आणि कविता खपल्या... (५)

आपल्या आयुष्यातल्या पेचप्रसंगांवर विचार करत करत दोघं जण भकास अवस्थेमधे शनिपाराच्या पायर्‍यांवर बसले होते. शनिवारचा दिवस, दुपारी बाराची वेळ आणि शनिपाराच्या पायर्‍यांवर बसलेलं हे उध्वस्त अवस्थेमधलं कवी जोडपं... आजु बाजुला तूफान गर्दी जमली होती.. पण त्या गर्दीकडेही त्यांच लक्ष नव्हतं...  (अर्थात गर्दी काही त्यांना बघायला जमली नव्हती! कोणतातरी सण होता म्हणे एक दोन दिवसात, तर त्यानिमित्त चितळ्यांकडे लागलेली रांग वळून पार शनिपारा पर्यंत आली होती त्याची गर्दी होती ती!)


खुप वेळ असं भकास अवस्थेत बसल्यावर त्यांचं स्वगत सुरु झालं!


चिंट्याः मिने काय करुया आता आपण?


मिनीः हो ना, इतके दिवस आपण वाया घालवले आपण कविता खपवण्याचा नादात.. आता काहीतरी केलं पाहिजे रे. आता आपलं लग्न होणार, मग संसार, पोरं, जबाबदार्‍या... किती काळ असे आपण कवितांसाठी वेळ घालवणार...


चिंट्याः खरंय तुझं मिने, पण, पण मी कवितांशिवाय जगू शकत नाही गं... कविता हा माझा श्वास आहे, माझा प्राण आहे, माझा स्पंद आहे. कवितांशिवाय आयुष्य म्हणजे पेन्सीलविना  पाटी, ताटाविना वाटी किंवा लाटण्याविना लाटी....
(आणि चिंट्या हमसुन हमसुन रडायला लागला... अर्थात रडतानाही तो यमकं जुळवल्या शिवाय तो रडत नाही!)


मिनीः रडू नको  रे असा... आपण काहीतरी उपाय शोधुन काढुया... उं... आपण... आपण एक हलवायाचं दुकान टाकायचं का?


चिंट्याः हलवायाचं दुकान?


मिनीः हो, हलवायाचं दुकान... अरे समोर गर्दी बघ ना किती आहे ते, हलवायाच्या दुकानाला मरण नाही... आणि आपण दारावर पाटी लावू, आमच्याकडे श्रीखंड व चारोळ्या मिळतील... लोकांनी श्रीखंड घेतलं की त्यांना तुझ्या चारोळ्या ऐकवायच्या! एक किलो श्रीखंडावर 'चिंट्या मिनीचा' या चारोळ्याच्या पुस्तकाची एक प्रत भेट!


चिंट्याः वा वा... मस्त आईडिया आहे गं! पण १२ महिने रोज कोण श्रीखंड नेणार....


मिनीः मग आपण सिझनल गोष्टींच दुकान टाकुया का.... म्हणजे 'आमच्या कडे _________व चारोळ्या मिळतील' अशी एकच पाटी करुन घ्यायची... आणि त्या गाळलेल्या जागेत सिझन नुसार बदल करायचे.... श्रीखंड, बासुंदी... आंबे, रातंबे, लोणची, पापड... असे सगळे खायचे पदार्थ सिझन नुसार आणि कसलाच सिझन नसेल तेंव्हा पायजमे किंवा परकर...


चिंट्याः ए ही आईडिया सुध्दा मस्त आहे.. एका नव्या परकरावर एक नवी कोरी चारोळी फ्री आणि एक डझन परकर घेतले की एक कविता संग्रह...


मिनीः आणि मग मेंबरशिप स्कीम्सही काढता येतील... परकरच्या सिझनला आमचे परकर घेउन जा, आणि आंब्याच्या सिझनला येऊन २०% डिस्काउंट घ्या...


मिनीः आणि असा डिस्काउंट घ्यायला लोकं आली, की दोन रांगा करायच्या, पायजमे वाल्यांची रांग वेगळी आणि परकरवाल्यांची रांग वेगळी... एका रांगेला माझ्या रोमॅंटिक कविता आणि दुसर्‍याला तुझ्या दुर्बोध कविता ऐकवायच्या...


चिंट्याः हो, जे सलग ३ सिझन असे रांगेत उभं राहुन कविता ऐकतील त्यांना मग आपल्या कार्यक्रमाचा पास फुकट!


मिनीः काय खळबळ माजेल ना गावात, सकाळ मधे बातमी येईल, संध्यानंद मधे रांगेचा फोटो छापुन येइल, मॅटीनी शो बंद पडतील, कॉलेजं ओस पडतील, सगळे अबालवृद्ध हातातली कामं सोडून आपल्या दुकानासमोर रांगेत! येणार्‍या, जाणार्‍या प्रत्येकाच्या हातात 'चिंट्या मिनीचा ' ची एक प्रत!


चिंट्याः बास, ठरलं मिने, आपण असं दुकान टाकुया...


- क्रमशः