आणि म्हणे .. आम्हाला माणसे कळतात ...!

"आणि म्हणे ... आपल्याला माणसे कळतात..." 
आपल्याला भेटलेल्या अनेक व्यक्तींबद्दल आपली काही मते तयार होतात. ही मते त्या व्यक्तीच्या वेशभूषेवरून, बोलण्यावरून आणि महत्वाचे म्हणजे त्याच्या वागणुकीवरून तयार होतात.  
मग त्यांना आपण मित्र, शत्रू किंवा चांगला, बरा, वाईट माणूस म्हणून आपल्या मनाच्या ज्या त्या कप्प्यात बंदिस्त करून टाकतो आणि त्यानुसार त्या व्यक्तीशी आपल्या प्रतिसादाच्या, वागण्याच्या पद्धती ठरवून टाकतो.   
आणि अचानक ... आपल्या मतांना, कल्पनांना छेद देऊन ती व्यक्ती अशी काही वागते की आपण अचंबित, आश्चर्यचकित होऊन जातो. 
हे अचंबित, आश्चर्यचकित होणे कधी आनंददायी तर कधी दु:खदायकही असू शकते. 
पण दोन्ही अर्थांनी आपल्या कल्पनांना, मतांना हादरा बसलेला असतो, हे मात्र नक्की.  
आणि आपल्याला पटते की आपले त्या व्यक्तीबद्दलचे अंदाज, अडाखे चुकीचे होते. 
आपल्याला जाणवते की, "... आपल्याला माणसं कळतात" ही आपली समजूत चुकीची होती किंवा निदान फारशी बरोबर नव्हती. 
प्रत्येक व्यक्तीला असा अनुभव आलेला असेलच, नव्हे असतोच. किंबहुना असे अनुभव रोजच्या रोज आपल्याला येतच असतात.    
अशाच सर्वसामान्य माणसांची, त्यांच्या प्रसंगोपात्त वागण्याने आपल्याला दिलेल्या धक्क्यांची, जाणीवांची, अनुभवांची देवाणघेवाण खूप रंजक, रोचक होईल असे मला वाटते. त्याची एक लेखमाला होईल असेही वाटते. तशी ती व्हावी अशी माझी इच्छा आहे. 
(अर्थात हे अनुभव उगीचच, "मला वाटले होते माझा मित्र मला उसने पैसे देईल, पण त्याने दिलेच नाहीत", "मला वाटले पत्नी माझ्या आवडीचे पिठले, भात करेल पण तिने केलाच नाही" वगैरे बालिश स्वरूपाचे असू नयेत, ही अपेक्षा आहे. आणि ती रास्त असावी.)
आपल्या मनाचा तळ ढवळून काढणारा, आपली त्या व्यक्तीबद्दल किंवा आयुष्यातल्या मूल्यांबद्दलची मते बदलायला लावणारा किंवा बदलणारा असा तो मर्मस्पर्शी प्रसंग असावा.
"मनोगतींनी" ह्याला प्रतिसाद देऊन त्यांचे अनुभव लिहून काढावेत असे आवाहन करतो. प्रकाशकांना अर्थातच सर्वाधिकार असेल. 
प्रथम पुष्प मी गुंफावे ह्या विचारणे सुरुवात करतो... 
...... 
मी सन १९८२ मध्ये कोल्हापूरला एक ज्युनिअर वकील म्हणून व्यवसाय सुरू केला. त्यावेळी मी फक्त कामगार न्यायालय आणि नंतर औद्योगिक न्यायालयात काम करायचो. त्याच सुमारास एका केसमुळेच माझी कुमार नावाच्या व्यक्तीशी ओळख झाली. त्याच्या भावाचे काम माझे वरिष्ठ वकील श्री. पाटील ह्यांच्याकडे होते. 
पुढे सन १९८५ मध्ये मी स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. आणि साधारणपणे जानेवारी १९८६ च्या सुमारास हा कुमार माझ्याकडे सोनटक्के नावाच्या माणसाची केस घेऊन आला. हे सोनटक्के त्याचे मित्र. 
सोनटक्के ४७-४८ वर्ष वयाचे होते आणि एका महामंडळात नोकरीला होते. महामंडळाने त्यांना केवळ सात-आठ महिन्यांच्या विनापरवानगी गैरहजेरी करता, कोणतीही संधी न देता, चौकशी न करता नोकरीतून तडकाफडकी बडतर्फ केले होते आणि ते ही जवळ जवळ २४-२५ वर्षांच्या त्यांच्या निष्कलंक सेवेचा विचार न करता.   
प्रथमदर्शनीच सोनटक्के मला मवाळ, पापभीरू, सोशिक वाटले. आमच्या चर्चेच्या वेळी, त्यांचीच केस असून देखील, खूप शांत होते आणि माझ्या ऑफिस मध्ये खाली मान घालूनच बसले होते. त्यांची माहिती मला कुमारच देत होता. कदाचित बडतर्फीचा धक्का सोनटक्के ह्यांना जास्त वर्मी लागला होता असे मला वाटले. आणि ते साहजिकच होते. 
केसची माहिती घेता घेता मला त्यांची वैयक्तिक माहिती देखील कळत गेली. त्यांची पत्नी नोकरी करत नव्हती आणि घरात दोन मुले होती जी शिकत होती. 
कुमार म्हणाला, "सोनटक्केला ह्या सगळ्याचा खूप मानसिक धक्का बसला आहे. त्याला कमी केल्याचे फक्त त्याच्या पत्नीला माहीत आहे. मुलांना ते अजून कळू दिलेले नाही. शेजारी-पाजारी तर त्या बद्दल अनभिज्ञच आहेत. त्याला ह्यातून बाहेर काढणे एक मित्र म्हणून माझे कर्तव्य आहे. तसेही मी आणि इतर दोनचार मित्र सोनटक्केच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. तुम्ही ह्याची केस घ्या. तुमची जी काही फी असेल ती आम्ही देऊ. पण त्याला न्याय मिळवून द्या आणि तो ही लवकरात लवकर". 
ह्या सगळ्या चर्चेत सोनटक्के गप्पच होते. मला त्यांचे ते शांत बसणे थोडेसे विचित्र वाटत होते. पण मग, संधी मिळाल्यावर बोलू असा विचार करून मी, कागदपत्रे ठेवून घेऊन त्यांना दोन दिवसांनी यायला सांगितले. 
दोन दिवसांनी सोनटक्के आले. एकटेच. मी कागदपत्रे त्यांच्या सहीसाठी तयार ठेवली होती. त्यांनी सही केली. मला किती पैसे द्यायचे ते विचारले.
मी म्हटले, "पैसे तुम्ही देणार आहात का?" 
सोनटक्के म्हणाले, "नाही कुमारच देईल, पण किती द्यायचे?".
"तुम्ही नका काळजी करू. पैशाचे मी आणि कुमार बघून घेऊ. तुम्ही आता पुढच्या आठवड्यात या. जमले तर कोर्टाची नोटीस आपणच संस्थेला लागू करू, म्हणजे वेळ वाचेल", मी समजावणीच्या सुरात म्हटले. 
सोनटक्केंनी मान डोलवली. 
दोन चार दिवसांनी कुमार आला. केसचे काय झाले आणि फी किती द्यायची हे विचारायला. मी माझ्या मनात आलेले विचार त्याला बोलून दाखवले.
"सोनटक्के जरा जास्तच हताश वाटतात. म्हणजे त्यांच्याकडे अन्यायाविरुद्ध झगडण्याची जिद्दही दिसत नाही. तुम्ही मित्रांनीच त्यांना घोड्यावर बसवल्यासारखे वाटतंय". मी न राहून म्हणालो.
"तसे नाही. पण सोनटक्के खूप संवेदनशील आणि सोशिक आहे. त्याची बायको, म्हणजे आमची वहिनी देखील तशीच. तुम्हाला विश्वास नाही बसणार, बडतर्फ केल्यापासून मुलांना काय, कुणालाच कळू नये म्हणून आजही वहिनी त्याला सकाळी डबा करून देतात आणि हा ऑफिसच्या वेळेला घरातून निघतो. लांब कुठल्यातरी बागेत जातो आणि दिवसभर वेळ काढतो. भूक लागलीच तर डबा खातो आणि ऑफिस सुटायच्या वेळेला घरी परत येतो", कुमार म्हणाला.
"सोनटक्केची आर्थिक परिस्थिती देखील फारशी चांगली नाही. आधी त्याचे वडील गेले. तो धक्का त्याच्या आईला नाही सोसला. तिने हाय खाल्ली. गेले चार वर्षे खूपच आजारी होती. तिच्या औषध, उपचारात त्याने अपार पैसा खर्च केला. पन उपयोग नाही झाला. सोनटक्केला बडतर्फ करायच्या फक्त ८ दिवस आधी त्याची आई गेली. तिचे दिवसही पूर्ण झाले नव्हते तेव्हा ही बडतर्फीची नोटीस सोनटक्केला घरीच मिळाली". कुमार सांगत होता.
"पण मग त्यांनी ऑफिसला का कळवले नव्हते? रीतसर रजा का घेतली नव्हती? अरे, ऑफिसचे नियम पाळून देखील सोनटक्केंना आईची सेवा करता आली असती", मी म्हणालो.   
"बरोबर आहे. पण आता त्याला असले काही समजवायला गेलो तर काही न बोलता नुसता घुम्यासारखा बसतो". कुमार सांगत होता.   
"आज त्याच्याकडे साठवलेले पैसे नाहीतच पण डोक्यावर जवळजवळ रु. ५०,००० चे कर्ज आहे. आणि नोकरी गेलेली. तसेही आम्ही काही श्रीमंत नाही, पण सोनटक्के आणि त्याचा कुटुंबाकडे पाहवत नाही म्हणून आम्ही चार-सहा मित्रांनी आळीपाळीने दरमहा २०० रुपये काढून त्याला द्यायचे ठरवले आहे. शक्य तेवढी मदत करायची म्हणून ..". कुमार म्हणाला.
मला नाही म्हटले तरी हे सगळे ऐकून सोनटक्केंबद्दल कणव दाटून आली आणि तरीही कुमार सारखे काही मित्र त्याला लाभलेत ह्याचा आनंदही झाला.         
माझ्यापरीने मी देखील सोनटक्केंना मदत करायचे ठरवले. 
"कुमार, ह्या केसची मला काहीही फी देऊ नकोस. फक्त खर्च झालेले १५०-२०० रुपये दे. तुम्ही सगळे सोनटक्केंकरता एवढे करताय त्याला माझाही हातभार लागू दे". मी कुमारला मनापासून बोललो. कुमारला देखील बरे वाटलेले दिसले.  
पुढे सोनटक्के तारखेला येत गेले. सकाळी वेळेवरच यायचे, ऑफिस मध्ये शांत बसायचे. कोर्टात चला म्हटले की निघायचे. कोर्टात देखील एका जागी बसून रहायचे. 
त्यावेळी कामगार न्यायालयातल्या केसीस चालून संपायला ४-५ वर्षे लागायचीच. 
पण सोनटक्केंची अवस्था आणि कुमारचा तगादा ह्यामुळे मी शक्य तेवढ्या जवळच्या तारखा घेऊन केस संपवत आणली. 
कायदेशीरदृष्ट्या तशी खूप सोपी केस होती. त्यामुळे  वेळ न काढता, अगदी साक्षी पुराव्याची देखील गरज न भासावी आशा तऱ्हेने आणि केवळ कागदपत्रे आणि वरिष्ठ न्यायालयाचे न्यायनिवाडे ह्यावरच मी ती चालवली आणि दीड-दोन वर्षातच संपवली.
कामगार न्यायालयाचा निकाल लागला. सोनटक्केंना महामंडळाने त्वरित कामावर घ्यावे, नोकरीमध्ये सलगता द्यावी आणि मधल्या काळातला सर्व पगार द्यावा असा भरघोस निकाल लागला. 
निकालाच्या दिवशी सोनटक्के कोर्टात होते. न्यायालयाने निकाल जाहीर केल्यानंतर सोनटक्केंनी माझे हात हातात घेतले आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलेले मला स्पष्ट दिसले. मला देखील आपल्या हातून खूप काहीतरी चांगले घडल्याची जाणीव झाली. कर्तव्यपूर्ती आणि मानसिक आनंद अशी संमिश्र भावना माझ्या मनात आली. मी सोनटक्केंना पेढे मागितले आणि तीन-चार दिवसांनी येऊन निकालाची प्रत घेऊन जायला सांगितले. 
संध्याकाळी ऑफिसमध्ये कुमार आला. त्याला झालेला आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसला. त्याने पुन्हा "फी किती देऊ" अशी पृच्छा केली. 
मी तृप्त होतो. मी त्याला मनापासून "ह्या केसची फी घेणार नाही" असे सांगितले. 
"तुमचे ऋण कधीच फिटणार नाही. सोनटक्केच काय, आम्ही मित्र देखील ते विसरणार नाही", असे म्हणून कुमार गेला.
त्या नंतर जवळजवळ १०-१२ दिवस गेले. मी कोर्टात निकालाच्या सहीशिक्क्याची नक्कल मागणीचा अर्ज द्यायला गेलो.
आणि रजिस्ट्रारने, सोनटक्के स्वतःच निकालाची प्रत ४-५ दिवसांपूर्वीच घेऊन गेल्याचे सांगितल्यावर, पूर्णपणे चक्रावलोच. मला धक्का बसला. 
मला अंधारात ठेवून, काहीही न कळवता सोनटक्केनी असे काही केल्याचा संतापही आला. मी कुमारला निरोप पाठवला पण नंतर १५-२० दिवस तो ही नाही आला.
माझा सहकारी वकील चिडवण्याच्या सुरात, "तुम्हाला असेच लोक फसवतात" असे बोलू लागला. 
माझा विश्वासच बसत नव्हता. कुणी माझा असा "मामा" करावा ह्याचे मला आश्चर्य वाटले आणि स्वत:चाच रागही आला. 
डोळ्यासमोर सोनटक्के यायचे आणि त्यांचे ते शांत बसणे, उदास असणे, सगळे ढोंग वाटू लागले. 
मनात आले, कुमार कशाला येईल? सोनटक्केंचे वागणे त्यालाही न आवडल्याने, आपण आता वकिलांना तोंड कसे दाखवायचे असे त्याला वाटत असावे.
एकूण मला खूप मनस्ताप झाला होता हे नक्की.     
......  
असेच तीन चार महिने गेले. संध्याकाळी सहा-साडेसहाचा सुमार. मी एकटाच ऑफिस मध्ये काहीतरी वाचत बसलो होतो. 
"सर, आत येऊ" असे विचारणारा जरासा ओळखीचा आवाज आला. 
दारात सोनटक्के आणि त्यांच्या सोबत एक स्त्री, त्यांची बायको, आत येण्याची परवानगी मागत होते. 
सोनटक्केंना पाहताच माझा राग उफाळून आला. पण मग त्या रागामुळेच माझ्या स्वर कुत्सित झाला आणि बोलण्यात खोचकपणा आला असावा.
"या, सोनटक्के, कसे काय आलात? मला वाटले विसरलात. गरज सरो, वैद्य मरो असे ऐकले होते, पण तुम्ही गरज सरो, वकील मरो असेच वागलात"
"तसे नाही. सॉरी, माझी चूकच झाली. पण काय आहे की ..."
"राहू दे सोनटक्के, असे अनुभव मला नवे नाहीत. उपकार कसे फेडायचे असतात त्याचे प्रत्येकाचे नियम वेगळे असतात हे मला कळते".
"साहेब तुम्ही काहीही बोला, तुम्हाला अधिकार आहे. माझी चूकच तेवढी मोठी आहे. पण माझे ऐकून तरी घ्या ..."
"नको सोनटक्के, उगीच माझे तोंड उघडू नका. अकारण माझ्याकडून तुमच्या पत्नीसमोर तुमचा अपमान नको व्हायला"
"मी काही बोलू का साहेब?" सोनटक्केंच्या पत्नीने विचारले.
"साहेब आम्हाला मान्य आहे, आमचे चुकलेच. त्याबद्दल ह्यांच्या वतीने मी माफी मागते. पण आज आम्ही का आलो आहोत ते ऐका आणि मग काहीही बोला", वाहिनी म्हणाल्या.
निकाल लागल्यावर त्याची प्रत घेऊन सोनटक्के ऑफिसला गेले होते. त्यांना असे वाटले की हा निकाल बघून त्यांना लगेच कामावर घेतले जाईल. फरकाचे पैसे मिळतील. पण आज बघू, उद्या बघू अशी टोलवाटोलवी करून शेवटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी औद्योगिक न्यायालयात अपील केले होते. त्याची नोटीस घेऊन आता सोनटक्के आले होते. माझी गरज त्यामुळेच पुन्हा निर्माण झाली होती. नाहीतर सोनटक्के कशाला आले असते? 
"मला माहीत आहे, तुम्हाला ह्यांचा खूप राग आला आहे. पण खरे सांगते साहेब, आज तुमच्याकडे यायला हे तयारच नव्हते. मला साहेबांकडे जायला तोंडच नाही असे म्हणत होते. पण मी ह्यांना म्हणाले, आपली चूक झाली हे खरे पण, तुम्हीच विचार करा, इतर कुणी वकील असते तर ते अशा वेळी कसे वागले असते? पण ह्या साहेबांनी निकाल लागल्यावर गेले तीन चार महिने तुम्हाला साधा निरोपही पाठवला नाही, पत्र, नोटीस काहीही पाठवली नाही. म्हणून दुसऱ्या कुठल्याही वकिलाकडे न जाता ह्याच वकिलांकडे आपण हे अपिलाचे कागद घेऊन जायला हवे. त्यांना राग येणे साहजिकच आहे, पण तेच तुम्हाला आताही मदत करतील", वाहिनी म्हणाल्या.
"तुमची वकिली करायला वहिनींना आणले आहे का तुम्ही, सोनटक्के? अहो, अगदी माझ्या नकळत, निदान सौजन्य म्हणून तरी तुमच्या निकालाची एखादी प्रत माझ्या घरी, ऑफिसमध्ये ठेवून जायची. तुम्हाला माहीत आहे ही केस मी फक्त वकील म्हणून लढत नव्हतो. तुमची अवस्था आणि परिस्थिती बघून मी एक पैसा देखील न घेता तुमची केस चालवली. त्याचे चांगले पांग फेडलेत", मला माझा राग शेवटी आवरला नाहीच.
सोनटक्के आणि त्यांच्या पत्नीने एकमेकांकडे पाहिले. त्यात थोडे आश्चर्य, थोडे दुःख होते. 
मला वाटले मी जरा जास्तच बोललो. पण आता मी माझा अभिनिवेश सोडणार नव्हतो. व्यवहार तर अजिबातच नाही.
"ठीक आहे, मी हे अपील स्वीकारतो. पण माझी आधीच्या केसची फी रु. १००० आणि अपिलाची रु. १५०० देणार असाल तरच". मी ताठरपणे म्हणालो. खरे तर त्या वेळेच्या माझ्या फीच्या मानाने मी जरा जास्तच फी सांगितली होती.  
"आता तुमच्या शिवाय आम्हाला कुणाचाच आधार नाही. तुम्ही मागितलेली फी आम्ही तुम्हाला नक्कीच देऊ, त्यात अनमान करणार नाही. पण साहेब हे ही लक्षात घ्या की अजून ह्यांना नोकरी नाही. डोक्यावर कर्ज आहेच, मुलांचे शिक्षण, इतर देणी, ह्या सगळ्यांमुळे आता लगेच तुम्हाला पैसे देणे आम्हाला शक्य होणार नाही. पण माझ्यावर विश्वास असेल तर तुम्ही हे कागद ठेवून घ्या, वकीलपत्र घाला. तुमची लहान बहीण म्हणून एवढी मदत कराच". वाहिनी म्हणाल्या. सोनटक्के गप्पच होते.
मला हे असल्या स्वरूपाचे पक्षकारांचे बोलणे नवीन नव्हते. शिवाय सोनटक्केंवर आता माझा तितकासा विश्वास बसत नव्हता. असे काहीतरी बोलून मला भरीला पाडायचे म्हणूनच ते पत्नीसह भेटायला आले होते असा माझा पक्का समज झाला. 
"मागच्या वेळी तुमच्यासाठी शब्द टाकायला कुमार होता. पण त्याने देखील तुमचा निकाल लागल्यावर मला तोंड दाखवलेले नाही. मग आता माझ्या फी ची खात्री द्यायला कोणाला घेऊन येताय?" मी सोनटक्केना विचारले. 
"कुणालाही नाही", वाहिनी ताडकन म्हणाल्या, "आमच्यावर कुणाचा आणि आमचा कुणावर विश्वास उरलेला नाही. आणि तुमचाही आमच्यावर विश्वास नसेल तर इतरांमुळे देखील तो ठेवू नका साहेब. पण तुमच्या फीचीच खात्री तुम्हाला हवी असेल तर आमच्याकडून काहीही लिहून घ्या. हे आणि मी डोळे झाकून त्यावर सही करतो".
का कुणास ठाऊक, पण आता मला उगीचच अपराध्यासारखे वाटू लागले. आपण आजपर्यंत पैशाकरता असे वागलेलो नाही, मग आत्ताच का असे वागतो आहे, असा स्वतःलाच प्रश्न पडला. शेवटी मीच जरा नरमाईने घेतले. 
"त्याची काही गरज नाही, वाहिनी. पण आज काय बोलला आहात ते लक्षात ठेवा सोनटक्के". मी माघार घेत पण स्वत:चा बाणा जपत बोललो. 
सोनटक्केंनी कागदपत्रे ठेवली आणि गेले.
पुढे केसच्या तारखा पडत गेल्या. सोनटक्के पूर्वीसारखेच येऊ लागले. ऑफिसात बसायचे. कोर्टात यायचे. तिथेही पूर्वीसारखेच शांत असायचे.                                 
औद्योगिक न्यायालयात देखील केसीसचे निकाल लागायला वेळच लागायचा. पण सुदैवाने एक-दीड वर्षात सोनटक्केची केस चालली. कामगार न्यायालयाचा निकालच कायम झाला. सोनटक्के पुन्हा जिंकले. 
मागचा अनुभव जमेस धरून मीच स्वतः मुद्दामहून निकालाची प्रत मागायचा अर्ज तयार करून सोनटक्केना दिला आणि त्यांना माझ्या समोर सही करायला लावली. आपल्या माघारी निकालाची प्रत घेऊन सोनटक्केनी पसार होऊ नये म्हणून! त्यांच्या ते लक्षात आले. अर्जावर सही करताना सोनटक्के कसेनुसे हसले. 
दहा बारा दिवस गेले असतील. मला पुन्हा कोर्टातून कळले, सोनटक्के परस्पर निकालाची प्रत घेऊन गेले.
मला पुन्हा राग आला. सोनटक्के आणि त्यांच्या पत्नीचा चेहरा डोळ्यासमोर आला आणि सहकारी मित्राने तेच शब्द पुन्हा ऐकवले.
मला एक स्पष्टपणे जाणवले की माणसे ओळखण्यात मी पुन्हा चुकलो.   
सोनटक्के वाटलं तेवढे प्रामाणिक, निरलस आणि निष्पाप नव्हते हेही उमजले.  
डोळ्यात चमचाभर पाणी आणणे आणि समोरच्याला त्यात बुडवणे थोडेफार अवघड असले तरी अशक्य नसते. बऱ्याचजणांना ते जमते. 
सोनटक्केंनी तेच केले आणि मला हातोहात बनवले.  
पण मग हे कळते तर वळत का नाही? कुणीही यावे आणि आपल्याला फसवावे, हा आपला मूर्खपणा म्हणायचा की आपले प्राक्तन? आणि असे वागून माणसे काय मिळवतात? क्षणाचा फायदा? पण मग त्या फायद्यामुळे आयुष्यभराचे नुकसान करून घेणे परवडते? माणसे तुटली तरी चालते?
मनात असे असंख्य प्रश्नाचे भोवरे उमटले, उमटत राहिले.
माझा पक्षकारांकडे बघण्याचा दृष्टिकोन, नाही म्हटले तरी थोडासा, बदललाच. 
आपल्या मनावर ओरखडे उठले की मग त्यांचे परिणाम आपल्या बरोबर इतरांनाही भोगावेच लागतात. 
तसे थोडेफार होत गेलेच. 
माझ्याकडे नंतर येत गेलेल्या प्रामाणिक पक्षकारांकडे देखील मी संशयाने बघत गेलो. अभावितपणे, पण नाईलाजाने. 
....
खूप दिवस, महिने गेले. माझ्या मनातून सोनटक्के प्रकरण मी काढून टाकले. पण विसरलो नाही. 
आलेला एक अनुभव म्हणून गाठीशी ठेवून माझे आयुष्य आणि माझा व्यवसाय चालूच राहिले. 
....
सन १९९२. दुसऱ्या दिवसापासून कोर्टाला दिवाळीची सुट्टी सुरू होणार होती. 
ऑफिस ७ दिवस बंद असणार होते. त्यामुळे मी, माझा सहकारी आणि ऑफिस स्टाफ सगळे आवराआवरी करत होतो.
असेच सहा-साडे सहा वाजलेले. 
आणि ऑफिसच्या दारात सोनटक्के उभे. बायको आणि दोन्ही मुलांसह.
मला आश्चर्य वाटले. पण त्यांचे सगळ्यांचे चेहरे प्रसन्न, फुललेले होते,  
"साहेब आत येऊ? नाही, न विचारता येतोच. साहेब, प्लीज काही बोलू नका. आधी हे पेढे घ्या. खूप दिवसांपूर्वी कबूल केले होते. मुलांनो काकांना नमस्कार करा. 
साहेब हे माझी मुले. माझ्या पत्नीला तुम्ही ओळखताच" इति सोनटक्के.   
"सोनटक्के हे सगळे काय चाललंय?" मी जरासा गडबडून गेलो होतो आणि रागही येत होता.
"साहेब" वाहिनी म्हणाल्या, "आधी हे घ्या आणि मग बोला". वहिनींनी माझ्या हातात एक पाकीट ठेवले. 
"हे काय आहे?" मी विचारले.
"हे पैसे आहेत. तुमच्या फीचे" वाहिनी म्हणाल्या.
मी काही बोलायला तोंड उघडण्याआधीच त्यांनी पुढे बोलायला सुरुवात केली.
"साहेब, प्लीज ऐका. तुम्हाला आठवतंय? ह्यांची नोकरी गेली आणि आमच्यावर आभाळ कोसळले. त्यावेळची परिस्थिती किती बिकट होती ते तर तुम्हाला माहीतच आहे. कर्जाचा डोंगर, मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आणि ह्यांचा असा सरळ स्वभाव. त्या वेळी फक्त तुम्हीच आम्हाला देवासारखे भेटलात. निरपेक्षपणे तुम्ही ह्यांची केस घेतलीत. आमच्यासाठी तुम्ही जे केले, तसे आणि तेवढे करणारे कुणीही भेटले नाही, साहेब. तुम्हाला वाटत असेल की ह्यांचे मित्र मदत करत होते. पण तुमचा विश्वास नाही बसणार, साहेब त्यांच्याकडून मिळालेला प्रत्येक पैसा विषासारखा होता. मी ह्यांना तेव्हा म्हणत होते मी काम बघते, धुणीभांडी करते पण तुमच्या मित्रांची मदत नको. पण ह्यांनी माझे ऐकले नाही. साहेब, महिना १०-१२% व्याजाने पैसे देऊन हे मित्र आम्हाला आर्थिक मदत करत होते. तुमच्या कृपेने केसचा लवकर निकाल लागला. आम्हाला वाटले ह्यांना कामावर घेतले जाईल. पण आमचे दुष्टचक्र कुठले थांबायला? संस्थेने अपील केले. आणि पैसे मिळतील ही आशा दुरावल्याने मित्रांनी पैशाकरता तगादा लावला. दारात पठाणासारखे येऊन बसायचे. ह्यांना, मला, मुलांना घरातून बाहेर पडणे मुश्कील झाले होते साहेब. आम्हाला निदान अपिलापुरती मदत करा म्हणून मी स्वत: त्यांच्या पाया पडले. मुलांना त्यांच्या पायावर घातले. पण त्यांना दया नाही आली. ह्या त्रासामुळे 'आता ही कोर्टबाजी पुरे' असे म्हणून ह्यांनीदेखील अपिलाला विरोध करायचा नाही असे ठरवले. साहेब असे सगळे सोडून, हातपाय गाळून बसलेले चालले असते का? म्हणून मग मी स्वतः ह्यांना घेऊन तुमच्याकडे आले. तुम्ही म्हणालात मी आधीची केस फुकट चालवली. आम्हाला धक्काच बसला. कारण तुम्हाला फी द्यायची म्हणून खूप मोठी रक्कम कुमार आणि मित्रांनी ह्यांच्याकडे मागितली होती. तुम्हाला भेटल्यावर हा खुलासा झाला. पण त्यांच्याशी भांडण्यात काहीच अर्थ नव्हता. अपिलाकरता मग तुम्ही सांगाल ती अट आम्हाला मान्य होती. आणि सुदैवाने तुम्ही केस घ्यायला तयार झालात. तुम्ही घेतली नसती तर पुढे काय झाले असते ह्याचा विचारही करवत नाही". वहिनींचा  बोलता बोलता गळा भरून आला. मग सोनटक्के बोलू लागले.
