मुद्रिका-रहस्य - ६

मुद्रिका-रहस्य - ६


पंचमीच्या दिवशी राजाचा वेष धारण केलेला धुंडिराज आपला रथ घेऊन पहाटेच सिद्धयोगी आश्रमाकडे निघाला. बरोबर सारथी नव्हता. वाटेवर चतुराक्ष सारथ्याचा वेष करून उभा होताच. त्यानं आपलं स्थान ग्रहण केलं आणि थोड्याच वेळात ते मठात पोहोचले. मठात सिद्धयोगी अजून आलेले नव्हते. धुंडिराज याच संधीची वाट पहात होता. तो आत गेला आणि आता रहस्याच्या तळापर्यंत पोहोचण्यासाठी काय करावं याचा विचार करत असतानाच शेजारच्या दालनातून मायाचा स्वर ऐकू आला, "काय धुंडिराज, कसं काय चाललंय?"


दुष्यंताचं रूप घेतलेल्या धुंडिराजाचा चेहरा पांढरा फटक पडला. 'म्हणजे ह्या स्त्रीला आपलं रहस्य माहीत आहे तर! असो. आता एकदा उखळात डोकं घातलंय, पडतील तितके घाव सोसले पाहिजेत. प्रथम या स्त्रीचा समाचार घ्यावा.'  असा विचार करून तो मोठ्या धाडसानं शेजारच्या दालनात शिरला.


"अरे, तू केव्हा आलास?" माया एका काळ्या बोक्याला गोंजारत धुंडिराजाला म्हणाली.


"हा आत्ताच येतोय."


मायानं तेवढ्यात त्या बोक्याला सोडलं आणि म्हणाली, "जा धुंडिराज, मठातले उंदीर पकड."


दुष्यंताचं रूप घेतलेल्या धुंडिराजाच्या जिवात जीव आला. ह्या चोरांनी आपल्या मांजराचं नाव धुंडिराज ठेवलं काय! म्हणूनच आपल्याला त्या दिवशी आपलं बिंग फुटण्याची भीती वाटत होती. 


"तू तर खरोखरीचा राजा वाटतोयस!" माया म्हणाली.


"हा राजयोग किती दिवस टिकणार कुणास ठाऊक?"


"अरे, तुला शंका वाटते? कमाल आहे! अजून चार दिवसांनी देवीला राजा दुष्यंताचा बळी दिला जाईल. मग तूच राजा! कुणाला समजणार पण नाही."


"राजा दुष्यंत..!" असं म्हणून धुंडिराज हसला.


"दिवसभर पडल्या पडल्या 'शकुंतले, शकुंतले' असं ओरडत असतो. त्या मूर्खाला एवढंही माहीत नाही की मृत्यूची तलवार त्याच्या डोक्यावर लटकतेय."


"चल, त्याला बघू या."


"चल. सिद्धयोगी यायला अजून अवकाश आहे." मायानं किल्ली घेतली आणि दरवाजा उघडला. दुष्यंताचं रूप घेतलेला धुंडिराज मायेच्या पाठोपाठ काही अंधाऱ्या पायऱ्या उतरला आणि एक लांबलचक बोळ पार करून कैद्याला जिथं बांधलं होतं त्या खोलीजवळ ते दोघे आले.


"काय महाराज दुष्यंत? काय म्हणताय?" मायाने कैद्यावर हलकासा लत्ताप्रहार करीत म्हटले. तेवढ्यात तिला जाणवले की आपल्या पाठीला कट्यार टोचतेय आणि बरोबर आलेल्या दुष्यंतानं आपलं तोंड दाबून ठेवलंय. धुंडिराजानं मायाचे हात पाय बांधले आणि तिला एका कोपऱ्यात लोटून  दिलं. नंतर राजाची बंधनं सोडवत त्याला म्हणाला, "महाराज, मी धुंडिराज. आपण काही चिंता करू नका. मी आपल्याला सोडवायला आलोय." 


धुंडिराजाच्या साहसकथामालेतील "मुद्रिकारहस्य अर्थात शाकुंतलाची खरी कथा" नामक सोळाव्या पुष्पाचा अंतिम भाग त्या मालेतील इतर कथांप्रमाणेच सुखान्त होता. धुंडिराज व चतुराक्ष यांनी सिद्धयोगींच्या आश्रमातून खऱ्या राजाला घेऊन पळणं, राजाच्या सैनिकांनी मठाला वेढा घालणं, त्रिशूळ व तलवारी यांतील युद्ध, रक्तपात, धरपकड, देहान्ताची शिक्षा आणि शेवटी राजानं केलेलं सत्य घटनेचं रहस्योद्घाटन- जेव्हा राजा पहिल्यांदा शकुंतलेला भेटला व नगरात परतताना सिद्धयोगी मठात राहिला त्याचवेळी सिद्धयोगींनी त्याला कैद केलं आणि हळू हळू राजाचा खजिना लुटता यावा या उद्देशानं आपल्या शिष्याला दुष्यंत बनवून पाठवलं.


आणि शेवटी एक छोटीशी घटना :


राजाकडून प्रशंसा मिळवून जेव्हा आपला प्रिय गुप्तहेर धुंडिराज निवासस्थानी पोहोचला त्यावेळी त्याच्या प्रिय सेवकानं - चतुराक्षानं येऊन सांगितलं "स्वामी, वल्कलं धारण केलेली, कण्वाश्रमातून आलेली आणि आपलं नाव प्रियंवदा सांगणारी तरुणी आपल्या शयनकक्षात आपली प्रतीक्षा करीत आहे. तिचं म्हणणं आहे की ती आपली पत्नी आहे, कारण कण्व आश्रमात तिचा आपल्याशी गांधर्वविवाह झाला आहे."


हे ऐकून आपल्या नायकावर काय बेतलं असेल याची कल्पना करण्याचं कार्य वाचकांवर सोपवून अभिज्ञानशाकुंतलाच्या तोडीस तोड पदपथावर उभा असलेला तत्कालीन "बेस्ट सेलर" मुद्रिकारहस्य समाप्त झाला. 











समाप्त