अधांतरी

"पाच मिनिटात निघू" पर्स खांद्याला अडकवत सविताने गाडीच्या किल्ल्या विनयसमोर  नाचवल्या.
 चहाचा घोट घेत विनयचे डोळे टी. व्ही. वर खिळले होते.
"तू ऐकतोयस का? "
वाफाळलेल्या कपातून  घोट घेत त्याने तिच्याकडे पाहिलं.
"तू ऐकतोयस का असं विचारलं मी. "
"नाही"
"नाही काय? टी. व्ही. नंतर बघता येईल. "
"बातम्या ऐकायचा प्रयत्न करतोय. "
"असं काही विशेष घडलेलं नाही. दिवसभर तेच तर ऐकवतात. नंतर ऐक. दिवस रिकामा असतो तुला. " विनयच्या कपाळावर आठी उमटली.
"तू ठेवू देतेस का दिवस रिकामा? " चढ्या आवाजात त्याने विचारलं.
"नाही ना, दिला तर नुसत्या झोपा, खाणं आणि टी. व्ही. एवढंच करशील तू. "
विनयला राग आवरणं अशक्य झालं. चिडून त्याने टेबलावर कप आपटला. फुटलाच कप. पण विनय सांडलेला चहा पुसायलाही उठला नाही. तो तसाच बसून राहिला. बाजूला येऊन उभ्या राहिलेल्या सविताच्या चेहर्‍यावर चहाचे शिंतोडे  उडाले. चेहरा पुसत तिने कपड्यांकडे पाहिलं. दोन तीन बारीक थेंब होते, डाग पडणार आता. घाईघाईने  पाणी लावून  ती शर्ट पुसत राहिली. पण तिचं समाधान होईना. ती बाथरुमच्या दिशेने धावली. विनयने तटस्थासारखं आपलं लक्ष पुन्हा टि. व्ही. कडे वळवलं. बातम्यांच्या जोडीला नळाचा आवाज त्याला पार्श्वसंगीतासारखा वाटत होता. विनयचा राग हळूहळू शमत गेला. सविताचा राग मात्र धुमसत होता. ती बाहेर आली ती चिडूनच.
"विनय, फार झालं हे. "
"तू वाट्टेल ते बोलतेस तेव्हा नाही वाटतं हे समजत. "
"खरं तेच बोलले. "
"असं तुला वाटतं. "
"तुला वादच घालायचा असेल तर मी परत आल्यावर करू ते. आत्ता सोडून दे मला कंपनीत. "
"थोडा आळस करतो, निवांत खातो. त्यानंतर वाटलं तर देईन सोडून तुला. "
"ठीक आहे. मग मी घेऊन जाते गाडी. "
तो निमूटपणे उठला. एकच गाडी. सविता ती घेऊन गेली तर दिवसा अजिबात कुठे बाहेर जाणं होणार नाही. दोघं न बोलता गाडीत बसले. गाडी चालवण्यात त्याच लक्ष लागेना. अस्वस्थ हालचाली होत होत्या.   मध्येच वेग कमी, तर अचानक एकदम वाढलेला वेग. त्याने करकचून ब्रेक दाबला तेव्हा पुढच्या गाडीवर आदळणं जेमतेम वाचलं होतं. सविताला कधी गाडीतून उतरतोय असं झालं.
दिवसाची सुरुवात अशी व्हायला नको होती. पण हल्ली  ह्याच घटनाक्रमाची पुनरावृत्ती होत होती. टाळायचं म्हटलं तरी  दोघांनाही ते जमत नव्हतं. मनाला, शरीराला बधीरपण घेरतंय असं तिला वाटत राहिलं. गाडी थांबेपर्यंत तोंडातून चक्र शब्दही न काढता  रस्त्यावर नजर खिळवून ती बसून राहिली. सविता गाडीतून उतरली. निरोपही न घेता, तिला बोलायची संधी मिळू नये याची खात्री करत विनयने गाडी वळवली.
आता  दिवस मोकळाच होता. काय करायचं हे त्याला ठरवता येईना. सविताचा राग आला तरी आपल्या वागण्याने तीही दुखावली जातेय या जाणीवेने त्याला काही सुचत नव्हतं. ती समोर असली की, त्याच्या मनाला लागेल असं काही बोलली की त्याच्याही अंगात तुसडेपणा अंगात भिनत होता. तिच्या मनाविरुद्ध वागलं की त्याला आसुरी आनंद होई. नंतर मात्र स्वत:च्या मनोवृत्तीची  लाज वाटे. डोक्याचा भुगा होत होता पण उपाय सापडत नव्हता हे टाळण्याचा. इकडे तिकडे चक्कर मारून त्याने एक पिक्चर टाकायचं ठरवलं.   ’पिक्चर’ शब्दाने त्याचा तोच चपापला. ’मूव्ही’ म्हणायला बजावलं असतं सविताने. हं.... अजूनही इथे रुळणं जमलं नव्हतं हेच खरं. थिएटरपाशी तो पोचला त्यावेळेस जी ’मूव्ही’ होती ती त्याने बघितली. सुदैवाने त्याचं मनही त्यात रमलं.

झालं गेलं विसरून उत्साही मनाने विनय घरी परतला. आल्या आल्या त्याने फ्रीजवरचा आजचा बेत पाहिला. पोळ्या, कोबीची भाजी, आमटी आणि भात. सविता यायच्या आत हे सगळं व्हायला हवं होतं. सहा सात तास होते ती यायला. त्याने संगणकाचं बटण दाबलं. एक दोन ठिकाणी नोकरीसाठी अर्ज पाठवून दिले. वर्तमानपत्र वाचून झाली. आता काय या विचाराने त्याला पुन्हा ग्रासलं. बेचैनी आली. फेसबुकवर अवि दिसत होता, कितीतरी दिवसापासूनची रुखरुख अविकडे बोलून टाकावी असं त्याला वाटायला लागलं. झालंच तर स्काईप होतं पण त्याला ई-मेलचा पर्याय चांगला वाटला. बसलाच तो लिहायला.

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
अव्या दोस्ता,

    आज फार आठवण येतेय तुझी, म्हणजे तुम्हा सर्वांचीच यार. तसं तर रोज गप्पा होतात फेसबुकमुळे. पण ते सगळं वरवरचं वाटतं. एकावेळी चार पाच जणांशी मारलेल्या गप्पा त्या. कसं चाललंय तुझं? नवीन संसार, नवीन नोकरी, 'आ‍ल इज वेल' ना? नशीबवान आहात तुम्ही. गेल्या वर्षी मी अमेरिकेत आलो तेव्हा तुम्हाला माझा हेवा वाटला, तसाच हेवा मला तुमचा वाटतोय. हसू नको लेका. खरं सांगतोय मी.   आई बाबाची मनं दुखवून येताना फार अपराधी वाटलं. परदेशात जाण्यासाठी काहीही करणा‌‍र्‍या मधलाच मीही एक असंही मनात येत राहिलं. पण सविता तिकडेच असते म्हटल्यावर काय पर्याय होता मला?. डिपेंडंट व्हिसावर जातोय याचं निदान तेव्हा काही फारसं वाटलं नव्हतं, एवढा शिकलो आहे तर सहज मिळेल नोकरी हा विश्वास होता. पण सगळ्या आशा, स्वप्नांवर पाणी पडल्यासारखं वाटायला लागलं आहे. ओबामांच्या नव्या राज्यात बदल होतायत हे माहीत होतं, पण नेमकं याचवेळेस मंदीची लाट येईल आणि तीही इतकी तीव्र असेल असं नव्हतं वाटलं. विशेषत: बहुतांशी कंपन्या  इथला पण सगळा कारभार भारतातून चालवण्याला प्राधान्य द्यायला लागल्या आहेत.   मी चुकीच्या वेळी या देशात  पाऊल टाकलं असं वाटतंय. मला याची कल्पना नव्हती का? असं तू विचारशील, म्हणजे आपण सगळे बोललो होतोच तेव्हा, पण त्यापेक्षा फार हलाखीची परिस्थिती आहे इथल्या उद्योगधंद्यांची. परिस्थिती सुधारण्याची चिन्ह नाहीतच, कदाचित आणखी खालावण्याचीच शक्यता आहे. माझी सहनशक्ती संपत चालली आहे त्याचं फक्त हेच एक कारण नाही. सविताच्या प्रेमाने मला इथे ओढून आणलं पण तिच्या वागण्याने मी बुचकळ्यात पडतो. तिच्या महत्त्वाकांक्षेच्या आगीत मी होरपळला तर जाणार नाही ना या भितीने जीव दडपून जातो. इथे यायच्या अगोदर झालेले आपले कँम्पस इंटरव्ह्यू आहेत ना लक्षात? तुझ्याप्रमाणे मी ही विप्रो मध्ये सुरवात करायला हवी होती असं फार वाटायला लागलंय. पण मला स्वतंत्र काही तरी करायचं होतं. सुरुवातही केली मी, काय काय बेत करतो आपण आणि काय होत जातं. मी लिहितो तुला सविस्तर नंतर. सविता यायच्या आत बरीच कामं उरकायची आहेत. पण थोडंसं बरं वाटतंय; मनातली मळमळ बाहेर टाकल्यासारखं. एकदम सगळं लिहायच्या कल्पनेनेच थकवा आलाय. या पत्रावरून तुला फार अंदाज येणार नाही. पण हळूहळू माझ्या पत्रावरून धागे जोडता येतील. बाकी आपली मित्रमंडळी लागली का मार्गाला? सर्वांचीच नवीन सुरुवात आहे. पक्याचा हॉटेल बिझनेस काय म्हणतोय? का सगळी गि‍र्‍हाईकं तुम्हीच? नर्‍या कसा आहे? आणि स्नेहा? हाय सांग सगळ्यांना.

विनय
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
विनयने ई-मेल पाठवून दिलं. एकीकडे कुकर लावत त्याने भाजी चिरायला घेतली. हातातल्या सुरीच्या गतीने त्याच्या विचारांची लय मागे पुढे होत होती. सविता त्याची बालमैत्रीण. महाविद्यालयीन काळात त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या. तिलाही  कल्पना होतीच. दोघांच्या घरीदेखील हे गृहीत धरलेलं होतं. त्याच्या घरी  फक्त आई, बाबाच. हसतमुख सविता त्यांचीही लाडकी होती. तिच्या घरी तिचे आई, बाबा आणि बहीण. सहज सारं जमून गेलं. दोघांचं अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण झालं की लग्न करायचं निश्चित झालं. हे कधीतरी होणारच हे माहीत असल्यासारखे दोघं अभ्यासात गुंतले. भविष्याची स्वप्न रंगवत राहिले. पण नियती वाकुल्या दाखवीत होती. सविताच्या बाबांना हृदयविकाराचा झटका आला आणि सहज वाटलेल्या गोष्टी दुर्लभ होत गेल्या. त्यांना हॉस्पिटलध्ये  हलवल्यानंतर सविताइतकाच तोही धावपळ करत होता. औषधं आण, जेवणाचा डबा पोचव, रात्री झोपायला राहा. जसं जमेल तसं, त्याच्या घरचेही सविताच्या कुटुंबाला मदत करत होते, ते सविताचे काका अमेरिकेतून येईपर्यंत. नंतर मात्र त्यांनी परिस्थितीचा ताबा घेतला. सविताचे बाबा बरे होतायत असं वाटेपर्यंत त्यांना हॉस्पिटलमध्येच लागोपाठ दोन झटके आले आणि त्यातच ते गेलेदेखील. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. त्या क्षणी नव्हतं जाणवलं ते.   सुरवातीच्या दहा दिवसात दोनच शक्यता त्याला वाटत होत्या, त्याही एकत्रित. एका वर्षाच्या आत लग्न आणि सवितावर आई, बहिणीची आलेली जबाबदारी. पण घडलं ते सर्वांच्याच आकलना पलीकडचं.   सविता, विनयच्या भविष्याचं चित्र धूसर होत गेलं, काकांच्या निर्णयाने...
शिट्टीच्या आवाजाने त्याच्या विचारांची साखळी तुटली. पुन्हा त्या विचारांपाशी पोचणं टाळलंच त्याने. भाजी, आमटी झाल्यावर जेवून घेतलं. पुस्तक वाचता वाचता डुलकीही लागली.

सविताने दोनतीनदा घड्याळात पाहिल्यावर मार्कच्या कपाळावर आठ्या उमटल्या. तिकडे दुर्लक्ष करत ती मीटिंग संपण्याची वाट पाहत राहिली.   नव्याने  सुरू झालेल्या छोट्याशा कंपनीत सविताने अडीच वर्षापूर्वी काम करायला सुरुवात केली. मार्केटिंग विभागातल्या पाच सहा जणापैकी एक सविता. सविताला कंपनीचं डिरेक्टर व्हायचं होतं. आधी मॅनेजर आणि नंतर डिरेक्टर. सध्या तरी छोट्या कंपनीत राहिलं तरच त्या पायरीपर्यंत पोचता येईल असं तिला वाटत होतं. प्रश्न होता  वेळेचा. लग्नाला जेमतेम दोन वर्ष झालेली. विनयला इथे येऊन नुकतंच वर्ष होत होतं. तिलाही नवीन नवीन लग्नाची अपूर्वाई होती, फिरावं, भटकावं, रात्र दिवस एकमेकांच्या सहवासात घालवत सारं जग विसरून जावं असं वाटायचं. पण आयुष्याकडे बघण्याचा तिचा दृष्टिकोन विनयसारखा ’हॅपी गो लकी’ नव्हता. तारुण्याच्या जोषाबरोबर महत्त्वाकांक्षेचं रोपटं फोफावलं होतं. या देशात आल्यापासून कष्टाची तयारी आणि प्रयत्नामध्ये प्रामाणिकपणा असेल तर ’हवं ते मिळवता येतं’, ही नवीनच जाणीव तिला झाली होती.   आशेला पंख फुटले. त्या पंखांच्या बळावर वाट्टेल ते करण्याची हिंमत आली. तिच्या स्वप्न, आकांक्षेपुढे विनयची जम बसवायची धडपड तिला अपुरी वाटत होती. त्याचा अल्पसंतुष्टपणा तिच्या सहनशक्तीपलीकडचा होता.
"मी तुला विचारत होतो सविता. " मार्कच्या करड्या स्वराने ती दचकली.
"अं? काय विचारलंस? लक्ष नव्हतं माझं. "
त्याने पुन्हा तेच सांगितलं, तेव्हा केवळ काहीतरी खुसपट काढायचं म्हणून तिने नाना प्रश्न विचारले. मार्कने शांतपणे तिचं शंकानिरसन केलं तशी ती वैतागलीच.
"तुला समजत नाहीये मला काय म्हणायचं आहे ते. "
"मला समजलं आहे व्यवस्थित. पण तुला तसं वाटत असेल तर नीट समजावून सांग. " त्याच्या थंड स्वराने ताडकन उठून जावं असं तिला वाटलं. पण पाण्याची बाटली तोंडाला लावत तिने चेहरा लपवला.   कधी घरी जातोय असं होवून गेलं. डोकं भणभणायला लागलं होतं. हातातल्या कागदावर ती काहीतरी खरडत राहिली. विनय येईपर्यंत थांबणं भाग होतं. एकच गाडी होती घरात. विनयच्या नोकरीचं जमलं की दुसर्‍या गाडीचं बघता येणार होतं.

संध्याकाळी येतायेता सविताला बाहेर खाण्याची लहर आली. सकाळचा प्रसंग कामाच्या व्यापात तिने केव्हाच मनाआआड केला होता.
"आधी सांगायला हवं होतस तू. सगळं करून ठेवलं आहे ते कोण खाणार? " विनय चिडलाच, जवळजवळ ओरडलाच तिच्या अंगावर.
"अरे, तू एकदम चिडू नकोस रे असा. लहर आली म्हणून म्हटलं. " खरं तर कुठेतरी खाऊ आणि एखादी मूव्ही टाकू असं ती सुचवणार होती. पण विनयच्या स्वराने तिच्या उत्साहावर पाणी पडलं, विरस झाला. त्याच्याशी गप्पा मारण्याची, आँफिसमधल्या लहान सहान गोष्टी सांगण्याची इच्छा तिने मारून टाकली,   सकाळ पासून त्याचं हे असं चाललं होतं, दुर्लक्ष नाहीतर ती म्हणेल त्याला विरोध. तो संथपणे गाडी चालवत राहिला. मध्येच आठवण झाल्यासारखं, एकदा विचारायचं म्हणून विचारल्यासारखं ’थांबवायची आहे का गाडी कुठे’ असंही विचारलं त्याने. तिने मानेनच नकार दिला. शुक्रवारची संध्याकाळ अशी जायला नको होती. आता विनय स्वत:हून बोलणार नाही याची तिला खात्री होती. दोघांनीही एकमेकांशी बोलायचंच नाही असं ठरवलं की एक भयाण शांतता खोलीत रेंगाळत राहणार. नको नको होवून जायचं सविताला ते. त्यातून सुटकेचा एकच मार्ग तिच्या डोळ्यासमोर होता. दार उघडून आत गेल्या गेल्या ती त्याच्या मिठीत शिरली. त्यानेही तिला जवळ ओढलं. आठवड्यातल्या सुटीला गालबोट लागलं नाही या सुखद जाणीवेने ती स्वत:वर खूश झाली. त्याने पुढे केलेल्या चहाचा आस्वाद घेत राहिली. स्वत:च्या पुढच्या बेतांबद्दल, विनयने काय करायला हवं याबद्दल बोलत राहिली. त्यानेही तिच्या बेतांना पुष्टी द्यावी, कौतुक करावं असं तिला वाटत होतं. विनय चेहर्‍यावर पुसटसं स्मित राखत मान डोलवत होता.   टी. व्ही. चालू करण्यासाठी त्याचा हात रिमोटकडे गेला पण काहीतरी उमगल्यासारखा त्याने तो पटकन मागे घेतला. त्याचं तिच्या बोलण्याकडे लक्ष नाही हे तिला कळत होतं, तरीही ती बोलत राहिली. गळ्यात गळे घालून बसलेली ती दोघं दोन ध्रुवावर उभी होती. अचानक स्वत:च्या बोलण्याला खीळ घालत ती म्हणाली.
"मी चार दिवस काकांकडे जाऊन येऊ का? "
"अं? " तो दचकलाच.
"तू आल्यापासून वर्षभरात गेलेच नाही म्हणून म्हणतेय. मला फार आठवण येतेय. "
"अगं पण काका, काकू येतात की अधून मधून. "
"हो पण त्या घरी जावंसं वाटतंय. नेत्रा पण भेटेल. "
तो काहीच बोलला नाही. ती तशीच त्याला खेटून बसून राहिली. त्याने तिच्या गळ्याभोवती हात टाकत तिला छातीशी  ओढलं. तिने टी. व्ही. चालू केला. दोघंही समोर चालू असलेला कार्यक्रम पाहत राहिले. सविता टीव्हीवर नजर खिळवून होती, पण गेल्या चार पाच वर्षाचा ताळेबंद मनात साचत राहिला, उसवत गेला.

