आणि कविता खपल्या... (३)

आणि एक दिवस जिलब्या गणपतीला प्रदक्षिणा घालताना अचानक त्यांना एक खल्लास आयडिया सुचली...


त्याचं झालं असं की जिलब्या गणपतीला येताना ती दारात बसलेल्या त्यांच्या नेहमीच्या हार - फुलं वाल्याकडे गेले होते. नेहमीसारखाच गणपतीला हार घेतला (हल्ली चिंट्या मिनीला गजरा घ्यायच्या ऐवजी देवाला हार घ्यायला लागला होता.. कालाय तस्मै नमः हेच खरं!) तर हार घेताना असं लक्षात आलं की आज सगळे बोगनवेलीच्या फुलांचे हात आहेत, नेहमीचे शेवंती, गुलछडी असे नाहीत. म्हणून त्यांनी हारवाल्याला विचारलं की का रे बाबा हे असे हार का? तर त्यानी उत्तर दिलं 'अवो सायेब आजकाल ह्याच फुलांना ज्यादा डिमांड हाये. आपल्याला काय, कष्टमर ज्ये मागतो त्ये आपन बनवतो. हे असंच चालतं बगा बाजारात. बोगनवेल तर बोगनवेल, उद्या कुनी सदाफ़ुलीचे हार मागितले तर आपन सदाफुलीचे बनवू की'


तो हार घेउन ते निघाले आणि प्रदक्षिणा घालतान एकदम त्यांच्या डोक्यात ट्यूब पेटली! जर आपली काव्य सुमनं लोकांनी घ्यावीत असं आपल्याला वाटत असेल तर ज्या टाईप च्या फुलांना बाजार आहे त्या टाईप चे हार आपण बनवले पाहिजेत. 'सापडलं, नरसाळं सापडलं' चिंट्या हर्षातिरेकानी ओरडला. नेहमीच्या २१ प्रदक्षिणा घालून झाल्या झाल्या तिथुन तडक निघुन ते सायबरकॅफे मधे आले. मनोगताचे सर्व अर्काईव्ह्ज नीट वाचुन काढले. ते झाल्यावर सकाळ, लोकसत्ता, केसरी, पुढारी, संध्यानंद सगळ्या पेपर्स च्याही ऑनलाइन एडिशन्स चे जुने अर्काईव्ह्ज चाळुन काढले. आणि या सगळ्यातुन बाजारात सध्या कोणत्या टाईप च्या कविता जास्त डिमांड मधे आहेत याचं ऍनॅलिसिस केलं! आणि ते ऍनॅलिसिस बघुन ते चकितच झाले.


त्यांच्या असं लक्षात आलं की आपण उगाचच चारोळ्या लिहित बसलो आहोत. चारोळ्यांचे दिवस संपले आता. सध्या बाजारात जोरात चालतात त्या म्हणजे ज्यातलं एक अक्षरही कोणाला कळत नाही अशा दुर्बोध कविता किंवा लय सनसनाटी अशा रॉमँटिक कविता. बरं... असं काय... दुर्बोध तर दुर्बोध, रॉमँटिक तर रॉमँटिक... आपल्याला काय, आपलं मिशन स्टेटमेंट ठरलेलं आहे


अक्षर अक्षर जुळवुया
नोबेल प्राइज मिळवुया


मोठ्या निर्धारानी त्यांनी परत एकदा पेन आणि कागद समोर ओढला.. आणि विचार करायला लागले... काय लिहुया बरं दुर्बोध की रॉमँटिक. रॉमँटिक की दुर्बोध... खुप खुप वेळ ते विचार करत होते... आता इथे कधी नव्हे तो चिंट्या आणि मिनी मधे मतभेद झाला. चिंट्याच म्हणणं होतं काहीतरी ह्रुदयस्पर्शी, भावस्पर्शी, हळुवार, मनमोहक, रोमांचक (सर्वांगाला झिणझिण्या आणणारं, कानशीलं तापवणारं इ. हे कंसात!!) असं रॉमँटिक काव्य लिहावं. तर मिनीचं म्हणणं होतं की अनुभूतीपूर्ण, आत्मसंवेदनशील, जाणीवांची वर्तुळं रेखाटणारं, संवेदनांच्या कक्षा विशाल करणारं (म्हणजे लय झंगड आणि वाइट्ट वाइट्ट शब्द असलेलं!! हे कंसात) असं काही तरी लिहावं... त्यांचं काही एकमत होईना. मग त्यांनी तह म्हणून एक दुर्बोध रॉमँटिक कविता लिहायचं ठरवलं... हे ठरण्याचा अवकाश... पाडलीच त्यांनी एक कविता


फाटक्या उशीतून बाहेर डोकावणारा कापुस
आणि तुझ्या अलगद उघडल्या
ओठांतून येणारं हास्य
जणू ७.२८ च्या लोकलचा
गच्च भरलेला डबा...
ओसंडून वहाणारा...


हे सगळं सगळं रोज पहातो
तरीही मला कळत नाही
माझ्या टंच नशीबाची चोळी
उसवलीच कशी,
अशी नको या जागी...
आणि त्यातून बाहेर डोकावणारा
हा सौभाग्याच्या कापुस
असा सैरभैर का...
बेभान रातीनं फाडलेल्या
उशीतल्या कापसासारखा...


राधेचं एक बरं होतं
त्यांच्या काळी उशा नव्हत्या सिंथेटिक कापसाच्या
आणि लोकल ही नव्हत्या ७.२८ च्या...


(हुश्श... लोकल, कापुस, चोळी असे दुर्बोध कवितांमधले कीवर्ड्स सुद्धा आले आणि ओठ, रात्र, राधा अशी रॉमँटिक मधली रूपकंही आली... दुर्बोध रॉमँटिक कविता पूर्ण झाली!!)


दोन तिनदा त्यांनी आपण लिहिलेली कविता वाचली. आणि स्वतःच स्वतःवर सॉलीड खुष झाले. काय लिहिलंय आपण... फारच भारी... एकदा वाचली तर ग्रेस आहे अस वाटत, परत वाचली तर वाटतं आरती प्रभू असावेत.. फारच भन्नाट... इतके दिवस कुठे होतो बरं आपण... असो, आता टाकुच या ही कविता आणि बघुच कशी आवडत नाही ते लोकांना..!!


(मग कविता पोस्ट करणं, पेज रिफ्रेश करणं असा सगळा जुनाच प्रसंग कॉपी आणि पेस्ट! एकच ऍडिशन म्हणजे यंदा त्यांनी इतरही २ - ३ वेगवेगळ्या कथा / कवितांच्या खाली प्रतिसादांमधे 'आमची नवी कविता राधा व उशितला कापुस इथे आहे' अशी लिंक ही टाकली!)


काही मनोगतींना या दोघांचीही दया आली म्हणा किंवा त्यांच्या सगळ्या प्रयत्नांना फळ आलं म्हणा किंवा ७ - ८ देवांपैकी कोणीतरी पावलं म्हणा किंवा कविता खरंच कोणाच्याही समजुती पलिकडची होती म्हणा... काही म्हणा पण या कवितेवर थोड्या फार प्रतिक्रिया आल्याच! भले त्या प्रतिक्रिया हह्म्म्म..., एक चांगला प्रयत्न, ओके कॅटेगरी मधली कविता, राधा अजुन रंगवायला हवी होती, ७.२८ ऐवजी ८.१६ ची लोकल घेतली तर एक वेगळी अनुभूती येइल या प्रकारच्या होत्या... कही का असेना... कोणीतरी आपली दखल घेतली हे बघुन दोघं जाम खुष!


या विजयाच्या आनंदात एक दोन दिवस जातात न जातात तोच कोणाला तरी पोटशूळ झाला आणि एका वात्रट मनोगतीनं यांच्या कवितेचं चक्क विडंबन करुन टाकलं!


थरथरत्या माऊस नं त्यांनी ते विडंबन उघडलं... आणि आपल्या लाडक्या कवनाचं विडंबन पाहिलं..


फाटक्या शर्टातुन बाहेर डोकावणारा बनियन
आणि तो बघुन..
तुझं फेंदारलेलं हसू
जणु पी एम सी चा कचरा डेपो
गच्च भरलेला
ओसंडून वहाणारा


हे सगळं सगळं रोज पहातो
तरीही मला कळत नाही
माझा शर्ट असा फाटलाच कसा
असा नको या जागी
आणि त्यातून बाहेर डोकावणारा
हा व्हीआयपी चा बनियन
असा पिवळट कसा
निरमानं धुतलेल्या
पलंगपोसासारखा...


कृष्णाचं एक बरं होतं
त्याच्या काळी बनियान नव्हते व्हीआयपी चे
आणि कचरा डेपोही पीएमसी चे


काय हे... आपल्या भावनांची अशी चेष्टा करावी, आपल्या कलाकृतीच्या अशा चिंध्या कराव्यात. नाहिच लेको तुम्हाला चाडच नाही चांगल्या काव्याची... आता एक क्षणही या संवेदनाहीन लोकांबरोबर काढण्यात अर्थ नाही... असं स्वगत करुन त्यांनी अत्यंत उद्विग्न अवस्थेमधे मनोगत सोडण्याचा निर्णय घेतला...


- क्रमशः