माझे खरच इतके चुकले का?

प्रिय मनोगती,

येथे मी माझा अनुभव नमूद करणार आहे. मी इंजिनिअर असून गेली ७ वर्षे (मुलगी लहान असतानाचे १ वर्ष वगळता) नोकरी करत आहे. माझ्या अत्ताच्या नोकरीमध्ये मला सकाळी ७ वाजता घराबाहेर पडावे लागत होते आणि घरी यायला संध्या. ६.१५ वाजत असत. असे मी २ वर्षे केले. २ महिन्यांपूर्वी मी नवीन नोकरी धरली. तेथेही येण्याजाण्याची वेळ हीच होती. पण जून मध्ये माझ्या मुलीची शाळा सुरू झाली. शाळा ९.३० ला आहे. मला ७ ला जावे लागत असल्याने मी तिला शाळेसाठी तयार करणे, तिला शाळेत पोचवणे ह्यापैकी काहीच करू शकत नव्हते. ह्या गोष्टीचा माझ्या मनाला त्रास होऊ लागला. तिचे आजी आजोबा व कधी कधी बाबा तिचे आवरून तिला शाळेत पोचवत असत. पण माझ्या नवऱ्याला त्याच्या नोकरीच्या वेळेमुळे हे रोज करणे शक्य नव्हते. त्यामुळे काही वेळा फक्त आजी आजोबांवर हे सोपवावे लागे. त्यांचे वय ७० च्या आसपास असल्याने मला त्यांच्यावर ही जबाबदारी टाकणे योग्य वाटले नाही. ते काही म्हणाले नाहीत तरिही त्यांना ते त्रासाचे होते हे मला दिसत होते. आणि माझी कंपनी घरापासून २५ कि. मी. वर हिंजेवाडीला असल्याने कंपनीची बस (सकाळी ७.१०ची) गेली तर तेथे जाण्याचे काहीच साधन नव्हते. आणि दिवसेंदिवस सकाळी ७ ला घर सोडणेही मला त्रासदायक होऊ लागले. माझा नवराही हिंजेवाडीतच काम करतो. त्यामुळे हया नवीन कंपनीत रुजू होताना कंपनीच्या बसने न जाता मुलीला शाळेत सोडून आम्ही दोघांनी आमच्या कारने ऑफीसला जायचे असे ठरवले होते. ३-४ दिवस तसे करूनही पाहिले. पण पोचायला १०.३० होत असत आणि मग मी जरी ६.३० ला निघू शकत असले तरी नवऱ्यावर अवलंबून असल्यामुळे मला ७.३० पर्यंत थांबावे लागे. आणि मग घरी पोचायला ८.३० होत असत. मुलगी तोपर्यंत कंटाळत असे. ती अत्ता ३ वर्षाची आहे आणि हे तिचे शाळेचे पहिलेच वर्ष आहे. तर तिला शाळेसाठी आपण तयार करावे, ती शाळेत जाईपर्यंत मी तिच्यासोबत असावे, तिला शाळेत पोचवावे असे आई म्हणून मला मनापासून वाटते.

       म्हणून मी शेवटी ही नोकरी सोडली. आणि मी मुलीचे सर्व करून तिला शाळेत पोचवून दुचाकीने जाता येईल अशी जवळची नोकरी बघण्याचे ठरवले आहे. ह्या माझ्या निर्णयाला माझ्या नवऱ्याचा तीव्र विरोध आहे. तो त्यावरून मला खूप बोलत असतो. त्याचे म्हणणे आहे की काही ना काही मार्ग काढून नोकरी सुरुच ठेवायची. आणि मुलीची गैरसोय होते हे कारण त्याला महत्त्वाचे वाटत नाही. तिचे काय आजी आजोबा आवरतील असे त्याला वाटते. त्यांच्या वयाचे त्याला विशेष वाटत नाही. मी अत्यंत बेजबाबदारपणे हा निर्णय घेतलाय असे त्याला वाटते. नोकरी सोडण्याइतके काही झाले नाहीय असे त्याला वाटते.

आता तुम्हीच सांगा, माझे खरच इतके चुकले का?

आपल्या माहितीसाठीः माझा पगार काही दिवस बंद झाला तरी त्याचा आमच्या दैनंदीन जीवनावर काहीही परिणाम होणार नाही, घराचे हप्ते भरणे सहज शक्य आहे इतका पैसा माझा नवरा कमावतो.