मुद्रिका रहस्य - २

मुद्रिका रहस्य - २


रमणीय पहाट होती. ब्राह्मण पवित्र नद्यांमध्ये स्नान आटोपून नित्यनेमानुसार भिक्षा मागण्यासाठी निघाले होते. क्षत्रिय लोक आपल्या तलवारी आणखी धारदार बनवत होते आणि वैश्य आपल्या तराजूचा तोल घालवत होते. शूद्र जनता शासनाला दूषणं देत सफाईच्या कामात गुंतली होती. रात्रीच्या श्रमामुळे थकलेले चोर-दरोडेखोर तेवढेच डाराडूर झोपले होते. अशा वेळी चतुरांचा शिरोमणी गुप्तहेर धुंडिराज नित्यानुसार प्रात:कर्मं आटोपून आपल्या दालनात प्रविष्ट झाला होता. अंगावर रेशमी वस्त्र, गळ्यात धवल फुलांची माला आणि पुष्ट भुजांमध्ये कंकण अशा रूपातील धुंडिराज असा काही सुंदर दिसत होता की जणू इंद्र आणि कामदेवाचा एकत्रित अवतार!


कोमल धवल आसनावर विराजमान होताक्षणीच धुंडिराजाने आपला प्रिय सखा चतुराक्ष यास पाचारण केले आणि म्हणाला "चतुराक्षा, कालच्या दिवसात नगरामध्ये काय विशेष घटना घडल्या ते कथन कर बरे."


चतुराक्ष उतावीळ झाला होताच. तो हात जोडून म्हणाला, "स्वामी, काल महाराज दुष्यंतांच्या दरबारात एक विचित्र घटना घडली."


"काय ते लवकर सांग! मी ऐकण्यासाठी अगदी उत्सुक झालो आहे."


"कण्व ऋषींच्या आश्रमात वाढलेली शकुंतला नावाची एक तरुणी काही गोसावड्यांच्या समवेत दरबारात आली आणि राजांना म्हणाली की आपण माझे पती आहात, तेव्हा माझा स्वीकार करा."


"ते कसं काय?"


"ती म्हणत होती, आपण कण्वाश्रमात येऊन माझ्याशी गांधर्वविवाह केला आहे."


"त्यावर राजा काय उत्तरला?"


"राजा म्हणाला, देवी, गांधर्वविवाहाची हूल चांगली उठवलीस! मी तर प्रथमच तुला पहातोय. तू कोण आहेस?"


"पुढं काय झालं?"


"तेव्हा ती रूपगर्विता आश्चर्यचकित होऊन आपल्या नशीबाला दोष देत आक्रोश करू लागली - हाय दैवा, बघा बघा, आज माझा पतीच माझ्याकडे पाठ फिरवत आहे."


"राजानं त्या युवतीला काही पुरावा मागितला नाही?"


"मागितला तर! पण शकुंतला म्हणाली की माझ्या पोटातील गर्भ हाच आता पुरावा आहे, कारण आपण जी अंगठी दिली होतीत ती हरवली."


"गर्भ हा काही पुरावा होत नाही."


"हेच तर राजाही म्हणाला"


धुंडिराज आणि चतुराक्ष आपापसात चर्चा करत असतानाच सेवकानं येऊन सांगितलं की वल्कलं परिधान केलेली एक युवती आपल्याला भेटू इच्छिते.


"चतुराक्षा, आपण जिची चर्चा करत होतो तीच आली असावी असं वाटतंय. तिच्याकडूनच उर्वरित कथा ऐकतो. आता तू राजा काय करतोय आणि नगरात काय वार्ता पसरली आहे याच्या शोधात रहा."  


तदनंतर धुंडिराजानं सेवकाला आज्ञा केली की त्या तरुणीला दालनात बोलवावं आणि आसन द्यावं.


शकुंतलेनं प्रवेश केला आणि नमस्कार करून ती आसनस्थ झाली. धुंडिराज शकुंतलेचं सौदर्य पाहून दिपून गेला. त्याच्या मनात विचार आला की कण्व ऋषींच्या आश्रमात जर असा माल भरलेला असेल तर एकदा तिथे जायलाच हवं.


"आपण आश्रमवासिनी दिसता!" धुंडिराज शकुंतलेला म्हणाला.


"मी ऐकलं होतं त्याप्रमाणे आपण खरोखरच चाणाक्ष आहात! आपण कसं ओळखलंत की मी आश्रमवासिनी आहे?"


"फारसं अवघड नाही. वल्कलं नेसण्याची आणि कानात कुंडलं घालण्याची आवड आता शहरी स्त्रियांमध्ये राहिलेली नाही परंतु आश्रमवासी स्त्रियांत आणि भिल्लिणींमध्ये मात्र अजून ही प्रथा टिकून आहे. त्यावरून मी ओळखलं."


"वा!"


"आपण दक्षिणेकडून आला आहात!"


"हो, पण आपण कसे जाणलेत?" 


"काहीच कठीण नाही. ह्या ऋतूत वायुची दिशा दक्षिणेकडून उत्तरेकडे आहे आणि आपले केस उडून आपल्या कपोलांवर आणि भालप्रदेशावर स्थिरावले आहेत... आपण चिंतातुर दिसता?"


"आपलं म्हणणं बरोबर आहे. माझ्या चिंतेमुळेच मी आपले साहाय्य मागण्यासाठी आले आहे."


"निर्भयपणे सत्य काय ते मला सांगा."


"माझं नाव शकुंतला. मी कण्व ऋषींच्या आश्रमात....."


"माता-पिता?"


"माता मेनका- इंद्राच्या दरबारात नाचते. पिता ऋषी विश्वामित्र. जेव्हा ते तपश्चर्या करत होते त्यावेळी इंद्रानं माझ्या मातेला.."


"हं हं, ते प्रकरण! मी ऐकलंय त्याच्याबद्दल. त्या मेनकेच्या का तुम्ही सुकन्या? तुमच्या आईचा बराच बोलबाला आहे! असो. तुमच्याबद्दल बोला."


"कण्व ऋषींच्या आश्रमात मी वाढले. काही दिवसांपूर्वी राजा दुष्यंतांचं आश्रमात आगमन झालं. त्यांनी गांधर्वविवाहाचा प्रस्ताव मांडला. कण्व ऋषी आश्रमात नव्हते आणि प्रतीक्षा करण्यासाठी वेळ नव्हता. तेव्हा मी ती मागणी मान्य केली."


"या वयात बहुधा असं होतं."


"काही का असेना, आमचा विवाह झाला. पण काल मी कण्वाश्रमातून निरोप घेऊन निघाले आणि इथे आले तेव्हा राजा दुष्यंतांनी मला ओळखलं नाही."


"तुम्ही आठवण करून दिली नाही? हे राजे लोक प्रवासात कुठे कुठे विवाह करतात आणि राजधानीत येऊन विसरून जातात. पण तुमच्या सारख्या सुंदरीला एकदा पाहून कोणी विसरू शकेल यावर विश्वास बसत नाही"


"नुसतं बघितलं नाही तर मी त्यांची विवाहिता आहे आणि त्यांच्या होणाऱ्या अपत्याची माता."


"मोठा बिकट प्रसंग आहे. तुमच्या जवळ काही पुरावा?"


"राजांनी एक अंगठी दिली होती पण ती हरवली."


काही वेळ शांतपणे विचार केल्यावर धुंडिराज म्हणाला, "बोला, मी तुम्हाला काय मदत करू?"


"आपण मोठे गुप्तहेर आहात. अनेक गुंतागुंतीचे अवघड प्रश्न आपण सोडवले आहेत. कण्वांच्या आश्रमातील मुले वेदपाठ सोडून आपल्याच कथा सांगत असतात. राजा दुष्यंत मला का विसरले आहेत याचं रहस्य जर आपण शोधून काढलंत आणि कसंही करून मला या संकटातून बाहेर काढून राणी बनवलंत तर आपण मागाल तेवढं धन मी आपल्याला देईन."


धुंडिराजानं या बाबतीत पूर्ण कार्रवाई करण्याचं आश्वासन देऊन शकुंतलेला निरोप दिला.


"ही भानगड काही समजत नाही. शकुंतलेचं म्हणणं खरं आहे की ती राजाला अडकविण्यासाठी काही बायकी डावपेच लढवतेय? जर असं असेल तर यात हात कुणाचा? कण्व ऋषींचा तर नसेल? दुष्यंताला शकुंतलेचं स्मरण का होत नाही? तो खरोखरच विसरलाय का नाटक करतोय? दुष्यंत आश्रमात ज्या शकुंतलेला भेटला ती ही शकुंतला नव्हेच का? का हा तो दुष्यंत नाही? मग कण्व ऋषींच्या अनुपस्थितीत दुष्यंत राजाचं रूप घेऊन जाणारी आणि शकुंतलेचं कौमार्य भंग करणारी व्यक्ती कोण? पण त्यानं तर खूण म्हणून राजमुद्रिका दिली होती. ती गेली कुठं? अशीही शक्यता आहे की शकुंतलेला दुष्यंताकडे जाताना बघून दुष्यंताचं रूप घेऊन आश्रमात गेलेल्या त्या व्यक्तीनंच ती नाहीशी केलेली असावी. काही समजत नाही." असं स्वतःशी बोलून गुप्तहेर धुंडिराज दालनात येरझाऱ्या घालत विचार करू लागला.


थोड्याच वेळात त्याने चतुराक्षाला बोलावलं. तो तत्क्षणी उपस्थित झाला.
                                                      क्रमश: