भारतभेटीचा भार

(टीप : ह्या गोष्टीतील सर्व पात्रे, प्रसंग, ठिकाणे, वस्तू, विचार, तत्त्वज्ञान इत्यादी सर्वकाही पूर्णपणे काल्पनिक आहे. कशाचेही कशाशीही काहीही साम्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा, ही विनंती.)


परवा मॉलमध्ये गेलो होतो तेंव्हा समोरून आनूज येताना दिसला. त्याच्या हातात दोन बासमती तांदुळाच्या पिशव्या होत्या. मला दोन दिवसापूर्वीच त्याने दोन पिशव्या बासमती घेतल्याचे म्हणाला होता, म्हणून मला आश्चर्य वाटले.


"काय रे, पुन्हा बासमती?"


"अरे इंड्या ट्रिपची प्रिप्रेशन चालल्ये"


"म्हणजे इथून भारतात तांदूळ घेऊन जाणार?"


"तू म्हणजे खरा गांवढळ आहेस!.." तो पुढे काही बोलणार इतक्यात तिकडून हर्शीला येताना दिसली.


"हाय गॅवी!" ती चित्कारली. (त्यांनी सगळ्या मित्रमंडळींची नांवे हल्ली क्रमाक्रमाने बदलली आहेत. मला ती दोघे 'गॅवी' असे म्हणतात) हातातल्या पिशव्या उंच वर करून दाखवून म्हणाली "इंड्या ट्रिप!" आणि पुढे आनूजला म्हणाली, "आनूज ट्रंकमधे (म्हणजे गाडीची डिकी) ह्या बॅग्ज टाक तोवर मी हा कॅमेरा तिकडे रिटर्न करून येते." आणि पिशव्या ठेवून ती गेली.


"हे स्नॅप्स बघ." म्हणून त्याने माझ्या हातात एक फोटोंचे पुडके ठेवले.


आनूज आणि हर्शीला कॉम्प्यूटरवर काम करताहेत, कारमध्ये बसलेत, लॉन साफ करीत आहेत, वॉशिंग मशीन वापरत आहेत, सेलफोनवर बोलत आहेत, कधी गॉगल लावलेले आहेत, कधी कॅमकॉर्डरवर शूटिंग करीत आहेत, मॉलच्या हालत्या जिन्यावरून वर खाली जात आहेत, घरातल्या टीव्ही, फ्रीज, म्यूझिक सिस्टिम पाशी उभे आहेत, हाफ पँट घालून समुद्र किनाऱ्यावर गेलेत.... असे अनेक फोटो होते. भारतभेटीची तयारी जोरदार दिसत होती. खरे म्हणजे मला आनूज हर्शीला, त्यांच्याकडच्या वस्तू आणि त्यांनी वापरलेल्या आजूबाजूच्या गोष्टीत नवे असे बघण्यासारखे काही नव्हते, पण फोटो पाहण्यात वेळ बरा गेला.


"अरे! छान आले आहेत की फोटो! मग कॅमेरा परत कशाला केला?" फोटो पाहून झाल्यावर कॅमेर्‍याबद्दलही एखादे वाक्य बोलायचे असते हे अलीकडे मी बघून बघून शिकलोय.


"वी टुक ऑल स्नॅप्स. विदिन थर्टी डेज एनिटाईम तुम्ही कॅमेरा रिटर्न करू शकता तुम्हाला ते काहीही क्वेश्चन करत नाहीत." (तुम्ही म्हणजे आनूज, हर्शीला) तेवढ्यात हर्शीला आली.


"काय झाली का ट्रिपची तयारी?" मी तिला विचारले.


"होतेय कसली, गोइंग क्र..एझी...." पाची बोटे ताणून दोन्ही हात वर करून डोक्यावर टोपली ठेवल्याच्या अभिनय करून ती म्हणाली आणि एकदम मला पाहून तिला काहीतरी एकदम सुचले असावे. आनूजला ती म्हणाली, "आनूज, अरे गॅवी आलाय तर इट्स गुड म्हायते ना! गॅवीला सांग मोअर बॅग्ज बाय करायला."


त्यावर आनूज मला समजावू लागला, "अरे बासमतीच्या बॅगबरोबर केशर फ्री आहे त्या स्टोअर मध्ये...."


"म्हणजे भारतात न्यायला...." एव्हाना माझ्या हुशारीत किंचितशी भर पडली होती.


"येस. पण तो स्टोरवाला एनी वन ला मोर दॅन टू बॅग्ज अलाव् करत नाही. लास्ट वीकेंडला मी दोन आणि हर्शीला दोन अश्या चार डिफ्रंट टाईमला जाऊन घेतल्या. ही डिडंट नोटिस... मी आज दोन घेतल्या. तरी टू मोअर रिलेटिव्हज राहिलेत. तर तू जाऊन दोन बॅग्ज बाय कर ना आमच्यासाठी...."


"हो. आणतो की त्यात काय मोठंसं..." म्हणून मी जाऊ लागणार तेवढ्यात हर्शीला म्हणाली, "अरे, गॅवी व..एट, व..एट. आनूज तू नीट एक्स्प्लेन कर... केशर नसेल तर इट्स नॉट गुड म्हायते ना..."


त्यावर आनूजने मला सूचना दिली, "गॅवी, तिथे लास्ट रोमधे सगळ्यात खालच्या रॅकवर हे फ्री सॅफ्रनचा बासमती आहे. तो स्टोअरवाला पक्का आहे. आपणहोऊन केशर फ्री आहे ते सांगत नाही, त्याला मुद्दाम विचारल्याशिवाय....."


"हो बरं सांगितलंस...."


"यू मस्ट बी व्हेरी मच अलर्ट.... पीपल डोंट हॅव लाइक सिंपल ऑनेस्टी...."


"हो हो अगदी बरोबर." मी दुकानाकडे जाता जाता मान्य केले....


भारतभेटीचा एवढा भार डोक्यावर असतानाही आनूजहर्शीलांनी प्रत्येक बारकाव्याचा किती तळमळीने आणि नियोजनपूर्वक विचार केला होता!