मुद्रिका-रहस्य - ३

मुद्रिका-रहस्य - ३


शकुंतलेशी झालेलं संभाषण चतुराक्षाला सांगून धुंडिराज म्हणाला, "हे बघ, या घटनेचं सर्व बाजूंनी संशोधन केलं पाहिजे. तू नीघ आणि राजप्रासादावर जाऊन काही महिन्यांपूर्वी महाराज दुष्यंत कण्वांच्या आश्रमात गेले होते की नाही याच्या सत्यासत्यतेचा शोध घे.


"जशी आज्ञा" असे म्हणून चतुराक्ष निघून गेला.


चतुराक्षानं रथ जोडला आणि राजप्रासादाकडे प्रयाण केलं. राजाच्या सारथ्याचा आणि त्याचा नमस्कार-चमत्कार करण्याइतपत परिचय होताच.  राजाचा सारथी त्यावेळी रथावर आरूढ होऊन तांबूल चर्वण करीत होता. चतुराक्षानं त्याच्याजवळ आपला रथ थांबवला आणि सहजच विचारलं "काय मित्रा, इथंच आहेस? कुठं गेला नाहीस?"


"कुठं जाणार?" आम्ही पडलो राजाचे अनुगामी, त्याला जिथं जावंसं वाटेल तिथेच जाणार."


"ते ठीक आहे रे, पण राजाला तू नेहमी शिकारीसाठीच नेतोस. कधी ऋषींच्या आश्रमापर्यंतही फिरवून आण."


"का? काय झालं?"


"काल काही साधू निष्कारण राजाविरुध्द्ध बडबडत होते की तो नेहमी शिकारींनाच जातो. कधी संतमुनींच्या दर्शनाला जात नाही."


"हे साफ खोटं आहे! महाराज नेहमी साधूंच्या आश्रमात जातात. सिद्धयोगींच्या मठात तर दर पंधरा दिवसातून एकदा तरी ते जातातच."


"सिद्धयोगींचा मठ? कुठे आहे तो?"


"कण्व ऋषींच्या आश्रमाच्या मार्गावरच आहे. तीन-चार महिन्यांपूर्वी महाराज कण्वऋषींच्या आश्रमातही गेले होते पण त्यावेळी ऋषी तिथे नव्हते. महाराज काही प्रहर तिथे थांबले आणि नंतर निघाले. रात्र झाली होती. परतीच्या वेळी आम्हाला सिद्धयोगी आश्रमात थांबावं लागलं. महाराजांना तो आश्रम आवडला. तेव्हापासून ते नेहमी तिथे जातात. साफ खोटं बोलतात हे साधू!"


"हो न. खोटारडे नुसते!" असं काही तरी म्हणत चतुराक्षानं रथ पुढे काढला आणि उगीचच जरा इकडेतिकडे चक्कर मारून तो घरी गेला.


दुष्यंत प्रत्यक्ष कण्वऋषींच्या आश्रमात गेला होता हे एकदा निश्चित झाल्यावर शकुंतलेच्या वक्तव्याबद्दल धुंडिराजाच्या मनात कसलीही शंका उरली नाही. तरी त्यानं विचार केला की कण्वांच्या आश्रमात एखादी चक्कर मारून येणं निष्फळ ठरणार नाही. तिथे काही धागेदोरे सापडण्याचीही शक्यता आहे. नाहीतरी शकुंतलेला पाहिल्यापासून धुंडिराजाची कण्वाश्रमात जायची इच्छा होतीच. तेव्हा तो सत्वर कण्वाश्रमाकडे निघाला. चतुराक्ष रथ चालवत होता.


रथ आश्रमाच्या बाहेर थांबवून धुंडिराज आत गेला. दुपारची वेळ होती. काही आश्रमकन्या आश्रमाच्या प्रवेशद्वाराजवळच वेलींना पाणी देत होत्या आणि मोठ्या तोऱ्यात आपापसात बोलत होत्या. ही ह्या मुलींची नेहमीची सवय आहे. दूरवरून आश्रमात येणारा कोणी पुरुष दिसला की झाडांना पाणी देण्याच्या निमित्तानं द्वाराजवळ यायचं आणि असे काही अविर्भाव चेहेऱ्यावर ठेवायचे की जणू काही त्याला बघितलंच नाही! धुंडिराज काही क्षण त्यांना न्याहाळत राहिला आणि मग पुढे गेला.


"हे सुंदर तरुणींनो, कण्व मुनींचा आश्रम हाच काय?"


