फसवून कुठेसा वसंत गेला होता

फसवून कुठेसा वसंत गेला होता
फुललो पण मी, मी करार केला होता

हृदयातच फेसाळले प्रेम जोमाने
(फुटकाच तुझ्या हृदयाचा पेला होता!)

रडलो नव्हतो, मी कशास खोटे बोलू?
अपवाद जगाचा शोकसभेला होता

नुसतीच ढगांची नभात गर्दी झाली
प्रणयातुर वारा तहानलेला होता

"असतोस कुठे?" मी विचारले देवाला
कळले भलते - तो कधीच मेला होता

अवतीभवती मी तुझ्याच होतो तेव्हा
(नव्हता मजला, पण लळा हवेला होता! )

-नीलहंस