महाभारत कथा (७)

महाभारत कथा (७)महाभारत कथेमध्ये काही प्रभावी स्त्री व्यक्तिरेखा आहे. अनेक संकटांना त्या धैर्याने सामोऱ्या जातात, राजकुळातील स्त्रिया असूनही ऐश्वर्यसंपन्न आयुष्य जगणे त्यांच्या नशिबात नव्हते. त्या स्त्रिया राजवाड्यामध्ये राहूनही व्रतस्थ आयुष्य जगतात. सत्यवती, कुंती, द्रौपदी, गांधारी या महाभारत कथेतील विशेष उल्लेखनीय स्त्रिया आहेत. प्राचीन काळातील या स्त्रियांचा इतिहासावर प्रभाव दिसून येतो. महत्त्वाचे निर्णय घेण्यास त्या सक्षम आणि स्वतंत्र असल्याचे दिसते. या सर्वजणी दुःख, कष्ट , मानहानी आणि संकटांचा सामना करतात. त्यांचे अस्तित्व लक्षणीय आहे आणि म्हणूनच यांच्याशिवाय महाभारत कथा अपूर्ण आहे.

भारतामध्ये पूर्वापार पितृसत्ताक पद्धती अस्तित्वात आहे. दक्षिणेकडील एखाद्या प्रदेशात मातृसत्ताक पद्धती आहे पण तो अपवादच समजला पाहिजे. संपत्तीचा, सत्तेचा वारस म्हणून पुत्र असायला पाहिजे. कुटुंबाच्या चालीरीती, लौकिक इत्यादी राखण्यासाठी पुत्र असायला हवा. घरातील मंगल कार्ये, श्राद्धकर्मे आणि इतर क्रियाकर्म करण्यासाठी पुत्र असणे जरुरीचे आहे. प्राचीन समाजात अशीही समजूत रूढ होती (अजूनही आहे) की चितेला अग्नी देण्यासाठी पुत्र नसेल तर मृताच्या आत्म्याला मुक्ती मिळत नाही. एकूण काय पुत्र असणे इहलोकी आणि परलोकी ... अती महत्त्वाचे. काही कथांमध्ये पुत्रकामेष्टी यज्ञाचा उल्लेख आहे. अपत्य प्राप्तीकरता नाही तर पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केला जाई. अनेक पुत्रांची जन्मदात्री असलेल्या स्त्रीस समाजात मानाचे स्थान दिले जात असे.

महाभारतामध्ये काही स्त्री व्यक्तिरेखा आहेत ज्या केवळ सौंदर्यासाठीच नाही तर बुद्धिमता आणि कर्तृत्वासाठीसुद्धा ओळखल्या जातात. काही प्रसंगी अशा स्त्रियांमुळे इतिहासाला कलाटणी मिळालेली आहे. परंतु ते निव्वळ अपवाद असावेत कारण समाजात स्त्रियांचे स्थान नेहमी दुय्यमच होते. कर्तृत्ववान, बुद्धिमान असली तरीही स्त्रीने पिता, बंधू, पती आणि नंतर पुत्राच्या आज्ञेतच राहणे अपेक्षित होते. स्त्रियांना विद्या संपादन करण्याचा अधिकार नव्हता. पौराणिक कथांमध्ये स्त्रियांनी युद्धामध्ये सहभाग घेतल्याचे उल्लेख आहेत. सर्व हिंदुधर्मीयांना पूजनीय असलेली दुर्गादेवी रणरागिणीच्या स्वरूपातच पूजिली जाते. इतिहासातदेखील स्त्रियांना शस्त्र विद्या अवगत होती आणि त्यांनी रणांगणावर धैर्याने शत्रूवर मात केल्याचे काही उल्लेख आहेत पण ते अगदीच अपवादात्मक.

कुरुकुलामधील स्त्रियांची व्यक्तिमत्त्वे मात्र विलक्षण प्रभावशाली दिसतात. महाराणी सत्यवती हिने महाराज शंतनूंच्या पश्चात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेले दिसतात. विशेष म्हणजे तिचे दोघेही पुत्र आणि स्वतः राजपुत्र देवव्रत (भीष्म) तिचे निर्णय प्रमाण मानतात. महाराज शंतनूंच्या निधनानंतर सत्यवतीचा ज्येष्ठ पुत्र चित्रांगद याला राज्याभिषेक करण्यात आला होता. दुर्दैवाने एका युद्धप्रसंगी रणांगणावर चित्रांगदाचा मृत्यू झाला होता. सत्यवतीचा द्वितीयपुत्र विचित्रवीर्याचे देखील कसल्याशा आजाराने अकस्मित निधन झाले होते आणि आता हस्तिनापूरच्या सिंहासन रिकामे होते. त्यावर अधिकार सांगण्यासाठी राजघराण्यामध्ये कुणी वारस नव्हता कारण सत्यवतीचे दोन्ही पुत्र निपुत्रिक होते. राजकुमारी अंबिका आणि अंबालिका निपुत्रिक असतानाच विधवा झालेल्या होत्या.

या वेळेपर्यंत कुरुंचा वंश जवळपास संपुष्टातच आला होता असेच म्हणावे लागेल. पितामह भीष्म हे खरे तर कुरुकुळातील शेवटचे वंशज म्हणता येतील, पण इतिहास तसे म्हणत नाही. अंबिका आणि अंबालिका या कुरुकुळाच्या स्नुषा होत्या आणि म्हणून त्यांचे पुत्रसुद्धा कुरुकुळाचे वंशज म्हणूनच ओळखले जाणार होते. परंतु दोघींना निपुत्रिक असतानाच वैधव्य प्राप्त झाले होते.

अशा परिस्थितीमध्ये राजमाता सत्यवतीने योग्य आणि रीतीला अनुसरून निर्णय घेतला होता. तिने भीष्मांना विनंती केली, की एखाद्या सुशील, राजवंशीय कन्येचा पत्नी म्हणून स्वीकार करावा आणि सिंहासनावर आधिपत्य स्थापन करावे. भीष्मांनी त्या विनंतीस नकार दिला, स्वर्गस्थ देवतांच्या साक्षीने त्यांनी सिंहासनावरील हक्काचा त्याग केला होता आणि ब्रह्मचर्य स्वीकारले होते. ते त्यांच्या प्रतिज्ञेचा भंग करणार नव्हते. भीष्मांनी विवाहास नकार दिला आणि सिंहासनदेखील नाकारले होते म्हणून तिने सुचवले, भीष्माने तिच्या दोघी स्नुषांना नियोगाद्वारे संतान द्यावे. परंतु ती विनंतीसुद्धा भीष्मांनी नाकारली होती.

प्राचीन काळातील 'नियोगाद्वारे अपत्यप्राप्ती' ही एक अनोखी प्रथा होती जी कालपरत्वे संपुष्टात आली. घराण्याला वारस हवा, पुत्रजन्म आवश्यक होता. धार्मिक, सामाजिक आणि आर्थिक जबाबदारी निभावणे हे पुत्रकर्तव्य होते. स्त्री वांझ असेल किंवा पुत्र प्रसविण्यास असमर्थ असेल (तिने केवळ कन्यांना जन्म दिलेला असेल) तर पुरुष द्वितीय विवाह करीत असे. बहुपत्नीत्व ही त्या काळात समाजमान्य असलेली रीत होती. परंतु पुरुष पुत्रप्राप्तीकरता असमर्थ असेल तर तो स्वतः त्याच्या पत्नीस अन्य पुरुषांकडून पुत्रप्राप्ती करण्याची अनुज्ञा देत असे आणि अशा नियोगातून जन्मलेल्या संततीचे पितृत्व स्वीकारीत असे. पुत्रजन्माआधीच पतीनिधन झाल्यास, घरातील ज्येष्ठांच्या संमतीने आणि सहकार्याने ती विधवा स्त्री अन्य पुरुषाकडून पुत्रप्राप्ती करू शकत असे. अशा रीतीने आपत्यप्राप्ती करून घेण्याच्या पद्धतीला 'नियोग पद्धती' असे संबोधन होते. नियोगाद्वारे जन्मलेली अपत्ये ही त्या स्त्रीच्या पतीची अपत्ये समजली जात आणि त्यांना घरातील सर्व वारसा हक्क मिळत असत. सत्यवतीने नियोगपद्धतीने राजसिंहासनाला वारस मिळावा असा निर्णय घेतला होता.

राजमाता सत्यवतीने पराशरपुत्र व्यासांचे स्मरण केले. राजसिंहासनाला वारस देण्याकरता त्यांचे सहकार्य घेणे तिला इष्ट वाटले होते. महर्षी व्यास हे सत्यवती आणि पराशर ऋषी यांचे पुत्र, त्यांनी तिला वचन दिले होते, संकटकाळी स्मरण केल्यास ते तिच्या मदतीसाठी जरूर येतील. तिने मनोमन तिच्या ज्येष्ठपुत्राचे स्मरण केले आणि तिला दिलेल्या वचनानुसार महर्षी व्यासांचे तिथे आगमन देखील झाले होते.

सत्यवतीने व्यासमहर्षींना उद्भवलेल्या गृहसंकटाविषयी सर्व कथन केले आणि विनंती केली की त्यांनी तिच्या राज्याला वारस द्यावा, व्यासांनी तिची विनंती मान्य केली. अंबिका आणि अंबालिका या दोघींनाही पुत्रप्राप्ती झाली. दुर्दैवाने दोन पुत्रापैकी एक जन्मांध होता आणि दुसरा अशक्त आणि आजारी होता. सत्यवती निराश झाली. सिंहासनाचा वारस अव्यंग, निरोगी आणि सक्षम असायला हवा होता. तिने तिच्या सुनांना परत एकदा व्यासांकडे जाण्याची आज्ञा दिली, परंतु यावेळी दोघींनी संगनमताने एका दासीला त्यांच्याकडे जाण्यास सांगितले. तिसरा पुत्र अव्यंग आणि निरोगी होता परंतु तो दासीपुत्र होता त्यामुळे तो राज्याचा वारस होऊ शकत नव्हता.

जन्मांध धृतराष्ट्र आणि अशक्त, रोगग्रस्त पंडु हे दोघेजण आता कुरुसाम्राज्याचे वारस होते. विदुर दासीपुत्र होता आणि त्या तिघांचे पालनपोषण, संरक्षण करणार होते गंगापुत्र भीष्म.

राजपुत्र धृतराष्ट्र, राजपुत्र पंडू आणि दासीपुत्र विदुर पितामह भीष्मांच्या छत्रछायेखाली राहत होते. त्यांच्या शिक्षणाची, जडणघडणीची जबाबदारी भीष्मांनी उत्तम रीतीने सांभाळली होती. धृतराष्ट्र जन्मांध असूनही त्यांना राज्यकारभाराचे उत्तम प्रशिक्षण दिले गेले. पंडू राजनीती बरोबर युद्धकलेमध्ये सुद्धा प्रवीण होते, उत्तम सेनानी होते. पंडू कनिष्ठ बंधू असूनही त्यांनाच राज्याभिषेक करण्यात आला होता कारण जन्मांध धृतराष्ट्र राज्यकारभाराची जबाबदारी स्वीकारण्यास असमर्थ होते.

महाभारतामध्ये दासीपुत्र विदुर ही एक अनोखी आणि अतिशय महत्वाची व्यक्तिरेखा आहे. अशीही कथा सांगितली जाते की विदुर म्हणजे प्रत्यक्ष यमधर्माचा अवतार होते. विद्वान आणि राजनीतीतज्ञ असलेले विदुर खरेतर सिंहासनासाठी योग्य वारस होते, परंतु दासीपुत्र असल्याने ते अधिकारापासून वंचित राहिले होते. विद्यासंपन्न, न्याय-नीतीतज्ञ असलेल्या विदुरांचा ओढा अनाथ असलेल्या पांडवांकडे अधिक होता. दुर्योधनाच्या कपटी कारस्थानातून निसटण्यासाठी त्यांनी वेळोवेळी पांडवांची मदत केली होती. असे असले तरीही ते धृतराष्ट्र आणि हस्तिनापूरच्या सिहासनाशी शेवटपर्यंत एकनिष्ठ होते, त्यांनी कधीही उघडपणे पांडवांना पाठिंबा दिला नाही आणि युद्धकाळात देखील त्यांनी कौरवांच्या विरोधात जाऊन पांडवांचे समर्थन केले नाही.

धृतराष्ट्र आणि पंडू हे दोघे राजपुत्र आता विवाहायोग्य झाले होते, पितामह भीष्मांनी त्यांच्या विवाहाकरता योजना आखली होती.

महाराज कुंतिभोजांनी त्यांची दत्तककन्या कुंतीसाठी स्वयंवर आयोजित केले होते. देशोदेशींचे राजे, राजपुत्र स्वयंवरासाठी आलेले होते. कुंतीने पंडुराजाच्या गळ्यात वरमाला घातली. राजकुमारी कुंती आता हस्तिनापुराची महाराणी होती. धृतराष्ट्राचा विवाह दूरदेशीच्या राजकुमारीबरोबर योजण्यात आला होता. गांधार देशाची राजकुमारी गांधारी त्याची नियोजित वधू होती.

हस्तिनापूर साम्राज्याला पुन्हा एकदा स्थैर्य लाभले होते. सिंहासनावर पंडूराजा विराजमान होता, धृतराष्ट्र आणि विद्वान, राजनीतिज्ञ विदुर त्याच्या साहाय्यार्थ होते, पितामह भीष्म यांचे मार्गदर्शन होते. साम्राज्याचा विस्तार होत होता आणि राज्यामध्ये सुख आणि समृद्धी होती.

***