मुद्रिका-रहस्य - ४

मुद्रिका-रहस्य - ४


"हं, तीच ती. मेनकेनं सोडलेली. मी तिचं पालन पोषण केलं, तिला वाढवलं. तो ढोंगी विश्वामित्र. स्वत:ला ऋषी म्हणवतो. राजाकडे जाऊन यथेच्छ धन उकळतो पण स्वत:ची एक मुलगी नाही सांभाळता आली. हल्लीच एका यज्ञाच्या वेळी भेटले होते. मी शकुंतलेचा विषय काढला. म्हटलं मुलगी आता मोठी झालीय, तिचं लग्न करायचंय, पैसे द्या. तर म्हणाले मी तर तो प्रसंग केव्हाच विसरलोय. ती आता माझी नाही, तुमचीच मुलगी आहे. मी म्हटलं "ऋषी असून लाज नाही वाटत? मेनकेबरोबर मजा करायला तू आणि मुलं सांभाळायला आम्ही काय? मारे तप:श्चर्येचं ढोंग रचतो पण बाई दिसली की पाघळलाच! मी इथं वर्षानुवर्ष आश्रम चालवतोय. एकही प्रकरण घडलं नाही. पण, धुंडिराज तुम्हीच सांगा, ह्या बाहेरून येणाऱ्या लोकांचं मी काय करू? राजा दुष्यंताबद्दल मी बोलत होतो. शकुंतलेशी गांधर्वविवाह करून तो निघून गेला. मी काही काळासाठी बाहेर गेलो होतो. परतलो तर हे समजलं."


"यामुळं आश्रमाची बदनामी होते." धुंडिराज म्हणाला.


"ते जाऊ द्या हो. मुलं जन्माला घालून त्यांना कुठेही सोडतात त्यांची नाही बदनामी होत आणि त्या मुलांना  मी सांभाळतो, वाढवतो तर माझी बदनामी होते काय!" कण्व गुरगुरले. "म्हणून यावेळी शकुंतलेल्या पोहोचवायला जाणाऱ्या शिष्यांना मी सांगितलं होतं की राजा दुष्यंतानं हिचा स्वीकार केला नाही तर तिला इथं परत आणू नका, तिथंच सोडा. तुम्ही विचार करा धुंडिराज, मी ऋषी आहे. त्या दृष्टीनं जगात माझी इतरही काही कर्तव्यं आहेत."


"दुष्यंतानं शकुंतलेला दिलेली अंगठी सापडत नाही?"


"अहो असल्या गोष्टींना काय अर्थ आहे? एवढी साडेचार हात उंचीची बाई समोर उभी असताना तिला ओळखत नाही तर एवढीशी अंगठी काय ओळखणार? काय पण बोलता तुम्ही!" कण्व म्हणाले. "पण एवढं सांगतो की अंगठी इथं हरवली नाही. कुठं तरी रस्त्यात गहाळ झाली. मला तर वाटतं शकुंतलेबरोबर गेलेल्या साधूंनी ती चोरली आणि शहरात विकली."


कण्वांशी आणखी थोडं बोलणं झाल्यावर धुंडिराज जेव्हा निघाला तेव्हा दाराजवळ कोणीतरी त्याचं तोंड दाबून धरलं आणि डोळ्यावर पट्टी बांधली. मागून कुणीतरी म्हणालं, "गुप्तचर महाशय मुकाट्यानं चला."


काही अंतर चालून गेल्यावर त्याच्या डोळ्यावरची पट्टी सोडली. भोवती आश्रमकन्या खिदळत उभा होत्या! त्यादिवशी प्रियंवदेशी गांधर्वविवाह केल्याशिवाय धुंडिराज कण्व मुनींच्या आश्रमातून बाहेर पडू शकला नाही हे काय सांगायला हवं?


कण्व आश्रमात धुंडिराजाचं काही काम झालं नाही. प्रियंवदेशिवाय कशाचीच प्राप्ती झाली नाही. रथात बसून धुंडिराज असाच विचार करत होता. चतुराक्ष रथ चालवत होता. धुंडिराज जे काम हातात घ्यायचा त्यात यशस्वी व्हायचा. पण आता त्याला वाटत होतं की यावेळी काही यश मिळणार नाही. शकुंतलेला नाकारण्यामागे राजाच्या अनिच्छेशिवाय दुसरं काही कारण दिसेना. आश्रमातल्या मुली ज्याप्रमाणे जाळं टाकून पकडतात तसाच दुष्यंतही शकुंतलेच्या जाळ्यात अडकला असण्याची शक्यता आहे. पण राजाच्या बाबतीत मुलींनी असलं धाडस केलं नसावं. असा विचार धुंडिराज करत असताना त्यांचा रथ सिद्धयोगींच्या प्रसिद्ध आश्रमाजवळ आला आणि त्याचवेळी चतुराक्षाला दूरवरून येणाऱ्या राजाच्या रथाची ध्वजा दिसली.


"बहुतेक महाराज दुष्यंत येत आहेत." चतुराक्षानं सांगितलं.


"इकडे कुठे? कण्व आश्रमात?"


"नाही, सिद्धयोगी आश्रमात. त्या दिवशी सारथ्यानं सांगितलं होतं की महाराज दहा-पंधरा दिवसात एकदा तरी सिद्धयोगी आश्रमात जातातच."


"असं किती दिवस चाललंय?"


"तीन चार महिने."


"कमाल आहे! शकुंतला असलेल्या कण्व आश्रमात जायला राजाला वेळ नाही आणि त्याच्याच जवळच्या सिद्धयोगी आश्रमात मात्र तो जातो. चतुराक्षा, इथंच काहीतरी पाणी मुरतंय. तू रथ वृक्षराजीच्या आड घेऊन चल."


