आणि कविता खपल्या... (४)

मनोगत सोडून जायच्या आधी एकदा अश्रूभरल्या नयनांनी वगैरे त्या दोघांनी मनोगतावर आपण केलेली प्रतिभेची उधळण पुन्हा पुन्हा डोळ्यांत भरून घेतली. ती उधळण आणि अश्रू दोन्ही डोळ्यांमधे भरून भरून काही दिसेनासं झालं तेंव्हा त्यांनी एकदा शेवटची पान ताजं तवानं करायची टिचकी मारली आणि जाण्याच्या नोंदीवर टिचकी मारणार इतक्यात चिंटुला 'निरोप वाचावे' च्या पुढच्या कंसात १ आकडा दिसला. आपल्याला कोणी बरं काय निरोप पाठवला असा विचार करत करत चिंटुनी निरोपाचा कप्पा उघडला. निरोपाच्या कप्प्यात कोण्या पिंकी नावाच्या मनोगतीचा निरोप होता. मिनीचं आपल्याकडे लक्ष नाही ना हे बघत चिंटुनी तो निरोप उघडला. तो निरोप असा:


नमस्कार चिंटोपंत
क्षमा करा हं... आपल्यासारख्या अतीशय प्रतिभावान साहित्यिकाला 'साष्टांग' नमस्कार न म्हणता मी नुसतंच 'नमस्कार' म्हणाले. काय करणार, आपलं साहित्य वाचून आपल्या बद्दल इतकी आपुलकी वाटते की मनात असे आप-पर भाव येतच नाहीत!


'राधा आणि उशितला कापूस' वाचली. फार्फार सुरेख कविता आहे हो! इतकं सुंदर कसं सुचतं बरं तुम्हाला? एका डांबरट माणसानी त्याचं विडंबन केलं आणि त्या विडंबन वाचुन इतर डांबरट लोक फिदिफिदी हसले म्हणून आपल्या सारख्या अतीशय महान कवीनं असं खचून जाऊ नये ही कळकळीची विनंती. याच डांबरट लोकांनी कित्ती कित्ती महान लोकांना इथून पळवून लावलं आहे. यांच्या अशा वागण्याला बळी पडून आपण इथून जाउ नये अशी विनंती.


आपली (म्हणू ना हो 'आपली' असं?... उगाच राग मानू नका!)


पिंकी


ता. क.
मी नुकतीच 'वाकडी ही वाट वेडी' नावाची गझल कम कविता प्रकाशित केली आहे. वेळात वेळ काढून ती वाचाल का? आपल्या सारख्या काव्य-भास्कराकडून मार्गदर्शनाची चार किरणं मिळाली तर माझं काव्य उजळून निघेल.


हा व्य नि बघून चिंट्याला फार म्हणजे फार भरून पावलं... केली.. कोणीतरी आपल्या प्रतिभेची कदर केली... प्रतिभावान, महान, काव्यभास्कर... वा वा... किती किती सुरेख उपमा या... जे या पिंकीबाईंना कळलं ते इतर कोणाला कसं बरं समजलं नाही अजून... असो... सगळ्यांना थोडीच हिर्‍याची ओळख असते... पारखीच लागतो चांगला त्याला... बघुया बरं या पारखीबाईंची... आपलं पिंकीबाईंची गझल कम कविता.... चिंट्या दिलेल्या दुव्यावर टिचकी मारून गेला:


वाकडी ही वाट वेडी
अन माझ्या पायात बेडी


तू सख्या लपलास कारे
मी इथे आहेच ready


अस्वला वाणी मिठीचा
दे मला गोंडस तू टेडी


बास.... चिंट्याला पुढे वाचवेना.... पिंकी बाई सुटल्याच होत्या... लय नाही, ताल नाही, अर्थ नाही... काही नाही... बाई आपल्या डी वर डी, डी वर डी रचत बसल्या होत्या... वेडी, बेडी, रेडी, टेडी, स्टेडी, खेडी... डी नं संपणारा एकही शब्द (कुठल्याही भाषेतला असो!) बाईनं सोडला नव्हता... चिंट्यानं कविता कम गझलेच्या खाली पाहिलं... तर तिथे चक्क प्रतिसाद दिसत होते! आणि सगळेच 'बरे' प्रतिसाद होते. आता मात्र चिंट्याला चक्कर आली. आपल्या प्रतिभासंपन्न काव्याला हे लोक हुंकारानीही दाद देत नाहीत आणि या पिंकीच्या 'डीडी'ज कोमेडी शो ला भरभरून प्रतिसाद. चिंट्याला फार फार उद्वेग आला. हा भीषण प्रकार सांगण्यासाठी त्यानी शेजारीच बसलेल्या मिनीकडे पाहिलं तर मिनीही तिच्या संगणकावर 'वाकडीही वाट वेडीच' वाचत आहे असं त्याला दिसलं... आणि त्या पुढे एका क्षणात मिनीनंही तशाच उद्वेगभरल्या नजरेनं चिंट्याकडे पाहिलं... दोघांच्या नजरा एकमेकांना भिडल्या आणि क्षणातच या मनीचं त्या मनी पोचलं!


