मुद्रिका रहस्य - १

                     मुद्रिका रहस्य 


(हिंदीतील प्रसिद्ध व्यंगकार कै.शरद जोशी यांच्या "मुद्रिका रहस्य" ह्याच नावाच्या मूळ हिंदी दीर्घकथेचा मी केलेला मराठी अनुवाद)


त्याकाळी विक्रमादित्याच्या दरबारात सगळीकडे कालिदासाबद्दल चर्चा चालू होती. शासकीय पातळीवरून शाकुंतलाच्या प्रयोगाची जोरदार तयारी चालू होती. तेव्हा "अभिज्ञानशाकुंतला"च्या केवळ दोनच प्रती अस्तित्वात होत्या. एक कालिदासाची स्वत:ची प्रत आणि दुसरी त्यानं विक्रमादित्याला भेट म्हणून दिलेली सुसज्जित प्रत. आणखी प्रती तयार करण्याचे आदेश देण्यात आले होते. एका दालनात भोजपत्रांची रास रचलेली होती. काम जोरात चालू होतं.....


.... आणि अगदी याच काळात क्षीरसागरापासून महाकाल मंदिरापर्यंत जाणाऱ्या गजबजलेल्या रस्त्यावर रोज संध्याकाळी एक पुस्तक विक्रेता बसत असे. त्याच्या भोवती गिऱ्हाइकांची नेहमी झुंबड उडालेली असायची. त्याच्याजवळच्या सती स्त्रियांची चरित्रे, दुर्गा स्तोत्र, राजा गर्दमिलच्या गोष्टी याबरोबरच गुप्तहेर धुंडिराज याच्या साहसकथांना जोरदार मागणी असायची. दिवसभर दरबारात बसल्याबसल्या कालिदासांच्या कवितांचं गुणगान करणारे दरबारी देखील जेव्हा घरी परतायचे तेव्हा अशी एखादी रहस्यकथा खरेदी करायचे आणि आपल्या वस्त्रांमध्ये लपवून घरी आणायचे. विक्रमादित्याच्या राण्याही गुपचूप असली पुस्तके मागवायच्या आणि लपवून ठेवायच्या. राजा शिकारीला गेला की अंत:पुरात या पुस्तकांचं सामुदायिक पठण व्हायचं.


अशा या हेरकथांचा कर्ता कालिदासासारखा प्रसिद्ध नव्हता. तो होता एक गरीब ब्राह्मण. तो दर महिन्याला आपल्या बुद्धिचातुर्यानं असं एखादं पुस्तक लिहायचा आणि त्याच्या मोबदल्यात पदपथावरील दुकानदाराकडून काही मोहरा मिळवायचा. अशी वदंता होती की ह्या लेखकाला गुरुनं शाप दिला होता की तुझी विद्या खूप प्रसिद्ध होईल परंतु अमर होणार नाही.  ह्याच्यापाठीमागे एक घटना होती. आश्रमात अध्ययन करीत असताना रोज पहाटे गुरुंना पुष्पहार आणून देणाऱ्या एका शूद्र जातीच्या तरुणीबरोबर त्यानं पाप केलं आणि काही मत्सरी ब्राह्मणांनी गुरुंकडे तक्रार केली. गुरुंनी त्याला शाप देऊन आश्रमातून हाकलून दिलं. उदरनिर्वाहासाठी तो लहानलहान पुस्तकं लिहून पैसा मिळवायला लागला. त्यानं लिहिलेल्या गुप्तहेर धुंडिराजाच्या कथा प्रसिद्ध झाल्या आणि त्याला पब्लिकमध्ये अफाट मागणी येऊ लागली.


वास्तविक ह्या रहस्यकथांचा नायक धुंडिराज म्हणजे एक अफलातून व्यक्तिमत्त्व होतं! कुशल बहुरुप्याप्रमाणे अनेक प्रकारे तो वेष बदलत असे. कधी योगी, कधी सामंत, कधी पारधी तर कधी अभिसारिका बनून ठुमकत, ठुमकत चाललेली सुंदरी. त्याच्याजवळ अंधारात चमकणारा एक अद्भुत मणी होता, आवश्यकता नसताना घडी करून ठेवता येईल अशी तलवार होती. पशु-पक्षी, कीटक यांचे आवाज तो तोंडाने काढू शकत होता. त्याला अनेक भाषा अवगत होत्या. विंचू किंवा सर्पदंशावरील मंत्र त्याला माहीत होता. त्याचा कमरेला नेहमी एक पातळशी पण मजबूत दोरी बांधलेली असायची. तिचाच फास करून तो कधी पळून जाणाऱ्या गुन्हेगाराला पकडायचा, कधी उंच खिडकीवर चढायचा तर कधी तो फास लोट्याला अडकवून विहिरीतून पाणी काढायचा. धुंडिराज कपट कारस्थानात आणि भानगडीत पारंगत असूनही वृत्तीनं धार्मिक होता. ज्या गोष्टींमुळं न्यायाचं रक्षण होईल आणि राजाकडून बक्षिसी मिळेल अशाच गोष्टी तो करायचा. पुस्तकी गुप्तहेरांप्रमाणे तो नेहमीच प्रत्येक कामात यशस्वी व्हायचा.


तो जेव्हा हेरगिरी करण्यासाठी जायचा तेव्हा त्याच्याजव्ळ एक काष्ठपेटिका असायची. त्या पेटीत वेळप्रसंगी लागणारं सर्व साहित्य होतं. उदा. चेहेऱ्यावर रंगरंगोटी करण्याचं सर्व सामान, तांब्याचा अष्टकोनी आरसा, खोट्या दाढीमिशा, पिशाच्च, वेताळ इ.चे रूप धारण करण्यासाठी मुखवटे, धारदार चाकू, बेशुद्धाला शुद्धीवर आणण्यासाठी लखलख नावाची वनस्पती, गोरोचन, तुळशीची पानं, कुमारिकेनं कातलेलं सूत, निळ्या कमळाचं मूळ, त्रिफळा चूर्ण, सिंहाची चरबी, गायीचं शुद्ध तूप, गांधीलमाशीची नांगी, पंचांग, कस्तुरी, मोराचा तुरा, हरणाच्या शिंगाची तुतारी, सातू, गूळ, गंगेचं पाणी, चुना, सुपारी, कंगवा, रुद्राक्षाची माळ, सोमल नावाचं विष, चकमक, व्याघ्रचर्म, लोटा, कवड्या, मोहरा, पूजेचं सामान आणि पांघरायची चादर. त्याकाळी एवढ्या साहित्यानिशी अशा गुप्तहेराला केव्हाही काहीही करणं अशक्य नव्हतं. धुंडिराज धष्टपुष्ट आणि सुंदर होता. गळ्यात नेहमी ताज्या फुलांचा हार असायचा. तो नेहमी सुंदरसं जाडसर जानवं घालीत असे आणि दंडावर सुवर्णकंकण बांधीत असे. गणिका त्याच्या सहवासासाठी वर मागायच्या, इतकेच नव्हे तर चेटूकही करायच्या! त्याचेही अनेक स्त्रियांशी संबंध होते. थोडक्यात म्हणजे तो त्या काळातील जेम्स बाँड होता!


जेव्हा इकडे विक्रमादित्याच्या दरबारात कालिदासाच्या "अभिज्ञानशाकुंतला"ची जोरदार चर्चा चालू होती तेव्हाच दुसरीकडे गुप्तहेर धुंडिराजाच्या साहसकथामालेत एक नवीन पुष्प गुंफलं गेलं होतं-- "मुद्रिका रहस्य अर्थात शाकुंतलाची खरी कथा". ह्या पुस्तकानं ह्यापूर्वीची विक्रीची सर्व रेकॉर्डं मोडली.  भोजपत्रावर जेवढ्या प्रती तयार व्हायच्या त्या सगळ्या संध्याकाळपर्यंत संपायच्या. त्या पुस्तकाचा आरंभ साधारण असा होता.


श्री गणेशाय नम:। मुद्रिका रहस्यची कथा सांगतो ती ऐकावी. रमणीय पहाट होती. ब्राह्मण पवित्र नद्यांमध्ये स्नान आटोपून...


                                                            क्रमश: