पोलीसांचे किस्से

एकुण पोलीस हा समाजाचा एक स्वतंत्र घटक असावा, मात्र समाजातील इतर सर्व घटक याच्याशी संबंध न आला तर बरा असे म्हणत असतात.पोलीस हा एक वेगळाच प्राणी आहे. माणसा सारखा दिसणारा पण माणसापेक्षा वेगळा. एखादा बातमीदार सहज लिहून जातो "रस्त्यात एकही मनुष्य दिसत नव्हता, सर्वत्र पोलीस दिसत होते".


'पोलीसांची मुले'


मी लहान असतानाची गोष्ट. मी असेन दहा-अकरा वर्षाचा. अंगणात खेळत होतो. पलिकडे माझी पाच सहा वर्षांची बहिण तिच्या मैत्रीणींबरोबर खेळत होती. इतक्यात जवळच असलेल्या शाळेतील राष्ट्रीय छात्र सेनेची मुले खाड्खाड बुट वाजवीत आणि एक-दो-एक असे गर्जत समोरच्या रस्त्यावरुन जाउ लागली. खाकी कपड्यातली ती मुले पाहून माझ्या बहीणीला मोठी गंमत वाटली. ती धावत मला बोलवायला आली आणि म्हणाली ,"दादा, लवकर चल बघायला, पोलीसांची मुले चालली आहेत"


संस्कार


एकुण पोलीस या प्राण्यापासुन चार हात दूर असलेलेच बरे. नुकतेच शिक्षण संपवुन नोकरीला लागलो होतो तेव्हाची गोष्ट. आमच्या कंपूतील एक मित्र मनाली येथे शिबिरासाठी निघाला होता. त्याला मुंबई सेंट्रल स्थानकावर सोडायला आम्ही चौघे जण गेलो होतो. रात्री दहाला गाडी सुटल्यावर आम्ही परत येत होतो. सरळ दादरला गाडी बदलायची व ठाण्याला यायचे. एका शहाण्याने सुचवले कि दादरला गर्दी होते, आपण एलफ़िस्ट्न ला उतरू आणि परळ ला ठाणे गाडी पकडु. झाले, आम्ही एल्फ़ीस्टन रोड स्थानकावर उतरलो. आता सरळ पुलावरुन परळ गाठायचे इतक्यात लांबून एक गाडी परळ कडे येताना दिसली. आम्ही पट्कन उड्या टाकल्या आणि रुळातुन धावत परळला पोचलो. स्वागताला लोहमार्ग पोलीस हजर होतेच. आम्ही टरकलोच,पण आलीया भोगासी म्हणत साहेब, उशीर झालाय घरी जायला म्हणून नाहीतर आम्ही आपली सरळ पुलावरुनच जाणारी मुले.. असे सुरु केले. हवालदार पोचलेला होता. पकड्लेल्या माणसावर दबाव आणून त्याला घाबरवून पैसे कसे काढाचे हे बहुधा पोलीसांच्या अभ्यासक्रमात शिकवले जात असावे. तो शांतपणे म्हणाला ' आमाला पावर नाय. आत चला, आणि सायबाना सांगा'. नाइलाजाने लोहमार्ग पोलीस स्थानकात प्रवेश करताच आतला मेजर विचारता झाला, "काय? लेडीस का?". लोहमार्ग पोलीस स्थानकात सरळ दिसणारे मध्यमवर्गिय तरुण म्हणजे महिलांच्या डब्यात प्रवास करताना पकडलेले असा संकेत असावा. लगेच आम्हाला घेउन गेलेला बोलला, 'लाइन क्रासिंग'. मग आमचे आइ-वडील, शिक्षण, निष्काळजीपणा, आम्ही केलेला गुन्हा या सर्वांचा पाढा वाचुन झाला. मग त्या मेजरने आमच्या हवलदाराला विचारले, काय रे यांना ते गेल्या आठवड्यातल्या मर्डरचे सांगितलेस का? आता 'मर्डर' ऐकताच आम्ही चपापलो. ते बरोब्बर हेरत मेजर म्हणाला, पोरांनो गेल्या आठवड्यात याच लाइनीत रात्री एक मर्डर झाला. आता त्याला मारणारे कोण याचा आम्ही शोध घेतोय, तर लाइनित सापडलेल्या सगळ्यांची चौकशी नको कराला? आता उद्या सकाळी रेल्वे कोर्टात नेणार, साहेब म्हणाले सोडा तर सोडु, आमचे काय. एव्हाना आम्हाला घाम फ़ुटला होता. बरिच गयावया केल्यावर साहेब म्हणाले, पैसे किती आहेत. आम्ही आपले सांगितले कि आम्ही विद्यार्थि, थोडेफ़ार आहेत आपले, फ़ार कुठुन असणार? साहेब म्हणाले, ठिक आहे. उद्या बघु. अखेर सगले मिळुन पन्नास वर तोड निघालि. जाताना साहेब गंभीर चेहरा करत म्हणाले ' खर मंजे कायद्यान आमी म्याजीश्ट्रेट फ़ुडे उबे केले पायजेल तुमा लोकांला. पन काय, तर तुमी चांगल्या घरचे सुक्शिक्शीत (सुशिक्षित या शब्दाचा पोलीसी उच्चार) दिसता, तिते कोर्टात साले चोर, जुगारी, पाकिट्मार सगळे येनार, उगाच तुमच्या मनावर वाइट संस्कार होतील, म्हणुन सोडुन देतो. आता पुन्यांदा आसला शानपना करु नका, जावा.


'बार'


एकदा 'उजवीकडे' वळु नये अशी पाटी असतानाही इकडे तिकडे बघुन हळुच दुचाकी उजवीकडे वळवली. लग्गेच ढगातुन चंद्र बाहेर यावा तसा एक वाहतुक पोलीस पानाच्या टपरी आडुन बाहेर आला. मला हात दाखवुन थांबवत त्याने पदपथावर तोंड मेकळे केले व जड जिभेने पृच्छा केली, '.लायसन?' कपाळाला हात लावला. सकाळिच कुठे हा टपकला? त्याने खिशातुन चिमुकली (फ़ुकट मिळालेली?) वही काढत माझ्या दुचाकिचा क्रमांक टिपायचे नाटक केले. आता समजले, कि प्रकरण साधे आहे, फ़ार दम नाही. उगाच पावतीपुस्तक काढले म्हणजे लोचा होतो. नाव? - मी नाव सांगीतले. पत्ता? - मी पत्ता सांगितला. मी रहात असलेल्या इमारतिचे नांव होते '.वसंत बहार' तो पोलीस लिहिताना एकदम थांबला व चकित होत म्हणाला कुठे आला? आता मी चकित झालो! म्हणालो, काय कुठे आला? तो वैतागला, म्हणाला राव, आता पत्ता सांगितलात ना, तो बार कुठे आला? कधी पाहिलेला आठवत नाही! काय बोगस पत्ता देता काय?


फ़ुकट


तो मी नव्हेच या नाटकात बहुतेक्ल वेळ न्यायालयाचे दृश्य आहे. साहजिकच आरोपीच्या पिंजऱ्यापुढे पहाऱ्याला पोलीसही आहेच. या पोलीसाला सबंध नाटकात साहेबांनी फ़क्त एक वाक्य दिले आहे मात्र ते वाक्य नाट्यग़ृहाचे छ्प्पर उडवून जाते. आरोपीला सरकारी वकिल तंबाखुचा भाव विचारतो. आरोपी सांगतो कि तो बरेच दिवस तुरुंगात असल्याने त्याला कल्पना नाही. मग आरोपी पटकन म्हणतो, हे हवालदार खातात, याना माहित असेल. आरोपीने हवालदाराला तंबाखुचा भाव विचारताच तो खेकसतो "आम्ही कुठलीबी गोष्ट इकत घेत नसतो"


एकदा औषधाच्या दुकानात खरेदिसाठी गेलो असता एक पोलीस तिथे आला. त्याने 'न्युसोबी' हा पचायला हलक्या अशा सोया दुधाच्या भुकटिचा डबा विकत घेतला. दुकानदाराने पैसे मागताच तो गुरगुरला, "आधी फ़्रि गिफ़्ट काढा". दुकानदार चक्रावला. म्हणाला साहेब कसली गिफ़्ट? तर पोलीस विजयी मुद्रेने म्हणाला, आम्हाला काय इंग्रजी वाचत येत नाही असे वाटते काय? मग डब्याकेडे बोट दाखवत तो म्हणाला वाचा हे. डब्यावर छपले होते 'लॅक्टोज, सुक्रोज फ़्रि'. ते दाखवत मला म्हणाला हे डँबिस लोक असे फ़सवतात लोकाना. कसा पकड्ला!


विनोद


पोलीस पंचनामा वा प्रथम माहिती अहवाल (एफ़ायार) हे खरेतर महान विनोदी साहित्य म्हणून गौरविले गेले पाहिजे, पण दुर्दैवाने ते उपेक्षित राहिले आहे.


माझी गाडी चोरीला गेली, तिच्या 'प्रथम माहीती अहवालातला' हा शेवट्चा समारोपाचा परिच्छेद


" तरी, सदर माहिती प्रमाणे अद्यात चोरट्याने माझी गाडी माझ्या संमतीशिवाय लबाडिने चोरुन नेल्यामुळे मी त्याचे विरुद्ध तक्रार दाखल करीत आहे"