हं.... अशी युक्‍ती आहे होय पिंकीबाईंची... नुसती कविता छापायची नाही तर कविता छापून झाल्यावर लोकांना व्य नि पाठवायचे! त्या व्य नि मधे लोकांची, त्यांच्या प्रतिभेची इ इ लय लय तारीफ करायची.. आणि खाली हळुच आपल्या कवितेचा दुवा द्यायचा... देऊन तो देऊन वर त्यांचं मार्गदर्शनही मागायचं... अजुन थोडं बारकाईनं निरिक्षण केल्यावर त्यांच्या असं लक्षात आलं की पिंकीबाईंनी नुसतेच व्य नि पाठवले नव्हते तर याहू, MSN, ICQ, गूगल टॉक, रेडीफ बोल अशा ज्या ज्या माध्यमातून जमेल त्या त्या माध्यमांतून बाईंनी जमेल तितक्या मनोगतींशी संपर्क साधला होता आणि या सगळ्या काव्यभास्करांना आपल्या मार्गदर्शनपर किरणांची बरसात स्वतःच्या कवितांवर करायची विनंतीही केली होती.


वा... पिंकीबाई वा... मानलं तुम्हाला... आम्हाला कसं बरं हे काही सुचलं नाही आधीच! आता असं बघा कोणाला स्वतःहुन मार्गदर्शन मागितलं तर कोण कशाला वाईट प्रतिसाद देईल उगाचच. शिवाय व्य नि मधे एवढं चढवुन ठेवलेलं असतं की आपल्या मार्गदर्शनाची खरचंच या बयेला गरज आहे असं त्यांना वाटून गेलेलं असतं मग प्रतिसाद हा दिला जातोच.


चिंट्या मिनीला म्हणाला 'आयला, या पिंकीची वाट वाकडी असली तरी ही बाई वेडी नक्की नाही! कसली सॉलिड आयडिया काढलिये राव तिनी...चल मिने... आपणही करुया असंच काही... तू पुरुष मनोगती घे, मी स्त्री मनोगती घेतो... अन दणादण व्य नि पाठवायला सुरुवात करू... चल चल...'


मि: 'चिंट्या, मला नाही पटत हे'


चि: 'ऑ... काय गं... असं काय... काय प्रॉब्लेम आहे याच्यात'


मि: अरे व्य नि पाठवायला काही प्रॉब्लेम नाही... पण त्यात असं कौतुक करायचं दुसर्‍या कोणाचं... ह्या... मला नाही पटत.... अरे आपण दोघं सोडून कोणाला एक अक्षर तरी कळतं का काव्या मधलं? अशी दुसर्‍यांची उगाचच कौतुकं करायला मला नाही जमणार हां.. आणि यांचं मार्गदर्शन कसलं आलंय डोंबलाचं... काव्यभास्कर कसले... काव्यकाजवे आहेत एक एक...


चिंट्याला मिनीचं पटत होतंही आणि नव्हतंही... कविता तर खपल्या पाहिजेत... पण त्या साठी असं काही करायचं तर ते तत्वात काही बसत नाही... फार म्हणजे फार गंभीर पेचप्रसंग निर्माण झाला होता. इतक्यात अजून एक पेचप्रसंग निर्माण झाला. सायबरकॅफेचा तास संपला म्हणून तिथल्या मालकानं या दोघांना तिथून जायला सांगितलं! 


आपल्या आयुष्यात निर्माण झालेल्या या सर्व पेचप्रसंगांवर विचार करत करत दोघंजणं शनिपारपर्यंत आले. तो बहुदा शनिवार असावा... दुपारी बाराची वेळ असावी... दोघंजण शनिपारच्या पायर्‍यांवर बसून आयुष्यातल्या या गहन पेचप्रसंगावर विचार विनिमय करत बसले... थोड्यावेळातच आजुबाजुला तूफान गर्दी जमली....


- क्रमशः