हेस्टर सरोवराचे रहस्य

अनुवादाविषयी थोडेसे - जिओलॉजिकल सोसायटी ऑफ अमेरिका (GSA) फाउंडेशनातर्फे (पाहा - दुवा क्र. १) जिओटेल्स (GeoTales, भू-कथा) नावाचे संग्रह प्रसिद्ध केले जातात. अमेरिकी भूवैज्ञानिक सर्वेक्षण (U.S. Geological Survey) संस्थेमध्ये काम करणाऱ्या विविध वैज्ञानिकांना काम करतेवेळी आलेले अनुभव ह्या पुस्तकांमध्ये संग्रहित केलेले आहेत. ह्या भू-कथांचे पहिले चार खंड छापिल स्वरूपात प्रकाशित झाले आहेत. आता नवीन अनुभव जालावर उपलब्ध आहेत (पाहा - दुवा क्र. २), पहिले चार खंड जालावर उपलब्ध नाहीत. भू-कथांच्या पहिल्या संग्रहातील पहिल्या कथेचा 'The Mystery of Hester Lake' चा हा अनुवाद. 

 
हेस्टर सरोवराचे रहस्य
२७ जुलै १९६० चा तो उन्हाळी दिवस होता. मी आणि फ्रँक डॉज त्यावेळी अमेरिकी भूवैद्यानिक सर्वेक्षण संस्थेमध्ये (U.S. Geological Survey, पाहा - दुवा क्र. ३) भूशास्त्रज्ञ ( geologists) म्हणून काम पाहात होतो. मध्य (central) सिएरा नेवाडा पर्वतश्रेणीच्या (mountain range) दुर्गम भागामध्ये 'ब्लॅक डिव्हाइड' (the Black Divide) आहे. तिच्या विस्तारापैकी पूर्वेकडील भागात 'गॉडर्ड' पर्वत (Goddard Mountain) आहे. ह्या पर्वतीय भागाच्या १५ मिनिट चौकोनाचा (15 minute quadrangle) नकाशा तयार करण्याचे काम आम्हा दोघांवर सोपवण्यात आले होते. 'ले कॉन्टे' कॅन्यनमधून (Le Conte Canyon) 'किंग्ज' नावाची नदी वाहाते. तिच्या मधल्या प्रवाहाजवळून जाणाऱ्या 'जॉन मुइर' नावाच्या पायवाटेजवळ (trail) आम्ही तळ ठोकला होता. त्यावेळी लीरॉय ब्रॉक नावाचा एक वनरक्षक (पार्क रेंजर) त्या पायवाटेवरून जात असताना नेमका आम्हाला दिसला. दर मौसमात त्याची ह्या वाटेवर फेरी असे.  त्याचा तळ आसपासच कुठेसा होता.  जवळपास तीन हजार फुटांवरच्या चढाईमध्ये अनायासे आम्हाला त्याची सोबत मिळाली.
 
आम्ही एका झऱ्याशेजारच्या कंदरातून जाणारा रस्ता पार करत आणि वाटेत लागलेली काही छोटी डबकी मागे टाकत ११,२५५ फूट उंचीवर असलेल्या एका निनावी सरोवरापाशी येऊन पोहोचलो. हे सरोवर अर्धवट गोठलेले होते. घसे कोरडे पडलेले असल्यामुळे आम्हाला पाण्याची नितांत गरज होतीच. सरोवराचे पाणी पिण्यासाठी म्हणून आम्ही वाकतो तोच पाण्यात तरंगणाऱ्या दोन वस्तूंनी आमचे लक्ष वेधून घेतले. सरोवराच्या मुखापाशी असलेल्या दगडांमध्ये ह्या वस्तू अडकल्या असाव्यात. त्यातली पहिली वस्तू म्हणजे लहान विमानाच्या लाकडी चाकाचा रोध ठोकळा (wheel chock) होता आणि दुसरी वस्तू म्हणजे एक छोटी धातूची दाब-टाकी (pressure tank) होती. साधारण २-४ लिटर आकारमानाची आणि श्वसनासाठी प्राणवायूची जी नळकांडी वापरतात त्या प्रकारची ही टाकी असावी असे वाटत होते. ह्या वस्तू इथे सापडाव्या म्हणजे ह्या परिसरात जवळपास एखादे विमान कोसळले असणार हे उघड होते. उत्तरेच्या दिशेने त्या सरोवराला एक प्रदक्षिणा घालत कोसळलेल्या विमानाचा शोध घ्यावा असे आम्ही ठरवले. थोडे अंतर जात नाही तोच आम्हाला सरोवराच्या उथळ पाण्यात एक हवाई छत्री (parachute) पडलेली दिसली. मी माझी विजार उतरवली आणि सरोवराच्या त्या गोठलेल्या पाण्यातून वाट काढत कसाबसा त्या हवाई छत्रीजवळ पोहोचलो. छत्रीचे पांढरे कापड मी धरून ओढायचा प्रयत्न करताच धरल्या ठिकाणी ते टर्रकन फाटले. तेवढ्यात फ्रँकला साधारण सहा फुटांवर  पाण्यात पडलेला एक बूट दिसला. गोठणाऱ्या थंडीने अंग शहारत होते. तरीही मी बाकी कपडेही उतरवून त्या गार पाण्यात सूर मारला आणि तो बूट हस्तगत केला खरा, मात्र तो दोऱ्यांमध्ये अडकून बसला होता.  तो सोडवून काठावर घेऊन जाणे काही मला जमले नाही. मी पुन्हा पाण्यात सूर मारून त्या दोऱ्या सुऱ्याने कापून काढल्या आणि बूट तळ्याकाठच्या गवतावर फेकला.
 
हवाई सैनिक वापरतात त्या प्रकारचा तो बूट होता आणि त्यात एक पायही होता. घोट्याजवळ तुटलेला. त्या दोऱ्या म्हणजे पाय उबदार राखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विद्युत उपकरणाच्या (इलेक्ट्रिक सिस्टिम) वायरी असल्याचे निष्पन्न झाले. त्या पायाची त्वचा थोडी सुरकुतली होती आणि पांढरी पडली होती, पण तेवढे वगळता तो पाय अगदी व्यवस्थित जतन झाला होता. त्यावरून, सुमारे दोनेक वर्षांपूर्वी हे विमान कोसळले असावे असा अंदाज आम्ही काढला. हे सरोवर जवळपास वर्षभर गोठलेले असते आणि विमान कोसळल्यानंतरही आतापर्यंत सरोवराचे पाणी गोठलेले राहिले असणार.
 
थोड्याच वेळात आम्हाला जीर्ण झालेली एक कातडी पिशवी सापडली. सरोवराच्या काठापासून सुमारे तीस फुटांवरच्या चढणीवर ती पडलेली दिसली. त्यात कागद होते, पण ते घट्ट एकमेकांना चिकटून बसले होते आणि त्यावर लिहिलेले वाचता येणे अशक्य होते. त्या कागदांवरून आम्हाला एवढे मात्र ध्यानात आले की ते एका बी-२४ बाँम्बरवाल्याचे होते. बी-२४ बाँम्बर म्हणजे चार इंजिने असलेले 'लिबरेटर' विमान. चढणावर थोडे आणखी पुढे जाता, सरोवराच्या नैरृत्येला असलेल्या उंच पर्वतरांगेवर विमानाच्या शेपटाकडचा भाग तुकड्यांत विखुरलेला आमच्या दृष्टीस पडला. त्या पर्वतमाथ्यापाशी विमान आले तेव्हा बहुतेक ते पुरेश्या उंचीवर नसावे. १३००० फुटांवरच्या माथ्याच्या दगडांना घासले जाऊन ते विमान गडगडत सरोवरात कोसळले असावे, असा तर्क आम्ही लढवला. विमानाचा बराचसा भाग खोल सरोवराच्या तळाशी गेला असावा. मात्र ते गडगडत असताना त्याचे काही भाग निखळून इतस्ततः विखुरले असावेत. ते बर्फावरून घसरत उथळ पाण्यात येऊन पडले असावेत. 
 
दुसऱ्या दिवशी 'लॅडर' झऱ्याच्या दिशेने आम्ही पुन्हा मार्गस्थ झालो.  डोंगरदऱ्यांतून फिरत आणखी वेळ घालवण्याची इच्छा आता आम्हाला नव्हती. लीरॉयने आम्हाला काल सापडलेल्या विमानाबद्दलची आणि इतर वस्तूंबद्दलची माहिती रेडिओसंदेशाद्वारे मुख्य कचेरीकडे रवाना केली. मग अर्थातच ह्या बातमीला पाय फुटले आणि बाकीची माहिती भराभर पुढे येऊ लागली. ते (बी-२४ बॉम्बर ) विमान दुसऱ्या महायुद्धाच्या काळात एका प्रशिक्षणाच्या कामावर रुजू होते.  ५ डिसेंबर, १९४३ रोजी ह्या विमानाने उड्डाण केल्यानंतर ते परतलेच नाही. त्या विमानाने कॅलिफोर्नियातील फ्रेन्सो जवळच्या 'हॅमर फील्ड' येथून पहिले उड्डाण केले आणि ते ऍरिझोनातील टुसाँ येथे गेले. तेथून परतीच्या मार्गात ते सिएरा नेवाडाच्या उंच पर्वतराजीत कुठेतरी गडप झाले.

त्या विमानाचा सहसारथी (copilot) लेफ्टनंट रॉबर्ट हेस्टर आणि त्याचे ते विमान शोधून काढण्याच्या निर्धाराने त्याच्या वडिलांना, म्हणजे क्लिंटन हेस्टर यांना अगदी पछाडून टाकले. प्रत्येक उन्हाळ्यात त्यांनी आल्पीय (alpine) सिएराचा विस्तीर्ण परिसर पायी चालत पिंजून काढायला सुरुवात केली. मात्र त्यांचा हा उत्कट शोध काही पूर्णत्त्वास गेला नाही आणि १९५९ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यानंतर पुढच्याच वर्षी आम्हाला त्या विमानाचा शोध लागला. ते विमान ह्या निर्जन दुर्गम जागी १६ वर्षे पडून होते.  म्हणजे ह्या १६ वर्षात ह्या जागेकडे कोणी फिरकलेही नसणार. त्या उन्हाळ्यात नंतर सेनादलाच्या पाणबुड्यांचे एक पथक हेलिकॉप्टरने त्या सरोवरापाशी गेले आणि त्यांनी सहा मृत सैनिकांची शवे त्यातून शेंदून काढली. कोसळलेले विमान पाण्याबाहेर बाहेर काढण्यासाठीची यंत्रणा मात्र तेव्हा उपलब्ध नव्हती. यू. एस. जिओलॉजिकल सर्व्हेच्या ७.५-मिनिट२ उत्तर पॅलिसेड चौकोनामधील ह्या सरोवराला आता 'हेस्टर सरोवर' नावाने संबोधले जाते.
 
मूळ लेखक - जेम्स जी. मूर
'The Mystery of Hester Lake', GSA GeoTales - Memories from GSA members, Volume 1, page 2-3, GSA Foundation, Summer 2004
अनुवाद - वरदा व. वैद्य    
 
*१ "द ब्लॅक डिव्हाइड" - सिएरा नेवाडा पर्वतश्रेणी  ग्रॅनाइट खडकांपासून तयार झालेली आहेत. ग्रऍनाइट हे गडद रंगांचे खडक असल्यामुळे ह्या भागाला काही वेळा द ब्लॅक डिव्हाइड असे म्हटले जाते. मात्र हे नाव मोठ्या प्रमाणात प्रचलित नाही.

*२ १५ मिनिट व ७.५ मिनिट चौकोन - (दुवा क्र. १ ह्या पानावरील माहितीनुसार ) - १८७९ मध्ये  USGS  ने  देशाचा नकाशा तयार करण्याची जबाबदारी उचलली.  सर्वपरिचित USGS  नकाशे म्हणजे १ : २४,००० मापाने काढलेले नकाशे. त्यांनाच ७.५ मिनिट चौकोन म्हणतात. (अमेरिकेची) ४८ सलग राज्ये मापणारे सुमारे ५५,००० ७.५ मिनिट चौकोन तयार केले गेले. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचे सर्व क्षेत्रफळ बऱ्याच तपशीलांसह दाखवणारी ही एकमेव नकाशेमाला आहे. ७.५ मिनिट चौकोनी नकाशांची माला १९९२ साली पूर्णत्त्वास गेली.  आता हा (नकाशे तयार करण्याचा) प्रकल्प "द नॅशनल मॅप" नावाने ओळखला जातो.१५ मिनिट चौकोन म्हणजे ७.५ चौकोनाच्या दुप्पट आकार.

*३ बी-२४ लिबरेटर - कॅलिफोर्नियातील सॅन डिएगोस्थित 'कन्सॉलिडेटेड  एअरक्राफ्ट' नावाची कंपनीने 'कन्सॉलिडेटेड बी-२४ लिबरेटर' नावाची बॉम्बर विमाने उत्पादित असे. अधिक माहितीसाठी हा दुवा पाहा -  दुवा क्र. ४

*४ हेस्टर सरोवर - हेस्टर सरोवराचे नाव हे आपल्या मृत मुलाच्या शोधासाठी सिएरा नेवाडासारख्या दुर्गम भागात दर उन्हाळ्यात वणवण फिरणा‍‍र्‌या, बी-२४ विमानाच्या सहसारथ्याच्या वडिलांच्या - क्लिंट हेस्टरच्या नावावरून देण्यात आले आहे.   अधिक माहितीसाठी हा दुवा पाहा - दुवा क्र. ५