आणि कविता खपल्या... (६) - अखेर

'आली आली आली.... फट्ट... गेली तिच्यामारी...' काउंटर वर गेले दोन तास घोंघावणार्‍या माशीला मारायचा चिंटूचा तेरावा प्रयत्नही फसला.. 'चिंटु मिनी अँड सन्स' (आमची कुठेही शाखा नाही) ला सुरू होउन आता दोनेक वर्ष झाली होती... आणि एव्हाना त्यांचा चांगलाच जम बसला होता... (म्हणजे गिर्‍हाइकाची वाट बघत काउंटर वर बसणं आता चांगलंच जमायला लागलं होतं!) या सर्व काळात लकडीपुलाखालून आणि त्यांच्या काव्यगंगेतूनही बरंच पाणीही वाहून गेलं होतं. तसे दु्कानाच्या सुरुवातीचे काही दिवस बरे गेले होते. आमचे येथे '_________ आणि चारोळ्या' मिळतील या एकाच पाटीवर त्यांना बर्‍यापैकी गिर्‍हाईकही मिळायला लागलं होतं. सिझननुसार आंबे, रातंबे, श्रीखंड, बासुंदी, पायजमे, परकर इ इ वस्तू लोक घेऊनही जायला लागले होते. आणि आलेल्या प्रत्येकाला आपल्या चारोळ्या (!) देण्याची त्यांची योजना सुरवातीला फारच यशस्वीही ठरली होती. अर्थात याचं कारण म्हणजे सुरुवातीला पुणेकरांना वाटायचं की खायच्या चारोळ्या फुकट मिळणार... आणि फुकट काही म्हटलं की पुण्यात गर्दी होतेच! जस जसं लोकांना या खायच्या नसून ऐकायच्या चारोळ्या आहेत हे लक्षात यायला लागलं आणि त्या पचायला (!) फारच जड आहेत हे ही लक्षात यायला आलं तस तसं लोकांनी 'पायजमे नकोत पण चारोळ्या आवर' म्हणायला सुरुवात केली. तरीही नेटानी चिंट्या आणि मिनीनी लोकांना आपले चारोळी संग्रह वाटणं चालूच ठेवलं. सुरुवातीला लोकंही संग्रह घेऊन जायचे... नंतर नंतर तर दोन दोन तीन तीन प्रती मागून न्यायचे. कोणी अशा जास्त प्रती मागितल्या की चिंट्यामिनीला फार फार भरून यायचं... ते मोठ्या झोकात त्यावर सही बिही करून द्यायचे. पण थोड्या दिवसातच त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. एकच गिर्‍हाईक, तोही निरक्षर वाटणारा, सारखा सारखा येतो, फक्‍त पन्नास ग्रॅम श्रीखंड विकत घेतो आणि कविता संग्रहाच्या चार चार प्रती घेऊन जातो.. काय चाललंय काय त्यांना कळेना... एक दिवस तर तो माणूस आला आणि पंचवीस ग्रॅम श्रीखंड घेऊन दहा प्रती मागायला लागला. तेंव्हा मात्र चिंट्याला रहावेना.


त्यानी विचारलंच... 'काय हो... म्हणजे देतो मी तुम्हाला प्रती, पण एवढ्या प्रतींचं तुम्ही करता काय... म्हणजे भेट बीट देता का कोणाला'


गिर्‍हाईक: कावो सायेब, दहा क्वापीज नायेत का? बरं... पाच तरी द्या या टायमाला...


चिंट्या: पाच? पण अहो काका... कशासाठी हव्यात तुम्हाला?


गिर्‍हाईक: सायेब, म्या श्रीखंड घेतलया नव्हं? तुमी बोर्ड काय लावलाय, श्रीखंडावर चारोळ्या फ्री... आमी त्या कशासाठी बी न्यू...


चिंट्या: अहो पण....


गिर्‍हाईक: ह्ये बगा... ज्यादा टाईम खोटी करू नका... माझं गिर्‍हाईक खोळंबलं असंल तिकडं...


चिंट्या: गिर्‍हा‌ईऽऽक?(चिंट्या किंचाळलाच) तुम्ही विकता माझ्या कविता?


(चिंट्याला खरं तर फार म्हणजे फार भरून आलं होतं... गेल्या अनेक वर्षात त्याला जे जमलं नव्हतं ते या महाभागानं करून दाखवलं होतं. चिंट्याच्या कविता तो अक्षरशः खपवत होता. आणि ज्या प्रमाणात तो चिंट्याकडून फुकट प्रती घेऊन जात होता ते बघता, त्याला बर्‍यापैकी जमलेलं दिसत होतं, 'आहे... कुठेतरी देव आहे'... चिंट्यानी मनोमन देवाचे आभार मानले)


गिर्‍हाईक: ओ सायेब... आपल्याला काय डांबरट समजले काय? अशी फुकटची घेतलेली वस्तू विकत नाय आपण... मी बी फुकटच देतो... चला चला आणा लवकर त्या क्वापीज... अवो म्हणलं ना तुम्हाला, गिर्‍हाईक थांबलंय माझं...


चिंट्या: कसलं गिर्‍हाईक?


गिर्‍हाईक: अवो पल्याडच्या गल्लीत भेळेचं दुकान हाय माजं... तुमच्या पुस्तकाची पानं बरी पडतात पुडे बांधायला.. हां अन तुमच्या कव्हराचे चमचे एकदम झकास होतात हां... आपलं गिर्‍हाईक खुष हाय येकदम गुळगुळीत पानांचे पुडे देतो म्हनून... द्या हो लवकर... खोटी नका करू धंद्याच्या टायमाला...


आता मात्र चिंट्या मटकन खालीच बसला. आपल्या कवितांची इतकी अवहेलना? पानांच्या पुड्या आणि कव्हरांचे चमचे? चिंट्यानी हातातल्या कवितासंग्रहाच्या कव्हरकडे पाहिलं. मलपृष्ठावरचा स्वतःचा गंभीर स्मित करणारा फोटो (आयकार्डावर लावतात त्या प्रकारचा) पाहिला. तो फोटो आत्ता फारच केविलवाणा दिसतो आहे असं त्याला वाटलं... हीच आपली छबी, जी लोकांच्या हृदयात काव्यसम्राटाची छबी म्हणून विलसत असावी असं आपल्याला वाटायचं... तीच छबी आता चमचा बनून लोकांच्या उदरात सुखाने भेळ ढकलत आहे. शिव शिव शिव काय वेळ यावी ही एका कलेच्या उपासकावर... अर्थातच या प्रसंगानंतर त्यांनी आपल्या दुकानातली फुकट चारोळ्या योजना बंद केली.


या मधल्या दोन वर्षांच्या काळात त्यांचे इतरही अनेक प्रयोग, प्रयत्न करून झाले होते. त्यातला एक प्रमुख प्रयत्न म्हणजे कविसम्मेलनं! त्यांच्या असं लक्षात आलं होतं की हे बरेचसे कवी कविसम्मेलनांमधे जाऊन जाऊन मोठे झाले आहेत. त्यांनीही ठरवलं की आपणही कविसंमेलनांमधे जायचं. नेटानं प्रयत्न करून त्यांनी वेगवेगळ्या संमेलनांमधे स्वतःची वर्णी लावायला सुरुवात केली. सुरुवातीची संमेलनं फार म्हणजे फार छान झाली. संमेलनांमधे त्यांना इतकी वाहवा मिळायची की बास... दोघंही एकमेकांवर सॉलिड खुष व्हायचे. मग एक गंमत त्यांच्या लक्षात आली. त्याचं काय व्हायचं, की ते ज्या संमेलनांना जायचे त्याला खरंतर बर्‍यापैकी उपस्थिती असायची... बर्‍यापैकी म्हणजे ४० - ५० लोक. पण यात मजा म्हणजे ४० पैकी ३६ कवी, एक दोन संयोजक, आणि एखाद दुसरा श्रोता! अर्थात चिंट्या मिनीला जशी दाद मिळायची तशी सगळ्याच कवींना मिळायची.... कारण या संमेलनांमधे एक अलिखित नियम असायचा, आपल्याला आपल्या कवितेला दाद हवी असेल तर आपण दुसर्‍या कवीलाही द्यायला हवी! आणि संमेलनात बहुतांशी सगळेच कवी असल्याने सगळ्यांनाच दाद मिळायची! हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी संमेलनांना जाणंही बंद केलं होतं.


थोडक्यात, गेल्या दोन वर्षात त्यांनी कविता खपवण्यासाठी अवलंबलेले सर्वच मार्ग आता बंद झाले होते. वर्तमानपत्रं, मासिकांत प्रयत्न करून झाले होते, मनोगत, मायबोलीवर फेर्‍या मारून झाल्या होत्या. पुस्तक छापून दुकानातून वाटून झाली होती आणि कविसंमेलनांचे रंगमंच झिजवून झाले होते... सगळं सगळं करू झालं होतं... तरीही त्यांच्या कविता खपायला काही तयार नव्हत्या. मधल्या काळात त्यांचं लग्नही झालं होतं आणि आता त्यांच्या संसाररूपी वेलीवर  बाल-हास्याची फुलं बहरण्याचे वेध त्यांना लागले होते. या नव्याने येऊ घातलेल्या जबाबदारीमुळे पोटापाण्यासाठी काही तरी जगन्मान्य उद्योग करणं त्यांना अनिवार्यच होतं... तो अर्थातच ते तसा उद्योग करायला लागले... त्यात दिवसें दिवस अधिकाधिक व्यग्र व्हायला लागले. त्यांचा कवितांचा नाद हळुहळु कमी व्हायला लागला.... आणि बघता बघता एक दिवस त्यांच्या आयुष्यातून कविता नाहिशा झाल्या... म्हणजे कविता कायमच्या खपल्याच म्हणा ना!


- समाप्त


डिस्क्लेमर २ - या कथेतील पात्रं, त्यांचं वर्तन आणि विचार हे संपूर्णतः काल्पनिक आहेत हे डिस्क्लेमर १ मधे मी म्हणालोच आहे. अजून सांगायचं म्हणजे या कथेतून मला काहीही संदेश द्यायचा नाही! कोणाच्याही डोळ्यात झणझणित अंजन बिंजन घालायचं नाही. कोणाच्याही कुठल्याही कृतीचं खंडन अथवा मंडन करायचं नाही. माझा कोणावरही कसलाही रोख नाही (उधार तर नाहीच नाही!). आपल्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यात दोन क्षण हसून घालवता यावेत या एका आणि एकाच हेतूनं मी ही कथा लिहिली आणि खपवली आहे!