मुद्रिका-रहस्य - ५

मुद्रिका-रहस्य - ५


धुंडिराजाच्या हातापायातलं अवसानच गेलं. तो लपूनछपून आल्याचं मायाला समजलं की काय? पण ती तर मघापासून वारा घालतेय. मग तिला कसं समजलं? काही का असेना, आता ही जागा लवकरात लवकर सोडण्यात शहाणपण आहे. लगेचच एका ठिकाणी दोरीचा फास अडकवून तो भिंतीच्या आधारानं खाली उतरू लागला. तेवढ्यात त्याला कुणाच्या तरी कण्हण्याचा आवाज आला. कुणा व्यक्तीचा केविलवाणा आवाज -शकुंतले, शकुंतले - तो आवाज कुठून येतोय याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न धुंडिराजानं केला पण ते त्याला जमलं नाही. मठात पुन्हा प्रवेश करणं त्याक्षणी तरी शक्य नव्हतं.


रथ नगराकडे परतू लागला. प्रकरण सगळं समजूनही नीट उलगडत नव्हतं. कितीतरी रहस्यं उलगडायची आहेत. बरीच गुंतागुंत आहे. योगीराज दुष्यंताला राजकोषाबद्दल का विचारत होते? दुष्यंतानं सांगितलं, त्याला अंदाज घेता आला नाही. धन किती आहे हे तर राजाला माहीत असतं. हे धन माया नामक सुंदरीला प्राप्त करण्यासाठी दिलं जात आहे काय? ही माया कोण? धुंडिराजाच्या छतावरील अस्तित्वाचा तिला कसा काय पत्ता लागला? योगीराज म्हणाले नवमीला रात्री बळी देण्यात येईल. जिला बळी दिल्यामुळे राजा निष्कंटक राज्य करेल अशी व्यक्ती कोण आणि शकुंतलेचं नाव घेऊन विव्हळणारा तो स्वर कोणाचा?


चतुराक्षानं सांगितलं की मागून राजाचा रथ येतोय. त्याच्यापुढं आपला रथ चालवणं अप्रस्तुत वाटून त्यानं आपला रथ एका बाजूला उभा केला. राजा दुष्यंत धुंडिराजाचा मित्र आहे. त्या दोघांनी एकाच आश्रमात अध्ययन केलेलं आहे. राजानं नेहमीच रहस्यमय, अवघड बाबतीत वेळोवेळी धुंडिराजाला बोलावून त्याचा सल्ला घेतलेला आहे. तो धुंडिराजाच्या साहसी वृत्तीची आणि हेरगिरीतील चातुर्याची नेहमीच प्रशंसा करत आलेला आहे. राजाची आणि त्याची कधीही भेट झाली तरी राजा त्याची खुशाली विचारतो.


पण ह्यावेळी जरा विचित्रच घडलं. राजाला बघितल्यावर धुंडिराजानं लवून नमस्कार केला. राजानं त्याला प्रत्युत्तर दिलं पण ते एखाद्या सामान्य प्रजाजनाला द्यावं तसं आणि तो अपरिचिताप्रमाणे पुढे निघाला. राजा गेल्यावर धुंडिराज चतुराक्षाला म्हणाला, "राजाला प्रिय व्यक्तींचा विसर पडण्याचा रोग जडलाय की काय?" चतुराक्ष त्यावर नुसता हसला.


या गुप्तहेरांची एक सवय असते. कुठलंही प्रकरण हातात घेतलं की सुरुवातीला उगीचच निरर्थक हालचाली करतात आणि भांबावून जातात पण नंतर अचानक अशा एखाद्या तर्कशुद्ध निर्णयापर्यंत पोहोचतात की तिथून त्या प्रकरणाच्या तळापर्यंत जाता येतं. आणि तिथून त्याला आणि वाचकालाही परतणं शक्य नसतं. मुद्रिका रहस्यमध्येही अगदी असंच घडलं.


माध्यान्हीची वेळ. महाराज दुष्यंत आपल्या महालात द्राक्षांचा आस्वाद घेत बसलेले होते. तेवढ्यात एका सेवकाने येऊन निवेदन केले की प्रतिष्ठानपूरहून महाराजांचे व्यापारी मित्र आणि बालसखा आनंदवर्धन आले आहेत व आपल्या दर्शनासाठी उत्सुक आहेत.


