गडे चैन नाही, तुलाही मलाही...
सुचेनाच काही, तुलाही मलाही...
कशी कोण जाणे अकस्मात लाट
दुभंगून जाई तुलाही मलाही...
असे गाठ ही जन्मजन्मांतरीची
कळालेच नाही तुलाही मलाही...
किती यत्न केलास सोडावयाचा
तरी शक्य नाही तुलाही मलाही...
नको एकटे एकटे वाहणे हे
भवाच्या प्रवाही तुलाही मलाही...
खुल्या होउनी आज बोलाविती या
दिशा सर्व दाही तुलाही मलाही...
'कधी भेट होई? अता राहवेना
प्रवासी जराही तुलाही मलाही...'
§----- प्रवासी ३० ऑक्टोबर २००४ -----§