खरे म्हणजे शीर्षकात दिलेले उद्गारचिन्ह ही एवढी एकच प्रतिक्रिया होउ शकते हरिश्चंद्रगड या अनुभवाचे यथार्थ वर्णन करायला. बाकी कितीही लिहिले तरी शब्द तोकडे पडतील, पण डोंगरयात्रांची नोंदवही ठेवायची असे ठरवले आहे त्याप्रमाणे लिहितो..
शुक्रवार १२ मे. एक मेच्या जोडुन आलेल्या सुटीमध्ये दोन दिवसांची डोंगरयात्रा करायची राहिलीच होती. त्यामुळे कधी नव्हे ते दोन तीन दिवस आधीच ठरवून कोयनेच्या घनदाट जंगलातला महिमंडणगड किंवा डोंगरयात्रींची पंढरी मानला जाणारा हरिश्चंद्रगड करावा असा बेत होता. महिमंडणगडाच्या घनदाट जंगलात शिरायचे धाडस करायचे तर किमान पाच सहा साथीदार पाहिजेत, ते नाही जमले त्यामुळे मग मी आणि कूल असे दोघेच रात्री साडेनऊच्या पुणे नाशिक आरामगाडीने निघालो.
आळेफाट्याला (९० किमी) उतरलो, आता माळशेजघाटमार्गे कल्याण मुरबाडकडे जाणारे एखादे वाहन शोधणे आवश्यक होते. त्याप्रमाणे काही ट्रकमध्ये प्रयत्न करेपर्यंत बारा वाजता महामंडळाची लाल बसच मिळाली. वाटेत कधीतरी गेल्या एक मेपासून सुरू केलेल्या डोंगरयात्रांची उजळणी केली आणि लक्षात आले की ही आमची चक्क रौप्यमहोत्सवी डोंगरयात्रा / गड होता.
माळशेज घाटाच्या अलिकडे खुबी फाटा लागतो, तिकडे उतरलो. एक वाजून गेला होता पण रस्त्यावर दोन तीन टपऱ्यांवर जाग दिसत होती. तिथुन रस्त्याची खात्री करून घेतली आणि खिरेश्वर या पायथ्याच्या गावाकडे चालू लागलो. एका बांधावरूनच कच्च्या रस्त्याने दूरवर दिसणाऱ्या अक्राळविक्राळ डोंगरांच्या पायथ्याशी मिणमिणणाऱ्या दिव्यांकडे चतुर्दशीच्या चंद्रप्रकाशात आमची वाटचाल सुरू होती. पाठीमागे एक उंटाच्या आकाराचा पहाड सोबत करत होता.
रात्री अडीचला सहा किमी चालून गावाजवळ आलो तसे गाण्याचे सूर ऐकू आले. कोणाकडे तरी अजून जाग होती आणि लग्नानिमित्ताने गाणी चालू होती. तिथूनच बाहेर पडलेल्या दोघांनी जिल्हा परिषदेची शाळा दाखवली, तिच्या ओसरीतच आम्ही पथारी पसरली. पहाटे साडेपाचला उठलो, थोडे बाहेर रस्त्यावर आलो आणि समोर बघतो तर पुणे खिरेश्वर एस्टी !! गावातल्या अक्षय नावाच्या एकमेव टपरीसमोर थांबली होती. चालकही उठतच होता, ही दुपारी चार वाजता पुण्यातून सुटते आणि खिरेश्वराला मुक्कामी राहून पहाटे पुण्याला परतते. तसेच ओतूरहून सकाळी एक गाडी येते आणि दहा वाजता परत ओतूरला जाते. याव्यतिरिक्त साधन नाही, आणि पावसाळ्यात या सुद्धा येत नाहीत. अक्षयच्या मालकांना घरातून उठवून आणले आणि पोहे खाऊन सव्वा सहाला मार्गस्थ झालो. त्यांच्याकडूनच वर चारपाचजणांचे दोन गट गेल्याचेही कळले.
दाट रानातल्या पण सुस्पष्ट पायवाटेने रमत गमत चढण चढत दोन तासात तोलार खिंड गाठली. वाटेत एकदाच दोन फाटे फुटले, बरेच बाण डावीकडे जा असे दाखवत होते तरी तो रस्ता दरीत उतरतो म्हणून आम्ही ( नेहेमीप्रमाणे शहाणपणा करून ) उजवीकडे गेलो आणि कातळाचा एक थोडा अवघड ( आणि पावसाळ्यात अशक्य) ट्रॅव्हर्स सामोरा आला. तो केला आणि मग ती डावीकडची वाट पण पुन्हा येउन मिळाली. मध्ये केवळ एकाच ठिकाणी थोडे पाणी होते आणि पुढे तर अजिबातच नाही, तेंव्हा भरपूर पाणी घेउन निघणे क्रमप्राप्तच आहे.
तोलारखिंड ओलांडुन पुढे न जाता, तिथेच व्याघ्रशिल्पाच्या डाव्या बाजूने थेट उभा कातळ चढायला सुरूवात केली, हाच तो हरिश्चंद्रगडाचा सुप्रसिद्ध 'रॉक पॅच' ! सहाशे फुट उभे चढुन जायचे होते. मध्ये काही ठिकाणी तुटके रेलिंग तर काही ठिकाणी अरुंद खोदीव पायऱ्या आहेत. पण पावसाळा व नंतर लगेचचा काळ सोडल्यास फारशी अवघड नाही ही चढाई. एव्हाना उनही तापले होते, पण आम्ही तयारीत होतो, त्यामुळे विशेष त्रास नाही झाला. तर पहाटे निघाल्यापासून तीन तास, आठ किमी आणि पंधराशे फूट उंची एवढे मार्गक्रमण करून आपण हरिश्चंद्र पठारावर पोहोचतो, पण हा परिसर एवढा प्रचंड विस्ताराचा आहे की 'दिल्ली तो बहोत दूर है' अशीच परिस्थिती असते. अजून दोन तास साधारण पर्वतीएवढ्या पाच लहान मोठ्या टेकड्या चढुन उतरल्या तेंव्हा कुठे त्या हरिश्चंद्रेश्वराचे दर्शन झाले. जागोजागच्या खुणा आणि सुस्पष्ट पायवाट यामुळे रस्ता चुकलो नाही, पण चुकलो तर दिवसभर भटकत ठेवण्याचे 'पोटेन्शियल' या भागात आहे. बालेकिल्ला, तारामती, रोहिदास ही शिखरे डाव्या हाताला ठेवत मंदिर दिसेपर्यंत चालत रहायचे ही सोपी युक्ती म्हणता येईल.
शेवटची पर्वती उतरलो आणि समोरचे एखाद्या प्राचीन वैभवशाली नगरीच्या अवशेषांसारखे दिसणारे दृश्य बघून हरखून गेलो. पूर्ण काळ्या पाषाणातले हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आहे. देवळाला समोरासमोर दोन दरवाजे, त्यांच्या समोर दोन नंदी आणि आत दोन शिवपिंडी. बाजूला सर्वत्र कोरीव खांब व शिला, मंदिराला मागे एक काळा पहाड उतरत येऊन बिलगलेला. त्या पहाडात कोरलेल्या दुमजली गुहा, वरच्या गुहांमध्ये रहायचे तर खालच्या गुहांमध्ये त्या कडाक्याच्या उन्हातही शीतकपाटासारखे थंडगार आणि स्फटिकासारखे निर्मळ पाणी.
हे वैभव कमी म्हणून की काय, बाहेरच पाण्याचे एक मोठे रेखीव कुंड, त्याच्या एका बाजूला काळ्या पत्थरातील देखण्या देव्हाऱ्यांची रांगच. वर टेकाडावर विश्वामित्राचे मंदिर, समोर अजून एक शिवमंदिर. हे बघुन पुढे केदारेश्वराच्या गुहेकडे गेलो आणि भारावून मटकन त्या गुहेच्या छोट्याशा दारातच बसलो. पन्नास फूट लांब , चाळीस फूट रूंद आणि पंधरा फूट उंच अशी बरोबर चौकोनी सुबक गुहा आमच्या पुढ्यात होती, मधोमध चार कोरीव खांब होते, तीन भग्न तर एक सुस्थितीत. त्यांच्या मधोमघ एका पुरुषभर उंचीच्या चौथऱ्यावर अर्ध्या पुरूष उंचीचे शिवलिंग होते, आणि संपूर्ण गुहा कमरेच्या वर येईल एवढ्या पाण्याने दरवाजापर्यंत भरलेली होती, त्या पाण्यात शिवलिंगाचे, खांबाचे, गुहेच्या कानाकोपऱ्याचे लख्ख प्रतिबिंब दिसत होते. डोंगरयात्रेची आवड असो वा नसो , केवळ या केदारेश्वरासाठी इथे यायला हवे असे हे स्थळ आहे.
