फुर्सत के रात दिन

शायर-ए-आजम मिर्जा ग़ालिब यांचा एक नितांत सुंदर शेर वापरून गीतकार गुलजार यांनी हिंदी सिनेमाला एक नितांत सुंदर गीत दिले. तो शेर आहे,

दिल ढूंढता है फिर वोही फुर्सत के रात दिन

बैठे रहें तसव्वुर - ए- जाना किये हुए॥

हा शेर त्यातल्या 'फुर्सत' या शब्दामुळे समजायला काहीसा कठीण वाटत असेल. 'तसव्वुर - ए- जाना' समजावून घेऊ शकतो. 'तसव्वुर' म्हणजे कल्पना आणि 'जाना' म्हणजे प्रिया! तसव्वुर - ए- जाना म्हणजे प्रियेची कल्पना! पण 'फुर्सत' हा शब्द काहीसा कठीणच आहे नाही का समजायला? कारण आजकाल 'फुर्सत' ही अतिशय 'रेअर कोमोडिटी' म्हणजे दुर्मिळ उपभोग्य वस्तू झालेली आहे.

प्रत्येकाच्याच आयुष्यात इतकी गतिमानता आली आहे की कुणालाच मरायलाही फुर्सत नाही. जो तो आपला 'ह्यात' म्हणजे घाईत. 'कोण काय करतं? ' याचा हिशेब केला तर कोणीच काहीच जास्त करत नाही. तरीही कोणालाच मरायलाही फुर्सत नसते.

आजकाल प्रत्येक गोष्ट इन्स्टंट आणि फास्ट झाली आहे. फास्ट फास्ट म्हणजे किती फास्ट? तर 'फास्ट या इंग्रजी शब्दाला 'जलद' हा मराठी प्रतिशब्द सगळ्यांना आठवेल. पण 'स्लो' या इंग्रजी शब्दाला मराठीत काय म्हणतात? अशी भाषिक शंका विचारून आपले (मति)मंदत्व सिद्ध करण्यात आपण धन्यता मानतो. यामागचे कारण हेच, इथे कोणाला शब्दकोशात शोधायला फुर्सत आहे?

पूर्वी म्हणे आपल्याकडे चार-चार पाच-पाच दिवस लग्न चालायची. सगळे नातेवाईक, इष्टमित्र, शेजारी-पाजारी सहकुटुंब सहपरिवार एकत्र येऊन याच चार पाच दिवसांत आपापल्या नात्यांची वीण घट्ट करायचे. आजकाल काही तासांत सगळं आटोपलं की सगळे आपापल्या मनाची कवाडं बंद करून फुर्सत नाहीचा जप करायला मोकळे.

या फुर्सतीबरोबरच आणखी काही गोष्टी दुर्मिळ झाल्या आहेत. सदनिका पद्धत आली, अंगणाचा पार्किंग लॉट झाला. त्यामुळे उन्हाळ्यात गच्चीत घातलेली, चांदण्यानं गार झालेली अंथरूण विसरल्या गेलीत. स्वतःचं अंथरूण जास्त गार व्हावं म्हणून इतरांच्या अंथरुणात काही वेळ लोळण्याची मजा गेली. पिकलेल्या आंब्याचा आणि उमलणाऱ्या मोगरीच्या कळ्यांचा संमिश्र सुवास घेत मध्यरात्रीपर्यंत जमलेला गप्पांचा फड आणि पत्त्यांचे डाव, सगळं सगळं गेलं. कारण इथे कोणाला मरायला फुर्सत आहे?

आजकाल श्रावणात घननिळा कधी बरसून जातो हेही कळत नाही. श्रावण सरींचं स्वागत झोक्यांवर झुलत करायचं असतं. पण झाडं नाहीशी झालीत, झोक्याच्या जागी सीलिंगला लटकवण्याच्या वेताच्या खुर्च्यांचे झुले आलेत, आणि श्रावणाला भेटण्याचा आवेगही ओसरला. देवघरात समईच्या शांत प्रकाशासकट श्रावण मासात येणाऱ्या विविध सणांची महती सांगणाऱ्या 'आटपाट नगरातील गोष्टी'ही हरवल्यात आणि त्या गोष्टी सांगणारी आजीही हरवली. श्रावणही मग उभ्याउभ्याच उगामुगा येतो आणि न रेंगाळता, झिम्मा फुगड्या न खेळताच निघून जातो. त्याच्या स्वागताला इथे कुणाला मरायला फुर्सत............

पूर्वी काही निवडक लोक खिशात घड्याळ ठेवून फिरायचे. एरवी घड्याळं भिंतीवर टांगलेली असत. सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्र अशी काय ती दिवसाची चार ठळक विभाजनं होती. पण ही घड्याळं मनगटावर बांधली गेलीत, वेळेची हातकडी पडली आणि 'टाईम मॅनेजमेंट'चं शास्त्र उदयाला आलं. घड्याळाचा तोल सांभाळता सांभाळता मानवी नात्यांचा तोल कधी ढळला कळलंच नाही.

आज के. जी. त असलेल्या मुलांना नॅनो सेकंद दाखवणारं घड्याळ हवं असतं. कारण एका सेकंदाच्या फरकानं आपण 'सेकण्ड' किंवा 'थर्ड' होऊ शकतो हे त्यांना कळलं आहे. आता लगोरी, शिवाशिवी, डबाऐसपैस, टिक्करबिल्ला, नदी की पहाड, विषाम्रुत या सारखे बिनपैशांचे खेळ खेळण्याकरता मैदानं उरली नाहीत आणि कोणाला त्यात रसही वाटत नाही. कारण या खेळातून मित्र मिळतात, प्रतिष्ठा मिळत नाही. प्रतिष्ठा मिळते ती विकासाच्या नावाखाली मैदानं गिळून, पचवून बसलेल्या शॉपिंग मॉल्स आणि वॉटर पार्क्सच्या एंटरटेन्मेट झोन मध्ये. तिकिटांच्या किमतीत मनोरंजन आणि सोबत प्रतिष्ठा फ्री. 'एका वर एक फ्री' च्या जमान्यात वावरणाऱ्या आमच्या सारख्यांना 'मित्रां'साठी वेळ खर्च करायला वेळ आहे कुठे? इथे कुणाला मरायला फुर्सत..........

काळाची पावलं ओळखावी म्हणतात. काळाच्या पडद्या आड अनेक गोष्टी हरवल्यात. 'कालाय तस्मै नमः' म्हणत आपण हे हरवणं मान्य केलं. पण जेव्हा जीवनातले आनंदाचे छोटे छोटे क्षण हरवू लागले, माणसांचे प्रेमाचे बंध जाचक बेड्या वाटू लागले तेव्हा हे असं कसं झालं? या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचे विचार मनात आल्याशिवाय राहत नाहीत. इतके दिवस हे कारण शोधायचं म्हणते आहे पण वेळच मिळत नाही. इथे कोणाला मरायला फ़ुर्सत.........