार कायदा १९५७;
३. व्यापारचिन्हे कायदा १९९९;
४. डिझाइन कायदा २०००;
५. वस्तूंच्या भौगोलिक उपदर्शनाचा कायदा (नोंदणी व संरक्षण) १९९९ [जिओग्राफिकल इंडिकेशन ऑफ़ गुड्ज़ (रजिस्ट्रेशन अँड प्रटेक्शन) ऍक्ट १९९९];
६.  एकात्मीकृत अर्धवाहक परिपथ रेखांकन-डिझाइन कायदा २०००2 [सेमिकंडक्टर इंटिग्रेटेड सर्किट लेआउट-डिझाइन ऍक्ट २०००];
७. वनस्पती-वैविध्य आणि शेतकऱ्यांच्या अधिकारांच्या संरक्षणाचा कायदा २००१ 3 [प्रटेक्शन ऑफ़ प्लांट वरायटिज़ अँड फार्मर्ज़ राइट्स ऍक्ट २००१];
८. जैव-वैविध्य कायदा २००२ 4 [द बायलॉजिकल डायवर्सिटी ऍक्ट २००२].

शेवटी महत्त्वाचे म्हणजे बौद्धिक संपदा ही अमूर्त मत्ता आहे. पण असे असले तरी मूर्त मत्तेसारखे तिचे हस्तांतरण करता येते. बौद्धिक संपदेच्या संरक्षणासाठी अनेक कायदे आहेत. पण ह्या कायद्यांद्वारे संरक्षण प्राप्त करुन घेण्याची जबाबदारी मालमत्ताधारकाची आहे.

ह्या भागापुरते एवढेच. पुढच्या भागात आपण भारतीय पेटंट कायद्याच्या ठळक वैशिष्ट्यांची ओळख करून घेणार आहोत.


1 मराठीत 'टु इनवेंट' साठी योग्य असा पर्याय मला मिळाला नाही. 'डिस्कवरी' आणि 'इनवेन्शन' ह्या दोहोंतला फरक अतिशय मूलभूत आहे.
2,3,4  ह्या कायद्यांचा संबंध बौद्धिक संपदेशी आणि एकस्व कायद्याशी कसा आहे हे पुढच्या भागांत सांगण्याचा प्रयत्न करीन.