वन फॉर द....(२)

अत्यंत उद्विग्न अवस्थेत कुबल फॅक्टरी ऐवजी घरी जायला निघाले.......



त्यांना घरी आलेले पाहून सौ.कुबल आश्चर्यचकित झाल्या " काय झालं शाळेत ?" "कन्येने दिवे लावलेत" कुबल स्वत:वरच चिडलेले होते "तीला परीक्षेला बसू दिले जाणार नाही, म्हणत होते मुख्याध्यापक !" पुढे त्यांनी सौ. कुबलांना पूर्ण वृत्तांत एका दमात सांगितला. सौ. कुबलांचा रक्तदाब अचानक वाढला. डॉक्टर बोलावण्या इतपत वेळ येऊन ठेपली.


त्या दिवशी सर्व काही स्थिरस्थावर झाल्यावर अचानक साहेबांना विवेकची आठवण झाली. "सिंधूताई, विवेकला सांगा, फॅक्टरीत जाता येथे भेटायला, महत्वाचे काम आहे." विवेकच आता ह्या परिस्थितीत तोडगा काढू शकेल असा विश्वास त्यांना होता.


"विवेक, स्नेहाच्या दहावीचे काही खरे नाही !" विवेक सायंकाळी त्यांना भेटायला येताच त्यांनी सरळ विषयालाच हात घातला"काय झाले ?" विवेकने प्रश्न करताच त्यांनी भडभडा शाळेत झालेला प्रकार सांगितला. विवेकला शाळेचे नियम चांगलेच माहित होते. "पण ती तर क्लासेस ना जाते ना ?" "तेथे काय शिकवतात देव जाणे, ह्या परिस्थितीत स्नेहावर रागावूनही फायदा होणार नाही"


"आपण काय करायचं ठरवलंय ?" विवेकनेच त्यांना विचारले. "स्पष्टच विचारतो, तुला तीचा अभ्यास घ्यायला जमेल ?" कुबलांकडे प्रस्तावना प्रकार कधीच नसायचा."तू संध्याकाळी फॅक्टरीत येता ही जबाबदारी डोक्यावर घे !"


"परीक्षेला फक्त महिने उरलेत, मी माझ्याकडून प्रयत्न करीन, नानासाहेब" विवेकने त्यांना आश्वासन दिले. अनेक अडीअडचणींच्या वेळी कुबल एखाद्या पहाडासारखे सिंधूताईंच्या पाठीशी उभे राहिलेले होते. विवेकला त्यांच्या उपकारांची जाण नेहमीच होती. त्यातच अभ्यासाची गोडी असलेल्या विवेकसाठी हे काम फारसे अवघड नव्हतेच."आज पासूनच सुरुवात करतो" विवेकने त्यांना सांगताच, "मलाही तुझ्याकडून हीच अपेक्षा होती, विवेक" इतकेच ते बोलू शकले. त्या दिवशी पासून विवेक स्नेहाचा अभ्यास घेऊ लागला.


विवेकने तीन महिने स्नेहावर घेतलेली मेहनत फुकट गेली नाही. जेमतेम काठावर पास होणारी स्नेहा चक्क प्रथम वर्गात दहावीची परीक्षा पास झाली. नानासाहेब कुबलांना सौ. कुबलांना विवेकबद्दलचा आदर अजून दुणावला. इतके करून विवेकचे स्वत:च्या अभ्यासाकडे जराही दुर्लक्ष झालेले नव्हते. ते वर्ष त्याचेही महत्वाचे असे पदवीकेचे शेवटचे वर्ष होते. ह्या वर्षी मेरीट मध्ये आल्यासच पदवी अभ्यासक्रमाला थेट दुसऱ्या वर्गात त्याला प्रवेश मिळणार होता..... अपेक्षापूर्तीचा आनंद काय असतो ते विवेकला परीक्षेचा निकाल लागल्यावर कळले ! आता महत्वाचा प्रश्न नोकरी करून पदवी घेणे कितपत जमेल ? ह्याचे उत्तर नानासाहेबांनी दिले - जसा विवेक प्रवेश मिळाल्याची बातमी घेऊन नानासाहेबांच्या समोर उभा राहिला, नानांनी त्याला सरळ सांगितले," ह्या वर्षी पासून तुझी नोकरी बंद, फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचे". नानांच्या हुकुमनाम्याने विवेक साफ गोंधळला. "सिंधूताई, जसा मला उमंग तसा विवेक, तुम्ही त्याला फक्त खर्चाला चिरीमिरी देत जा, बाकी मी सांभाळेन".


विवेक उमंग दोघांचेही अभ्यास जोरदार चालू होते. दोघांच्या स्वभावात बराच फरक पडलेला होता. उमंग बराचसा खेळकर होत गेला तर विवेक जबाबदार. उमंग ने काहीही झाले तरी अभ्यासाला महत्त्व दिलेच होते. अभ्यासाच्या बाबतीत एकाला झाकावा दुसऱ्याला काढावा अशी परिस्थिती होती. बारावीला स्नेहाने 'येरे माझ्या मागल्या' उक्ती प्रमाणे नानासाहेबांचे रक्त आटवले. परीक्षेच्या आधी दोन महिने वेळात वेळ काढून जसे जमेल तसे विवेकने तीला अभ्यासात मदत केली. गाडी जेमतेम वरच्या वर्गात ढकलली गेल्याचे समाधान नानांना लाभले. ह्या वेळी स्नेहा मध्ये झालेला छोटा बदल विवेकला अस्वस्थ करून गेला होता. शिकताना स्नेहाचे लक्ष अभ्यासात नसून आपल्यावर जास्त आहे असे त्याला वाटले होते म्हणून ह्यावेळी त्याच्याकडून हवी तेव्हढी मेहनत घेतली गेली नव्हती (किंवा स्नेहाने हवी तेव्हढी मेहनत घेतली नव्हती) पण विशेष विचार करण्या इतपत तो विषय त्याला महत्वाचा वाटला नाही.


बारावी नंतर महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर स्नेहासाठी नानासाहेबांनी दुचाकी घेतली. बसच्या अनियमित वेळा, बसची गर्दी लांबचे अंतर ही कारणे नानांना पटण्याजोगी होती.


विवेकच्या अभियांत्रिकी महाविद्यालयावरून पुढे गेल्यावर स्नेहाचे महाविद्यालय यायचे. विवेक सायकलवर ये जा करीत असे. कित्येकदा "चल मी पटकन सोडते तुला कॉलेजला" अशी लिफ्ट स्नेहा विवेकला द्यायची. "मला मित्रांनी पाहिले तर चिडवतील, मुलीच्या मागे दुचाकीवर बसून आला म्हणून" "त्यात काय विशेष ? सांगायचे, मी तीला शिकवत होतो" स्नेहा पटकन म्हणाली. पण विवेकने काही उत्तर दिले नाही. नंतर दोघांची भेट विवेक स्वत:हून टाळायला लागला. स्नेहाचा आपल्या कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत आहे हे कळण्याइतका विवेक वयात आलेला होता. विवेकची सारासार विचार बुद्धी त्याला सावध करत होती. एका बाजूला नानांचे अनंत उपकार त्याला आठवत होते तर दुसरीकडे स्नेहाचा विचार डोक्यातून जाता जात नव्हता. शेवटी 'विवेक' ने विचारांवर मात केली.... त्याने स्नेहाला पूर्णपणे टाळायचे ठरवले.


विवेक दर खेपेला स्नेहाची भेट टाळायच्या प्रयत्नात होता तर दैव अजून वेगळ्याच प्रयत्नात होते. कुठल्या कुठल्या निमित्ताने दोघांची गाठ पडायचीच. जी गोष्ट विवेक टाळू पाहत होता तीच घडली..... विवेक स्नेहा एकमेकांच्या प्रेमात पडले !


बरेच महिने हे प्रकरण दोघांनी सर्वांपासून दडवण्यात यश मिळवले. स्नेहाच्या अती उत्साहा मुळे कित्येकदा भांडे फुटता फुटता राहिलेले होते. ज्या गोष्टीची भीती सतत विवेकला छळायची ती गोष्ट एकदा घडली. उमंगच्या वर्ग मैत्रिणीने त्यांना एकत्र बघितले. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे...... बातमी मिळूनही उमंग बर्फासारखा थंड होता. "मला कल्पना होतीच, असे काहीतरी घडेल ह्याची" इतकीच प्रतिक्रिया त्याने तिच्याजवळ व्यक्त केली. पण घरी गेल्यावर मात्र आई वडिलांना त्यांच्या बेडरूम मध्ये जाऊन त्याने सर्व कहाणी कथन केली.


सौ.कुबलांचा त्रागा मुलीची आईच समजू शकेल असा होता. स्नेहाला घराबाहेर जायचे नाही, दुचाकी बंद, कॉलेजला सोडायला आणायला कंपनीची गाडी चालक, बाजारात जाताना आई बरोबरच जायचे अन्य अनेक बंधने घालण्यात आली. त्यातच त्यांचा रक्तदाबाचा विकार परत उफाळून वर आला. सिंधूताईंचे घरातले येणे आता त्यांना नकोसे झाले होते. प्रत्येक गोष्टीत त्या सिंधूताईंवर उखडायला लागल्या होत्या. कुबलांची परिस्थिती निराळी होती. ते विवेकवर संतापले नसले तरी त्यांना वाईट नक्कीच वाटले होते. त्यांनी विवेककडे फॅक्टरीत ह्या विषयी विचारणा केली. "नानासाहेब, मी कुठल्या तोंडाने आपणांस ही गोष्ट सांगणार ? मी स्वत:ला आवरण्याचा खूप प्रयत्न केला पण मला जमले नाही." कुबलांना त्याच्या डोळ्यात पाणी तरळल्याचे स्पष्ट दिसत होते. त्याच्या प्रामाणिक पणाचा अनुभव त्यांनी ह्यापूर्वी घेतलेला होता त्यामुळे विवेक खोटं कधीच बोलणार नाही हे ते जाणून होते. ह्या परिस्थितीला कसे हाताळावे ह्याचा गहन प्रश्न त्यांना पडला होता. उमंगला तर ह्या गोष्टीचे काहीच नवल वाटले नव्हते किंबहुना आपले बिंग फुटायच्या आत स्नेहाचे बिंग फुटले हे बरेच झाले असा स्वार्थी विचार त्याच्या मनात येऊन गेला.


==============================


भाग लवकरच येत आहे......