'वार'
थोर भ्याडांचा पराक्रम, यार झाला!
हाय! हा मागुन आता, वार झाला !
रावणांना, पातकांचा, घोर कोठे?
आज सीतेचा पुन्हा, अपहार झाला !
लपविताना दु:ख ती, केवळ म्हणाली,
-"धूर ह्या खोलीत नाही, फार झाला"?
नाही लीला ज्ञानियांची , आज तरीही,
वेद रेड्यांच्या मुखी, साकार झाला !
विनय, लज्जा, नीती- ह्या आभुषणांचा,
आज माझ्या संस्कृतीला, 'भार' झाला !
तोरणाला तोरणाची जोड; आहा!
'सप्तरंगी' बघ, खगांवर, स्वार झाला !
जानकीची घेऊनी अग्नी-परीक्षा,
त्या म्हणे रामास, 'साक्षात्कार' झाला!
भंगलेले हृदय हे, जोडु कसे मी?
प्रीत 'सुई' अन, वेदनेचा 'तार' झाला !
-- मानस६