चेहरा
चेहऱ्यामागुन निघतो, रोज नवखा चेहरा,
मज तिऱ्हाईत भासतो मग, ओळखीचा चेहरा!
हृदय माझे फाटले;अन रिक्त हे डोळे तुझे,
हाच का तो आपलासा, वाटणारा चेहरा?
शेवटी आलात सवडीने, सुखांनो हाय पण,
झाकला आहे फुलांनी, आज माझा चेहरा!
चाहुलीने आज माझ्या, दर्पणा उजळू नको,
रे व्रणांनी ग्रासलेला, आज माझा चेहरा!
रंग चढवु कोठला नी कलप लावु कोणता?
-मांडतो बाजार आहे, माणसाचा चेहरा!
जपुन आहे सल अनामिक, गूढगर्भी अंतरी,
एकदा त्या मज दिसावा, वेदनेचा चेहरा!
का असूया झळकते, पण सर्व ह्या नजरांतुनी,
वेध माझा घेतसे, उफ!, तो गुलाबी चेहरा!
वेसणीतील देह हे, अन दडपणाची नांगरे,
ह्यात दिसतो नेहमी,मजला स्वत:चा चेहरा!
आरसा तु हो मनाचा, अन स्वत:ला शोध रे,
सापडे तेव्हाच मित्रा, तुज स्वत:चा चेहरा!
-- मानस६