पुरुषार्थ छे पुरुषार्त ? ?

       शतकानुशतके पुरुषांच्या अत्याचारास तोंड देणाऱ्या स्त्रियांनीही आपल्या छळाने पुरुषांनाच जीवन नको नकोसे करून टाकले आहे व त्यामुळे होणाऱ्या आत्महत्येच्या प्रमाणात इतकी वाढ झाली आहे की पुरुषांच्या छळास कंटाळून आत्महत्या करणाऱ्या स्त्रियांच्या जवळ जवळ दुप्पट प्रमाणात स्त्रियांच्या छळास कंटाळून आत्महत्या करणाऱ्या पुरुषांची संख्या असते असा दि.१९ नोव्हेंबरच्या महाराष्ट्र टाइम्समध्ये आलेल्या बातमीचा मतितार्थ आहे.
   एकूण सर्व बाबतीत पुरुषांच्या बरोबरीनेच काय पण कांकणभर सरसच असल्याचा प्रत्यय स्त्रियांनी याही बाबतीत आणून दिला आहे असे दिसते.माझा एक विद्यार्थी अमेरिकेत आहे त्यामुळे मी इकडे आल्यावर तो मला घरी बोलावतो पण मागील वेळी त्याचा फोनही आला नाही त्यामुळे मी यावेळी मुद्दाम चौकशी केल्यावर " सर मी जरा अडचणीत आहे " असे त्याने सांगितले सध्या जिकडे तिकडे मनुष्यळ कमी करण्याच्या लाटेत त्याचाही नंबर लागला असे मला वाटले पण नंतर प्रत्यक्ष  भेटल्यावर कळले की त्याच्या बायकोने त्यालाच जवळ जवळ घराबाहेर काढले आहे इतकेच नव्हे तर नवरा माझा छळ करतो अशा स्वरूपाची तक्रार तिने नोंदवली. चौकशीसाठी पोलिस आल्यावर तिला पुरावा काही देता आला नाही.त्याचा  सगळा  पगार तिने प्रथमपासूनच तिच्याच खात्यावर  जमा करायला लावला  आहे. त्या दोघाना एक मूलही आहे. आता त्याने आपल्याच घरात स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे व घटस्फोटासाठी अर्ज दिला आहे. अमेरिकेत दुसऱ्या कोणाची मदत नसताना तिने  एकटीने एवढा उद्योग करण्याबद्दल तिचे कौतुकच केले पाहिजे. अर्थातच  तिच्या भारतातील  काही भगिनी तर निश्चितच  तिचा कित्ता  गिरवीत असणार असे समजायला हरकत नाही त्यामुळे वरील बातमीत काहीतरी तथ्य असावे असे वाटते.   
  पुरुषार्थ या शब्दा ऐवजी आता पुरुष आर्त झाला आहे असे म्हणावे का ?