आणि कविता खपल्या... (१)

चिंट्या आणि मिनी दोघांचं एक मेकांवर जबर्‍या प्रेम... जबर्‍या म्हणजे जबर्‍याच... म्हणजे इतकं की चिंट्याला सर्दी झाली की मिनी शिंकणार आणि मिनीच्या पोटात गॅसेस झाले की चिंट्या एरंडेल पिणार... आता येवढं प्रेम म्हणल्यावर कविता आल्याच... दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडल्यापासून कोकाट्यांच्या फाड फाड English सारखे रोज रोज कविता पाडायचे... म्हणजे पुण्याच्या शैलेश रसवंती गृहात दिवसाला जेवढा रस गळत असेल निदान तेवढ्या तरी कविता रोज पाडल्याशिवाय त्यांना झोपच लागायची नाही. अर्थात चिंट्या आणि मिनी दोघांचाही असा पक्का समज होता की आपण जन्मत:च कवी आहोत... आपण दोघंही फार म्हणजे फार म्हणजे फारच छान कविता करतो. आणि त्या इतक्या सुंदर असतात की आपला जर कुठे वशिला असता तर अगदीच Nobel किंवा ज्ञानपीठ नाही तर गेला बाजार एखादं पुण्यभूषण पारितोषिक तरी आपल्या कवितांना मिळालंच असतं... पण हाय राम, आपला वशीला नाही!


तरीही नेटानं पुरस्काराची वाट बघत बघत त्यांनी दोन तीन वर्ष काढली... तेंव्हा अचानक कोणीतरी त्यांना सांगितलं की असा कोणताही पुरस्कार मिळण्यासाठी म्हणे कविता कुठेतरी प्रकाशित कराव्या लागतात... त्यांना काय माहित, ते दोघं आपले एकमेकांना कविता ऐकवूनच पुरस्काराची वाट बघत होते... पण हे कळल्या कळल्या त्यांनी प्रयत्नांची शर्थ सुरू केली... सकाळ, लोकसत्ता, केसरी, पुढारी, सामना झालंच तर नवाकाळलाही ते आपल्या कविता पाठवायला लागले... अर्थात त्या कुठेच कोणी छापेना. कुठेही कोणीही त्या छापत नाहियेत हे बघुन त्यांनी या सगळ्या पेपर्स मधे रोज सकाळ संध्याकाळ खेटे मारणंही सुरू केलं. पण हाय राम, इथेही वशीला नव्हता... मग 'सकाळ'च्या दरवानानी दोन तीनदा हाकलून दिल्यावर त्यांनी मेनका, आवाज, संध्यानंद अशा सगळ्या ठिकाणी कविता प्रकाशित करायचा प्रयत्न केला... पण एकही पेपर किंवा मासिकवाला यांची कविता छापायला घेइल तर शपथ! 'जगात माणुसकीच राहिली नाही' अस चिंटू मिनीला म्हणाला सुद्धा! आणि मग दोघांनीही 'माणुसकी' या विषयावर आठ दहा ज्वलंत कविता करून त्या 'कोथरुड विषेश', 'बिबवेवाडी दिनांक', 'औंध समाचार' अशा एकेक स्थानिक पत्रांना पाठवुन पाहिल्या... पण हाय, त्यांनीही त्या छपल्या नाहित...


एक दिवस त्यांना कोणीतरी सांगितलं की काहीतरी एक मनोगत नावाची वेब साईट आहे म्हणे. तिथे आपल्या आपण कविता प्रसिद्ध करता येतात. आणि त्यांना बर्‍यापैकी वाचकही असतात. हे ऐकलं आणि दोघांचाही जीव direct भांड्यात पडला! म्हणजे आपण आता आपल्या कविता कोणाचेही पाय न धरता थेट प्रकाशित करू शकू! दोघंही खूष! त्यांनी लगेच कोकाट्यांचा 'धाड धाड इंटरनेट'चा क्लास लावला. इंटरनेटही काय भानगड आहे ते पटकन शिकुन आपल्या कविता प्रकाशित करून काय ते एकदाचं नोबेल प्राईझ मिळवून टाकु असं त्यांनी ठरवलं!


झालं, त्यांचा धाडधाड क्लास करून झाला. त्यांनी जवळच्याच एका सायबर कॅफेमधे जाऊन मेंबरशिप घेऊन टाकली. दोघंही एक छानसा मुहुर्त बघुन 'मनोगत' वर आले. आणि देवाचं नाव घेऊन त्यांनी 'चिंटू मिनीचा' आणि 'मिनी चिंटुची' अशी दोन खाती उघडूनही टाकली... आपल्या कविता या जगात खपवण्याचा त्यांचा प्रवास अशा रितीने माहितीमहाजालावर येऊन ठेपला...


- क्रमशः


तीन वर्षांपूर्वी मायबोलीवर मी ही कथा लिहायला सुरुवात केली होती. बऱ्यापैकी लिहून झाल्यावरही काही कारणाने ती अपूर्णच राहिली होती. ती कथा उर्ध्वश्रेणिकृत (अरे बापरे!) करून आणि पूर्ण करून इथे प्रकाशित करायचा विचार आणि प्रयत्न आहे! आपल्याला आवडेल अशी आशा आहे!


डिस्क्लेमरः या कथेतील सर्व पात्रे व प्रसंग आईशप्पत काल्पनिक आहेत आणि बरेचसे तीन वर्षांपूर्वी लिहिलेले आहेत, तरी(सुध्दा) आपल्या आजुबाजूला यांपैकी काही दिसल्यास तो योगायोग मानायचा का नाही हे आपले आपण ठरवावे!