सावल्या

मिट्ट काळोखात होत्या गूढ काही सावल्या
भूतकाळातील पापांच्या उशाशी सावल्या


जागतो सैतान देही आज कोणा पाहुनी
चेहऱ्याला नाव होते, या निनावी सावल्या


गाडले होतेस ज्यांना खोल तू अपुल्या मनी
त्या भुतांच्या खेळती आता जिवाशी सावल्या


जोडले नाते तनुशी कालपावेतो जरी
या निघाल्या आज करण्या बेइमानी सावल्या


जीवनाचे सत्त्व सारे शोषले जळवांपरी
जीव माझा घेउनीही का उपाशी सावल्या


काय तृप्तीच्या बढाया मारता माझ्यापुढे
पोटभरल्या माणसांच्याही अधाशी सावल्या


शाप त्यांना, सांग, कोणी हा विदेहाचा दिला
मांडती दावा उभा बघ इंद्रियांशी सावल्या