चार वर्षापूर्वी तिचे बाबा गेले आणि त्या चौकोनी कुटुंबांच्या आयुष्याची अचानक दिशाच बदलली. तिला आत्ताही बाबा गेल्यावर दहाव्या दिवशी काकांशी झालेलं बोलणं तसच्या तसं आठवत होतं.
"तुम्ही सगळे आमच्याबरोबर चलता का? " काकांकडे तिघी आश्चर्याने बघत राहिल्या.
"अमेरिकेत? " नेत्राने उत्सुकतेने विचारलं. तिच्यादृष्टीने ते जग अद्भुत होतं.
"हो आणि कायमचं. " काकू म्हणाली.
"काहीतरीच काय, ही काय वेळ आहे का भलत्यासलत्या चेष्टेची. " सविता, नेत्राच्या आईला राहवलं नाही.
काका हसले.
"चेष्टा नाही वहिनी. खरंच विचार करा. सविता आणि नेत्राला दत्तक घ्यायची इच्छा आहे आमची. "
तिघी नुसत्या काकांकडे पाहत राहिल्या.
काकूंच्या चेहर्‍यावर हलकंसं स्मित तरळलं.
"ते खरंच म्हणतायत. आम्हाला पोटची मुलं नाहीत. पहिल्यापासून या दोघींचा लळा आहे. त्या साठी तर न चुकता भारतात फेरी असायची आमची. तुम्हीही आला आहात अमेरिकेला, म्हणजे तसं काही अगदी परकं नाही वाटायचं. "
"हो पण एकदम दत्तक? " तिच्या आईला विचारतानाही अवघडल्यासारखं झालं.
"एकतर आडनाव तेच राहिलं आणि तिथलं नागरिकत्वही मिळेल. दुहेरी फायदा नाही का हा? नागरिकत्वाचे सगळे फायदेही घेता येतील म्हणून हे सुचलं आम्हाला. आम्हालाही आयत्या मुली मिळतील. "
"निर्णय घ्यायची घाई करू नका. तुम्ही नाही म्हटलं तरी वाईट वाटणार नाही आम्हाला. पण सगळा नीट विचार करा. इथे म्हटलं तर कोण आहे?   तिघीच इथे राहण्यापेक्षा सगळे तिकडे एकत्र राहू. मुलींसाठी तर संधीचे मार्ग खुले होतील. सविताला स्पर्धेला तोंड न देता  पदव्युत्तर शिक्षण घेता येईल, छान नोकरी मिळेल. नेत्राचं कॉलेज  तिकडे पूर्ण होईल, तिला तर अनेक पर्याय उपलब्ध असतील. "
त्या रात्री तिघींच्या डोळ्याला डोळा लागला नाही. त्यानंतर निर्णय घेईपर्यंतचे सगळेच दिवस तसे होते, बेचैन, अस्वस्थ, नुसत्या विचारांनी छाती दडपून टाकणारे. दोन दिवसांनी काका, काकू परत गेले ते घरातल्या प्रत्येकावर विचाराचं ओझं लादून. तिकडे जायचं ठरवलं तर पुढे काय? घर विकून टाकायचं की तसंच ठेवायचं? काकांमुळे त्या सर्वाचंच अमेरिकेत जाणं झालं होतं दोन तीन वेळा. प्रत्येकवेळेला इथे कायमचं येता आलं तर असंही वाटून जाई, पण असं वाटलं तरी परत भारतात जाणार आहोत याची कल्पना असायची. इथल्या आणि तिथल्या जीवनशैलीत फार तफावत होती. नेत्राचं तर, मित्रमैत्रिणींचा गोतावळा, नातेवाईक हे सारं सोडून तिकडे जाणं म्हणजे वाळवंटात पाऊल टाकणं हेच मत होतं. पण हे तेव्हा, आता मात्र परिस्थिती बदलली होती. इथेच राहिलं तर कदाचित काका सगळा भार उचलतीलही, पण स्पष्ट शब्दात त्यांनी त्यांची अपेक्षा व्यक्त केल्यावर असं विचारणं कितपत योग्य? शेवटी आईनेच पुढाकार घेऊन मुलींनी तिकडे जाणच कसं योग्य हे पटवून दिलं.   मोठा पेच होता तो सवितापुढे. विनयला काय सांगायचं? तो काय करेल? दत्तक जायचं ठरवलं तर लग्न करून त्यालाच तिकडे यावं लागेल. होईल तो तयार? नाही झाला तर?..... तिला आत्ताही त्या विचाराने थकवा आला. पुढचं काही झालं नसतं तर बरं झालं असतं असं वाटायला लागलं. ती तशीच  सोफ्यावर लवंडली. विनय बाजूलाच बसलेला असूनही थकल्या मनाला टीव्ही च्या आवाजाची साथ सुसह्य वाटत होती.

टीव्हीकडे डोळे खिळवून बसलेल्या सविताचं लक्ष त्यात नाही हे त्याला कळत होतं पण स्वत:हून तिच्याशी बोलावंस वाटत नव्हतं त्याला. तोही तसाच बसून राहिला. कुठेतरी काटा खुपत होता पण त्यावर बोट ठेवता येत नव्हतं. तिच्यासारखाच तोही घडत गेलेल्या प्रसंगाची उजळणी करत स्वत:लाच तपासत होता. सविताचे काका अमेरिकेला गेले आणि सविताचं वागणं बदललं, विचारात गुंतल्यासारखी, हरवल्यासारखी वाटायची. घरी यायची, त्याच्याबरोबर फिरायला बाहेर पडायची पण ती काहीतरी लपवतेय, मनात असूनही बोलायचं टाळतेय हे त्याला समजत होतं. त्याला वाटलं होतं, आर्थिक बाबींच्या संदर्भात चिंता असेल, बहिणीचं शिक्षण कसं पूर्ण होईल ही काळजी असेल. त्याने तिला आपल्यापरीने निश्चिंत करण्याचा प्रयत्नही केला. पण तिचं वागणं तुटक होत चाललं होतं. अती झालं तेव्हा त्याच्या स्वभावाशी विसंगत त्याने  एक घाव दोन तुकडे करायचं ठरवलं. खरंतर ती तिची खासियत होती. ती कुढत बसणार्‍यातली नव्हती. एकदा ठरवलं की तडीला न्यायचंच हा खाक्या होता तिचा. बोलण्यातही नको इतका स्पष्टपणा असायचा. मग आताच काय झालंय? कुठे अडलंय की तिचं तिला समजत नाही पुढे काय करायचं? त्याने स्पष्ट विचारलं तेव्हा सविता म्हणाली,
"ठरतंय, ठरवतेय मी. एकदा माझी खात्री झाली मला नक्की काय हवंय ते की सांगेन तुला. "
"पण आत्ता सांग ना, अर्धवट नको काहीतरी सांगू. असं काय गुपित आहे की माझ्यासमोरही उघड करावंस वाटत नाही. "
"तसं नाही, माझ्या निर्णयाला फाटे फुटायला नको आहेत मला. माझी एकदा खात्री झाली मी मला हव्या त्या वाटेवर पाऊल टाकतेय ह्याची की तुला सांगेनच. मग तुला ठरवावं लागेल काय ते. "
"मी फाटे फोडेन असं आहे का? काही तरी कल्पना दे सवू. असं टांगणीला नको लावूस. शेवटचं वर्ष आहे आपलं. अभ्यासात लक्ष नाही लागत तू अशी वागलीस की. "
"मी काही हे सुखासुखी नाही करत. पण नको विचारू आता मला तेच तेच. वेळ आली की मी स्वत:हून सांगेन. "
त्याने मग तो नाद सोडून दिला. सांगायचं तेव्हा सांगेल. त्यानंतर आठवड्याच्या आत ती त्याच्या घरी आली, तिच्या आईला घेऊन. आई, बाबा आणि त्याच्याशी एकाचवेळी एकत्र बोलायचं आहे म्हणाली. विनय ओळखत होता त्यापेक्षा ही सविता फार निराळी होती. आईने घाईघाईने चहा टाकला. बाबा येऊन बसले. सविताच्या आवाजातला ठामपणा त्याला ठळकपणे जाणवला.   अलिप्त तटस्थपणा डोकावत होता तिच्या देहबोलीतून. अवघडलेली शांतता तिनेच दूर केली.
"मावशी आणि काका, मी जे ठरवलं आहे ते तुम्हाला रुचेल की नाही याची कल्पना नाही, विनयला पसंत पडणं तर कठीणच आहे, याची मला कल्पना आहे, त्यालाही माझ्या मनात काय चालू आहे त्याचा अंदाज नाही. त्याला सांगायचं, मग त्याने तुम्हाला विचारायचं यापेक्षा तिघांशी एकदम बोलणं योग्य वाटतंय. " कुणीच काही बोललं नाही. सविताचाच आवाज त्या खोलीत भरून राहिला.
"बाबा गेले त्यानंतर पुढे काय हा विचार करायच्या आधीच बर्‍याच घटना घडल्या. काकांनी अमेरिकेत येण्याचा पर्याय जाण्यापूर्वी आमच्यापुढे ठेवला आहे. मला माहीत आहे अमेरिकेत जाणं आता फार नावीन्याचं राहिलेलं नाही. पण काका आम्हाला तिथलं नागरिकत्व घ्यायला सांगतायत, किंबहुना त्यांची नेत्राला, मला दत्तक घ्यायची इच्छा आहे. नेत्रा आणि आईचा विचार केला तर आम्ही अमेरिकेत कायमचं जाणं हाच पर्याय आहे. इथे राहिलो तर नेत्राचं शिक्षण अर्धवट सोडावं लागेल, म्हणजे पदवीपर्यंत शिकेलही ती, पण नुसतं शिकण्याला काही अर्थ राहिलेला नाही आता. स्वत:च्या पायावर उभं करेल असं शिक्षण हवं. बाबा नाहीत तर पैसे वगैरे भरून प्रवेश घेणं आर्थिक दृष्ट्या परवडणार नाही. मलाही अमेरिकेत पदव्युत्तर शिक्षण घ्यायला जायचं मनात होतच. बाबा असते तर एम. एस. करून परत आले असते. आता ते नाहीत आणि काकांच्या मदतीने हे करायचं तर ते म्हणतायत तसं दत्तक जाणं मला सोयीस्कर वाटतं. त्यांना मान दिल्यासारखं होईल ते. प्रश्न आहे तो माझा आणि विनयचा. आम्ही तिकडे गेल्यावर, माझं एम. एस. पूर्ण झाल्यावर लग्न करावं असं म्हणेन मी. ते एका वर्षात पूर्ण करता येतं. दत्तक जायचं ठरवलं तरी त्यात दोन तीन वर्ष जातीलच. त्याआधीच लग्न करता येईल. तसंही मी नाव, आडनाव बदलणार नाहीच. लग्न झालं की विनयही अमेरिकावासी होईल. " सविता बोलत होती, एकटी. बाकी सगळे निशब्द. विनयला काही बोलायचं भान राहिलं नाही. बाबा उठून निघूनच गेले. आई काय करावं ते न सुचून  बसून राहिली. हे सगळं कल्पनेपलीकडचं होतं. अशक्य होतं. त्या चुकार शांततेला तडा गेला तो आई चहाच्या निमित्ताने उठून आत गेली तेव्हा. तिच्या मागून सविताची आईही आत गेली.
"सविता तू काय ठरवते आहेस हे कळतंय का तुला? यासाठीच मी फाटे फोडेन अशी शंका होती का तुला? माझ्याजागी कुणीही असतं तरी तेच झालं असतं" त्याच्या स्वराला आलेल्या रागीट किनारीने  सविता चमकली पण  शांतपणे म्हणाली.
"हो, यासाठीच मी तुला आधी काही बोलले नव्हते. पण इथपर्यंत पोचायला मला खूप ताणातून जायला लागलं आहे, फार सहजासहजी नाही ठरवलेलं हे मी. "
"अगं एकुलता एक आहे मी आईबाबांचा. काय काय स्वप्न रंगवली होती आपण. मुख्य म्हणजे इतकी वर्ष ओळखतात ती दोघं तुला. मुलगीच आहेस तू त्यांची असं म्हणतात. त्यांच्या विश्वासालाच तडा देते आहेस तू. "
"पण त्यांनाही घेऊन जाऊ ना आपण तिकडेच कायमचं. "
"इथे रुजलेली मुळं उपटून तिकडे लावणं म्हणजे आपणच त्यांचं जग खुरटून टाकतोय असं होईल. आणि घेऊन जाऊ म्हणजे काय, ती काय लहान बाळं आहेत का, इकडून उचललं, नेलं तिकडे. त्यांनी यायला हवं ना. तुझी आई आहे यायला तयार?
"आत्ता नाही म्हणतेय पण मी करेन तिला तयार. तू तुझ्या आईबाबांना मनवण्याचं काम कर"
"पण मीच नाही म्हटलं तर? " त्याच्या आवाजातला आक्रमकपणा लपत नव्हता.
"तू नाही म्हटलस तर त्याच्या कारणांचा तुलाच विचार करावा लागेल, म्हणजे विरोध करायचाच म्हणून नाही म्हणायचं असं करू नकोस.   आपल्यासारखी तरुण मुलं तिकडे जायला जीव टाकतात. प्रश्न इतकाच आहे की बरीच जणं परत यायचं ठरवून तिकडे जातात, त्यात मानसिक समाधान गुंतलेलं असतं. त्यातली किती परत येतात हे तर तुला ठाऊकच आहे. तसा विचारही करू शकणार नाही आपण. तिथे रुळलो की तुझ्या आई, बाबांनाही नेऊ कायमचं. "
तो कडवट हसला.
"म्हणजे तू ठरवलं आहेस, मला फक्त तुझ्या मागून यायचं की नाही हे ठरवायचं आहे असच म्हण ना. "
"विनय, उगाच अहंकार नको आणू मध्ये तू. तुझ्या भविष्याचाही विचार कर आणि ठरव. " त्याला वाटलं सांगावं, हे नाही जमायचं पण ते तोंडावर आणायचं धाडस झालं नाही. त्याची आणि तिची आई परत येऊन बसल्या तेव्हा तात्पुरतं का होईना परिस्थितीपासून पळता आलं, सुटका झाली याचंच त्याला समाधान वाटलं.