हे सर्व बघुन मन तृप्त झाले होते, पण पोटाची भूक मात्र भागली नव्हती. जवळच श्री भगवान यांची छोटी कुटी आहे ते शनिवार, रविवार गडावर येउन रहातात, चहा, नाश्त्याची सोय करतात अशी माहिती होती. त्यांच्याकडे पिठले, रस्सा, गव्हाची भाकरी असे यथेच्छ जेवलो आणि तिथेच बाहेर आडवे झालो. समोर कळसूबाई, रतनगड दिसत होते. मुख्य गुहेत आदल्या रात्री आलेले उतरले होते म्हणून मग दक्षिणेकडे जरा वर असलेल्या गणेश लेण्यांकडे गेलो. गणपतीची विशाल मुर्ती असलेली एक गुहा आश्रयासाठी निवडली, तिकडे आमचा सर्व संसार मांडला, आणि हरिश्चंद्रगडाला पाय लागल्याचा आनंद खालच्या गुहेतून थंड पाणी आणून, ग्लुकॉन डी पिऊन साजरा केला. निवांत हरिश्चंद्र अनुभवायचा असे ठरवूनच आलो होतो, त्यामुळे बालेकिल्ला, तारामती, रोहिदास या प्रत्येकी एक तासाच्या वाटचालीच्या शिखरांकडे जाण्याचा विचार अधुन मधुन बोलून दाखवला तरी फारशा गांभीर्याने घेतला नाही.
एव्हाना चंपीराणी नावाच्या एका कुत्रीशी आमची चांगलीच दोस्ती झाली होती, तिला घेऊन सायंकाळी कोकणकड्याकडे निघालो. अर्ध्या तासाच्या पश्चिमेकडच्या नागमोडी वाटचालीनंतर कोकणकड्याला पोहोचलो, चालतांना समोर कडा आहे ते जाणवत होते, पण शेवटाच्या पाच पावलांपर्यंत सुद्धा समोर काय डोळे दिपवणारे जग मांडून ठेवले आहे याचा अंदाज आला नाही. एक किमी लांबीचा इंग्रजी C आकाराचा, उंचीतही अंर्तवक्र असलेला, सरळ कोकणात कोसळणारा कोकणकडा हा एक मंत्रमुग्ध करणारा आविष्कार आहे. किमान पंचवीस लोकांनी काढलेले फोटो पाहिले होते मी, पण या भव्यतेची, सौंदर्याची कल्पनाही आली नव्हती त्यावरून.
कड्यापलिकडचे कोकणातून उगवलेले चित्तथरारक सुळके, दोन्ही बाजूला पसरलेल्या सह्याद्रीच्या भिंती, एका रूद्र पहाडातून कोरलेला माळशेजचा घाट, काय पाहू, किती पाहू असे झालेले, त्यात मलाही हलवणारा भन्नाट वारा.. या सगळ्यातच झालेला सूर्यास्त. मिट्ट काळोख पडला, पण तिकडेच बसून राहिलो अजून तासभर. आता पश्चिमेचा खेळ संपला होता, आणि पूर्वेचे नाट्य सुरू झाले होते. रोहिदास आणि तारामतीच्या मधुन पौर्णिमेचा चंद्र उगवत होता. सुर्योदयाची रंगांची उधळण पाहिली आहे अनेकदा, आज चंद्राची पाहिली. तेवढी रंगीत नाही अर्थात, पण तेवढीच उत्कंठा ताणणारी आणि सुंदर.
कुणी माधव आचवलांचे 'किमया' वाचले आहे का ? तेच जगलो असे म्हणता येईल..
परत फिरलो, आणि साराच माळ, साऱ्या टेकड्या एकसारख्या भासू लागल्या, कुठे पायवाट आहे, कुठे जायचे आहे काही समजेना, बरे हा परिसरही एवढा विस्तीर्ण की एकदा भटकलो की काही खरे नाही, पण नेटाने पुढे जात राहिलो. चंपी मदतीला धावून आली. आम्ही संभ्रमात पडलो की ती जाईल तिथे आणि ती थांबली की आम्ही जाऊ त्या दिशेला असे करत करत अखेर ओळखीच्या खाणाखुणा दिसू लागल्या आणि आम्ही पुन्हा भगवान कडे पोहोचलो, वरणभात आणि बरोबर आणलेली पुरणपोळी खाऊन आमच्या गुहेकडे रवाना झालो. बिबट्या आम्हाला उचलून नेण्याच्या शक्यतेवर जरा चर्चा केली आणि निद्राधीन झालो.
सकाळी उठून बघतो तर खाली देवळासमोर मैदानात एक तंबू. रात्री दोन बहाद्दर गड चढुन आले होते, ही त्यांचीच करामत. त्यांनी बरोबर स्वयंपाकाची भांडी वगैरे पण आणली होती. प्रत्येकी पंधरा किलो वजन नक्कीच आणले असावे. थोर आहेत, नाहीतर आम्ही नुसते वर येउन आयते खाउन दमतो.. परतीची तयारी सुरू केली, पाचनई या गावात उतरणाऱ्या एका वेगळ्या वाटेने जायचे ठरवले होते. वेगळी वाट बघून होईल म्हणून आणि दीड तासातच खाली उतरता येईल म्हणूनही. ही वाटही मस्तच आहे, एका वेगळ्याच कोनातून हरिश्चंद्रगडाचे दर्शन घडवणारी आहे. बारकू नावाच्या तिथल्या एका गुहामानवाबरोबर खाली उतरायला सुरूवात केली, चंपीही पार पाचनईपर्यंत सोबत आली.
पाचनईहून सकाळी सहाला आणि अकराला अशा दोनच बस सुटतात, भंडारदऱ्याजवळच्या राजूर या गावाला जायला. इथे मात्र जरा चूक झाली, हे गाव भलतेच दुर्गम आहे, सर्व बाजूंनी डोंगराने वेढलेले आहे. बस काही बारा वाजले तरी येईना तेंव्हा आम्ही जरा गडबडलो, पुन्हा हरिशचंद्र चढायचा, खिरेश्वराला उतरायचा आणि पुढे सहा किमी खुबी फाट्याला चालत जायचे हे सर्व डोळ्यासमोर दिसू लागले. पण अखेर बस आली, अरूंद घाटातून घरघरत दीड तासात राजूरला पोचलो. पुण्याला जायला बस होती अडीचला. इकडुन लोक का येत नाहीत ते नीटच कळले. राजूरचे प्रसिद्ध पेढे घेतले. तिकडे वर्तमानपत्रात कालच बिबट्याने घराबाहेर झोपलेल्या एका मुलीला मारल्याची बातमी. रात्रीची चर्चा आठवली, गेले दोन वर्ष या ओतूर, कोतूळ, राजूर या भागात नरभक्षक बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. डोंगरयात्रींना नाही अनुभव आला अजून काही, पण तयारी असावी.
खचाखच भरलेल्या बसचा सहा तासाचा अत्यंत कंटाळवाणा प्रवास करून पुण्यात पोहोचलो, ते पुन्हा लवकरात लवकर हरिश्चंद्रगडावर नक्की यायचे असे ठरवूनच. एक रॉक पॅच सोडला तर इतर सर्व बाबतीत जे जे ऐकले होते त्यापेक्षा प्रत्यक्ष अनुभव फारच सरस आले, त्यातली एक एक गोष्टही हरिशचंद्रावर पुन्हा पुन्हा निवांत जावे अशी मनाला ओढ लावणारी. काही प्रकाशचित्रे व चलतचित्रे घेतली आहेत, ती लवकरच कुठेतरी देईन, पण अनुभवाची सर त्यातल्या कशालाच नाही...!