लेखणी आर्त अक्षरासाठी


 लेखणी आर्त अक्षरासाठी


लेखणी आर्त अक्षरासाठी
हंबरे गाय वासरासाठी


माळले का कधी कुणी यांना?
ही फुले फक्त अत्तरासाठी


वादळाने मला विचारावे!?
काय केलेस तू घरासाठी?


चांदणे लाभले असून मला
बांधतो ऊन छप्परासाठी


बोचते का गजांपरी वारे?
(हे न आकाश पाखरासाठी)

प्रश्न होता निघून जाण्याचा
थांबलो मी न उत्तरासाठी

—चित्तरंजन