सविता आणि तिची आई गेल्या. विनयच्या आईच्या डोळ्यातून पाणीच वाहायला लागलं. बाबा वैतागले.
"विनय तू नाही म्हणून मोकळा हो. अरेरावीच झाली  ही सविताची. "
"मी नाही म्हणून परिस्थिती बदलेल का?   तिने जायचं पक्कं केलेलं आहे. " त्याच्या मनात हीच भिती होती.
"जाऊ दे तिला. लग्न मोडलं असं समजायचं. पण ती स्पष्टपणे दत्तक जायचं म्हणतेय म्हणजे परतीचे मार्ग बंदच. "
"मला विचार करू दे. सविताला लग्नाचं मीच विचारलं ना. मला कल्पनाही नाही करवत लग्न मोडून टाकण्याची. माझा जीव गुंतलाय तिच्यात. "
"हे तिला नको का समजायला. पुढच्या वर्षी आधी छोटा कारखाना काढून व्यवसायाला सुरुवात करायचा तुझा मनसुबा तिला माहीत नाही का? आपल्याबरोबर बसून तीच ना करत होती त्याचं नियोजन. मनात आलं की बदलला बेत, असं नाही करता येत म्हणावं. तिला काय हवं आहे हे सांगताना चुकूनही तुझ्या बेतांवर पाणी पडणार आहे याची पुसटशी खंतही दिसली नाही. आत्ता ही तर्‍हा, नंतर तुझ्या शब्दाला काही किंमत राहिलं का बघ. तिच्यामागून तुझी फरफट झाली नाही म्हणजे मिळवली. " बाबा काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आईने त्यांना थोपवलं.
"अहो, काय बोलताय तुम्ही हे समजतंय का तुम्हाला? त्याला का कल्प्नना होती ती काय बोलणार होती त्याची. आत्ताच समजतय ना त्यालाही. लहान नाही तो आता. त्याला विचार करू दे. मग बघू. "
"करा काय करायचं ते. " बाबा त्यांच्या सवयीप्रमाणे हात उडवून निघून गेले. तो ते गेले त्या दिशेने अर्थहीन नजरेने पाहत राहिला. आईच पुढे झाली, त्याच्याबरोबर गप्पा मारत राहिली. पण तिच्या आवाजात दडलेली अनामिक भिती त्याला पूर्ण खोलीत पसरल्यासारखी वाटत होती.
"तुला भिती वाटतेय ना मी काय ठरवेन त्याची. "
"वाटतेय खरी. पण ह्यांच्यासारखं नाही करायचं मला. प्रेमात पडलेली तुम्ही दोघं, तोडून टाकणं दोघांनाही सोपं नाही हे कळतं मला. कुणालातरी तडजोड ही करावीच लागणार. सविताचे बाबा असते तर गोष्ट निराळी होती. पण त्या जर-तरच्या बाबी. सविता आणि तुझं नातं टिकवायचं तर तुला मान अपमान बाजूला ठेवावा लागेल. "
"मी तुमचा एकुलता एक मुलगा. दोघं फार एकटे पडाल इथे. बाबांनी मनात राग ठेवला तरी मला अपराधी वाटत राहिल. "
"आमच्या एकटेपणाचा नको विचार करू. एकदा म्हातारपण आलं की तो इथे काय, तिथे काय येणारच. ह्यांचं म्हणशील तर जोपर्यंत तू काही ठरवत नाहीस तोपर्यंत या ना त्या प्रयत्नाने त्यांना पाहिजे ते होतं का बघतील. पण एकदा का तू ठरवलंस की मग जो तुझा निर्णय असेल त्याला पाठिंबा देतील. हे खरं तर मी तुला सांगायलाच नको. तुला आहेच अनुभव त्यांच्या स्वभावाचा. बघ, घाई करू नकोस ठरवायची. पण एकदा जे काही ठरवशील ते तडीला न्यायची तयारी ठेव. " आईने संभाषण संपवून डाव त्याच्यापुढे सरकवला.
टीव्हीचा आवाज एकदम वाढला तसा त्याच्या आठवणींचा लंबक स्थिर झाला. रात्रीचा एक वाजून गेला होता. सोफ्यावर लवंडलेल्या सविताला उठवण्याचं त्याच्या जीवावर आलं. आतल्या खोलीत जाऊन त्याने चादर आणली, अलगद तिच्या अंगावर घातली. टीव्ही बंद करून तोही झोपला खोलीत जाऊन.

शनिवार रविवार दोघांनीही मनातून ठरवल्यासारखे चांगले घालवले. सविताने विनयने अमेरिकेत जम बसविण्यासाठी काय केलं पाहिजे यावर चकार शब्दही काढला नाही. तो ही ती म्हणेल तसं करत राहिला. दोघं सॅनफ्रान्सिस्कोच्या रस्त्यावरून मनसोक्त भटकले. गोल्डन गेट पुलाजवळ गाडी उभी करून चालता चालता आडवाटेवरच्या खडकावर गळ्यात गळे घालून बसले. सविताला कितीतरी दिवसांपासून प्रतीक्षा असलेली शांती मिळाल्यासारखं वाटत होतं. समोर पसरलेल्या अथांग सागराकडे पाहत तिथेच बसून राहावं असं वाटत होतं. मनात येणार्‍या विचारांना निकराने तिने बाजूला ठेवलं. दोघांचा उत्साह तसाच राहावा यासाठी तिचा कसोशीने प्रयत्न चालू होता. दोन तीन तास त्यांनी आसपास घालवले.   तिने विनयला त्याची गोड खाण्याची आवड पूर्ण करू दिली. आइसक्रीम, चाँकलेट जे मनाला येईल ते दोघं पोटात ढकलत होते.   दिवस, रात्र दोघांनी मनापासून एकमेकांना साथ दिली.

