भरंवशाची म्हैस

(टीप : ह्या गोष्टीतील सर्व पात्रे, प्रसंग, ठिकाणे, वस्तू, विचार, तत्त्वज्ञान इत्यादी सर्वकाही पूर्णपणे काल्पनिक आहे. कशाचेही कशाशीही काहीही साम्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा, ही विनंती.)


अमेरिकेत आनूज कडे म्हैस नाही हे पाहून मला त्या दिवशी धक्काच बसला.


आता हे एकदम वाचून वाचकांना धक्का बसेल त्यामुळे नेमके काय झाले ते सांगतो.


'रिलायबिलिटी' ह्या विषयावर आमच्या कंपनीचा टोन्स्टनला एक ट्रेनिंग प्रोग्रॅम होता. कंपनीने राहण्याची व्यवस्था केलेली होती. आणि तेथे आनूजच्या ओळखीचे सॅन ज्ये, आब् हे आणि सॅतया हे तीन देशबांधव होते ते माझ्या सोबत असणार होते.


टॅक्सीने मी कंपनीत गेलो, तर सॅन ज्ये, आब् हे आणि सॅतया हे मला तेथे त्या कंपनीच्या कॅफेटेरियात दिसलेच. नेहमीप्रमाणे सॅन ज्ये मोठाच्या मोठा ग्लास भरून कॉफी घेऊन आला ती आम्ही चौघांनी वाटून प्यायली. कॉफी किफायतशीरपणे पिण्यासाठी 'एक कप आणि चार बश्या' ह्या तंत्राचा विचारपूर्वक केलेला वापर होता तो.


पहिल्या दिवशी माझ्यासोबत सॅन ज्ये होता. सॅन ज्ये ची हिरवी टोयोटा करोला होती. तिच्या फुटलेल्या दिव्याकडे माझे लक्ष जाताच सॅन ज्ये म्हणाला, "पार्किंग लॉट! ओह् मियँ...न ....पीपल डोंट नो हाउ टु ड्राइव्ह". गाडीत शिरल्या शिरल्या. स्टिअरिंग व्हील खाली चिकटवलेल्या गणपतीला टच करून सॅन ज्येने गाडी सुरू केली. काँक्रीटच्या फ्रीवे वरून आम्ही सुसाट निघालो थबडक थबडक करीत. मधेच खटाक् करून त्याने एक कॅसेट लावली आणि म्हणाला, "धिस स्टफ इस नाइस".... ती पुलंची 'म्हैस' गोष्ट होती. ती आम्हाला शाळेत स्थूल वाचनाला होती त्यामुळे माझी ती जवळ जवळ पाठ होती.


तर अशा प्रकारे मी पहिल्या दिवशी 'नाईस स्टफ' ऐकला.


दुसऱ्या दिवशी माझ्या दिमतीला आब् हे होता. आब् हे ची हिरवी होंडा ऍकॉर्ड होती. तिच्या फुटलेल्या आरश्याकडे माझे लक्ष जाताच आब् हे म्हणाला, "पार्किंग लॉट!" गाडीत शिरल्या शिरल्या पार्श्वदर्शनाच्या आरश्यावर टांगलेल्या गणपतीला टच करून आब् हे ने गाडी सुरू केली. वंग वंग वंग करीत जाऊ लागली. क्लक् करून त्याने एक कॅसेट लावली आणि म्हणाला. "यूइल लाइक धिस स्टफ." हो. म्हैस होती ती. मला आवडण्याचा प्रश्नच नव्हता.


दुसऱ्या दिवशी असा म्हशीचा रवंथ चालू होता.


तिसऱ्या दिवशी सॅतया निळी कॅव्हेलिअर घेऊन आला. मी म्हणालो, "रंग छान आहे." त्यावर तो म्हणाला, "ओह! धिस इस रेंटल. माझी कॅमरी आहे. ग्रीन कलर. पार्किंग लॉट मधे सम्बडी बँग्ड इट. उद्या मिळेल." गाडीत शिरल्या शिरल्या समोरच्या ग्लोव्ह पॉकेट मधे काढून ठेवलेल्या गणपतीच्या चित्राला टच करून सॅतया ने गाडी सुरू केली.  घुर्र्र्र्र्र गाडी सुरू झाली. "डोंट वरी ... आयॅम कॅरीइंग ऑल स्टफ..." असे म्हणून त्याने म्हैस लावली.


अशी तीन दिवस म्हैस करून मी परत मुक्कामी आलो.


मला विमानतळावर घ्यायला आनूज त्याची हिरवी होंडा सिव्हिक घेऊन आला होता. आनूज आणि हर्शीला च्या दोघांच्या दोन हिरव्या होंडा सिव्हिक होत्या. त्या त्यांना कुठेतरी नाईस डील म्हणून मिळाल्या होत्या. नंतर एकीच्या दारावर आणि एकीच्या मागच्या बंपरवर (पार्किंग लॉट मध्ये) पोचे पडले होते, ते मला माहित होते.


"हॅए...गॅवी, (गॅवी म्हणजे मी) हाऊ वाज योर प्रोग्रॅम मॅन? " आनूज उत्साहाने दोन्ही हात उंचावत म्हणाला.


"छान होता." मी ट्रंकेत (गाडीच्या डिकीत) बॅग टाकत म्हणालो.


"क्खूऊ....ल" आनूज ट्रंक बंद करीत आनंदाने म्हणाला.  समोरच्या बोर्डावरच्या स्प्रिंगवर नाचणाऱ्या गणपतीला टच करून त्याने गाडी सुरू केली आणि.... आणि....


नाही! काहीतरी चुकलेच! गाडी पार्किंग मधून बाहेर आली. एक मिनिट गेलं, म्हैस नाही. दोन गेली... नाही. विमानतळापाशी सुरू होणाऱ्या वाहनांच्या गर्दीतून गाडी बाहेर आली तेव्हा तब्बल ४ मिनिटे झाली होती. तरीही म्हशीचा पत्ता नव्हता. आता मात्र माझ्या हृदयाचा ठोका चुकला. मी आनूजकडे अपेक्षेने पाहिले; पण त्याचे लक्षच नव्हते...


म्हशीवाचून मला राहवेना. मन अस्वस्थ झाले. चुळबूळ करू लागले. शेवटी विमानतळाच्या आवारातून गाडी बाहेर येता येता मीच धीर करून कॅसेटप्लेअर चे बटण दाबले. कॅसेट सुरू झाली आणि त्या क्षणीच मला तो धक्का बसला..... कथेच्या सुरवातीला जो मला धक्का बसला म्हणालो तोच हा धक्का.


ती म्हैस नव्हती! ती 'अंतू बर्वा' ची कॅसेट होती.


'अरेरे! काय झाले हे', असे माझ्या मनात आले. परिचयाच्या गोष्टी एकमेकांबरोबर दिसल्या की एक प्रकारचा भरंवसा तयार होतो आणि ग्राहकाची तशी अपेक्षा तयार होते आणि ग्राहक त्यावर विसंबून राहतो असे आमच्या भरंवशाच्या कार्यक्रमात शिकवलेले होते त्याचा हा परिणाम असावा. 'आनूजकडून भरंवसाभंग' ह्या भावनेने मी अगदी सुन्न झालो.


खरे म्हणजे आनूजचे कधी काही चुकले असल्याचे मी पाहिलेले नव्हते. कदाचित त्याचे सगळे लक्ष खाली गेलेल्या गॅसच्या काट्यावर असावे. वाटेत एका ठिकाणी सर्वात कमी भावाने पेट्रोल मिळते ते त्याला माहित होते. त्या पेट्रोल पंपापर्यंत आम्ही पोहोचतो की नाही ह्याचे त्याला टेन्शन आले असावे. पण अर्थात त्याच्या मनासारखे झाले. बरोबर 'त्या' पेट्रोलपंपात आम्ही वळलो.


पेट्रोल भरण्यासाठी इंजिन बंद केल्यामुळे कॅसेट बंद झाली; पण माझे विचाराचे वादळ थांबेना. अमेरिकेत आनूज कडे म्हैस नाही ही गोष्ट मानायला माझे धजेना. मला त्याने जो धक्का बसला त्यातून सावरणे कठीणच होते. इतक्या सगळ्या गोष्टी अगदी दृष्ट लागाव्या अशा अगदी नेमक्या आपापल्या ठिकाणी अनुरूप आहेत, मग नेमके इथेच काय बिनसले असावे बरे... असे मला वाटत राहिले. ही विसंगती माझे मन स्वीकारीना. आणि व्हायचे तेच झाले. इतका वेळ जाणीवपूर्वक नको नको म्हणून बळे बळे दूर सारलेला तो विचार शेवटी माझ्या मनात घुसलाच .... 'बापरे! आनूजला म्हैस नकोशी तर झाली नसेल ना?' ह्या विचारासरशी माझ्या पोटात धस्स झाले.


तेव्हढ्यात पेट्रोल भरून झाले. आनूजने गाडी सुरू करताच कॅसेट पुढे सुरू झाली, तसे माझे विचारचक्र थांबले....आणि काय सांगू, गाडी पंपाच्या बाहेर आली तेव्हा एक चमत्कारच झाला.


".... समस्त रत्नांग्रीच्या म्हयशी तूर्तास गाभण काय रे झंप्या?......"


हे त्या कॅसेटमधले वाक्य आणि तो म्हशीचा उल्लेख आनूजच्या कानावर पडला मात्र.... विजेच्या वेगाने त्याने हालचाली केल्या आणि डोळ्याचे पाते लवते ना लवते तोच कॅसेट बदलून दुसरी लावली.


होय! होय! होय! वाचकहो, ती म्हैस होती!!!


त्या क्षणी एक सुखद लहर माझ्या सर्वांगातून गेली. सगळे संशय, दुःख, शंकेचे वादळ मळभ वगैरे दूर झाले आणि घर येई पर्यंतचा सगळा वेळ मी म्हशीच्या सान्निध्यात रमून गेलो.


हे सगळे झाले खरे; पण केवळ काही मिनिटांच्यासाठी धीर न धरता आपण आनूजच्या आवडीनिवडींविषयी, भरंवशाविषयी उगाच भलतीच शंका घेतली ह्या अपराधी भावनेने मी घरापाशी उतरताना मनोमन चांगलाच शरमिंदा झालो होतो.