गोइंग "फ़ॉर गुड" - अर्थातच पुन्हा एकदा स्वदेस !!

!! "ओये मेरे देश, मेरी मीट्टी, मेरे राज.... मैं आ गया"!! अनुपमखेर चा DDLJ मधला हाच डायलॉग जरा वेगळ्या ढंगात म्हणत ८ वर्षांननंतर अमेरिकेला राम राम ठोकून "फॉर गुड" मायदेशी परत आलेल्या गिरीशने बॅग खाली ठेवत आपले हात आकाशात पसरले...  !!  

मागोमाग काहीशी नाईलाजाने पण अर्धांगिनी श्वेता, आणि त्याची मुलगी जिया सुद्धा आपापल्या बॅगा घेऊन पुढे आले. WELCOME BACK TO INDIA असा बोर्ड हातात घेऊन ट्रॅव्हल कंपनीची गाडी आणि ड्रायव्हर तयारच होता -आणि बंगलोर विमानतळ ते नव्यानेच घेतलेला आलिशान फ्लॅट हा प्रवास लगेचच सुरू झाला...

रस्त्यावरून धावणाऱ्या AC गाडीच्या काचा खाली घेऊन  गिरीश ने बाहेर नजर टाकली, मेडिकल्स, मिठाईची दुकाने,  पानटपऱ्या, बँका आणि हॉटेल्स मागे पडत असताना गेल्या ७-८ वर्षांचा काळ  गिरीशच्या मनात फेर धरून नाचू लागला..

२२ व्या वर्षीच एका नामांकित सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी,  मेहनत आणि बुद्धिमत्तेसोबत नशिबाची  जोड मिळाल्याने वर्षभरात प्रमोशन आणि त्यामध्ये कंपनीकडून ३ वर्षांसाठी ऑनसाईट रिलोकेशन ची ऑफर, मग तिथे देखील कलागुणांमुळे ३ वर्षांचे कॉन्ट्रॅक्ट कधी पर्मनंट झाले ते समजलेच नाही,  दरवर्षी भारत वारी व्हायची, पण चवथे वर्ष विशेष होते -- कारण ह्यावेळी त्याने श्वेताला देखील लग्न करून सोबत नेले होते, पुढे २ वर्षांनी एक कन्यारत्नप्राप्तीच्या आनंदाने  गिरीश आणि श्वेता हरखून गेले!!   

पण मग आज गेली ७-८ वर्षे अमेरिकेत राहून परत भारतात का? -

आई वडिलांना आपली गरज आहे --वयानुसार त्यांनाही आराम आणि आपल्या लोकांची सोबत हवीशी वाटते ?

मुलगी मोठी होऊ लागलीये -- कितीही झाले तरी संस्कार हे उसने मागून आणता येत नाहीत -- ?

नातेवाइकांनी  ->"काय ग्रीन कार्ड मिळाले असेलच, ऍप्लाय करा ना, मिळेल तुमची ओळख चांगली असेल तिथे, मेले आमच्या विशू ला व्हिसासाठीही इतके अडवतात" - असे प्रश्न करून डोकं पिकवलंय ?

अमेरिकेत देखील खूप काही फार चांगले दिवस नाहीत ?

एक ना अनेक कारणे!! 

ग्रीन कार्ड मिळणे अवघड नव्हते हे नक्की-- भारतात यायच्या आधीच्या सेंडऑफ पार्टीत जॉन पेरेस्टो हा ऑफिसमधला बॉस गिरीशसोबत रात्रभर दारू पीत होता, तो म्हणाला, "की गेल्या ४ वर्षात तुझ्यासारखा टॅलेंटेट, विश्वासू आणि स्मार्ट माणूस दुसरा कोणी मिळाला नाही. तुझ्यामुळे कंपनीला, मला आणि पर्यायाने पूर्ण युनिट ला अनेक फायदे झालेत.  तू इथेच राहा.  तुझे ग्रीन कार्ड चे काम आरामात होईल, वेरिफिकेशन साठी माझेही ओळखीचे लोक अनेक आहेत. दुसरा जॉब हवा असेल तर मी रेफरन्स मिळवून देतो पण... " 

बॉस ला अर्धवट तोडून गिरीशने ठामपणे सांगितले, "बॉस, धन्यवाद तुम्ही खूप करताय माझ्यासाठी, पण माझा निर्णय पक्का आहे...I've planned to go for GOOD now...  " 

बॉस म्हणाला -  "ठीक आहे, I'm loosing out a GEM.... पण परत कधी यावेसे वाटले तर मात्र मला आठवणीने फोन कर, आणि हा ग्रीन कार्ड चा फॉर्म कायम जवळ ठेव, म्हणजे ह्याकडे पाहून तू कधीतरी परत येऊन आमच्या कंपनीला रुजू होशील अशी आशा वाटते"

अनेक खड्यांमधून गाडी गेल्यामुळे त्याची तंद्री तुटली, त्याने मागे वळून पाहिले तर जिया श्वेताच्या मांडीवर झोपून गेली होती, आणि श्वेतादेखील झोपेला आली होती!   सिग्नल क्रॉस होतो न होतो तोच हवालदाराने गाडी बाजूला घ्यायला सांगितली, ड्रायव्हर बाहेर उतरून काहीतरी बोलला आणि त्याने शंभराची नोट पोलिसाच्या हातात टेकवली आणि परत निघाला,

गिरीशला फार वाईट वाटले,  अनेक वर्षात अमेरिकेत ह्या एवढ्या लहान  स्तरावर लाचलुचपतीचा उद्योग पाहायला मिळाला नव्हता -त्याबाबत विचारल्यावर समजले की गाडीचे  पी.यू.सी. (प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र) मुदतबाह्य झाले होते, आणि  विमा देखील भरलेला नव्हता म्हणे.

नव्या कोऱ्या इमारतीच्या भल्यामोठ्या दारातच भालदार-चोपदारांनी सलाम केला.  फ्लॅट तर आलिशान होता,  आई वडील १ला मजला आणि गिरीशसाठी ७वा मजला. एका बाजूला संपूर्ण काचेची भिंत होती, तिथून निम्म्या शहराचा नजारा दिसत होता  एका बाजूला उंच इमारती दुसरीकडे डोंगर, पण डोंगराच्या पायथ्यापासून माथ्यापर्यंत वाढलेल्या झोपडपट्ट्या आणि पत्र्याची घरे!

पडदा ओढून त्याने टीव्ही लावला,  पहिलीच बातमी भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाची पाहून गिरीशने आवाज वाढवला.

LiveNews चॅनलने गेल्या ५ वर्षातल्या नोंदी, स्टॅटिस्टिक्स मांडले होते. इलेक्शन च्या काळात होणारी भाषणे, नामांतराचे, आरक्षणाचे राजकारण, वाढती महागाई, वाढती लोकसंख्या, अपुऱ्या सोयी-सुविधा, सरकारी कामातला पारदर्शकतेचा अभाव इ. सगळे ठासून भरलेला मसालेदार बातम्यांचा कार्यक्रम बघताना ३ तास गेले. त्यानंतर मात्र त्याने वैतागून टीव्ही बंद केला.

जिया प्रवासाने दमल्यामुळे तिला थोडी कणकण देखील होती. श्वेता ने झोप झाल्यावर कॉफी केली.  (श्वेताला भारतात परतण्याची फार इच्छा नव्हतीच, तिने तर ग्रीन कार्डसाठीची माहिती लग्नानंतर लगेचच घेतली होती. केवळ इमोशनली गिरीशच्या बोलण्याने ती येण्यास तयार झाली)

 कॉफी ती पिता पिता त्याने महिन्याभराचा कार्यक्रम आखला - जिया ची शाळेची ऍडमिशन, मेडिकल इमर्जन्सीसाठी पैसे/पॉलिसी (तिकडे अमेरिकेत फुकट आहे ही सुविधा), सोसायटीच्या मिटींग्स, ऑफिस चे रूटीन, सेव्हिंग्सचे प्लॅन, इ. इ.

तेवढ्यात दारावरची बेल वाजली, सोसायटीची नोटीस आली होती, आजूबाजूच्या ३-४ मंडळांची गणपती/दहीहंडी वगैरेची एकत्रित वर्गणी सोसायटीच्या वतीने भरली जाणार होती आणि त्यासाठी १००० + ५०० रु. ची नोट खर्च होणार होती.   (ह्यांना वर्गण्या मिळाल्या नाहीत तर काचा फोडतात, रस्ते खोदतात, फोनच्या वायर्स कापतात... काय विचारू नका.... त्याला खरं तर खंडण्याच म्हणायला पाहिजे... ) 

भारतातून बाहेर जाताना ह्याच सगळ्या गोष्टींचा विचार करून  गिरीश अमेरिकेकडे निघाला होता, इथले नेते जनतेला फायदा करून देण्यापेक्षा स्वतःच्या तुंबड्या भरण्यात लागलेले असतात, कायदा सुव्यवस्था फक्त नावाला शिल्लक असते, मूठभर गुंडांमुळे समाजकारण आणि राजकारण दोन्ही बरबटले आहे, त्याहूनही जास्त म्हणजे लोकांची मेंटँलीटी - अर्थातच वैचारिक पातळी इतकी खालावली आहे की प्रामाणिकपणा, सामाजिक बांधिलकी ह्यांच्यासारख्या गोष्टी फक्त ५% लोक पाळतात बाकीचे सगळे हापापाचा माल गपापा करतात...!

पहिल्याच आठवड्यात जियाच्या शाळेच्या ऍडमिशनसाठी गिरीश आणि श्वेताचे ५ इंटर्व्हू झाले, त्यामध्ये शाळा व्यवस्थापक आनंदाने ऍडमिशनला तयार झाले फक्त १. ५ लाखाच्या, १ लाख आणि ९० हजाराच्या देणगीच्या मागणीनंतर....!!

महिन्याभराने जिया ला शाळेत सोडताना गिरीशच्या गाडीसमोर एक मोटरसायकलवाला मुलगा आडवा आला, ब्रेक दाबला नसता तर नक्कीच ऍक्सिडेंट झाला असता. सिग्नल दोघांनी पाळला नव्हता पण, मर्सिडिजमधून खाली उतरून शिव्या देत गिरीशने त्या मोटरसायकलवाल्याला एक टप्पल मारलेली पाहून आजू बाजूला गर्दी जमली,  

गिरीश जोरात ओरडला, "ड्रायव्हरने ब्रेक दाबला नसता तर गेला असतास ढगात! " - म्हणून परत गाडीत जाऊन बसला, ड्रायव्हर देखील खूश झाला की आपला बॉस आपल्यासाठी कसा मस्त भांडतो लोकांशी, परंतु गाडीत बसताना गिरीशला जाणवले की आपणदेखील नकळत  वाहतुकीचे नियम तोडण्याला प्रवृत्त झालो आणि गाडीत जिया असताना आपले हे कृत्य बरोबर नव्हे, पण वेळ निघून गेली होती!

रात्री श्वेताने सांगितले की जिया तिला म्हणाली "व्हाय डॅड इस ऍक्टींग वियर्ड? Our Driver hit a guy on bike आणि सॉरी म्हणायच्या ऐवजी डॅड नि त्यालाच टप्पल मारली. तो किती घाबरला होता, आणि DAD ABUSED him as well, in PUBLIC loudly  शी, How can he be so downmarket!! " हे ऐकून पुढचा आठवडाभर  गिरीश आपल्या मुलीशी नजर मिळवू शकला नाही, -- आपल्या सुजाण सुज्ञ बापाची  IMAGE क्षणात धुळीला मिळाल्यासारखे वाटले...