"अपिलाचा निकाल लागला आणि मी, हिच्या सांगण्यावरून, महामंडळाच्या वरिष्ठांना भेटलो. त्यांच्या कानावर सर्व घटना घातल्या. त्यांनी मला कामावर घेता येईल, पण मला मिळणारा फरक मला मिळाला आहे असे खोटे लिहून द्यावे लागेल आणि त्यातली निम्मी रक्कम त्यांना द्यावी लागेल अशी त्यांनी अट घातली. माझा नाईलाज झाला. मी कामावर हजर झालो आणि सगळे मित्र गिधाडासारखे, डोमकावळ्यासारखे जमा झाले. मिळालेले पैसे त्यांना दिले आणि उरलेली रक्कम जमेल तशी देतो असे कबूल करून कसबसे त्यांना थांबवले. पुढे प्रत्येक महिन्याच्या पगारातून ७५-८०% रक्कम त्यांना देऊन  उरलेल्या रकमेत आम्ही भागवत राहिलो. उपाशी राहणे परवडले पण ह्या सगळ्या तथाकथित मित्रांची देणी नकोत असे झाले होते. असे मित्र असले की शत्रूंची गरजच नसते साहेब. सगळ्यांची सगळी देणी, कर्ज, अगदी व्याजासकट फेडायला, इतके दिवस, महिने गेले. दोन महिन्यापूर्वी सगळ्या देणेकर्यांची सगळ्या रकमेतली पै आणि पै फेडली. मगच झोपू शकलो. आणि काल मला दिवाळी बोनस मिळाला. मी सगळी रक्कम घरी हिच्या हातात ठेवली. तर मला म्हणाली अजून एक ऋण फेडायचे आहे. ते फेडल्याशिवाय आपल्याला मरायचा देखील अधिकार नाही. साहेब, हेच ते मला मिळालेले बोनसचे पाकीट आहे. ह्यात बोनस म्हणून माझ्या अडीच-तीन महिन्याचा पगार आहे. ह्या रकमेवर फक्त तुमचा अधिकार आहे. ही रक्कम तुम्ही घेतलीत तर आज आमच्या घरी समाधानाची दिवाळी साजरी होईल. मनावरचे इतक्या वर्षाचे ओझे उतरेल. तुमच्या उपकाराचे ओझे आता पेलवत नाही साहेब. मुलांनी माझे असे काही मित्र पाहिले आहेत की त्यांचा माणुसकीवर विश्वासच उरलेला नाही. पण त्यांचा पुन्हा माणुसकीशी परिचय व्हावा म्हणून आज तुमच्या कडे घेऊन आलो आहे" सोनटक्के भावनाविवश होऊन बोलत होते. बोलता त्यांच्या डोळ्यात पाणी आले. वाहिनी आणि मुले देखील आपले अश्रू आवरू शकत नव्हते. 
माझा सहकारी अवाक झाला होता. ऑफिस स्टाफ देखील गप्प होता.  
आणि मी? मला कळत नव्हते की हे सगळे काय चाललंय? मी काय ऐकतोय? मला ह्या चार पाच वर्षात एकाच माणसाने एवढे धक्के द्यावेत? माझ्या विचारांना, कल्पनांना, निष्कर्षांना असा सुरुंग लावावा? मला जाणवले, आपण फार लवकर माणसांबद्दल काही मते बनवतो. त्या समोरच्या व्यक्तीला, स्वतःला सिद्ध करायची संधीच देत नाही. आणि मग असेच निष्कर्ष कुणी आपल्याबद्दल देखील काढत असेल तर? आपण कसे आहोत? आणि आपण आपल्याला कसे सिद्ध करू?
आता मी इतक्या सहजपणे म्हणत नाही, "मला माणसे कळतात...!"