सोमवारची सकाळ सविताला खूप प्रसन्न वाटत होती. विनयच्या नोकरीचं लवकरच काहीतरी जमून जाईल, कदाचित जोडीला त्याचा व्यवसायही चालू ठेवता येईल  याची तिला अचानक खात्री वाटायला लागली. तिच्या आग्रहाला बळी पडून तो नोकरीच्या शोधात होता, पण मनातून त्याला रस होता तो स्वतंत्रपणे काही करण्यात. जाणूनबुजून ती त्यात फारसा रस दाखवत नव्हती. पण असं नको करायला असं आज तिला प्रकर्षाने वाटलं.
"आज तू काही नको करू जेवणाचं. आल्यानंतर मीच करेन. बरेच दिवसात तुझ्या आवडीचं काही केलेलं नाही. " विनय तिच्याकडे पहात राहिला.
"ठीक आहेस ना...? " त्याने खात्री केल्यासारखं विचारलं.
"एकदम" ती गोड हसून म्हणाली.
"जाऊच नकोस तू आज कामाला. " विनयने तिला  मिठीत घेतलं.   त्याच्या घट्ट मिठीत लपेटून जावं असं तिला वाटलं पण तिने तसं केलं नाही. त्याचे हात अलगद दूर केले तिने.
"तुझ्या मनात स्वतंत्र काही करायचे बेत आहेत ते कधीपासून सांगायचं म्हणतोयस. जेवण मी करणार आहे तर विचार करून ठेव. मी संध्याकाळी आल्यानंतर बोलू. "
"चालेल. "  उत्साहाने  तो तिला सोडायला गेला. तिचा खुललेला चेहरा त्याला फार लोभसवाणा वाटत होता. तिलाही त्याचं उत्साहाने तिला सोडायला येणं, मागे मागे करणं हवंहवसं वाटत होतं. पूर्वीचे दिवस पुन्हा अनुभवल्यासारखं वाटत होतं.   दिवसभर तिच्या मनासारखं होत राहिलं. कधीपासून ऑफिसतर्फे एम. बी. ए. करण्याचा तिचा प्रयत्न चालू होता.   सविताला ते काम मार्गाला लागतंय हे कळलं आणि तिच्या खुशीत भर पडली. संगणकावर तिची बोटं यांत्रिकपणे पडत होती पण कामात लक्ष लागत नव्हतं. मागचं पुढचं काहीबाही गोळा होत होतं. अमेरिकेला येण्यापूर्वीचे बाबा अचानक गेले ते दिवस, नंतर काकांनी सर्वांना अमेरिकेत कायमचा यायचा केलेला आग्रह आणि तिने दत्तक जाण्याचा घेतलेला निर्णय. विनयला आणि त्याच्या आई-बाबांना ती भेटायला गेली ते तिला कधीच विसरता आलं नव्हतं. विनयच्या आईने शांतपणे तिला काय म्हणायचं आहे ते ऐकलं होतं, पण बाबा उठून गेले होते. तिला अपेक्षित होतं तसा विनयला धक्का बसला होताच. त्याने अद्यापही आधी काडीचीही कल्पना न देता त्याच्या घरी ती हा निर्णय सांगायला आल्याबद्दल तिला माफ केलं नव्हतं. तो दिवस आजही तिला काल घडल्यासारखाच वाटत होता.
विनयच्या घरुन ती परत आली. त्यानंतर विनय तिच्याकडे फिरकलाच नव्हता. त्याचे दिवसांतून दहावेळा येणारे फोन बंद झाले. तिने फोन केला तर तो घेत नव्हतं. ती घरी गेली तर कुणी तिची विशेष दखल घेत नव्हतं.   तिने मग थोडाफार अवधी जाऊ द्यायचं ठरवलं. तिला खात्री होती ती ठरवतेय त्याप्रमाणे होणारच. विनयकडून संमती मिळाली की पुढच्या गोष्टी सोप्या होत्या. पूर्ण विचारांती विनयने निर्णय घेतला तर तो तिने ठरवलं होतं त्याला अनुकुल असेल याचा तिला विश्वास होता. झालंही तसंच. पंधरा दिवसांनी त्याचा फोन आला. तिथून पुढे तिच्या मनासारखं होत गेलं. तिने एम. एस. साठी प्रवेश घेतला. अमेरिकेला जायचं निश्चित केलं. मार्गात अडथळे येणार हे तिने गृहित धरलं. तिच्या आईने अमेरिकेत यायला ठाम नकार दिला. पण या कारणाने आता ती बेत बदलणार नव्हती. नेत्रासह ती अमेरिकेत आलीदेखील. तिचं एम. एस. झालं की विनयबरोबर लग्न होणार होतच. त्यानंतर त्याचे आई, बाबा इकडे आले की आई येईलच हे समीकरण तिच्या मनात पक्कं होतं. काका, काकू खर्‍या अर्थी त्या दोघींचे आई-वडील झाले. पण तिचं सगळं सुरळीत झालं तसं विनयच्या बाबतीत घडलं नाही. एम. एस. झाल्याझाल्या ठरल्याप्रमाणे नोंदणी-विवाह झाला. ती इकडे होती त्या दोन वर्षात त्याने व्यवसायात उडी मारली होती. शस्त्रक्रियेची उपकरणं बनवण्याचा त्याचा लघुउद्योग पाहता पाहता हातपाय पसरू लागला होता. केवळ तिच्यावरच्या प्रेमाखातर तो तिकडे यायला तयार झाला ते आत्मविश्वासाने, पुन्हा पाय रोवण्याच्या हिमतीने. पण कुठे काय अडत होतं ते तिलाही कळत नव्हतं. प्रयत्नांना यश येत नाही हे लक्षात आल्यावर त्याचा उत्साह मावळत चाललेला दिसत होता. काही सांगायला गेलं की त्याचा अहंकार दुखावला जात होता, त्याला तो फुकटचा सल्ला वाटत होता, त्याच्या वागण्यात विक्षिप्तपणा यायला लागला होता. लहरीपणा वाढत होता. यशाच्या पायर्‍या चढताना हे असे अडथळे नको होते, मनात आखलेले आडाखे, गणितं विनयच्या कृतीने, अपयशाने चुकत होते.
हातातलं काम पुरं करता करता एम. बी. ए. सुरु झाल्यावर घर, नोकरी आणि अभ्यास याचा ताळमेळ कसा घालायचा त्याचं उलटसुलट नियोजन मनाच्या पाटीवर ती रेखाटत होती. अमेरिकेत विनयचं भवितव्य काय हा पेचही लवकर सुटायला हवा होता. तिची सहकारी कामासंदर्भात विचारायला आली तशी तिची तंद्री भंगली. पाच वाजत आलेले दिसल्यावर ती विनयच्या फोनची वाट पाहत राहिली.

"मी कंपनीतर्फे एम. बी. ए. करतेय. " दार उघडल्या उघडल्या तिने विनयला बातमी दिली. विनयला आश्चर्यचकित करण्यासाठी सविताने गाडीत दहावेळा तोंडावर आलेले शब्द गिळून टाकले होते.
"म्हणजे आता आणखी दोन वर्ष? आत्ता आत्ता तर एम. एस. झालं तुझं. "
"तर मग? एवढी संधी मिळतेय तर कशाला नकार द्यायचा. " तिला अपेक्षित होतं तसं काही त्याला अप्रूप वगैरे वाटलं नव्हतं.
"खरं आहे तुझं" त्याने एकदम तो विषयच संपवून टाकला. तिला काय करावं ते कळेना. थोडावेळ सविता तशीच बसून राहिली. विनय उत्सुकता न दाखवता संगणकाकडे वळलेला पाहून मात्र ती संतापली. हातातली पर्स तिने भिरकावून दिली. त्याने फक्त तिच्याकडे एक कटाक्ष टाकला. पाणी पितानाही हातातलं स्टीलचं भांडं तिने जोरात आदळलं.
"तू स्वयंपाक करणार होतीस ना आजचा? " त्याने खोचकपणे विचारलं.
"हो करते ना, काय काय करू? तू बस नुसता. आयतोबा"
"सविता" तो जोरात ओरडला.
"हळू बोल, मला ऐकू येतं. "
"तुझे शब्द मागे घे सविता. आयतोबा काय? जवळजवळ घर मीच सांभाळतोय. नोकरी शोधण्यासाठी माझे किती प्रयत्न चालू आहेत ते दिसत नाहीत का तुला? रोज तुला सोडून आलं की हजार ठिकाणी अर्ज पाठवत असतो. प्रत्येक कंपनीला आवश्यक त्या त्या गोष्टी घालून तसा तसा अर्ज पाठवावा लागतो. नोकरी शोधणं ही सुध्दा एक नोकरीच असते, बिनपगारी. तुझ्या वाट्याला असं आलं असतं म्हणजे हातचं सोडून पळत्याच्या मागे लागलोय की काय असं वाटणं काय असतं ते समजलं असतं तुला. भारतातला माझा व्यवसाय मित्राच्या भरवशावर चालू आहे ते खरंच बरं आहे, नाहीतर तू माझी अवस्था पायपुसण्यासारखी करून टाकली असतीस. "
"तेच तर म्हणणं आहे माझं. दोन्ही डगरीवर कशाला पाय ठेवायचे. कुठलंच धड नाही मग. "
"नोकरी आणि तो व्यवसाय दोन्ही चालू ठेवायचं आहे मला. "
"आधी नोकरी मिळू दे मग कर हे बेत. "
रागारागाने तो उठला. तिच्यासमोर लाल झालेल्या डोळ्यांनी उभा राहिला. रक्त साकळलेले ते डोळे, त्याचा आविर्भाव. ती भितीने शहारली. पण  तो नुसताच तिच्याकडे पाहत राहिला आणि पायात चप्पल सरकवून बाहेर पडला. त्याने तिने  म्हटलं होतं म्हणून भारतातला व्यवसाय इथे कसा वाढवता येईल त्याचा कागदावर आराखडा केला होता. ते नाही जमलं तर नवीन व्यवसायाच्या त्याच्या कल्पना तो आज तिला सांगणार होता. वर्षभरात इथे काय खपेल त्याची त्याला चांगली कल्पना आली होती. ती स्वयंपाक करता करता तो एकेक योजना तिला समजावून सांगणार होता, तिचं मत विचारणार होता. जेवताना कागदावर रेखाटलेली योजना दाखवणार होता. त्याच्या अतीव उत्साहावर पाणी पडलं. सविताने जाताना कबूल केलेली ही गोष्ट तिच्या खिजगणतीत आहे असंही त्याला वाटलं नाही. तो निघून गेला. त्याच्या मागून ती दाराशी धावली. पण एका हाताने तिला जवळजवळ ढकललंच त्याने. जिन्याशी उभी राहून खाली उतरणार्‍या पाठमोर्‍या विनयकडे ती पाहत राहिली. तिला स्वत:ची लाज वाटली. असं तोडून बोलायला नको होतं हे जाणवलं. आता हाक मारली तरी तो थांबणार नाही हे तिला माहीत होतं. आत येऊन तिने फोन उचलला, साधं ’माझं चुकलं’ म्हटलं की झालं. पण लगेच तिचा विचार बदलला. खरं ते बोललं तर काय चुकलं? भावना दुखवायला नकोत म्हणून काय नुसतं चुचकारत बसायचं, नको तिथे मान तुकवायची. जाऊ दे, त्यालाही कळू दे. आता पुस्तकांच्या दुकानात जाऊन बसेल. दुकान बंद होईपर्यंत निश्चिंती. तिला काका, काकूंकडे जावंसं वाटलं,   नेत्राला  फोन करून एम. बी. ए. चं सांगावं, विनयच्या तर्‍हेवाइकपणाबद्दल नाराजी व्यक्त करावी. पण त्यातही तिला तिचा अपमान वाटला. लग्नाला वर्षच झालंय आणि आत्ताच एकमेकांशी जमवता येत नाही असं नेत्राला वाटलं तर?   काका, काकूला समजेल कदाचित. काकू तर नेहमी म्हणते ना ओळख नसते, एकमेकांची पारख झालेली नसते त्यामुळे फार काही सुखाचं जात नाही लग्नाचं पहिलं वर्ष. अडखळत, तोल सावरत टाकलेलं पहिलं पाऊल असतं ते, येतो सराईतपणा हळूहळू. पण लग्नानंतर इतका बदल होतो? शाळेत असल्यापासून  ओळखतो एकमेकांना, हातात हात घालूनच वाढलो आम्ही हे म्हणणं चुकीचंच का?   ती खरी ओळख नव्हतीच का? करावा काकूला फोन? नकोच, नाही म्हटलं तरी काळजी करेल. पुन्हा विनयशी वागताना पूर्वग्रह नको राहायला त्यांच्या मनात. विचारांच्या लाटा वरखाली होत होत्या. विनयही नव्हता त्यामुळे वेळ कसा घालवायचा तेच तिला समजेनासं झालं. स्वयंपाकाचाही पत्ता नव्हता. चायनीज मागवावं बाहेरुन, की पिझ्झा. पण विनयला कबूल केलं होतं त्याच्या आवडीचं ती करेल काहीतरी. विनय परत येईल तोपर्यंत साडेनऊ तरी वाजतील. त्याच्या आवडीच्या बटाट्याच्या काचर्‍या करायला घेतल्या तिने.   ताकाची कढी आणि कांद्याची भजी करायला हवीत. सगळं त्याच्या आवडीचं पाहिलं की स्वारी येईल ताळ्यावर, राग निवळेल. स्वत:च्या मनाची समजूत घालत तिने कामाला हात घातला.  

दुकानात आल्यावर आल्यापासून हाताला येईल ते पुस्तक तो चाळत होता पण मन लागत नव्हतं. सविताच्या शब्दांनी तो  घायाळ झाला होता. निर्णय चुकल्यावर येणारा हताशपणा हात धरून बाजूलाच आहे असं वाटत होतं.   सविता बदलली की आपण तिला ओळखलंच नव्हतं? लहानपणापासून एकमेकांना ओळखतो हा भ्रमच होता? काय खरं आणि काय खोटं हे त्याला ठरवता येईना. पण आज  फार आत्मकेंद्री वाटली सविता त्याला.   हे, हेच, अगदी हेच नव्हते का सांगत बाबा? तेव्हा त्यांचं सांगणं म्हणजे त्याने अमेरिकेला जाऊ नये म्हणून केलेला खटाटोप वाटला होता. आता तेच बोलणं कटु सत्य वाटत होतं. त्याने हातातला लॅपटॉप उघडला. एका बेचैनीतच अवीला पत्र लिहिलं.

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
अव्या,
        फार बरं वाटलं, तुझं पत्र आलेलं पाहून. मागे मी लिहिलेल्या पत्रानंतर पुन्हा माझं पत्र नाही म्हणून काळजीत पडलायत तुम्ही सर्व, हे वाचून तर फारच छान वाटलं. स्नेहा कंपनीच्या कामासाठी अमेरिकेत येतेय असं लिहिलं आहेस. आम्ही राहतो त्या भागातच येणार असली तर आमच्याकडेच यायला सांग. मीही पाठवतो तिला आमंत्रण. तुम्ही सगळे भीमाशंकराला जाऊन आलात. फोटो टाक फेसबुकवर. मी आणि सविता असतो तिकडे तर खरंच मजा आली असती.
आता माझी कर्मकहाणी. इथल्या आयुष्याची तुला कल्पनाही करता येणार नाही. खरं सांगतोय मी. दूरून डोंगर साजरे हे शब्दशः: खरं आहे. त्यात बायको कर्तुत्ववान असेल तर.... नाही नाही, मला सविताचा द्वेष वाटत नाही. मी इतका कोत्या वृत्तीचा निश्चित नाही, पण तिच्या वागण्यातून जो अहंकार डोकावतो, महत्त्वाकांक्षा दिसते त्याने माझ्यात न्यूनगंड येत चाललाय असं मला वाटतं.   मला नोकरी मिळाली की सगळं सुरळीत होईल असं लिहिलं आहेस. मलाही तीच आशा आहे, पण हा आशावाद खुळा ठरला तर या भितीनेही मनात ठाण मांडलं आहे. आणि कधी ना कधी तरी मिळेलच नोकरी हे जरी खरं असलं तरी तो ’कधी’ केव्हा येणार हा प्रश्न आहेच ना?   मॄगजळाचा पाठलाग केल्यासारखं माझं आयुष्य वाटतंय मला.
 सविताला नाही म्हटलं असतं तर.... पण मी काही म्हणण्याचा प्रश्न नव्हताच. मला अमेरिकेत यायची इच्छा नाही यावर ठाम राहायला हवं होतं रे मी. नाही म्हटलं तरी, अभियांत्रिकी शिक्षण झाल्या झाल्या सुरू केलेला व्यवसाय असूनही चांगले पाय रोवत चालले होते. आता वाटतंय तेव्हा सविताला हे सांगायची भिती वाटली मला. वाटलं, तिच्या पक्क्या निर्णयापुढे मी नाही म्हटलं तरी तिला जायचं तर ती जाणारच, कदाचित मला झिडकारून. त्या मानभंगाची कल्पनेनेच भिती वाटली. ती म्हणेल त्याला दुबळा विरोध करत राहिलो. बघायला हवी होती का मी तिच्या प्रेमाची परीक्षा? तिचे काका अमेरिकेला परत गेले त्यानंतर चार दिवस काही बोलली नव्हती. भेटायची तेव्हा चित्त थार्‍यावर नसायचं. मला वाटायचं, वडिलांच्या जाण्याचं दु:ख ताजं आहे, खपली धरायला वेळ लागेल.   त्यानंतरचं तुला माहीतच आहे. तुम्हा सर्वांशी किती चर्चा केली होती ते आठवतंय ना तुला. तेव्हा हे नव्हतं सांगितलं मी तुम्हाला, म्हणजे ज्या पद्धतीने सविताने हा प्रस्ताव पुढे ठेवला ते. आपण बोललो होतो, ते मी अमेरिकेत कायमचं जायचं की नाही यावर. आता सविताशी लग्न करायचं असेल तर जावं लागेल यात चर्चा करण्यासारखं काय म्हणून तुम्ही सर्वांनी उडवूनच लावलं होतं मला. माझ्या मनातली भिती मी नाही व्यक्त करू शकलो, मोकळेपणाने. काय काय झालं ते सांगितलं असतं तर कदाचित तुमची मतं वेगळी असती. जाऊ दे, जर-तर करून काय होणार. पण सवितापुढे मी मला नगण्य समजायला लागलो आहे. आई-बाबांचं, विशेषतः: बाबाचं ऐकायला हवं होतं असं आता वाटतं. पण तेव्हा वाटलं, ज्या स्वतंत्रपणे सविता निर्णय घेऊ शकते त्याप्रमाणे मी का नाही घेऊ शकत. आई-बाबांच्या मताच्या आधाराची पंचविसाव्या वर्षी काय गरज? आता माझं अस्तित्व, ओळख निर्माण करणं एवढंच ध्येय आहे माझं. हे तुझ्या आणि माझ्यातच राहू दे. अपमानित मनाने लिहिलं आहे, त्याची चर्चा नको आपल्या मित्रमंडळीमध्ये. हे सगळं मागच्या पत्रात लिहिणार होतो ते आज लिहितो आहे. पण आज मला स्वत:ची लाज वाटली रे. सविताला एम. बी. ए. करायला देतेय तिची कंपनी. इतक्या आनंदाने कानावर घातली ती बातमी तिने, पण माझा चेहरा उतरला. असं नको होतं व्हायला. हेवा वाटतोय का मला तिचा, की द्वेष? फार फार क्षुद्र, कोत्यावृत्तीचा वाटलो मी मलाच. पण माझी मनस्थिती समजून घ्यायचा प्रयत्न ती करत नाही. दरवेळेला  दुखावणारं काहीतरी बोलतेच, उकरून काढल्यासारखी. आजही तसंच काही बोलली आणि माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. खरं तर मी तिच्या एम. बी. ए. च्या बेताला पाठिंबा द्यायला हवा होता, तसं न करता मी निमित्त साधून बाहेर पडलो......
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
भावनेच्या भरात अवीला त्याने लिहिलं खरं पण ते पाठवायला त्याचं मन धजावेना. समोरच्या भिंतीवरचा काटा नऊवर गेला. तसा नाईलाजाने विनय उठला, दुकान बंद होत असल्याची घोषणाही झाली आणि द्विधा मनस्थितीत ते पत्र न पाठवताच तो बाहेर पडला.

तो परत आला तेव्हा सविताचा स्वयंपाक आटोपला होता. एकमेकांशी बोलणं टाळत दोघांनीही जेवून घेतलं. तिचा शांतपणा पाहून त्याला राहवलं नाही.
"छान झालं आहे सगळं. "
"मुद्दाम तुझ्या आवडीचं केलं आहे, सकाळी म्हटलं होतं ना तसं. "
"सवू, मला भिती वाटते गं. "
त्याने सवू म्हटलं तशी ती सुखावली. प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहत राहिली.
"म्हणजे माझा जम कधी बसणार, तू अशी शिकतच राहणार की काय, मुलांच्या बाबतीत तर आपण काही बोलतच नाही. "
"त्याची काय घाई आहे? आत्ता आपण एकाच्या पगारात भागवतोय. मूल झालं की पाळणाघराचा खर्च.   कसं शक्य आहे विचार करणं देखील. एम. बी. ए. चाच खर्च आपल्याला झेपेल की नाही याचा अंदाज नाही. "
"सध्या मी घरी असलो तरी परिस्थिती बदलेल. आणि तुझी कंपनी करणार आहे ना तुझ्या शिक्षणाचा खर्च? "
"सगळा नाही देत कंपनी. ते नावापुरतंच असतं. जवळजवळ चाळीस हजार डॉलर्सच्या आसपास असेल. पण आपले जे बेत आहेत ते पुरे झाल्याशिवाय नाही करायचा मुलाचा विचार. चालली आहे ती ओढाताण पुरे झाली. "
"आपले बेत म्हणजे तुझे बेत म्हण. आणि तुझे बेत पार पाडण्यात घर, संसार तू विसरुन जात चालली आहेस. आत्ता तरुण आहोत, घाई काय म्हणत राहू आणि नंतर मृगजळांच्या मागे धावल्यासारखी अवस्था झाली असं नको व्हायला. मला मुलांची फार आवड आहे गं. आणि अशा गोष्टी वेळेवरच झालेल्या बर्‍या नाहीत का?
"उद्या तुझा मित्र येणार आहे ते लक्षात आहे ना? " तिने विषय बदलला. त्याच्या ते लक्षात आलं, पण त्यानेही फार ताणलं नाही. निदान त्याला काय वाटतंय हे कानावर घातलं होतं तेवढं पुरे असं मानून त्याने समाधान करून घेतलं.
"हो, आणि तू नेत्राला बोलावलं आहेस, बरोबर? "
"तिची मदत होईल म्हणून. अनायसे तिला सुट्टी आहे तर राहील ती आठवडाभर. "
"खरं तर तुझे काका, काकूही आले असते. तेही आलेले नाहीत इतक्यात. "
"मीच नाही बोलावलं. खरं सांगायचं तर तुझ्या मित्राची आणि नेत्राची ओळख करून द्यायची होती. "
"ओळख? " तो गोंधळला.
"सौरभ आता इथेच स्थायिक व्हायचा विचार करतोय म्हणालास ना? नेत्रा आणि त्याचं जमलं तर तिच्या लग्नाचं जमून जाईल. "
तो तिच्याकडे संभ्रमित नजरेने पाहत राहिला.
"नेत्राला कल्पना आहे याची? "
"नाही. तिला कशाला आधी कल्पना द्यायची? उगाच वागण्यात एकप्रकारचा संकोच येतो. आणि ती माझ्यासारखी नाही. पटकन नाही मोकळी होत. पक्की आतल्या गाठीची आहे. तेव्हा आधी नकोच काही बोलायला. मला सौरभ योग्य वाटला तिच्यासाठी की बघू पुढचं. "
"अग पण सौरभच जमलं असेल कुठेतर, आणि मुख्य म्हणजे तुला सौरभ योग्यं वाटतो की नाही यापेक्षा नेत्राला काय वाटतं त्याच्याबद्दल ते महत्त्वाचं नाही का? "
"ते बघू नंतर रे. आधीच कशाला शंकाकुशंका आणि नकारघंटा. "
सौरभ आला आणि घरात चैतन्य आल्यासारखं झालं. नेत्रा, सौरभ आणि तो कुठेकुठे भटकून आले. सविताला फक्त रविवारी त्यांच्याबरोबर येता येणार होतं. विनयला मनातून बरंच वाटलं होतं. सविता बरोबर असली की ती म्हणेल ती पूर्व. सौरभलाही चार दिवस माणसात राहिल्याचा आनंद झाला. हरवलेले दिवस परत आल्यासारखे वाटलं. जुने मित्र, मैत्रिणी एक ना दोन कितीतरी विषय निघत होते आणि वेळ पाखरासारखा उडून जात होता. नेत्राही कुतहलाने त्यांच्या गप्पा ऐकण्यात रमत होती. हळूहळू तीही त्यात सामील झाली.
रविवारी पूर्ण दिवस बाहेर काढायचं ठरलं. आज सवितालाही येणं शक्य होतं. सॅनफ्रान्सिस्कोतला बराच भाग त्यांचा बघायचा राहिला होता. जॅपनीज गार्डनकडे गाडी वळली. सविता सराईतपणे गाडी चालवत होती.
"इकडे बर्‍याच दुकानांची नावं आडनावावरून असतात. कसली विचित्र वाटतात ना यांची आडनावं. " सौरभ म्हणाला तसा विनय हसला.
"मला हे कळायलासुद्धा बरेच दिवस लागले. ’मेकीज’ काय आडनाव हे. "
"मेकीज नाही रे, मेसीज. " सविता एकदम ओरडलीच.
"अगं हो, हो त्यात एवढं चिडण्यासारखं काय आहे? " विनयने हसत विचारलं. त्याला मित्रासमोर वाद नको होता.
"देसी उच्चार बदलले नाहीत तर कसा निभाव लागणार इथे. मी तुला आल्या आल्या पंधरा दिवस नुसता टीव्ही बघ आणि इथल्या उच्चारांची सवय करून घे म्हणून मागे लागले होते ते काही उगाच नाही. "
"बघत होतो की मी टीव्ही प्रामाणिकपणे, रेडिओपण ऐकत होतो की सतत. इथे आल्यापासून तू सांगतेयस तेच तर करतोय. "
"हो पण उपयोग कुठे झालाय? " विनय एकदम गप्प झाला. तो आधीच मित्रासमोर सविताने काढलेल्या विषयाने खजील झाला होता. नेत्राला राहवलं नाही.
"ताई तू तर जन्मापासून इकडची असल्यासारखं करतेस. "
"आता लवकरच होईना ना खर्‍या अर्थी, दत्तकपत्राचं काम झालं पूर्ण की झालेच मी इकडची. "
"हो, पण त्याने काही आपण असतो त्यात बदल नाही होत. आणि उगाच सोंग आणायची गरजही नसते. एका पिसाने मोर होण्याचा प्रयत्न केल्यासारखं होतं ते"
"पण मला आवडतं इथे, इतकी वर्ष मी भारतात कशी रमले कुणास ठाऊक. इथला वक्तशीरपणा, कामाचं व्यवस्थापन, अशा अनेक गोष्टी आहेत. त्या गोष्टींची किती स्तुती करावी तेवढी थोडीच. मनातून मी जन्मापासून इथेच आहे असही वाटतं. "
"बापरे, मग तू अमेरिकन माणसांशीच लग्न करायला हवं होतस. " सौरभ म्हणाला.
"मी नाही म्हणालो असतो तर कदाचित तेच असेल तिने केलेल्या बेतात. इथल्या लोकांसारखं नियोजन आहे तिचं. पुढचा विचार करुनच गोष्टी करायच्या. "
"त्यात चुकीचं काहीच नाही. "
"हो पण नेहमी व्यवहार बघून नाही चालत. माणुसकी, भावना या गोष्टीही गृहित धरतोच ना आपण. " दोघी बहिणींमधला फरक विनयला फार जाणवला.
"पण त्याने यशस्वी नाही होता येत. वेळ पडली तर त्या बाजूला ठेवून निर्णय घ्यावे लागतात. " सविता ठाम होती.
"मला नाही पटत. " नेत्रा म्हणाली.
"म्हणून तर मागे राहतेस नेहमी सर्वांच्या. "
नेत्राचा चेहरा कावराबावरा झाला. विनयला एकीकडे त्याच्यावरून सविताचा मोहरा नेत्राकडे वळल्यामुळे बरं वाटत होतं. पण इतका सडेतोडपणा? तो नेत्राच्या मदतीला धावला.
"हेच तर ती म्हणतेय. तू असं काही बोलतेस त्याने माणसं दुखावतात ते समजतच नाही तुला. "
"कटू असलं तरी सत्य असतं ते. एकदा ते स्वीकारलं, त्याचा विचार करून पावलं उचलली तर नक्की यश मिळतं जे कराल त्यात. "
"पण तुझी आणि सर्वांची यशाची व्याख्या एकच कशी असेल. " सौरभलाही राहवलं नाही.
"यशाच्या व्याख्येत असा व्यक्ती व्यक्तिगत काय फरक पडणार आहे? " सविताला इतका निरर्थक प्रश्न कुणी विचारू शकतं याचंच नवल वाटलं.
"मी सांगते तुझी यशाची व्याख्या. नोकरीला लागायचं. थोड्याच दिवसात मॅनेजर व्हायचं, त्यानंतर पुढचं पद म्हणजे डिरेक्टर, मग प्रेसिंडंट.... त्यासाठी असंख्य वर्ष ओतायची, रक्त आटवायचं, अशा पदांवर पोचण्यासाठी जे डावपेच लढवावे लागतात त्याने शिणून जायचं.   पण हे होईतो कुठल्या वळणावर येऊन पोचणार ते माहीत नसतं. संसार आणि महत्त्वाकांक्षा याचं  संतुलन राखता आलं तर ठीक. नाहीतर या प्रवासात काय गमावलं ते कळेस्तो त्या वाटेवरची माणसं दूर निघून गेलेली असतात, हाती न लागण्याइतकी.   कदाचित तू याचाही विचार केला असशील, गणित आधीच मांडलं असशील. माझी यशाची व्याख्या आहे, पदवीपर्यंत शिक्षण घ्यायचं, विरंगुळा म्हणून एखादा छंद जोपासायचा आणि छानपैकी गृहिणी बनायचं. एक किंवा दोन मुलं झाली की त्याच्या संगोपनात रमायचं. मुलं थोडीशी मोठी झाली की सहज जमलं तर नोकरी किंवा स्वत:चं काहीतरी स्वतंत्रपणे सुरू करेन मी, पण त्यासाठी जीवाचा आटापिटा नक्कीच करणार नाही  मी. माझं घर माझ्याबरोबर असेल, ते हरवून मी काही करणार नाही. हे सगळं करणं मला जमलं तर मी स्वत:ला यशस्वी समजेन. "
सविता नेत्राच्या विचारांनी अवाक झाली. हीच का ती छोटी बहीण जिने तिच्यासारखं काहीतरी करावं म्हणून ती पाठपुरावा करत होती, तिच्या मागे लागत होती ती, एक सर्वसामान्य गृहिणी व्हायची स्वप्न बघतेय.
"पण मुलं मोठी झाली आणि तू म्हणतेस तसं नोकरी, स्वतंत्रपणे असलं काही नाही जमलं तर येणारं रिकामपण खाऊन नाही टाकणार? "
"ते आपल्यावर अवलंबून असतं ताई. त्यापलीकडे करता येण्यासारखं खूप काही आहे. तू मला सांग आत्ता या कंपनीतून तू बाहेर पडलीस तर तुझी कंपनी बंद पडणार आहे का? पण नात्याचा गुंता नाही सोडवता आला तर सगळी तोडफोडच होते. तिथे नियोजन करून काम करायला गेलीस तर वेळ निघून गेलेली असेल. "
"अरे तुम्ही दोघी तर टाळ्या घेणारे संवाद फेकताय एकमेकींवर" सौरभने वातावरण हलकंफुलकं करायचा प्रयत्न केला.
"तुम्ही दोघी सख्ख्या बहिणीच आहात ना? " विनयनेही हसत विचारलं आणि वादाचा ओघ गप्पांकडे वळवला.

जॅपनीज गार्डन सौरभला आवडली. नेत्राला आणि सौरभला एकत्र फिरण्याची संधी सविता जाणूनबुजून देत होती.
"उद्या सौरभ निघणार आहे, मला चांगली वाटतेय जोडी. तुला कसा वाटतो तो नेत्रासाठी. " विनयला अनपेक्षितपणे तिने विचारलं.
"चांगला वाटतो. मला वाटलंच तुझ्या मनात काहीतरी बेत शिजला असेलच. "
"बेत कसला? पण गोष्टी आपल्याला पाहिजे तशा व्हायला हव्या असतील तर आपणच पुढाकार घ्यायचा असतो. "
"हं" त्याने नुसताच हुंकार दिला. त्या ’हं’ मधून डोकावत होती निरीच्छा, दुखावलेपण. त्यातल्या कशाचा तिला गंधही नव्हता.
"मी त्याला कल्प्नना दिली होती तो आपल्याकडे आला तेव्हाच. "
"मग राहिलंय काय आता? "
"पुढे काय झालंय ते माहीत नाही. मी त्याला म्हटलं होतं नेत्रा आवडली तर तूच विचार म्हणून. "
"तू बोलली आहेस का हे नेत्राला? "
"ती माझ्या शब्दाबाहेर जाणार नाही. "
"ती काही कठपुतळी नाही सविता. आधी तिला विचार आणि नंतर मी बोलेन सौरभशी. सौरभला तू सुचवल्यामुळे तो भरीला पडला असं नको व्हायला.   त्याला त्याच्या आई, वडिलांशीही बोलावं लागेलच. "
"हो म्हणजे कानावर घालावं लागेल घरातल्यांच्या. "
"आणि नेत्रा नाही म्हणाली तर काय सांगशील? "
"फार गुंता करतोस तू. ती नाही म्हणाली तर सौरभला सांगायचं ’नाही’ म्हणतेय म्हणून. "
"हो पण नाही म्हणण्याची तू संधी दिलीस तर ना... "
"हे फार होतंय विनय. " ती पुढे काही बोलणार तेवढ्यात नेत्रा, सौरभ येताना दिसले. विनयने विषय बदलला. नेत्राच्या चेहर्‍याकडे लक्ष गेलं आणि सविताचा हेतू तडीला गेल्याचं जाणवलं विनयला. सौरभने तिला विचारलं असावं अशी शंका आलीच विनयला.
रस्त्यालगतच्या कॅफेमध्ये चौघं बसले आणि थोड्यावेळातच सौरभने थोडंसं संकोचत आपलं मन व्यक्त केलं.
"खूप छान गेले माझे तीन चार दिवस. " त्याने नेत्राकडे कटाक्ष टाकला. नेत्राच्या गालावर लालिमा पसरला.
"आमचेही. विशेषतः: माझे. दिवसभर भुतासारखा एकटा वावरत असतो मी चार खोल्यांमध्ये. तू आलास त्यामुळे जरा जिवंतपणा आल्यासारखं झालं. शिवाय नेत्राही सलग अशी पहिल्यांदाच राहिली. मजा आली दोस्ता. "
"मला आणि नेत्राला तुम्हाला दोघांना काहीतरी सांगायचं होतं. " विनय, सविता त्याच्याकडे पाहत राहिले. सौरभ थोडासा गोंधळला, संकोचला.
"अं, म्हणजे नेत्राला विचारलं  मी आज आणि तिची तयारी आहे, तुमची असली तर. "
"तयारी? कसली तयारी? " विनयला गंमत वाटत होती.
"लग्नाची. "
"कुणाच्या लग्नाची? कोण करतंय तयारी? "
"कमॉन यार, तुला समजतंय मला काय म्हणायचं आहे ते. "
"मी काही मनकवडा नाही. तू किंवा नेत्राने काही सांगितलं तर कळेल आम्हाला, नाही का सविता? "
सविताने नुसतीच मान डोलवली. तिला माणसाला आडपडदा न ठेवता बोलणं का जमत नाही तेच समजत नव्हतं. त्यात विनयही  भाग घेतोय, त्या खेळात रमतोय हे बघितल्यावर घाला काय घालायचा तो घोळ असा तिचा आविर्भाव होता.
"बरं बाबा, सांगतो, म्हणजे नेत्रा मला आवडली आहे. आणि मी तिला लग्नाची मागणी घातली आहे. तिचाही होकार आहे. अर्थात तुम्ही दोघं ’हो’ म्हणत असाल तर, विशेषतः: सविता. एकदा तुमच्याकडून परवानगी आहे हे कळलं की मी घरी सांगेन"
सविताने जिंकल्यासारखं विनयकडे पाहिलं. तो हसला. पुन्हा एकदा सविताच्या मनासारखा डाव पडला.

नेत्रा आणि सौरभच्या लग्नाला सगळे भारतात जाऊन आले. काका, काकूंनीही तत्परतेने नेत्राच्या आईच्या विनंतीला मान दिला. सौरभचेही आई-वडील, नातेवाईक सगळा गोतावळा भारतातच होता. भारतात जाण्याच्या कल्पनेनेच त्याचे दिवस खूप चांगले गेले होते. आई-वडिलांची भेट महत्त्वाची होती. जाताना ज्या उत्साहात तो गेला तितकाच निराश होवून परत आला. जाणता अजाणता त्यांचा संसार, सविताची नोकरी आणि त्याचं घर सांभाळणं, त्याचे नोकरीसाठीचे चाललेले प्रयत्न, त्याबद्दलचे प्रश्न आणि मग अनाहूत सल्ले मिळत राहिले तो जितके दिवस होता तितके दिवस. त्याच्या घरात आई-बाबांनी खोदून खोदून काही विचारलं नाही तरी त्याला उगाचच वडिलांची बोलकी नजर त्याचा चुकलेला निर्णय ठळकपणे व्यक्त करतेय असंच वाटत राहिलं. राहवलं नाही तसं त्याची आईच म्हणाली.
"बघ बाबा, तिकडे जम बसत नाही असं वाटत असेल तर या परत. इथे आहेच की तुझा व्यवसाय. आत्ता मित्र बघतोय त्यालाच भागीदार केलं की झालं. "
"बघू अजून एक दोन वर्ष. नंतर ठरवेन काहीतरी. "
"आई, अशा परत येण्यात मानभंगाचं दु:ख असतं. तुम्ही चला नं तिकडे आमच्याबरोबर. विनयचा आत्मविश्वास वाढेल तुमच्या सहवासात. " सविता कधी नव्हे ते त्याच्या मदतीला धावून आल्यासारखं वाटलं त्याला.
"यांचा जीव नाही रमत, मग परत यायची घाई. नकोच ते. तुम्ही येता ना भेटायला. खूप झालं. " सविताने बाबांना आग्रह केला, पण त्यांच्या मनातला तिच्याबद्दलचा आकस अधुनमधुन डोकं वर काढायचा. त्यांनी तत्परतेने नकार दिला.   हे घर सोडून जायची त्यांची तयारी नव्हती हे कारणही होतं. सवितालाही काही फरक पडला नाही. तिने आपलं कर्तव्य केलं होतं. निघताना त्याचं पाऊल उचलत नव्हतं. अशाश्वत भविष्य पाय मागे खेचत होतं. सविताला डोळ्यासमोर कंपनी दिसत होती. उज्ज्वल भवितव्याकडे वळण्याची घाई होती.

परत आल्यावर नव्या उमेदीने त्याने अर्ज पाठविले. काही ठिकाणी मुलाखती झाल्याही पण तेवढंच. आत्ताही त्याने ज्या कंपनीसाठी मुलाखत दिली होती त्यांचा फोन आला तेव्हा त्याच्या आशा पल्लवित झाल्या. पण पुन्हा तेच. सध्या नवीन उमेदवाराला घेण्याचा विचारच स्थगित केल्याचं त्यांनी सांगितल्यावर त्याला बरं वाटलं. निदान तो कुठे कमी पडला या विचाराने येणारी अस्वस्थता वाट्याला येणार नव्हती. फोन ठेवला आणि त्याची बोटं आपसूक अवीला ई-मेल लिहिण्यासाठी वळली.

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
अव्या,
     लेका, नाही रे माझा लागत निभाव इथे. तिकडे आल्यावर गप्पा झाडल्या. एक दोन पत्र मी नुसती लिहून ठेवली, पण पाठवली नाहीत. म्हणजे काय रे मन मोकळं झालं पण लाज झाकली गेली. तू वाचली असतीस तर माहीत नाही काय मत झालं असतं तुझं. पण जे लिहिलं तेच जवळ जवळ बोललो मी तुझ्याशी. पत्ते मनासारखे पडेपर्यंत डाव मोडायचा नाही हा तुझा तुझ्यामते साधासुधा सल्ला. पण मग तेच. सतत दडपण, एकच ध्यास. इथली डबघाईला आलेली अर्थव्यवस्था वाटत नाही मला पाय रोवू देईल असं. काही लोकं परत भारतात गेले कायमचे, काहीजणांनी कुटुंबाला पाठवून दिलं, एक ना दोन अशा अनेक गोष्टी कानावर येतात आणि मनाचा शांतपणा कोलमडतो. चिडचिड वाढते. अनामिक भितीने जीव कासावीस होतो. इथे तर आमच्या संसाराला नुकती सुरुवात झालेली. अजून तिशीपर्यंतही नाही पोचलेलो. मला इथे येऊन जवळजवळ दोन वर्ष होतील. सविताला चार साडेचार वर्ष. दोघांचीही स्वप्न, बेत तसेच आहेत. तिने निदान त्या वाटेवर पाऊल तरी टाकलं आहे, पण तरीही परिस्थिती फारशी बदललेली नाही. भारतातून इथे येणार्‍या प्रत्येकांची वेगळी कहाणी असते. पण जो तो आपल्या परीने त्या कहाणीत रंग भरत असतो. कधी मनाला पटणारे, कधी परिस्थितीशी जुळवून घेणारे. आमची दोघांची कहाणी तर फारच वेगळी. मी स्वत:ला ’अधांतरी’ संबोधतो. ही माझीच कहाणी आहे की सविताची हे काळच ठरवेल. पण आत्तातरी ना धड इकडे, ना धड तिकडे अशी अवस्था आहे माझी. क्या करें, दुनिया है भाई. थांबतो, जे काही होईल ते कळवत राहीन.

विनय
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

विनयने पत्रलेखन थांबवलं आणि फ्रीजवर लावलेल्या कागदावर त्याची नजर गेली. संध्याकाळच्या स्वयंपाकाची जबाबदारी त्याच्यावर होती. कुठल्यातरी नोकरीसंदर्भात आलेलं  इ-मेल त्याने उघडलं, आणि एकीकडे आज जेवणासाठी काय करायचं आहे ते बघण्यासाठी घाईघाईत तो फ्रीजच्या दिशेने वळला.