एकदा असेच संध्याकाळी  गिरीशने जिया सोबत टीव्ही गेम खेळत असतानाच फोनवरून पिझ्झा मागवला, जियासाठी खास चिकन+चीज, श्वेता साठी व्हेज सुप्रीम आणि स्वतःसाठी मसाला बार्बेक्यू!  

दारावरची बेल वाजली, कामवाल्याबाईंनी गिरीशने वर काढून ठेवलेले पैसे दिले आणि ऑर्डर घेतली. हॉल झाडून घेतला,  जिया-गिरीशला हाक मारली आणि त्या निघून गेल्या.  

 सर्वांसोबत तो गरम गरम पिझ्झा खाताना जिया सहज बोलून गेली " डॅड, मला इथे नाही आवडत  , इथे लोक खूप संकुचित मनोवृत्तीचे लोक आहेत, माझ्या शाळेत सारख्या वस्तू चोरीला जातात, रस्त्यावर रोज भांडणं होत असतात,  वाहतूक कोंडीने खूप कंटाळा येतो, आपण परत जाऊया ना US ला ?" - इतके दिवस पिझ्झा खायची सवय असूनही आज पहिल्यांदाच गिरीशला त्याचा चटका बसला.

ते संपलेले बॉक्सेस कचरापेटीत टाकताना वर चिकटवलेले बील पाहून तर तो अजूनच विचारात पडला.  "माझ्या एका वेळच्या पिझ्झ्याचे पैसे म्हणजे माझ्या कामवालीचा एक महिन्याचा पगार आहे? आणि हे पाहूनही तिने तिच्या मनातले भाव आम्हाला समजू दिले नाहीत? तिला ते तेवढे पैसे देऊन फक्त ३ पिझ्झ्याचे बॉक्स घेताना काय वाटले असावे?

गिरीशचे डोके परत जड झाले. जियाचे बोलणे, टीव्हीवरचे बातम्यांचे प्रक्षेपण, आजूबाजूला चाललेली राजकारणाची चिखलफेक, भर चौकात त्याने मारलेली टप्पल आणि तेव्हा जियाचे त्याला दंश करणारे डोळे, मंडळांच्या नावाखाली गुंडागर्दी... गरिबीचा शाप लाभलेली नोकर मंडळी, पिझ्झा चे बील आणि कामवालीचा पगार...  सगळे सगळे... 

श्वेताने त्याची द्विधा मन:स्थिती ओळखली, 

जिया झोपल्यावर तिने पुन्हा २ कप कॉफी केली आणि बाल्कनीत बसलेल्या गिरीशजवळ येऊन बसली... काय विचार करतोयस? आपण इथे का आलो असंच ना? मी आधीच म्हणत होते, की आई-बाबांनाच तिकडे नेऊ, फक्त एवढं ऐक ना माझं... सगळं पुन्हा सुरळीत होईल... जे काही खर्च झाले ते आपल्या अक्कलखाती पडले असे समजू... तिथे मी डे-केअर सुरू करेन म्हणाले होते, तो प्लॅन पण पुढे नेऊ म्हणजे वर्षभरात पुन्हा सगळे जैसे थे होईल... इथे सोयी सुविधा नाहीतच पण आपल्या टॅक्स चे पैसे कसे वापरले जातात ते कळायलाही मार्ग नाही!   वर्षभरात जे कमावतोय काय माहीत की उद्या एका हॉस्पिटलवारीत सगळे सोडावे लागेल?  सगळा विचार पुन्हा एकदा कर ना रे... मला माहीतीये तू आत्ता Confused आहेस पण उद्या सकाळी पुन्हा विचार कर, अजूनही सगळे आपल्या हातात आहे...Its just 6 months we came back!!

गिरीशचे डोके जड झाले होते, श्वेताचे बोलणे ऐकता ऐकता समोरच्या ड्रॉवरमधला हातात घेतलेला एक कागद पार चुरगाळला गेला होता, त्याने मोबाईल, पाकीट उचलले, घराची किल्ली आणि तो क्रश झालेलाकागद मुठीत कोंबून ,वॉक करून येतो असे म्हणून बाहेर पडला.... 

तासभर चालून डोके शांत झाल्यासारखे वाटल्यावर उलटपावली माघारी फिरला, रात्रीचे १२ वाजून गेले होते, श्वेताचा SMS आला होता की "आम्ही झोपतोय, तू आलास की फोन कर! "

सोसायटीच्या आवारात पाऊल ठेवतो न ठेवतो... एवढ्यात त्याचा फोन वाजला.! "Hello Girish.....John Here, तुला आनंदाची बातमी देतो, कंपनीने आज १५ वर्षे पूर्णं केली आहेत आणि आपल्याला २ नवीन प्रोजेक्ट्स पण मिळाली, त्यातले एक कोणते माहीत आहे? -- तू काम करत होतास ते, US AIRLINES SYSTEMs चे! क्लायंट म्हणतोय, प्रोजेक्ट डिझाइन मधलाच एफिशियंट स्टाफ त्यांना डिझायनिंगसाठी हवा आहे....I Would like to take opportunity on behalf of company -- तुला पुन्हा एकदा ऑफर देण्यासाठी - for the post of Production Manager Research & Testing आणि ह्यावेळी तुझा पगार मागच्यापेक्षा ३५% टक्के जास्त असेल, विचार करत बसू नकोस, बॅग आवरायला घे....   I hope you will join us back again.!

-- "येस बॉस... I will come... "असे बोलून द्विधा मन:स्थितीत सापडलेल्या गिरीशने फोन ठेवला.

अमेरिकेतली फक्त श्रीमंती नाही तर तिथे एक सबळ समाजव्यवस्था, परस्परविश्वास, GrassRoot लेव्हल वर दिसणाऱ्या डेव्हलपमेंट्स आणि भरलेल्या टॅक्स चा सुयोग्य वापर होताना दिसतो, भारतात वेगळे काही असेल तर फक्त संस्कार !!  आणि सध्याच्या पिढीत सुद्धा उपग्रहवाहीन्यांवरून घराघरात जाणारे चॅनल्स तेच सगळे पसरवत आहेत जी आपली संस्कृती नाही पण जे दिसते आहे त्याचा प्रचंड पगडा आहे, ज्याला कंटाळून तिकडून इकडे आलो,  इथे तर तेच करण्यात लोक धन्यता मानायला लागलेत.परदेशी ताकद, विदेशी षडयंत्र म्हणजे वेगळे काही नाही... फक्त दहशतवादच नव्हे तर हे चॅनल्स आणि परकीयाचे अनुकरण एक दिवस आपली संस्कृती फाटक्या कपड्यात भरून भारताच्याच  वेशीवर टांगण्यात सफल होतील आणि भारत देखील युरोप, अमेरिकेप्रमाणेच रंग ढंग पकडेल ही अनामिक भीती गिरीशला वाटली....! (कदाचित परिस्थिती बदलेल देखिल ज्याचा आपण विचार करून येथे परत आलो होतो परंतु त्याला अजून काही वर्षे लागतील हे निश्चित !)

आणि त्या नादात हाताची मूठ अजूनच वळली गेली-- काहीतरी जाणवले म्हणून त्याने मूठ उघडून पाहिले...

मगाशी घरातून निघताना घेतलेला कागद त्याने हलकेच उलगडला, मागच्या बाजूला बारीक अक्षरातल्या Terms & Conditions  आणि पुढच्या बाजूला ग्रीन कार्ड ऍप्लिकेशन फॉर्म!!

तोच फॉर्म जो बॉस ने जाताना दिला होता आणि आता त्याच्याच आधारे गिरीश आता परत जाऊन पुन्हा स्वतःची नवीन किंबहुना जी आधी होती तशी जीवनपद्धती बनवणार होता! त्याने ऑफरलेटरची प्रिंट काढून घेतली, आणि सगळा दिवस आई-बाबांना समजावण्यात गेली परंतु अखेरीस  त्याच्या बुद्धिवादी मनाने सर्वांना त्याच्याबाजुने विचार करण्यास भाग पाडले.  आधी  गिरीश आणि कुटुंब जाणार आणि महिन्याभराने आई-बाबा येतील असे ठरले.

बॅग पॅक झाल्या. जिया, श्वेताने आईबाबांना नमस्कार केला,  गिरीशने ओव्हरकोट चढवला आणि बाहेर पडला...

ड्रायव्हरने पुन्हा विमानतळावर सोडले, ह्यावेळी त्याच्या हातातल्या बोर्ड वरची पाटी वेगळी होती --"HAPPY JOURNEY...ENJOY YOUR FLIGHT"!!

सिक्युरिटी चेक पास झाल्यावर त्याने जिया, श्वेताचा चेहरा पाहिला - त्याला तो थोडा जास्त आनंदी वाटला.. ओव्हरकोटच्या खिशातला चुरगाळलेला ग्रीनकार्डचा ऍप्लिकेशन फॉर्म पुन्हा पुन्हा वाचत त्या आलिशान वेटिंग लाउंजमध्ये गिरीश विमानाच्या बोर्डींगच्या घोषणेची वाट पाहत तो स्वतःशी पुटपुटला -- This Time I am going back for good...!

-

आशुतोष दीक्षित.

=======================================

"लेखकाचे मनोगत"

नमस्कार वाचकहो, ह्या लेखाची प्रेरणा म्हणजे माझा प्रिय मित्र स्वप्नील राऊत, आणि तो भारतात आल्यावर त्याच्यासोबत होणाऱ्या वैचारिक, सामजिक, आर्थिक, राजकिय आणि वैयक्तिक गप्पा  !  

लेख पूर्णं झाल्यावर सहज मनात विचार आला -> "खरंच गिरीश कायम चा अमेरिकेला परत गेला असेल..? काय त्याला आपल्या मातृभूमी, जन्मभूमीचा एकदा हि विचार आला नसेल...?? ज्या मातीत वाढला, खेळला, मोठा झाला त्या मातीचा अभिमान असा सहज निघून गेला असेल.."?? कदाचित गेला हि असेल किंवा नसेलसुधा, पण ह्या मागची कारणं हि तशीच आहेत मित्रांनो.

आपल्या कुटुंबाला एक चांगले आयुष्य आणि सुविधा मिळाव्या असा विचार करणाऱ्याला आपण पूर्णपणे चुकीचं नाही म्हणू शकत -Coz, Family comes First !!  

पण गिरीश सारख्या असंख्य सुशिक्षित मंडळींनी जर असाच विचार केला तर काय आदर्श राहील पुढच्या पिढी समोर? काय अशिक्षित राजकारणी लोकांच्या हातात देश देऊन असाच निघून जायचं? आज कदाचित गिरीशच्या कुटुंबाला एक चांगला आयुष्य मिळेलही, पण भारतातल्या असंख्य कुटुंबाचं काय? जे स्वप्नातही परदेशात जायचा विचार करू शकत नाहीत.

आजच्या पिढी ने जर पुढाकार घेऊन चुकीच्या गोष्टींविरुद्ध आवाज उठवला नाही, आपल्या पासून चांगल्या गोष्टींची सुरुवात केली नाही तर आपली येणारी पुढची पिढी अंधारात असेल ह्यात शंका नाही. 

 -

आशुतोष स. दीक्षित.

९८२३३५४४७८