"ह्या भयानक जंगलात दुसऱ्या कुणाचा असणार?" प्रियंवदा नावाची आश्रमकन्या शास्त्रशुद्ध रीतीनं नेत्रकटाक्ष टाकीत म्हणाली "महाराज आपण कोण?"


"मी धुंडिराज, कण्व मुनींना भेटायला आलोय."


"आपण धुंडिराऽऽऽऽऽऽज!!! आपल्याबद्दल खूप ऐकलंय! चला, चला तिकडे लताकुंजात जाऊया, विहार करू या." प्रियंवदेने आपला घडा एकीकडे फेकला आणि ती जवळ आली.


"मला आता गांधर्वविवाहाला वेळ नाही." धुंडिराज म्हणाला.


"गांधर्वविवाह नसेना का! दुसरा कुठलाही प्रकार चालेल. चला तर आपला राक्षसविवाहावर विश्वास आहे का? कन्येच्या मर्जीचाही विचार केला नाही आणि जबरदस्तीनं ..."


"नाही नाही. मी इथं ऋषींना भेटायला आलो आहे."


"असं असेल तर प्रतीक्षा करावी लागेल. ऋषी बाहेर गेलेत."


"हे तुमचे कण्व ऋषी सारखे बाहेरच असतात का? राजा दुष्यंत आला होता तेव्हाही ते बाहेरच होते."


"शकुंतलेच्या सुदैवानं! नाही तर तो म्हातारा आम्हाला कुणालाच भेटू देत नाही."


"सुदैव की दुर्दैव? तुम्हाला माहीत नाही, दुष्यंतानं तिला स्वीकारलं नाही?"


"अरे दुष्यंत नाही, त्याचा बाप स्वीकारेल. शकुंतला त्याला फाडून खाईल. कण्वऋषींच्या आश्रमातली मुलगी आहे ती! काय चेष्टा वाटली काय? दुष्यंतासारखे कित्येक आले, गांधर्वविवाह करून नंतर नाकारणारे. पण कोणी सुटलं नाही. एकदा गळ्यात पडली की आयुष्यभर सोडणार नाही. दुष्यंत समजतो कोण स्वत:ला?"


धुंडिराज मुलींचे चेहरे न्याहाळू लागला. भगव्या, पिवळ्या रंगाची वस्त्रे परिधान केलेल्या, कानात कुंडलं धारण केलेल्या, यौवनानं रसरसलेल्या त्या मुली भोवती उभ्या होत्या. त्यांना बघितल्यावर एकदा त्यांच्याशी विवाह करून त्यांची पीडा टाळता येईल असा विचार करणं मूर्खपणाचं होतं.


इतक्यात कण्वमुनी येताना दिसले. सगळ्या मुली इकडे तिकडे पळाल्या आणि जागा सापडेल तिथे लपल्या.


कण्व प्रौढ, अनुभवी ऋषी होते. वीस पंचवीस वर्षे आश्रम चालवत होते आणि बराच पैसा मिळवत होते. ज्ञानदानाच्या मोबदल्यात शिष्यांकडून जवळपासच्या जंगलातली लाकडं तोडून आणणं, शेती करणं, गुरं राखणं, भाजीपाला काढणं अशासारखी कामं करून घेत होते. जमीन आश्रमाच्या नावची फुकट, कष्टही फुकटात मिळायचे. वर्षाकाठी बराच पैसा जमायचा. राजाकडून आणि श्रीमंत लोकांकडून धन मिळायचं.


जेव्हा धुंडिराजानं, तो ज्यासाठी आश्रमात आला होता, ते बोलणं कण्वांशी सुरू केलं तेव्हा कण्वांनी लगेच आपलं म्हणणं सांगायला सुरुवात केली. "काय सांगायचं? वर्षात अशी एकदोन प्रकरणं आश्रमात होतातच. तुम्हीच सांगा मी काय करणार? अष्टौप्रहर यांच्यावर पहारा ठेवणार? शहरातली वाह्यात मुलं आश्रमाभोवती घिरट्या घालतात, मुलींना खाणाखुणा करतात. आजच्या काळात शांततेनं आश्रम चालवणंही कठीण होऊन बसलंय. दुसऱ्या कुणाला कशाला बोल लावायचा? खुद्द राजा दुष्यंताचीच गोष्ट घ्या. इथं आला आणि त्या मुलीबरोबर-- काय नाव बरं तिचं?"


"शकुंतला"











क्रमश: