वाईवरून कोल्हापूर

आमच्या कोंकणात (म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यात) 'वाईवरून कोल्हापूर' असा एक वाक्प्रचार वापरला जातो. 'उगाचच अति लांबच्या मार्गाने जाणे' असा त्याचा अर्थ. रत्नागिरी जिल्ह्याचा नकाशा नि रडतोंडीचा घाट एवढे लक्षात घेतले की त्याचा अर्थ अगदी स्पष्ट होतो.
पण नुसतेच हिंडायला जायचे असेल तर कमीत कमी वेळ आणि अंतर हे निकष लावण्याची गरज नसते. पावसाळ्यात निरुद्देश भटकणे असेल तर मग 'ते निकष न लावणे' हीच गरज बनते.
जन्म आषाढातला असल्याने असेल बहुधा, पावसाळा माझा सर्वात आवडता ऋतू. भरून आलेले आभाळ, दिवसाही दिवे लावावे लागण्याइतका अंधकार, जिकडेतिकडे माजलेली हिरवाई, दमटपणामुळे हाडापर्यंत भिनणारा गारवा, सगळे कसे थेट आतवर पोहोचणारे.
त्या वातावरणात एक तर चादर घेऊन 'पड रे पाण्या', 'आई आहे शेतात' किंवा 'शेलूक' असले पुस्तक घेऊन लोळण मारावी. मधून अधून भाजलेल्या ओल्या शेंगा वा आठळ्या, कॉफी (ब्रू कॉफी दूधसाखर घालून; बिनदुधासाखरेच्या फिल्टर कॉफीची ही वेळ नव्हे. नेस्कॅफे ही कॉफी नसल्याने त्याबद्दल लिहित नाही) असा बेत चालू ठेवावा. 'पावसात दिवस कळेना, आळशी अंथरूण सोडेना' असा आनंदीआनंद होतो.
किंवा मग थेट बाहेर पडावे. दिसेल त्या रस्त्याकडे गाडी रोखावी आणि सुटावे. घड्याळ, सेलफोन आदी महत्त्वाच्या वस्तू घरी ठेवाव्यात. पैसे तेवढे प्लास्टिकच्या छोट्या पिशवीत लपेटून घ्यावेत.
दुचाकीवर असले प्रवास करण्याची इच्छा अजूनही आहे, पण 'स्पिरिट इज विलिंग बट फ्लेश इज वीक' अशी अवस्था बऱ्याच वेळेस असते. त्यामुळे चारचाकी घेऊन अशी हौस भागवावी लागते. अर्थात अख्ख्या पावसाळ्यात एखाददुसऱ्या वेळेसच अशी संधी साधता येते.
गेल्या आठवड्यात मध्येच (म्हणजे बुधवारी सकाळी) मला विरक्तीचा झटका आला. कार्यालयात काम नेहमीप्रमाणे तुंबलेले होते. त्या दिवशीचे काम त्या दिवशीच कसे संपवावे ही विवंचना कुरतडत होती. 'कशासाठी पोटासाठी' हे जरी खरे असले (आणि पोटही यथायोग्य विस्तार पावलेले असले) तरी कुठवर धावायचे याचा विचार करायची वेळ आली आहे असे जाणवत होते.
कार्यालयाच्या पार्किंग लॉटमधूनच मी एक दिवसाच्या रजेवर असल्याचे जाहीर केले. "हो का? बरं" अशा सगळ्या प्रतिक्रिया आल्या. म्हणजे मी समजत होतो तेवढे काही माझ्यावर अवलंबून नव्हते तर. ईगो दुखावण्याऐवजी आनंदच झाला. आणि गाडी साताऱ्याच्या दिशेने हाकली.
पहिला टोलनाका नेहमीच संयमाची सत्त्वपरीक्षा पाहतो. पण त्या सकाळी नशीब जोरावर होते. रिपरिपत्या पावसात रांग अशी नव्हतीच. शिरवळला काहीतरी चमचमीत तळण खाण्याची इच्छा मनातच ठेवली आणि खंडाळा-पारगांवच्या दिशेने गाडी हाकणे सुरू ठेवले.
खंबाटकीचा घाट चालू होता. तिथली इंजनेर मंडळी मध्येच काम चालू असल्याची आवई उठवतात नि कोल्हापूरकडून येतानाच्या एकदिशा मार्गावर असलेल्या बोगद्यातून दुहेरी वाहतूक चालू करून मज्जा बघतात हे ऐकून होतो. सुटलो.
साताऱ्याला पोहोचावे आणि मग काय ते ठरवावे असा बेत होता. पण सुरूरपाशी वाईफाटा ओलांडला आणि मग आपण बरोबर करतो आहोत की चुकीचे असा प्रश्न उगाचच पडला. गाडी चालवत राहिलो. भुईंजला एका टपरीवर चहा प्यायला थांबलो. भुईंजहून ओझर्डे मार्गे वाई गाठता येते हे ज्ञान झाले. गाडी त्या रस्त्याला घातली. रस्ता होता असेल पंधरावीस किलोमीटर. पण 'एन एच फोर'वरून त्या रस्त्यावर जाणे म्हणजे 'शिवास रीगल-बर्फ-सोडा' नंतर एकदम 'कॉफे रम'चा घोट (बिनपाण्याचा) घेण्यासारखे होते. छोटुकला रस्ता, खड्डे अपरंपार, पावसाची झड मधूनच अशी लागे की 'या परिस्थितीत गाडी बंद पडली तर' हा मनोरंजक विचार मनात पिंगा घालू लागे. ओझर्ड्याला पोहोचेस्तोवर धाकधूक चालू होती.
ओझर्ड्याला परिस्थिती थोडीशी सुधारली. 'कॉफे रम'ऐवजी 'डी एस पी'. मग वाई गाठली. तिथून मांढरदेवीमार्गे भोर गाठावे असा अंधुक विचार होता. पण वाई 'एम आय डी सी'कडे जाणारा रस्ता काही मला आवडला नाही. परत गाडी वळवून पांचगणीच्या दिशेने कूच केले.
पावसाने सुंदर आलापी सुरू केली होती.
माझ्या गाडीत संगीत वाजवण्याची काहीच सोय नाही (असलेली सोय गाडी खरेदी करताना नाहीशी करण्याच्या अटीवर गाडी खरेदी केली होती) त्यामुळे पावसाच्या आणि माझ्यामध्ये उगाच कुणीही लुडबुडत नव्हते. चालायला जाताना संगीत ऐकणे वेगळे. गाडी चालवताना संगीत ऐकणे हा संगीताचा आणि ड्रायव्हिंगचा अपमान आहे असे मी मानतो. व्यसनांची सरमिसळ वाईट.
चर्च बेकरी बंद दिसली. लकी बेकरीतही शांतता होती. बाजारपेठेतल्या भडभुंजाची भट्टी थंड होती. पुढे जात राहिलो.
मॅप्रो गार्डनला पार्किंगला नीट जागा मिळाली म्हणून थांबलो. मक्याचे कणीस नीट कसे भाजावे याचे प्रशिक्षणवर्ग सुरू करावेत असे नेहमीप्रमाणे वाटले. तिथे कॉफी तयार करणाऱ्या माणसाला जन्मठेपेवर पाठवावे की पाच वर्षांच्या सक्तमजुरीवर भागेल हा प्रश्नही नेहमीप्रमाणे पडला. महाबळेश्वरच्या दिशेने निघालो.
वेण्णा तलाव ओस पडला होता. पावसाचा आवाज, कसलेल्या प्रकाशयोजनाकारानेही हार मानावी अशी प्रकाशयोजना, एक हुडहुडी भरलेले कुत्रे सोडता दुसरा सजीव आसपास नाही... अजून काही काळ आयुष्य कंठायला हरकत नाही असा दिलासा देणारा क्षण.
महाबळेश्वरला मुक्काम करावा अशी इच्छा मनात जरा वेळ तरळत राहिली. उगाचच चारदोन हॉटेलांत जागा आहे का अशी चौकशी केली. खच्चून जागा होत्या. इच्छा सिगरेटच्या धुरासारखी विरून गेली. पण त्या रिकामपणच्या भटकंतीत महाबळेश्वरहून साताऱ्याला थेट रस्ता आहे (वाईमार्गे न जाता) असे कळले. न पाहिलेला रस्ता. वाहवा!
गाडी तिकडे वळवली.
महाबळेश्वर उतरतानाचा घाट म्हणजे केळघरचा घाट. घाट नितांतसुंदर आहे. डोंगरावरून उड्या घेणारे धबधबे असंख्य. काही धबधबे अगदीच चिमुकले, तर काही आडदांड. गारेगार पाणी.
पाऊस सलग असा पडत नव्हता, पण वातावरणातली आर्द्रताच इतकी होती की ढगात शिरल्यासारखे वाटत होते. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे रहदारी अगदीच तुरळक. त्या अख्ख्या घाटात दोन्हीबाजूंची वाहतूक मिळून मला दहादेखिल वाहने बघावी लागली नाहीत.
मध्येच धुकटाचा लोट उसळून उठे आणि दहापंधरा फुटांपलिकडचे दिसेनासे होई. हिरव्या रंगाच्या छटा मन चाहेल तशा चहूबाजूंना उलगडत होत्या.
घाट उतरल्यावर खाली जावळी, मेढा, कण्हेर धरणाचा पाणीसाठा, सगळे कसे संथपणे नजरेसमोर उलगडत होते. वाहतूक अजूनही तुरळकच होती. कुठे थांबावेसे वाटले नाही. पण गाडी पळवावी असेही वाटले नाही. हा रस्ता संपेल या भीतीने हळूहळू चाललो होतो.
एखाद्या हव्याहव्याशा वाटणाऱ्या स्वप्नासारखा रस्ता अचानक संपला नि मी भसकन सातारा शहरात शिरलो.
एवढ्या शांततेतून एकदम शहरात आल्यावर बुजायला झाले. नेहमीप्रमाणे पालेकर बेकरीत जावेसे वाटेना. बाहेर हायवेला लागलो. 'माईलस्टोन'मध्ये जाऊन चिरोटे खरेदी केले. मग 'ओंकार'मध्ये जाऊन 'ऐक्य' वाचतवाचत मिसळ, पुरी भाजी आणि चहा अशी पोटपूजा केली. वसंतगड करावा असा अंधुक विचार मनात घोटाळू लागला म्हणून त्या दिशेने निघालो. पण 'एन एच फोर'ची रहदारी फारशी भावली नाही. गाडी रहिमतपूरकडे वळवली. आणि उगाचच (जमेल तेवढ्या) सुसाट वेगाने गाडी चालवत यमाईदेवीची टेकडी गाठली. औंधच्या म्युझियममध्ये गर्दी नव्हती. संध्याकाळ होऊ घातली होती. रखवालदाराला घरी परतण्याचे वेध लागले होते. त्याच्याशी उगाचच गप्पाटप्पा केल्या. त्याचे गाव जावळी-सातारा रस्त्यावरचे चिंचणी हे निघाले. मी नुकताच त्या गावातून आलो आहे म्हटल्यावर त्याने तिथल्या टपरीवाल्याला विझवलेला स्टो परत पेटवायला लावून पेशल चाय करायला लावला नि पाजला. पार्लेची बिस्कीटे मात्र पारच सादळलेली होती. पावसाचा ताशा मधूनच वाजत होता.
पुरेसे भिरभिरून झाले होते. परत गोठ्याकडे परतणे भाग होते.
रोजच्या जगण्यात कितीही हताश व्हायला झाले तरी असा एखादा दिवस अचानक पाठीवरून आश्वासक हात फिरवून जातो. असा अजून एखादा दिवस आयुष्यात शिल्लक असेल या आशेवर पुढची वाटचाल जरा सुकर होते.