राजा दुष्यंताचा रथ आला आणि सिद्धयोगी आश्रमाच्या दिशेने पुढे गेला. काष्ठपेटिकेतून काही आवश्यक वस्तू घेऊन आपले गुप्तहेर धुंडिराजही वृक्षांमागे लपत छपत आश्रमाच्या दिशेने निघाले.


या ठिकाणी आम्ही आमच्या वाचकांना सांगू इच्छितो की सिद्धयोगींचा मठ प्राचीन आहे. घनदाट वृक्षराजींमध्ये बांधलेल्या ह्या विशाल मठाभोवती मजबूत तटबंदी असून त्याच्यावर ठिकठिकाणी त्रिशूळ रोवून काही साधू चिलीम ओढत बसलेले नजरेस पडतात. सर्वसामान्यांस मठात प्रवेशास मनाई आहे. आत अनेक साधू व शिष्या यांचा समुदाय असतो. मठाजवळ अमाप संपत्ती आहे आणि दूरवर त्याची ख्याती पसरलेली आहे. अनेक स्त्रियाही येथे रहातात आणि अनेक योगसाधनांमध्ये त्यांचे साहाय्य मिळते. ज्यावेळी गुप्तहेर धुंडिराज आपली घडीची तलवार वस्त्राआड लपवून आश्रमाच्या तटाजवळ पोचला त्यावेळी तिसरा प्रहर झाला होता. तो लपत छपत तटाच्या चारी बाजूंना चकरा मारू लागला. जिथून आश्रमात सहजपणे प्रवेश मिळेल अशा जागेच्या शोधात तो होता. पुष्कळ शोधाशोध केल्यावर त्याला अशी जागा सापडली देखील. धुंडिराजानं कमरेभोवती बांधलेली बारीक दोरी सोडली आणि तिचा फास बनवून तटावर फेकला. तो बरोब्बर एका बुरुजाला अडकला. धुंडिराज चपळाईनं वर चढला. आता तो अशा ठिकाणी पोचला होता की जिथून त्याला मठाच्या आतील सर्व दृश्य स्पष्ट दिसत होतं. त्यानं चौफेर नजर फिरवून परिस्थितीचं निरीक्षण केलं. दोरी गुंडाळून तो हळूहळू मठाच्या छताजवळ पोहोचला. छतावर तो अगदी अलगद पावलं टाकत होता. त्याला खात्री होती की काही धोका निर्माण झालाच तर आपल्याला उडी मारता येईल.


छतावर एका ठिकाणी धूर निघत होता. धुंडिराजाला वाटलं बहुतेक मठाचं स्वयंपाकघर असावं पण आत डोकावल्यावर वेगळंच दृश्य पहायला मिळालं. धूर एका दालनातल्या कुंडातून येत होता. जवळच व्याघ्रचर्मावर लांब दाढीवाले एक योगी बसले होते. बाजूला एक सुंदरी त्यांना पंख्यानं वारा घालत होती. राजा दुष्यंत हात जोडून योगीराजांसमोर बसला होता. धुंडिराजाच्या लक्षात आलं की हे तेजस्वी व्यक्तिमत्त्व म्हणजेच ज्यांच्या नावावर मठ चालतो ते सिद्धयोगी होत. राजा दुष्यंत आजकाल त्यांचाच भक्त बनत चालला आहे.


"कण्वांच्या आश्रमातून कुणी तरी पोरगी तुझी राणी बनण्यासाठी आली होती असं मी ऐकतोय." योगीराज एकदम गंभीर आवाजात म्हणाले.


"होय, पण मी तिला ओळख दाखवली नाही."


"शाबास!" आणि पंखा हलवणाऱ्या त्या कन्येकडे बघत सिद्धयोगी म्हणाले "ते स्थान तर आमच्या मायेसाठी राखून ठेवलेलं आहे."


दुष्यंताच्या चेहेऱ्यावर हास्य उमटलं. त्यानं मायेकडे दृष्टिक्षेप टाकला. आता धुंडिराजाचं लक्षही मायेकडे गेलं. ती शकुंतलेपेक्षा निश्चितच सुंदर होती. धुंडिराजाला एकदम सगळं रहस्य उलगडलं. राजा दुष्यंत मायेला राणी बनवू इच्छित होता आणि म्हणून शकुंतलेला टाळत होता.


"राजाच्या खजिन्यात किती धन आहे?" अचानक सिद्धयोगींनी विचारलं.


"मोठ्या प्रमाणात आहे. मला नीट अंदाज नाही आला." दुष्यंतानं उत्तर दिलं.


"नवमीच्या दिवशी तुला जास्तीत जास्त जितकं धन आणता येईल तितकं घेऊन ये. त्या रात्री बळी देण्यात येईल. नंतर तू निष्कंटक राज्य कर. आमची माया त्याच वेळी राणी बनेल. सिद्धयोगींनी आज्ञेच्या स्वरात सांगितलं.


"जशी आज्ञा." दुष्यंतानं उत्तर दिलं.


"आता तू जा. पंचमीला आम्हाला भेट. आम्हाला परतायला उशीर झाला तर प्रतीक्षा कर."


दुष्यंत प्रणाम करून उठला. धुंडिराजानं डोकावणं सोडून दिलं आणि तो बाजूला झाला. पण त्यामुळे छतावरून पाय हलल्यामुळे आवाज झाला.


"कोण आहे छतावर?" योगीराजांचा आवाज ऐकू आला.


"तोच असेल धुंडिराज." माया म्हणाली आणि तिच्या हसण्याचा स्वर कानी पडला.












क्रमश: