महाभारत कथा
धृतराष्ट्र आणि पंडू कुरुकुळाचे भावी राज्यकर्ते होते. पितामह भीष्मांनी त्यांचे संगोपन आणि शिक्षण उत्तम रीतीने केले होते. योग्यसमयी त्या दोघांचे विवाह संपन्न झाले होते. हस्तिनापुरामध्ये सौख्य आणि आनंदाचे वातावरण होते. धृतराष्ट्र पत्नी गांधारी आणि पंडुराजाची पत्नी कुंती या दोघीही प्रबळ राजघराण्यातील राजकन्या होत्या.
महाराणी गांधारीची कथा --
आयुष्यभर अंध पतीला सावलीप्रमाणे साथ देणाऱ्या गांधारीला इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. गांधारी पतिव्रता होती, तिची पतिनिष्ठा अतुलनीय होती हे खरेच. परंतु ती कौरवांची माता होती हेही सत्य आहे. गांधारी हस्तिनापूर साम्राज्याची अभिषिक्त सम्राज्ञी होती परंतु ज्यावेळी कठोर निर्णय घेण्याची, समतोल न्याय देण्याची वेळ आली तेव्हा तिने कर्तव्यापेक्षा स्वपुत्राचे हित अधिक महत्त्वाचे मानले होते. दुर्योधनाची सत्तालालसा आणि बंधू शकुनीची कटकारस्थाने यावर अंकुश ठेवण्याचा गांधारीने अथवा धृतराष्ट्राने कधीही प्रयत्न केलेला नव्हता पण समर्थनच केले होते.
गांधारी, गांधार देशाची राजकन्या होती. (गांधार देश म्हणजे वर्तमान काळातील पाकिस्तानातील पेशावर आणि अफगाणिस्तानातील कंदाहार, जलालाबाद असा प्रदेश ). गांधारीच्या मातापित्यांनी हस्तिनापुराचे राजकुमार धृतराष्ट्र यांना नियोजित वर म्हणून निश्चित केले होते. विवाह हस्तिनापुरामध्ये संपन्न होणार होता म्हणून राजकन्या गांधारी आप्त, दासदासी यांच्या समवेत हस्तिनापुरामध्ये दाखल झाली. गांधारीला तिच्या नियोजित पतीविषयी काही माहिती देण्यात आलेली नव्हती. कर्मधर्म संयोगाने गांधारीसमवेत हस्तिनापुरामध्ये आलेल्या तिच्या सखीने राजपुत्राबद्दल माहिती मिळवली आणि गांधारीला सांगितली. गांधारीवर तो मोठाच आघात होता (गांधारीला माहिती नसले तरी तिच्या माता पिता आणि बंधूंना धृतराष्ट्राच्या अंधत्वाबद्दल माहिती असावी असे दिसते). गांधारीच्या पित्याने नक्कीच काही राजकारण साधण्याकरता असा विवाह संबंध निश्चित केला असावा कारण त्या काळात हस्तिनापूर हे एक बलाढ्य साम्राज्य होते. गांधारीचा तर निरुपायाच होता कारण राजकन्या असली तरी पित्याच्या शब्दाबाहेर जाण्याचे धाडस ती करू शकत नव्हती. आणि हस्तिनापूरच्या राजपुत्राला नकार देणे म्हणजे साम्राज्याशी वैर करण्यासारखे होते ज्यामुळे तिच्या पित्याच्या राज्यावर संकट ओढवणार होते. परिस्थितीचा स्वीकार करणे हा एकच पर्याय तिच्यासाठी उपलब्ध होता.
गांधारीचे स्वभाव वैशिष्ट्य अशा काही प्रसंगातून स्पष्ट दिसून येते. गांधारी तिच्या देशापासून दूर अंतरावर असलेल्या हस्तिनापूर साम्राज्याच्या राजघराण्याची स्नुषा होणार होती. त्या काळाच्या प्रथेनुसार तिचे संपूर्ण आयुष्य आणि भवितव्य तिथेच व्यतीत होणार होते. एका पूर्णपणे परक्या, अनोळखी देशामध्ये तिला वास्तव्य करायचे होते आणि तेसुद्धा जन्मांध असलेल्या पतीसह. परंतु गांधारी घाबरली नाही, विरोध करून तिने मातापित्यांची परिस्थिती बिकट केली नाही. मिळालेले प्राक्तन स्वीकारण्याचा निर्णय तिने घेतला तोही अनोख्या पद्धतीने . धृतराष्ट्र जन्मांध आहे हे समजल्यावर गांधारीने स्वतःच्या डोळ्यावर वस्त्राची चिंधी बांधून अंधत्व स्वीकारले. तिने सांगितले, जे सुख (म्हणजे दृष्टीसौख्य )तिच्या पतीच्या नशिबात नाही, त्या सुखाचा ती सुद्धा त्याग करीत आहे. आणि शेवटपर्यंत तिने त्या व्रताचे निष्ठेने पालन केले होते.
गांधारीचा स्वभाव निश्चयी होता, ती समर्पित वृत्तीची आणि निष्ठावान होती. बालपणापासूनच गांधारी शिवभक्त होती. तिची भक्ती, तिने केलेली सेवा आणि साधना यामुळे भगवान शिवशंभू तिच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला वरदान दिले होते. भगवान शंकरांनी दिलेल्या वरामुळे गांधारी शंभर पुत्रांची माता होणार होती.
विवाहापश्चात गांधारी हस्तिनापुरामध्ये आली सोबत दासदासी आणि सख्यांबरोबरच बंधू शकुनीसुद्धा होता. शकुनीचे हस्तिनापुरातील वास्तव्य आणि तेथील राजकारणावरील प्रभाव याचे कारण काय असावे उमगत नाही.
-- भारतीय हिंदू प्रथेनुसार विवाहित कन्या अथवा भगिनींच्या घरी म्हणजे तिच्या सासरच्या घरी माहेरचे आप्त वास्तव्य करीत नसत, भोजनही घेत नसत. (ही प्रथा अजूनही अस्तित्वात आहे) असे असताना गांधारीचा बंधू हस्तिनापुरामध्ये सतत वास्तव्यास असणे हे आश्चर्यकारक वाटते.
-- गांधारी परक्या देशातून आलेली होती. सोबत कुणी नात्यातले/ओळखीचे असावे म्हणून बंधू शकुनीला हस्तिनापुरामध्ये पाठवले असेल का? (पूर्वी मुलीला सासरी पाठवताना तिच्या सोबत एक पाठराखीण असायची. बालविवाहाची प्रथा असल्याने मुलीचे वय लहान असे. परक्या घरी, परक्या माणसांमध्ये वावरताना तिला अवघड वाटू नये म्हणून एक जबाबदार स्त्री मुलीच्या सोबत राहत असे. पण ती व्यवस्था काही काळापुरतीच असे. पाठराखीण कायम मुलीच्या सासरी राहायची नाही.)
कारण काहीही असेल, परंतु शकुनीचे हस्तिनापुरातील वास्तव्य गांधारीसाठी अजिबात लाभदायक नव्हते. शकुनीमामांच्या अनुचित सल्ल्यांमुळे गांधारीचे शंभर पुत्र, पौत्र, जावई नामशेष झाले ,,, हा इतिहास आहे.
शकुनीमामा जरी गांधारीचे बंधू, कौरवांचे मातुल या नात्याने हस्तिनापुरामध्ये आले असले तरी त्यांचे दरबारात आणि राजकारणामध्येही चांगलेच प्रस्थ असावे. दुर्योधन, दु:शासन आदी कौरव मामांच्या सल्ल्यानुसार वर्तन करीत होते. शकुनीमामांच्या अशा हस्तक्षेपाला दरबारातील अथवा घरातील ज्येष्ठ, अनुभवी सदस्यांनी आक्षेप का घेतला नसेल?
-- शकुनीची कारस्थाने माहिती असूनही त्याला त्याच्या मायदेशी परत का पाठवले गेले नसेल?
-- शकुनीचे कपट द्युतामधले प्रावीण्य माहिती असूनही त्याला कुणीही प्रतिबंध का केला नसेल? दुर्योधनाने युधिष्ठिराला द्युताचे निमंत्रण दिले परंतु त्याच्या समोर स्वतः न जाता शकुनीमामाला पाठवले. यातील धोका कुणाच्याच लक्षात आला नसेल का?
कारण माहिती नसले तरी परिणाम तर सर्वज्ञात आहे --- कौरवांचा समूळ नाश घडून आला.
कुरुकुळाच्या इतिहासात आणखी एक महत्त्वाची स्त्री व्यक्तिरेखा आहे ती म्हणजे कुंती. महाराणी कुंती पंडूराजाची पत्नी आणि पांडवांची माता होती. परंतु तिची ओळख इतकी मर्यादित नाही, तिची कथा फारच आगळीवेगळी आहे.
महाराणी कुंतीदेवीची कथा -
यादव वंशातील राजा शूरसेन यांची कन्या पृथा. (देवयानीचा ज्येष्ठ पुत्र यदु याच्यापासून विस्तारलेला वंश म्हणजे यादव वंश. यादव हे कुरुंचे नातलगच म्हणावे लागतील. श्रीकृष्णाचे पिता असलेले वसुदेव हे कुंतीचे ज्येष्ठ बंधू होते).
राजा शूरसेन यांनी त्यांची कन्या पृथा, महाराज कुंतिभोज यांना दत्तक दिली होती. म्हणून तिचे कुंती असे नामकरण करण्यात आले. कुंती सौंदर्यवती होतीच आणि अनेक उत्तम गुणांनी युक्त होती. लहान वयातदेखील तिच्या स्वभावात अल्लडपणा बिलकूल नव्हता. ती स्वभावाने शांत आणि गंभीर होती.
एकदिवस महाकोपिष्ट दुर्वास ऋषी तिथे आले. महाराज कुंतीभोजांनी त्यांचा यथोचित आदर, सत्कार केला. दुर्वासांनी त्यांच्या आगमनाचे प्रयोजन सांगितले. ते पृथ्वी प्रदक्षिणा करून आलेले होते, त्यांना काहीकाळ तप:साधना करायची होती. कुंतिभोज महाराजांकडे त्यांनी त्याकरता योग्य आश्रमाची मागणी केली. महाराजांनी आनंदाने त्यांची सर्व व्यवस्था केली आणि कुंतीला त्यांची सेवा करण्यासाठी पाठवले.
दुर्वास ऋषी शीघ्रकोपी म्हणून प्रसिद्ध होते. थोडीही चूक किंवा त्यांच्या मनाविरुद्ध घडलेली घटना त्यांना क्रोध येण्यास कारण होऊ शकत असे. दुर्वासऋषींनी कठोर तप करून अनेक सिद्धी प्राप्त केलेल्या होत्या. त्यांनी दिलेला शाप किंवा आशीर्वाद नेहमीच परिणामकारक असे. अशा दुर्वासांची सेवा करणे ही कुंतीची परीक्षाच होती पण ती जबाबदारी कुंतीने उत्तम रितीने निभावली होती.
महाराजांनी दिलेल्या आश्रमात दुर्वासांचे वास्तव्य होते. ते ता:साधना करीत असत. राजकन्या कुंती आणि अन्य काही दासी त्यांची सेवा, शुश्रूषा करीत आणि आश्रमाची देखरेख करीत असत. दुर्वास ऋषींची साधना पूर्ण झाली आणि आता ते प्रस्थान करणार होते. कुंतीने केलेल्या उत्तम सेवेमुळे ते प्रसन्न झाले होते. स्वगृही प्रस्थान करण्याअगोदर त्यांनी कुंतीला एक बीजमंत्र दिला. तो बीजमंत्र म्हणजे कुंतीसाठी वरदानच होते. मात्र त्या मंत्राचे महत्त्व, सामर्थ्य जाणण्याइतके प्रौढ शहाणपण अजूनही षोडषवर्षा कुमारिका असलेल्या कुंतीपाशी नव्हते. मंत्राचा जप करून कुंती ज्या दैवताचे स्मरण करेल तो देव तिथे साक्षात प्रकट होईल आणि त्यांच्यायोगे तिला पुत्रप्राप्ती होईल असे दुर्वास ऋषींनी सांगितले होते.
-- दुर्वासांनी एका अविवाहित कुमारिकेला पुत्रप्राप्तीसाठी इष्टदेवतांना आवाहन करणारा असा मंत्र का दिला असेल? दुर्वासऋषी द्रष्टे होते -- त्यांनी भविष्य जाणले होते का?
महाभारत घडण्याची अनेक कारणे सांगितली जातात. खरे तर महाभारत ही अनेक प्रसंगांची मालिका आहे ज्याची परिणिती युद्धामध्ये झाली. कुंतीला बीजमंत्राची प्राप्ती होण्याची घटना इतिहासाला वळण देणारी ठरली, आणि त्यामुळेच भविष्यात महाभारत घडले असे म्हणता येईल.
दुर्वासांची सेवा करणारी कुंती प्रौढ स्त्री नव्हती तर षोडशवर्षा कुमारिका होती. तिने तिच्या सेवाभावाने दुर्वासांसारख्या कोपिष्ट ऋषींना प्रसन्न केले होते. दुर्वास ऋषी तपस्वी होते, त्यांनी केलेल्या उग्र साधनेने त्यांना अलौकिक असे योगसामर्थ्य प्राप्त झालेले होते. त्यांनी दिलेला मंत्र प्रभावी आणि परिणामकारक होता.
यौवनसुलभ कुतूहलाने कुंतीने त्या मंत्राचा जप केला आणि प्रत्यक्ष सूर्यदेवांना आवाहन केले. कुंतीला पुत्रप्राप्ती झाली, सूर्यदेवांचा तो पुत्र सुंदर आणि तेजस्वी होता. त्याच्या पित्याने त्याला जन्मजात संरक्षक कवचकुंडले दिली होती. दुर्दैवाने कुंतीला पुत्रजन्माचा आनंद साजरा करता येणार नव्हता कारण ती अविवाहित कुमारी होती. नाईलाजाने तिला तिच्या पुत्राचा त्याग करावा लागला होता. कुंती आणि सूर्यदेवाचा तो पुत्र आयुष्यभर सूतपुत्र म्हणून हिणवला गेला. सूर्यदेवांचा पुत्र म्हणजेच दानशूर आणि महापराक्रमी कर्ण.
त्याच बीजमंत्राच्या प्रभावाने पाच पांडवांचाही जन्म झाला होता.
***