लोकप्रभा साप्ताहिकाचा अंत

दोनेक आठवड्यांपूर्वी 'लोकप्रभा' मधून प्रसिद्ध होणाऱ्या संजोप रावांच्या विज्ञानकथांविषयी मी लिहिले. तीनचार दिवसांपूर्वी कळाले की 'लोकप्रभा' आता बंद झाले आहे. कायमचे. किमान संजीवला तसे कळवण्यात आले आहे.

तसेही ते साप्ताहिक कोविडकाळापासून छापणे बंद होऊन ऑनलाईन स्वरूपातच उरले होते. तेही संपले.

इंडियन एक्सप्रेस समूहाच्या मालकीचे असलेले 'लोकसत्ता' शालेय वयापासूनच माहीत होते. तेव्हाही मराठीत साप्ताहिकांची चणचणच होती.

'स्वराज्य' नावाचे 'सकाळ'च्या मालकीचे एक साप्ताहिक होते. त्यातील लेख ठीक असत. पण शेवटच्या पानावरचे विनोद म्हणजे कहर होता. पांचट विनोदांत अजून पाणी घालून केलेले असे ते विनोद. ("माझ्या बायकोच्या डोळ्यात वाळूचा कण भरला तर पंचवीस रुपयांचा भुर्दंड बसला डॉक्टरकडे." "हे तर काहीच नाही. माझ्या बायकोच्या डोळ्यात ती निळी साडी भरली तर दीडशे रुपयांचा भुर्दंड बसला" हा त्यातील एक इनोद). त्यातील विनोद वाचल्यावर हसू यावे म्हणून गुदगुल्या करणारा एक माणूस प्रत्येक प्रतीमागे पुरवावा लागत असे. तो खर्च हाताबाहेर गेल्यावर ते साप्ताहिक बंद पडले.

'श्री' साप्ताहिक होते, पण ते चडक-भडक लेखांसाठीच प्रसिद्ध. द्वारका नगरी कशी बांद्र्याच्या पश्चिमेला समुद्राच्या तळाला आहे इथपासून ते ब्लू फिल्म विशेषांक असे त्याचे चटकदार अंक असत.

'रसरंग' नाट्य/चित्रपट सृष्टीला वाहिलेले होते.

अनिल थत्त्यांनी ऐंशीच्या दशकात 'गगनभेदी' काढले पण ती 'श्री' साप्ताहिकाची अजून भ्रष्ट आवृत्ती होती.

त्या तुलनेत 'लोकप्रभा' आपला आब राखून होते. बराच काळ वसुंधरा पेंडसे नाईक त्याच्या संपादक होत्या असे आठवते. आठवण पूर्णतः माझ्या झिजत जाणाऱ्या स्मरणशक्तीवर आधारित आहे.

त्या साप्ताहिकाचा असा तडकाफडकी अंत व्हावा हे दुःखद आहे. ते मासिक शेवटीशेवटी दोन माणसांच्या खांद्यावर होते. विनायक परब संपादक नि त्यांना एक सहायक. सदर लेखकांना मिळणारा मोबदला चणे-फुटाणे श्रेणीतला. डोक्यावरून पाणी म्हणजे महिन्याला एक-सव्वा लाखाचा खर्च. म्हणजे वर्षाला बारा-पंधरा लाख. तेवढे खर्च करणेही एका वृत्तसमूहाला जड जावे हे लक्षणीय आहे.

गेल्या काही काळापासून 'लोकप्रभा'ने जीव वाचवण्यासाठी वाटेल तसे हातपाय मारले. त्यांचे अंक (http://epaper.lokprabha.com/t/293) इथे उपलब्ध आहेत. तिथे बघितले तर ३१ डिसेंबर २०२१चा अंक त्यांनी साक्षात 'भविष्य विशेषांक' म्हणून काढला होता. स्वतःचे भविष्य तेवढे त्यांना कळाले नाही.

एकंदरीतच आंतरजालावरची 'लोकप्रभा'बद्दल माहिती बघितली तर गंमत वाटते. स्वतःच्या वेबसाईटवर आपले साप्ताहिक बंद झाले आहे असे जाहीर करणेही त्यांना जड जात असावे. अजून तिथे ८ एप्रिलचा अंक शेवटचा आहे. १५ एप्रिलचा दिसत नाही. एवढेच कळते.

एक्सप्रेस समूहाच्या वेबसाईटवर (https://expressgroup.indianexpress.com/our-brands.html) बघितले तर लोकप्रभा १९७२ साली सुरू झाले हे कळते. आणि ती नोंद अद्ययावत नाही हेही कळते. तिथल्या माहितीनुसार अजून प्रवीण टोकेकर संपादक आहेत. आणि साप्ताहिक बंद झाल्याची कुठलीच नोंद तिथे नाही.

'लोकप्रभा'चे फेसबुक पेज आहे तिथे बघितले तर अजूनच गंमत. 'लोकप्रभा' बत्तीस वर्षांपूर्वी सुरू झाले अशी तिथली नोंद. म्हणजे ती नोंद २००४ सालची असावी. पण २००४ साली फेसबुक फेब्रुवारीत नुकते सुरू झाले होते. म्हणजे ते सुरू झाल्याझाल्या काही महिन्यांत 'लोकप्रभा'ने आपले फेसबुक पेज सुरू केले असे म्हणावे लागते.

फेसबुकवरचे दोन आकडे बघून गंमत वाटली. १, २५, २८० लोकांनी ते फेसबुक पेज 'लाईक' केले नि १, २४, ९९५ लोकांनी 'फॉलो' केले. पण एवढे साप्ताहिक चालू ठेवण्यासाठी पुरेसे नाही हे कळाले.

शेवटी, कुठलेही साप्ताहिक, पाक्षिक, मासिक वा द्वैमासिक बंद पडणे याचे यथायोग्य दुःख होतेच. पण एक प्रथितयश वृत्तसमूह आपल्या मालकीचे एक साप्ताहिक बंद करतो आणि त्याबद्दल कुठेच काहीच बातमी नाही, खळबळ सोडाच. याचे जास्ती दुःख वाटते.

असो.