"येऊ दे." राजानं एक क्षणभर विचार करून सांगितलं.


काही वेळानंतर मौल्यवान वस्त्रं परिधान केलेला एक हसतमुख तरुण राजाच्या महालात आला. त्याच्या हातात एक छोटीशी पुडी होती. राजा दुष्यंत उठला आणि मोठ्या सन्मानानं त्यानं त्याला स्वत:जवळ बसवलं.


"सांग मित्रा, केव्हा येणं केलंस?"


"कालच आलो." आनंदवर्धन उत्तरला.


"सर्व कुशल आहे न?"


"हो,हो. ह्यावेळी मी आपण सांगितलेली वस्तू घेऊन आलोय!"


राजानं आश्चर्यानं बघितलं. त्याला वाटलं, विचारावं कोणती वस्तु. पण आपल्या मनाला थोपवत तो म्हणाला, "वा वा. मोठी आनंदाची गोष्ट आहे. सांग कुठे आहे?"


त्या तरुणानं राजाच्या कानाजवळ तोंड नेत हळूच सांगितलं, "खरं शिलाजित आहे. दहा घोड्यांची शक्ती येईल! पण इथं नाही. उद्यानात जाऊ या. खऱ्या शिलाजिताचं नाव ऐकताच राजाचे डोळे चमकले. तो तत्क्षणी उठला.


इथे वाचकांना सांगावसं वाटतं की राजा दुष्यंताची वाटिका स्वर्गोद्यानापेक्षा कुठल्याच बाबतीत कमी नाही. अनेक ठिकाणी असे शीतल कुंज आहेत की जिथे लपलेल्या प्रेमिकांना बाहेरून कोणीही पाहू शकत नाही. राजानं आणि त्याच्या पूर्वजांनी अनेक वेळा या कुंजांमध्ये राण्यांबरोबर, दासींसमवेत आणि नगरातील इतर कुमारिकांच्या सहवासात आनंदात वेळ घालवला आहे. अशाच एका कुंजात राजाला घेऊन गेल्यावर आनंदवर्धन म्हणाला, "महाराज, आपण कित्येक वेळा म्हणालात की मित्रा खरं शिलाजित आणून दे. पण प्रयत्न करूनही मी आजपर्यंत आणू शकलो नव्हतो. पण आता मात्र हे मला सुदैवानं मिळालं.", असं म्हणत असतानाच आनंदवर्धनानं ती पुडी सोडली आणि त्यातली पांढरी पूड हातात घेऊन तो म्हणाला, "बघा काय सुगंध आहे!" राजानं त्याचा वास घेताक्षणीच त्याला गरगरायला लागलं आणि तो पडला.


काही वेळानंतर वाटिकेच्या एका कुंजातून एका पक्ष्याचा आवाज आला. त्याला प्रत्युत्तर म्हणून वाटिकेच्या भिंतीपलीकडून दुसऱ्या पक्ष्याचा आवाज आला. काही वेळानंतर ती भिंत ओलांडून एक तरूण आत आला. ज्याला आपण चतुराक्ष म्हणून ओळखतो तोच हा तरूण. त्याला पाहून आनंदवर्धन नामक युवक- जो दुसरा तिसरा कोणी नसून आपला प्रिय गुप्तहेर धुंडिराजच होता- म्हणाला "मला खात्रीच होती की राजाचा वेष धारण केलेला हा कोणीतरी दुष्ट आहे. प्रतिष्ठानपुरात राजाचा आनंदवर्धन नामक कोणीही मित्र नाही, पण हा दुष्यंताचं रूप घेतलेला मूर्ख माणूस खऱ्या शिलाजिताच्या आशेनं इथपर्यंत आला!"


"आता मला काय आदेश?" चतुराक्षानं विचारलं.


"याला गाठोड्यात बांधून घरी घेऊन जा आणि तळघरात कोंडून कडक पहाऱ्यात ठेव."


"आणि आपण?"


"मी तोपर्यंत दुष्यंताचं रूप घेऊन खऱ्या दुष्यंताचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. तू पंचमीच्या दिवशी राजाच्या सारथ्याचा वेष करून ये आणि सिद्धयोगी मठाच्या मार्गावर मला भेट."











क्रमश: