आणि कविता खपल्या... (२)

कथेचा या आधीचा भाग http://www.manogat.com/node/4380


कविता खपवण्याच्या आपल्या प्रयत्नामधे चिंटु आणि मिनी दिवस रात्र मनोगतावर येउन आपल्या प्रतिभेचे शिंपण करायला लागले. सुरुवातीला अर्थातच त्यांना फारसे कोणी ओळखत नव्हते. आणि म्हणून आपल्या कवितांना कोणीच दाद देत नाही किंवा काहीही प्रतिक्रियाही देत नाही असं त्यांना वाटलं. मग त्यांनी एक idea केली. चिंट्यानी कविता टाकली की मिनीनी वा वा म्हणायचं आणि मिनीनी कविता टाकली की चिंट्यानी वा वा करायचं. कवितेला एक दाद मिळाली की इतरही कोणीतरी दाद देइलच असं त्यांचं calculation होतं. पण तरीही चतुर मनोगती काही यांच्या कवितांवर बोलायला तयार नाहीत.


कविता या लेखनविषयात कविता टाक्ल्यावर त्याला कोणी response देत नाही पाहिल्यावर त्यांनी गझल, चारोळ्या, प्रेमकाव्य, मुक्‍तक असे सगळे लेखन विषय ट्राय करून पाहिले. इतकंच काय पण अगदी सद्भावना, शुभेच्छा, माध्यमवेध, हे ठिकाण, धोरण, जीवनमान इ इ सर्व लेखन प्रकार आणि लेखनविषय आपल्या कवितांना देऊन पाहिले. शिवाय टाकलेल्या प्रत्येक कवितेसाठी एकमेकांना दाद देउन पाहिलं. तरीही काहीही उपयोग झाला नाही. दाद मिळवण्यासाठी असेच भटकत भटकत त्यांनी माहिती - प्रश्नोत्तरे - इतिहास (!) हा प्रकारात आपली एक कविता टाकली! आतातरी आपल्याला काहीतरी दाद मिळेल अशी त्यांची ठाम श्रध्दा होती. (हो, जसं software  मधली लोकं आधी H1 मिळतोय का ते बघतात, नाही मिळाला तर मग UK, Europe try मारतात. तेही नाही जमलं तर Gulf आणि अगदीच कुठे नाही शिरकाव झाला तर मग Tanzania, Zimbabwe असं कुठेही फॉरीन ला जातात तसंच काहीसं..) तर सांगायची गोष्ट अशी की त्यांनी  माहिती - प्रश्नोत्तरे - इतिहास (!) अशा प्रकारात आपली एक कविता Post केली...


जास्वंदीच्या झाडाला
मोगर्‍याच्या कळ्या
तशा तुझ्या गालांवरच्या
खोल खोल खळ्या


दुसर्‍या दिवशी येउन बघतात तो काय, कविते वर प्रतिक्रियांचा महापूर... दोघं Solid खुष. त्यांनी cybercafeत एक मेकांना मिठीच मारली. झालं शेवटी आपल्या प्रतिभेचं चीज झालं. 'माहिती - प्रश्नोत्तरे - इतिहास' प्रकाराने का होईना पण शेवटी आपल्याला चाहते मिळाले. त्यांच्या या हर्षवायूचा भर जरा कमी झाल्यावर त्यांनी प्रतिक्रिया नीट वाचायला सुरुवात केली.


मनोगती 1 (गंभीर मनोगती)
कृपया आपली कविता योग्य लेखनप्रकारात टाकावी.


मनोगती 2 (टारगट मनोगती)
अहो योग्यच आहे की हा प्रकार, शेतीविषयक माहिती आणि कविच्या प्रेमाचा इतिहास एकत्र देण्याचा हा छानच प्रयत्न आहे!


मनोगती 3 (दुसरे गंभीर मनोगती)
एखाद्याच्या प्रतिभेची अशी चेष्टा करणं हे मनोगतावर होऊ नये.  शिव शिव मनोगताची संस्कृती रसातळाला चालली आहे.


मनोगती 4 (दुसरे टारगट मनोगती)
अहो नंबर 3, नंबर दोनला असं म्हणायचंच नव्हतं! नंबर दोन, तुझं बरोबर आहे रे... तू काही सुध्दा चेष्टा केली नाहीयेस... उलट नंबर एकनीच जाणून बुजून चुकीचा शेरा मारला आहे. नंबर एकचं हे नेहमिचंच आहे...


मनोगती 1 (पहिले गं . म. )
नेहमीचंच काय ? ऑ नेहमीचंच काय? मी योग्य तेच बोललो... आणि महत्वाचं म्हणजे आपलं स्वतःचं व्याकरण सुधारा. 'नेहमिचं' नसून नेहमीचं असं लिहायचं असतं.


मनोगती 5 (तिसरे गं म) 
अहो मनोगती 1, तुम्ही दुसर्‍याला व्याकरण काय शिकवता, स्वतःला काय ज्ञानेश्वर समजता काय?


मनोगती 6 (चौथे गं म)
निषेध, निषेध... संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांचा असा अवमानकारक उल्लेख खपवून घेतला जाणार नाही. असं कोणी 'त्या' 'त्यां'च्या देवा किंवा संता बाबत केलं तर दंगली उसळल्या असत्या. वाटल्यास हा दुवा बघा.


मग पाच सहा वेगवेगळे गं म.
निषेध, निषेध.. याचा... त्याचा... सर्वांचा... काहितरी केलं पाहिजे... कोण करणार... तुम्हीच करा... इ इ


प्रशासक
कृपया इथे मुद्याला धरून चर्चा करा..


मग पुन्हा मनोगती 2 (पहिले टा म) 
अहो त्या पेक्षा गुद्याला धरून जास्त मजा येते


मग मनोगती क्र 2, 4, 6 इ (सर्व टा म)


ही ही ही... हु हु हु... ह्या ह्या ह्या


आणि मग मनोगती 1 ते 199 असे सगळे
&^%^%*
$#&*^^$ %$&**
$^&^^&^& &%$
ढिशाव ढीशाव धडाम धुम...


आता मात्र चिंट्या आणि मिनी complete सटकले. फार म्हणजे फार निराश झाले. त्यांच हे एक स्वगतः बघा त्या वरून तुम्हाला त्यांच्या सटकलेपणाचा  अंदाज येइल.


(खरंतर दोघांच्या एकमेकांमधल्या संवादाला स्वगत म्हणत नाहीत पण चिंट्या आणि मिनी हे प्रेमात इतके एकरूप झाले होते की ते एकमेकांशी बोलले तरी ते स्वगतच आहे असं त्यांच म्हणण होतं... गप्पा या चंद्र, चांदणं, तारे यांच्याशी मारायच्या... एक मेकांशी जे बोलू ते स्वगत, असा त्यांचा ठराव मागेच पास झाला होता! असो, तर त्यांचं स्वगतः)


काय करायला गेलो आपण आणि काय झालं. काय समजत होतो आपण इथल्या सगळ्या रसिक लोकांना आणि ते काय निघाले. नाहीच, या जगात खरं रसिक कोणी नाहीच. कोणालाही चाड नाही आपल्या हृदयरुपी शिंपल्यांमधुन टपटपणार्‍या या काव्यरूपी मोत्यांची. आपल्या काव्याची अशी उपेक्षा करून मराठी साहित्याची केवढी प्रचंड हानी करत आहेत ही लोकं. यांचा अपराध अक्षम्य आहे, चौकात जाहीर फटके मारले पाहिजेत एकेकाला... नाहीतर काळ्यापाण्याची शिक्षा देउन हत्तीच्या पायाखाली देउन मग तोफेच्या तोंडी दिलं पाहिजे... नाहीतर एकेकाला उलटं टांगून आपल्याच कवितांच्या पानांची धुरी दिली पाहिजे... निदान त्या अवस्थेत तरी आपल्या कविता समजून घेतील... धुरावाटे थेट नाकातून आत गेल्या म्हणजे मगच कदाचित डोक्यातही शिरतील....


अरे एकदा, फक्त एकदा आमच्या कवितांचा आस्वाद घेउन बघा... अमृत अमृत म्हणजे काय असतं ते तुम्हाला कळेल.... पण नाहीच तुम्हाला तुमच्या मित्रांनी कढवलेले ते पाचकळ काढेच जर ढोसायचे आहेत तर ढोसा... आणि करा आमची उपेक्षा...


नाही.... असं हताश होउन चालणार नाही.. काहीतरी उपाय केलाच पाहिजे... आणि नरसाळ्यानी का होइना पण या लोकांना आपलं अमृत पाजलंच पाहिजे.


पण या इतक्या लोकांना एकदम पाजता येइल असं नरसाळं आणायचं तरी कुठुन...


हल्ली ते दोघं एकत्र आल्यावर, त्या वेळातले तारुण्य आणि काव्य सुलभ असे उद्योग करायचे सोडून तासन तास विचार करत बसायचे... पत्र्या मारुतीच्या पायर्‍यांवर, उंबर्‍या गणपतीच्या उंबर्‍यावर, खुन्या मुरलिधराच्या मंडपात, पासोड्या विठोबाच्या मागच्या बाजूला अशा अनेक ठिकाणी दोघांनी खूप खूप खलबतं केली... आपल्या कवितांना वाचक मिळावेत म्हणून या सर्व देवतांना त्या त्या देवाच्या status आणि liking नुसार रुईचे हार, वाटीभर तेल, २१ मोदक, ७ नारळांचं तोरण अशा सगळ्या offers ही देउन झाल्या


आणि एक दिवस जिलब्या गणपतीला प्रदक्षिणा घालताना अचानक त्यांना एक खल्लास idea सुचली...


क्रमशः